17 February 2019

News Flash

राजकीय चारित्र्य बदलावे लागेल!

सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे, दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंना साध्य झाली होती. त्यांनी ४६ वर्षांपूर्वी

| November 25, 2012 01:45 am

सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे, दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंना साध्य झाली होती. त्यांनी ४६ वर्षांपूर्वी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. संघटनेचे नेतृत्व ते एकटेच करतील आणि सेनापतींचा आदेश कुणाही शिवसनिकाला डावलता येणार नाही, हे त्यांनी प्रथमतच स्पष्ट केले होते. संघटनेत ‘लोकशाही’ किंवा ‘सामुदायिक नेतृत्व’अशा निर्थक कल्पनांना वाव असणार नाही ही गोष्ट ते प्रारंभापासून स्पष्टपणे मांडत. पुरोगामी महाराष्ट्रात संघटनांतर्गत लोकशाही नाकारणे, आदेश पद्धतीचा मनोमन स्वीकार करणे, कामगारांच्या संपांना विरोध करणे, श्रमिक वर्गाची एकजूट मोडणे या गोष्टी जनतेच्या पचनी पडतील असे त्या काळात कुणाला वाटले नव्हते. शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट हे पक्ष १९६६-६७ काळात प्रभावी होते. देशाच्या राजकारणात अँटीकाँग्रेसिझमचा जमाना सुरू झाला होता. त्यामुळे शिवसेनेसारखी संकुचित वैचारिक धारणेची संघटना समाजमनात मूळ धरू शकणार असेच सर्वाना वाटत होते.
डावे पक्ष तर शिवसेनेबाबत अगदीच बेसावध राहिले. शिवसेनेबाबत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सौम्य धोरण घेत. किंबहुना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अंतस्थ पाठिंब्यावर शिवसेनेचा खेळ उभा आहे असे बोलले जायचे. त्यात तथ्यही होते. वेळप्रसंगी सरकार पाठीशी उभे राहील अशा अपेक्षेने मुंबईतील गुन्हेगार जगत शिवसेनेकडे झुकले. शिवसेनेतून फुटू इच्छिणाऱ्या पुढाऱ्यांना या गुन्हेगारांचा धाक वाटत असे. छगन भुजबळ यांना शिवसेना सोडल्यानंतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अज्ञातवासात राहावे लागले होते. याउलट इतर पक्षांमधून बाहेर पडणारे निर्धास्तपणे बाहेर पडू शकत. तेही संधिसाधूच असत. पण त्यांना स्वपक्षीयांकडून जिवाला धोका होईल असे कधी वाटत नसे. जनता पक्षातून फुटलेले एक आमदार सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात तात्काळ मंत्री झाले. पण जनता पक्षाचे कार्यकत्रे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करतील असे त्यांना कधी वाटले नाही. शिवसेना अखंड राहिली ती काही अंशी अशा बाह्य़ शक्तींमुळे!

राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने शिवसेनेसमोर फुटीचे आव्हान उभे राहिले. कारण ते होते ठाकरे घराण्यातील. बाळासाहेबांना गांधी किंवा पवार घराण्यांची घराणेशाही खुपायची. याउलट त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरे घराण्याची घराणेशाही विनासंकोच निर्माण केली.
अनंत विसंगतींनी परिपूर्ण असलेली शिवसेना इतकी वष्रे कशी टिकून राहिली हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक यक्षप्रश्नच आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या राजकारणाचे दोन पदर होते. एक पदर होता डाव्या राजकारणाचा, अँटीकाँग्रेसिझमचा! दुसरा पदर होता मराठी भाषिकांच्या अस्मितेचा. महाराष्ट्र राज्य निर्माण झाले ते समितीच्या प्रखर आंदोलनामुळे. मुंबई शहरदेखील महाराष्ट्र राज्यातच राहिले. पण मुंबईत मराठी माणूस गौणच राहिला होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती विसर्जति झाल्यानंतर मराठी माणूस असमाधीनच होता. मुंबई मिळूनही महानगरात मराठी माणूस सूत्रे हलवत नव्हता. या मानसिकतेला बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला. समितीच्या आंदोलनाचा उत्तर पक्ष किंवा शेवटचा टप्पा म्हणून शिवसेना पुढे आली. विशेषत: प्रजा समाजवादी पक्षाबरोबर (बॅ. नाथ प, साथी मधू दंडवते) राजकीय युती झाल्यानंतर शिवसेनेचे नीतिधर्य अधिकच उंचावले. प्रजा समाजवादी मंडळींमध्ये सुप्त कम्युनिस्टद्वेष होता. त्यामुळे कम्युनिस्टद्वेष हा धागा दोघांना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरला. पुढे मराठी माणूस आणि कुणाचा तरी द्वेष या भांडवलावर शिवसेनेची वाटचाल सुरू झाली. मुंबई शहरातल्या श्रमिक वर्गाचा प्रभाव नष्ट करायला शिवसेना हे माध्यम उपयुक्त आहे हे भांडवलदार वर्गाने हेरले. तसेच डावे पक्ष व त्यांचे नेतृत्व संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेचा चातुर्याने वापर केला.
आणीबाणीचा काळ
आणीबाणीला शिवसेनेने जाहीर पािठबा दिला. आणीबाणीला विरोध केला असता तर इंदिरा गांधींनी शिवसेनेच्या नेत्यांना तुरुंगात टाकले असते. बचावात्मक पवित्रा घेतल्यामुळे बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा १९ महिन्यांचा तुरुंगवास टळला. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसविरोधी राजकीय पक्षांनी मुंबईत जनता पक्षाच्या रूपाने आपले स्थान निर्माण केले. शिवसेना काही काळ निष्प्रभ झाली. नंतर बाळासाहेबांच्या मनात जनता पक्षाबरोबर युती करावी असा विचार घोळत होता. जनता पक्षातील एक गट त्याला अनुकूलही होता. पण मृणालताई गोरेंच्या गटाचा शिवसेनेबरोबर जायला तीव्र विरोध होता. सेनेला कुणीतरी साथीला हवे होते. शेवटी बाळासाहेबांनी भाजपबरोबर युती करून हिंदुत्ववादाचा स्वीकार केला.
काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसविरोधी पक्ष यांच्या विसंगतींचा लाभ घेत शिवसेना वाढली. स्वत:ची अशी ठाम व दीर्घकालीन भूमिका नसल्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेणे त्यांना शक्य होते. १९८० सालानंतर देशात विचारशून्यतेचे वादळच आले. बाबरी मशिदीचा विध्वंस आणि मंडल आयोग या दोन महत्त्वाच्या घटनांमुळे देशातील राजकारणाचे रंग अंतर्बाह्य़ बदलले.
युतीची सत्ता
भाजप व शिवसेना युतीला महाराष्ट्रात एकदा सत्ता मिळाली. तथापि युतीचा कारभार काँग्रेसपेक्षा वेगळा नव्हता. काँग्रेसच्या सरकारइतकाच युतीचा भ्रष्टाचार ठळकपणे लोकांना जाणवत होता. आता अँटीकाँग्रेसिझमचे आकर्षण उरलेले नाही. १९९५ साली युती सत्तेवर आली नसती, तर मात्र आगामी काळात महाराष्ट्रात युती सत्तेवर येण्याची शक्यता होती. सद्यस्थितीत काँग्रेस वा काँग्रेसेतर पक्ष या दोघांवरचाही जनतेचा विश्वास उडालेला आहे.
योगदान
प्रारंभीच्या काळात शिवसेना हा एक राजकीय पक्ष बनला नव्हता. तेव्हा बाळासाहेबांनी संघटना वाढवण्यासाठी अफाट कष्ट घेतले. चाळीचाळीत जाऊन ते बठका घेत. माणसे जोडत. विशिष्ट वर्ग, जातीसमूह, घराणी यातून पारंपरिक नेतृत्व पुढे यायचे. त्यांनी हे समीकरण मोडून काढले. दबलेल्या समूहातून त्यांनी नवीन कार्यकत्रे, नवे चेहरे पुढे आणले. त्यांना आक्रमक बनवले. हे त्यांचे योगदान मानावे लागेल.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारंपरिक बाज बदलला. लोकांच्या लहानसहान सुखदु:खात सहभागी होण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळाली. काल्पनिक शत्रू निर्माण करून द्वेषमूलक राजकारण राजकीय ऊर्जा देते. विवेकी राजकारणात अनाक्रमकता असल्याने तेवढी ऊर्जा नसते. बाळासाहेब वाद निर्माण करून कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण करत.
व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े नेतृत्वासाठी आवश्यक असतात. पण केवळ नेत्याच्या व्यक्तिमत्त्वावर संघटना उभ्या राहत नाहीत. बाळासाहेबांची दोन ठळक वैशिष्टय़े होती. राजकारणात अतिशय आक्रमकता, पण व्यक्तिगत संबंधात मात्र निरागस जिव्हाळा. या माध्यमातून ते माणसे जोडत. म्हणून त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. त्यामुळेच तर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता.
पोकळीचा सिद्धांत
प्रथेप्रमाणे बोललो तर आपण चुकणार नाही, या भावनेने काही तथ्यहीन विधाने केली जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात, सांस्कृतिक जीवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे असे म्हणण्याची चढाओढ लागली आहे. पण ते खरे नाही. बाळासाहेबांचे निधन निसर्गनियमानुसार झाले. ज्याला आपण रोज पाहतो, ऐकतो त्याचे नसणे हे धक्कादायक असतेच. तथापि काळाच्या ओघात त्या व्यक्तीच्या नसण्याची सवय होते. जीवनात नित्य टिकणारे असे काहीच नसते. रोज परिवर्तन असते. एखाद्या नेत्याच्या जाण्यानंतर कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असे म्हणणे हे एकाअर्थी त्या व्यक्तीला कमीपणा आणणारे आहे. ती व्यक्ती मागे काहीतरी संचित ठेवूनच गेलेली असते.

