भीष्म आजच्या संदर्भात

‘भीष्म’ ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. महाभारत हीच एक अजरामर साहित्यकृती असल्याने, त्यातील विविध व्यक्तिरेखांवर भरपूर साहित्यनिर्मिती झालेली आहे. पौराणिक कथा-कादंबऱ्यांमध्ये अशा व्यक्तिरेखांचे विविध पैलू विविध अंगांनी उलगडून दाखवले आहेत. पुराणकालीन घटना, प्रसंगांचे नव्याने अन्वयन केलेले, या इतिहासाला आजच्या परिप्रेक्ष्यात पाहिल्याचे अनेक साहित्यकृतींमधून दिसते. ध्रुव भट्ट या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाची ‘प्रतिश्रुती’ ही कादंबरी अशाच प्रकारची एक वेगळी पौराणिक साहित्यकृती आहे. अंजनी नरवणे यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. भीष्मांच्या आयुष्यातील नाटय़मय प्रसंग व त्या प्रसंगांचा अन्वयार्थ सांगणारी ही कादंबरी असून, स्वत: भीष्मच वाचकांना आपली कथा सांगत आहेत, असे कादंबरीचे निवेदन आहे. पुराणातील एखादी व्यक्तिरेखा स्वत:च स्वत:ची कथा सांगते- ही निवेदनशैली वाचकाला मोहवणारी आहे. मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याचं वरदान भीष्मांना प्राप्त झालं आहे, त्यामुळे मृत्युशय्येवर उत्तरायणाची वाट पाहताना ते आत्मपरीक्षण करतात, तो नाटय़मय प्रसंग कादंबरीत परिणामकारकपणे रंगवला आहे. भीष्मांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाच्या नाशाला कारणीभूत ठरल्यामुळे ते शरशय्येवर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञाबद्धतेला दोष दिला जातो. याबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल भीष्म आत्मपरीक्षण करतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात. आपल्याच मनाशी चाललेल्या या संघर्षांचे, द्वंद्वाचे प्रभावी चित्रण या कादंबरीत केले आहे.

जुनी मिथकं, धारणा, परंपरा यांचे आजच्या काळात नव्याने अर्थ लावून चिकित्सकपणे पौराणिक इतिहासाकडे पाहणाऱ्यांसाठी ही कादंबरी हा एक उत्तम साहित्यिक ऐवज आहे. ऐतिहासिक, पौराणिक घटनांना आपल्या नव्या साहित्यकृतीतून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न मोजक्याच साहित्यिकांनी केलेला आहे. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत भेटणारी पात्रं आपल्याला त्याच कथेवर गिरीश कार्नाडांसारख्या नाटककारानं लिहिलेल्या ‘ययाती’ नाटकामधून वेगळ्याच रुपात भेटतात. या दोन भिन्न साहित्यकृतींची कथा, आशय सारखेच आहेत, आशयाकडे समाजरचना, काळ, मूल्यं यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा दृष्टीकोन मात्र भिन्न आहे. खांडेकरांच्या ‘ययाती’तील व्यक्तिरेखांचे  अनेक नवे पैलू  कार्नाडांच्या ‘ययाती’ नाटकातून समोर येतात. दोन्हीचेही महत्त्व आहेच. त्यामुळेच पौराणिक घटनांचे समकालीन परिप्रेक्ष्यात अन्वयन वाचकांना नवी दृष्टी देते. ध्रुव भट्ट यांची ही कादंबरी अशी नवी दृष्टी देऊ पाहणारी आहे. पौराणिक व्यक्तिरेखांना समाजमान्य नैतिकतेच्या काचातून मोकळं करून, त्यांच्याकडे मानवी दृष्टीनं पाहायला लावणारी आहे.

‘प्रतिश्रुती’ – ध्रुव भट्ट

अनुवाद – अंजनी नरवणे

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- २५०, किंमत- ३३० रुपये.

