स. पो. नि. : हां झावरे, बोलवा पुढची केस.. काय केलं ह्यानं? काय रे, काय म्याटरहे?
तो : नाही साहेब, काही नाही!
स. पो. नि. : हरा-बीप, मा-बीप.. आम्हांला काय चू-बीप समजतो काय? काय नाय बोल्तो..
lok01पो. ह. : सायेब, टीव्ही पोग्रामवाली पार्टी हाय ही..
स. पो. नि. : मग काय सेक्शन लावलंय? ३५४ का ३७७?
पो. ह. : नाय सायेब, रेपचं प्रकरन नाय. ऑब्शिनिटीची तक्रारहे. प्रतिवादीचं म्हन्नं असं, की वादीनी काहाडलेल्या पोग्राममधून समाजावर वाईट परिनाम होत असून त्यामुळे संस्कृतीचा भंग होत आहे.
स. पो. नि. : नाव काय म्हटलं?
पो. ह. : सायेब, झावरे!
स. पो. नि. : टीव्ही पोग्रामचं नाव विचारलं मी झावरे. नाव बोल रे सा-बीप.
पो. ह. : सायेब, लय टपराट नाव ठेवलंय सा-बीप-नी! घरात फ्यामिलीफुडंपन घेऊ  शकत नाही. नाव काढलं तरी फ्यामिली अंगावर येते. आद्दी च्यानेल बदला म्हन्ते! सालं, बातम्या लावल्या तरी तेच.. असा कार्यक्रम लावला तरी तेच! मान्सानं काय नुस्तं बिग बॉसच पाहावा काय..? घरात, ठाण्यात अन् टीव्हीतपण?
तो : साहेब, विनोदी कार्यक्रम आहे आमचा..
स. पो. नि. : इथं आम्ही काय येड-बीप बसलो का रे भा-बीप? इथं या तक्रारीत नाव काय लिहिलंय? आं? भें-बीप, झूट बोल्तो! असा बांबू बीपबीपबीपबीप! तुझ्या बीपबीपबीप..! चल, स्टोरी सांग.. शिरियलची!
पो. ह. : काय सायेब, शिरियलला कधी श्टोरी असती का फिक्स? तुम्ही पन काय पन विचारता..
स. पो. नि. : आं? मग पाच- पाच र्वष आमची फ्यामिली काय पाहाते शिरियलमधी? फसवनूक करता का रे पब्लिकची? झावरे, सा-बीप-ला ४२० अन् १२० ब लावा..
तो : तसं नाय साहेब, सीरियल नाही ही. चर्चेचा कार्यक्रम आहे- विनोदी..
पो. ह. : सायेब, कस्ला विनोदी! नुस्ती टिंगलटवाळी! पब्लिकमधी पार पँटीच काढतात एकमेकांच्या तिच्यामा- बीपबीप..
स. पो. नि. : काय बोल्ता, तिच्या- बीपबीप.. आऊटरेजिंग द मॉडेश्टी?
पो. ह. : आं? तसंपन आसंल! पन पँटी काढतात म्हणजे मापं काढतात! लई घान घान बोलत असत्यात तेच्यामा- बीपबीप!
स. पो. नि. : भांडता का रे पोग्राममध्ये? सार्वजनिक शांततेचा भंग करता?
तो : नाय साहेब, भांडत नाही, पण वाद घालतात. आरोप करतात. एकमेकांचे पाय खेचतात..
स. पो. नि. : म्हंजे फिजिकलपन होतात?
तो : नाही साहेब, पाय खेचतात म्हणजे खरे खरे नाही. हा मराठी वाक्प्रचार आहे साहेब.
स. पो. नि. : आम्हाला मराठी शिकवतो का रे भ- बीपबीप, बीपबीपबीप? टायरमधी टाकून बीपबीपबीप आणि बीपबीपबीप!
पो. ह. : साहेब, तक्रारीत म्हटलंय लय अश्लील बोलतात.. मागचं-पुढचं सगळं काढून एकमेकांवर राळ उडवतात.. इंग्रजीत शिव्यापन देतात.. हरामजादे-बिरामजादे असं कायपन..
स. पो. नि. : हराम- बीप, इथं घरात पोरंबाळं टीव्ही पाहत असतात. त्यांच्यासमोर अश्लील अश्लील शिव्या देऊन भारतीय संस्कृती बिघडवतो का रे सा- बीप? झावरे, याला अशी कलमं लावा, की पाच र्वष सडला पायजे आतमधी. कोणी समाजातल्या संस्कृतीची आय-भैन काढील तर आपण त्या भ- बीपबीप-ला असा सोडणार नाय!
तो : खरंच साहेब, तसं काहीही नाहीये आमच्या कार्यक्रमात. साधा विनोदी कार्यक्रम आहे.
स. पो. नि. : कलाकार कोण आहेत?
तो : कलाकार नाहीत साहेब. विषयानुसार बोलवतो आम्ही.. मग ते एकमेकांवर टीका करतात, विनोद करतात..
स. पो. नि. : हां. त्यांचीच नावं सांग..
पो. ह. : सायेब, त्यांचं जाऊ  द्या. त्यांना या केसमधी नका घेऊ.. जरा.. भारी जाईल सायेब!
स. पो. नि. : आयच्या गावात झावरे, आपन सिंघम हाय सिंघम! कोणाला घाबरत नाय! पन आपली एक क्युरॉशिटी म्हनून विचारतो.. का?.. भारी का जाईल?
तो : साहेब, कलाकार नसतात आमच्या कार्यक्रमात. फक्त पोलिटिकल नेत्यांना बोलावतो आम्ही.
स. पो. नि. : आं? नेत्यांना? अहो, मग साहेब, तसं सांगायचं ना आधीच! पण प्रोग्राम काय असतो तुमचा?
तो : एचआयपीपी!.. होल इंडिया पोपटपंची!!
स. पो. नि. : हां, ते कळलं. पण कार्यक्रम नेमका असतो काय?
तो : फार विशेष नसतं साहेब. कुटुंबाने एकत्र बसून पाहण्यासारखा नसतो हे खरं. पण..
स. पो. नि. : हो.. पण असतं काय त्यात? नाही म्हणजे तक्रार आलीय ना ऑब्शिनिटीची.. चौकशी करायला पाहिजे ना आम्हालापण!
पो. ह. : तेच तर सांगतोय सायेब, लय वाईटसाईट बोलत असतात एकमेकांबद्दल.. शिव्या देतात, पाय खेचतात, टिंगलटवाळी करतात.. लोक हसतात नंतर. पण फ्यामिलीनी बघण्यासारखं नसतं सायेब ते..
स. पो. नि. : हो.. पण त्याच्यात काय असतं?
तो : साहेब, फक्त राजकीय चर्चा!!

कठीण शब्दार्थ :
सपोनि – साहाय्यक पोलीस निरीक्षक
पोह – पोलीस हवालदार
तो – कोणीही कलाकार
बीपबीप- बीपबीप.
(वाचकांस नम्र सूचना- कृपया, उपरोक्त उताऱ्यातील बीपबीप या शब्दांच्या ठिकाणी आपल्या मनातील शब्द टाकून अॅडिशन घेऊ  नये. त्यामुळे भारतीय संस्कृतीस काळिमा लागल्यास ते आमच्या कानी नाही!
– अ. ब.)lok02