27 November 2020

News Flash

कार्यकर्त्यांनी ‘पालख्या’ उचलणे बंद करावे

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय.

| March 30, 2014 01:01 am

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांना समानअर्थी शब्द झालाय. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेसुद्धा पराकोटीचे मतभेद झाल्यावर बंडखोरीच्या भाषेनंतर अपमान गिळताना ‘मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी निष्ठेने पाळेन,’ असं(च) म्हणतात.
अशावेळी प्रश्न पडतो तो हा, की ‘सामान्य कार्यकर्ता’ म्हणजे नेमका कोण? पक्षातली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जेव्हा म्हणतात की, मी ‘सामान्य कार्यकर्ता’- तर मग त्यांच्यापेक्षा चार पायऱ्या खाली असणाऱ्यांना काय म्हणायचे? की उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना ‘मी चार पायऱ्या खाली उतरतोय’ असं सांगायचे असते? की ‘मला तुम्ही एवढे सामान्य समजत असाल तर मग प्रश्नच संपला!’ असा गर्भित वगैरे इशारा द्यायचा असतो?
थोडक्यात- ‘सामान्य कार्यकर्ता’ ही भाषणात, घोषणांत अत्यंत मूल्यवान असलेली गोष्ट- प्रत्यक्षात मात्र खोगीरभरती, हरकामे, निष्ठेची नशा चढलेले सरफिरे, आपल्यातल्या न्यूनगंडाला स्वामीभक्तीची झालर लावून ती जळीस्थळी दिसेल अशा धडपडीत असणारे. याशिवाय साहेबांची हरप्रकारे ‘मर्जी’ सांभाळणारे; दादा, भाई, नाना, तात्या, भाऊ यांचे सर्व प्रकारचे ‘हिशेब’ सांभाळणारे; त्यांच्या विरंगुळ्याची सोय पाहणारे आणि सत्ता, संपत्ती, दहशत यांच्या नशेत तरंगणाऱ्या या सर्वाना रात्री खांदा देऊन पलंगावर नेऊन झोपवण्यापर्यंत सगळी कामे हे सामान्य कार्यकर्ते करतात. नेत्यांच्या ‘सौ’सुद्धा अशा कार्यकर्त्यांना सख्खा भाऊ, भावोजी अशा नात्यात बांधून ‘लक्ष’ ठेवण्याची सोय करतात. त्यामुळे वेळप्रसंगी वहिनीसुद्धा पाच-दहा हजाराला ‘नाय’ म्हणत नायत!
यापलीकडेही सामान्य कार्यकर्त्यांची एक वेगळी जमात असते. ती बऱ्याचदा पक्षाच्या विचारधारेकडे आकृष्ट होऊन विचारांना.. पर्यायाने पक्षालाच निष्ठा वाहणारे असतात. हे थोडे शिक्षित, वाचनाची आवड, तोंडपाठ संदर्भ, पक्षाच्या मूळ विचाराला अनुसरून साधी राहणी, विचारांसाठी पूर्णवेळ कार्यकर्ते झालेले हे घरावर तुळशीपत्र ठेवून किंवा नांगर फिरवून आलेले असतात! पंचविशी-तिशीत पक्षात आलेले हे कार्यकर्ते पक्ष-कार्यालयातल्या साध्याच खुर्चीत बसल्या जागी म्हातारे होतात. तरीही निष्ठा कायम. कधीतरी येता-जाता मोठय़ांनी (म्हणजे मोठय़ा नेत्यांनी) नावाने एकेरी हाक मारून दखल घेतली तरी यांचा जीव धन्य होतो. हे बाजूच्याला सांगणार- ‘बघ! विसरले नाय!’ या अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ‘काळ’ जणू थांबलेला असतो. त्यांना वाटते, आपला पक्ष, नेते अजूनही त्याच जुन्या, पक्षाच्या मूळ प्रेरणेनेच राजकारण, सत्ताकारण करताहेत. बाहेर जग काहीही म्हणो, आपण खांद्यावरचा झेंडा, आदरणीय- माननीयसह कायम खांद्यावरच ठेवला पाहिजे. त्यांच्या आयुष्यात काळ हा असा अचानक थांबलेला नसतो; त्याला इतिहास असतो.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सचोटीने काही करून ‘बदल’ घडवण्यासाठी, पक्ष, संघटना वाढवण्यासाठी कुणा साहेबांचं भाषण ऐकून, कुणा साहेबांचा लोकसंग्रह पाहून, कुणा साहेबांचं सत्तेतलं वजन पाहून, तर कुणा साहेबांचं कला-संस्कृती-खेळ यांवरचं प्रेम पाहून, पक्षाची जाज्ज्वल्य भूमिका पाहून, संघटनेच्या राडा करण्याच्या दहशतीवर भुलून, कधी आपला धर्म, कधी आपली जात, कधी प्रांत, तर कधी भाषा यांना गोंजारणारे कार्यकर्त्यांना प्रामाणिक, ध्येयनिष्ठ वाटतात आणि ते प्रचंड