झारखंडचे अंतरंग 

झारखंडमधील कोळशाच्या खाणी, तेथील कामगारांचे जीवन, कोळसा खाणींचा कारभार, सरकारी अधिकाऱ्यांपुढील आव्हाने इ. बाबी अतिशय विस्तृतपणे ‘दामोदरच्या तीरावर’ या कादंबरीत रेखाटल्या आहेत. कोळसा खाणी आणि त्याभोवती फिरणारे झारखंडमधील अर्थकारण, लोकजीवन याचा जवळून परिचय लेखक अनंत जोशी या कादंबरीतून करून देतात. कोळसा खाण कामगारांचे प्रश्न, अडचणी यांबाबत भाष्य करणाऱ्या साहित्यकृती मराठीत तरी दुर्मिळ आहेत. त्यामुळे या कादंबरीचे मोल अधिक आहे. कादंबरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, झारखंडमधील कामगारांच्या लोकजीवनाचा घेतलेला परामर्श. लेखकानं अभियंता म्हणून अनेक वर्ष झारखंडमधे काम केलेलं असल्यानं हे जीवन त्यांनी जवळून अनुभवलं आहे, ते तितक्याच रसरशीतपणे कादंबरीत येतं. बनिहारी म्हणजेच बदली मजूर देण्याची तेथील पद्धत नेमकी कशी आहे, त्याचे आर्थिक लाभ कोणाला होतात, गरीब कामगारांना त्याचे काय तोटे सहन करावे लागतात, मुळात ही पद्धत कशी व का सुरू झाली यावर लेखकानं भाष्य केलं आहे. विकासासाठी खणल्या जाणाऱ्या खाणींमुळे तेथील स्थानिक आदिवासींचे, कष्टकरी समूहाचे जीवन निकृष्ट दर्जाचे बनते. रोजगार, विस्थापित झाल्यावर राहण्यायोग्य घरे इ. पायाभूत सुविधा त्यांना दिल्या जातातच असं नाही. शिवाय, खाणींचे मालक असलेल्या उद्योगपतींशी तेथील स्थानिक राजकारण्यांचे संबंधही बऱ्याचदा सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. तसंच औद्योगिकीकरणाच्या झपाटय़ात प्रदूषण, नदीत सोडले जाणारे सांडपाणी इ. मुळे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न बिकट झालेले आहेत. त्यात दामोदर नदीला तर झारंखंडची जीवनदायिनी मानलं जातं. लोकांच्या आयुष्यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही या नदीचं महत्त्व मोठं आहे. मात्र आजकाल निसर्गाची तमा न बाळगता प्रचंड पैसा कमावण्यासाठी नदीपात्रांची चाळण करणाऱ्या वाळूमाफियांचा सर्वत्र सुळसुळाट झालेला आहे. हे सारे तपशील या कादंबरीतून येतात.

नक्षलवादासारखं आव्हान असलेल्या प्रदेशात, प्रशासनात असलेल्या महिला अधिकाऱ्यांपुढे असणारी आव्हानं, ती आव्हानं पेलताना त्यांना करावी लागणारी कसरत या बाबीही लेखकानं बारकाईनं चितारल्या आहेत, त्यामुळे केवळ रंजनपर कादंबरी म्हणूनच नाही तर महत्त्वाच्या सामाजिक आशयाकडे लक्ष वेधण्याचं कामही ही साहित्यकृती करते.

विविध राज्यांतील लोक, तेथील विभिन्न संस्कृती, आर्थिक-सामाजिक स्थिती जाणून घेण्याची ओढ अनेकांना असते.  ‘दामोदरच्या तीरावर’ या कादंबरीतून मनोरंजनाबरोबरच ही उद्दिष्टे साधली जातात. त्यामुळे झारखंडच्या अंतरंगात डोकावून पाहण्यासाठी, तेथील लोकजीवनाबाबत जाणून घेण्यासाठी ही कादंबरी महत्त्वाची आहे.

‘दामोदरच्या तीरावर’ – अनंत जोशी,

विजय प्रकाशन,

पृष्ठे – १६८, किंमत – २२० रुपये.