आव्हाने
बाळासाहेब थोर होते. तरीही तेदेखील एका विशिष्ट कालखंडातील परिस्थितीचेच अपत्य होते हे लक्षात घेतले पाहिजे. आगामी काळ हा वेगळा असणार हे मान्य केले पाहिजे. भविष्यकाळात त्यांची सही सही नक्कल करून प्रतिबाळासाहेब निर्माण होणार नाहीत. त्यांच्याकडून लोकसंग्रहाची प्रेरणा घेऊन शिवसेनेला पुढील प्रवास स्वबळावरच करावा लागेल. १९९१ सालानंतर नव्या पद्धतीची भांडवलशाही व्यवस्था देशात आली. भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न पडू लागले. परंतु प्रचंड विषमता, कमालीचे दारिद्रय़, जातिव्यवस्था, धर्मद्वेष, भाषाद्वेष यांचे ओझे पाठीवर घेऊन भारत महासत्ता बनू शकणार नाही.
गतिमान आíथक विकास, भ्रष्टाचाररहित सार्वजनिक जीवन या गोष्टींना पर्याय नाही. आगामी काळात उद्ध्वस्त झालेली शेतीची अर्थव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. बाळासाहेबांनी या आव्हानांना कधी सामोरे जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांचे राजकीय वारस उद्धव ठाकरे यांना ही आव्हाने नजरेआड करून शिवसेनेची पुढील वाटचाल करता येणार नाही. त्यांना प्रथम हे ठरवावे लागेल, की शिवसेना केवळ प्रादेशिक अस्मिता व भावनाप्रधान प्रश्न घेऊन पुढील वाटचाल करायची, की जागतिक कसोटय़ा लावून विकासाचा कार्यक्रम हाती घ्यायचा. अर्थपूर्ण राजकारण करायचे असेल तर शिवसेनेला राजकीय चारित्र्य बदलावे लागेल. तत्काळ बदल होणार नाही. पण नवी दिशा घेण्याशिवाय शिवसेनेच्या समोर अन्य पर्याय नाही.
शिवसेना उमेदवाराची जात पाहून तिकीटवाटप करत नाही, ही बाब स्वागतार्हच आहे. तो बाळासाहेबांचा राजकीय वारसा आहे. त्याचे पालन करणे आवश्यकच आहे. जातीय समीकरणांचा आधार घेऊन राजकारण करण्याचा काळ हळूहळू संपत जाईल. पण जातिव्यवस्थेचा अंत केल्याशिवाय भारताला भविष्य नाही. बेकारी निर्मूलन ही मोठी समस्या आहे. त्यासाठी सर्वसमावेशक अर्थव्यवस्था असावी लागेल. निदान या सर्व समस्यांचे व्यापक भान शिवसेना नेत्यांना संपादन करावे लागेल.
शिवसेना जुन्या शैलीने पुढे जाणार असेल तर मात्र त्यांना राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर जीवघेणी स्पर्धा करावी लागेल. भविष्यात शिवसेना व मनसे यांचे मीलन होणार का या प्रश्नाची सध्या जोरात चर्चा चालू आहे. राज ठाकरे यांना हे मीलन मनापासून हवे आहे काय, हे त्यांनाच ठाऊक. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, मनसे शिवसेनेत विलीन झाली तरच राज ठाकरे नेतृत्व करू शकतील. नजीकच्या भविष्यात असे काही घडेल असे संभवत नाही. शिवसेना हे मूळ अधिष्ठान असल्याने मनसे शिवसेनेत विलीन झाल्याशिवाय एकत्रीकरणाला प्रारंभ होऊ शकत नाही. याला दुसरा पर्याय नाही. भारतीय राजकारणाचा इतिहास पाहता एकदा फुटल्यानंतर जुने पक्ष पुन्हा कधी एकत्र आले नाहीत. समाजवादी एकदा फुटल्यानंतर परत कधी एक झाले नाहीत. जनता पक्षाचे व कम्युनिस्टांचेही तेच झाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वक्षमतेविषयी शंका घेण्याची सध्या लाट उसळली आहे. पण मला मात्र तसे वाटत नाही. त्यांची उदारमतवादी प्रवृत्ती आणि शिवसेना शैली यांची नाळ कधी जुळणार नाही असे बोलले जाते. पण नव्या परिस्थितीत कात टाकून नव्या रूपात शिवसेनेला उभे करण्याचे सुप्त सामथ्र्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे असे वाटते. बाळासाहेबांना त्यांच्या अखेरच्या काळात त्यांनीच आधार दिला, हे विसरून चालणार नाही. त्यांचे सुप्त सामथ्र्य पाहूनच बाळासाहेबांनी त्यांच्याकडे वारसा सोपवला असावा. बाळासाहेबांच्या जजमेंटवर शिवसनिक नक्की विश्वास ठेवतील असे वाटते.

First Published on November 25, 2012 1:45 am

Web Title: political character tobe change
टॅग Politics