ऊर्जेनं त्या पक्षात सामील होतात. आंदोलनांत पुढाकार घेतात. स्वखर्चाने पोस्टर्स (आता फ्लेक्स) लाव, आपल्यापेक्षा सर्वार्थाने गरीब कार्यकर्त्यांना चहा-भजी दे, वेळोवेळी स्वखर्चाने फोन, प्रवास करून ‘वरती’ अहवाल दे, बंगल्यावर किंवा पक्ष- कार्यालयात मोठय़ा साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश मिळाला आणि ते सर्वासमोर म्हणाले, ‘आला आमचा वाघ! हे बघा उद्याचे नेते.. तू भेटतोयस बघ मला लौकरच असेंब्लीत.. अपोझिशनवालेपण तुझ्याबद्दल चांगलं बोलतात.. मीडियाचा लाडका झालायस तू..’ वगैरे वगैरे वाक्यांनी शहारून, फुलून जाण्याचा तो काळ असतो. एखादा संकेत मिळतो का, या आशेने हुरळूनही जायला होते. कामाचा वेग वाढत जातो. लक्षणीय होतो. पक्षबांधणीसाठी विविध पदे तयार होतात. आपल्याशिवाय कोण होणार, हा प्रामाणिक आत्मविश्वास असतो. पण पदे जाहीर होतात आणि आरसा तडकून प्रतिमेचंच भंजन व्हावं, तसं होतं. तो कुठेच नसतो, किंवा हवा म्हणून ठेवलेला असतो!
मग खांद्यावर हात ठेवून त्याला समजावले जाते.. ‘काय आहे- तू, मी, तो, हा सगळे आपण एकाच जातीचे. बाहेर चित्र वेगळे दिसायला पाहिजे म्हणून ‘त्याला’ बसवलाय! घटनात्मक मजबुरी. नायतर तुझ्यासमोर तो काय!’ पुढे निवडणुकांतही हेच. ‘अरे, या वेळी ते हे, अरे या वेळी ते.’ खांद्यावरचा हात निघत नाही. उलट त्याचा दाब वेगळ्या अर्थाने वाढतो. वर पुन्हा : ‘हे बघ- पक्ष माझ्यावर, आमदार-खासदारांवर नाही, तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर चालतो!’ तरीही तो ‘डावा खांदा’, ‘उजवा खांदा’ अशी विशेषणं झेलत आणखी दहा-वीस र्वष काढतो. आता परतीचे रस्ते बंद झालेले असतात. बायकोच्या पगारात घर चालते. कधीतरी याच्याकडून चार पैसे येतात. बायका-मुलांच्या इच्छा-आकांक्षांना नजरेआड करण्यासाठी पेपरवाचनाचे नाटक करावे लागते. कानावर पडणारे शब्द कानात शिसं ओततात. डोळ्यांत पाणी येतं. पण शिस्तबद्ध कार्यकर्त्यांसारखं ते पटकन् माघारी फिरतं.
आज तिरमिरीत जाऊन निकाल लावावा म्हणून तो निघतो. पोहोचतोही बंगल्यावर. आणि त्याला दिसतं- ‘बाळराजे’ किंवा ‘ताईं’चा राज्यारोहण सोहळा. सर्व अवसान गळून तो भानावर येतो तेव्हा कळतं- आज खांद्यावर तो हात नाही, तर बाळराजे/ताईंच्या पालखीचा दांडा आहे!
देशाच्या साठ वर्षांहून अधिक काळातल्या आपल्या संसदीय राजकारणात जवळपास सर्वच पक्षांत ‘तो’ आहे. अगदी कम्युनिस्ट पक्षातही. आणि दिवसेंदिवस अशा कार्यकर्त्यांची परिस्थिती कठीण होत आहे.
अगदी पक्षनिहाय पाहिलं तरी ज्यांनी राहुलला स्कूलबसने किंवा शालेय गणवेशात पाहिलं, त्यांनीच त्याला ‘राहुलजी’ म्हणायचं! उद्धवला अध्र्या पँटीत पाहिलेल्यांनी ‘उद्धवजी’ म्हणत आदित्यलाही हात जोडायचे! सतत निवडणुका जिंकणाऱ्या साहेबांना त्यांच्या पश्चात लोकसभेवर पाठवायला पक्षात आणि मतदारसंघात फक्त ‘सुप्रिया’च लायक वाटते! मुंडेंनाही मुलगी, जावईच ‘उमेदवार’ वाटतात! गांधी घराण्याला नावं ठेवत जे राजकारणात पुढे आले त्या मुंडे-महाजनांची मुलेच उमेदवारी द्यायला सापडतात! परवा कलमाडी निर्लज्जपणे म्हणाले, मला नाही तर माझ्या बायकोला द्या उमेदवारी. तिच्यावर आरोप नाहीत! तेच अशोक चव्हाणांचं. लालूंनी राबडीला रसोईतून उठवून सीएमच्या खुर्चीत बसवले त्याची चेष्टा होते आणि मग उद्धव व त्यामागोमाग आदित्य हे काय? मुलांच्या या थेट राजकारणप्रवेश व आमदारकी, मंत्री होण्यावर मागे एका मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले, ‘मग? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा वकील, उद्योगपतीचा उद्योगपती; तर आमची मुलं का नाहीत?’ असावीत ना भुजबळसाहेब. पण डॉक्टरचा मुलगा एमबीबीएस होऊन, वकिलाचा लॉ करून व सनद मिळवून आणि उद्योगपतीचा बिझनेस स्कूलमध्ये जाऊन मग पिढीजात ‘पद’ घेतो. समीर-पंकज भुजबळ, नीलेश-नीतेश राणे, पंकजा मुंडे, पूनम महाजन, मिलिंद देवरा, विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्या वयाएवढी र्वष पक्षाचं काम केलेले निष्ठावान कार्यकर्ते यांच्या पक्षात आहेत; मग त्यांना डावलून यांना का संधी?
आम्ही लोकशाही स्वीकारली, पण रक्तातली सरंजामी गेली नाही. संस्थानं खालसा झाली आणि लोकशाही मार्गाने नवी तयार झाली. पूर्वी राजमहाराजांचं निधन झालं की त्यांच्या बायका सती जात. नव्या लोकशाहीतले राजेमहाराजे गेले की त्यांच्या बायका वारसाहक्काने तिकीट मागतात. पक्ष देतोही आणि सहानुभूतीची लाट प्रसंगी यशस्वीही होते. हा सगळा लोकशाहीच्या नावावर चाललेला सरंजामी खेळ थांबवू शकतात ते सर्व पक्षांतले सामान्य कार्यकर्ते. ‘वर्षांनुवर्षे सतरंज्या उचललेल्यांनी आता एकत्रितपणे ताठ मानेने पक्षनेतृत्वाला सांगायला पाहिजे- मुलाला/मुलीला आणताय राजकारणात? आधी सतरंज्या उचलायला लावा, चहा सांगायला सांगा, पूर्णवेळ काम करायला सांगा. पोलिसांचा मार खायला नि खटल्यांचं खटलं मागे लावून घ्या म्हणावं. मग द्या तिकीट. नेत्यांची पोरं-पोरी मोठी होणार, ती तिकीट घेणार. या पक्षातून त्या पक्षात आले- मिळाले तिकीट!
‘दीवार’ चित्रपटात कॉलगर्ल परवीन बाबी अमिताभला विचारते, ‘नाम नहीं पुछोगे?’ अमिताभ थंडपणे म्हणतो, ‘तुम जैसी लडकीयां नाम ऐसे बदलती है, जैसे लोग कपडे बदलते है!’ हेच वाक्य अभिजीत पानसे, राहुल नार्वेकर, हीना गावित, आनंद परांजपे, वाकचौरे अशा मोठय़ा यादीला लागू पडेल.
सर्वपक्षीय सामान्य, निष्ठावान, जुन्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकच निर्णय करावा. पक्ष कुठलाही असो, नेत्याची मुलं, नातलग किंवा आयाराम-गयाराम यांची अनामत रक्कम जप्त करायची. घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी. अशा उमेदवारांना विरोध करत त्या- त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच नेतृत्वाला सांगायचं- ‘आम्ही काम करणार नाही. तुमची ताकद आहे तर आणा निवडून!’
अमेरिकेत जसं एखादी व्यक्ती दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते, तसंच बंधन आपल्याकडेही उमेदवारीवर घालता येईल. बाकी आपण साऱ्यांनीच पक्षभेद बाजूला ठेवून सरंजामी रक्ताचे ‘वंशाचे दिवे’ त्यांच्या विरोधात मतदान करून विझवले तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीची पहाट होईल. तेवढे तरी आपल्या आणि त्या- त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात नक्कीच आहे. ‘बदल’ अशाच छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी होईल. सुरुवात तर करू या!
शेवटची सरळ रेघ : आद्य लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यासाठी भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये प्रत्येक घरातून ‘लोखंड’ म्हणजेच ‘लोह’ जमा करायची योजना राबवलीय. गांधीनगरमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक नसलेल्या अडवाणींच्या मनात पराजयाची शंका येण्याचे कारण ही ‘लोह’ जमवणे योजनाच असावी. कारण समकालीन लोहपुरुष म्हणून आपल्याला ‘अखंड’च त्या पुतळ्यासाठी नरेंद्रभाईंनी जमा करून घेतलं तर..? ही भीती त्या शंकेमागे असावी!
चित्र- संजय पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2014 1:01 am

Web Title: political party members
टॅग Election,Politics
Next Stories
1 अरविंद केजरीवाल का उल्टा चष्मा!
2 दाग अच्छे है.. ‘अन्ना’ है ना!
3 या ‘सत्तेतच’ जीव रमतो : एक स्वगत
Just Now!
X