03 April 2020

News Flash

प्रार्थना

मी आस्तिक आहे की नास्तिक? ते मला ठाऊक नाही. या दोन संज्ञांना जे रुढ अर्थ आपल्याकडे परंपरेने आले आहेत, त्या अर्थाने माझं हे म्हणणं आहे.

| September 29, 2013 12:03 pm

मी आस्तिक आहे की नास्तिक? ते मला ठाऊक नाही. या दोन संज्ञांना जे रुढ अर्थ आपल्याकडे परंपरेने आले आहेत, त्या अर्थाने माझं हे म्हणणं आहे. पण ते पारंपरिक अर्थ नाकारायचे ठरवले तर मात्र मला भावणारा एक नवा अर्थ त्यांना लाभतो. गेल्या काही वर्षांपासून मी हे दोन शब्द ढ२्र३्र५ी आणि ठीॠं३्र५ी या अर्थाचे प्रतीक मानू लागलो आहे आणि हे गृहीत धरलं तर मी नक्की आस्तिकच आहे. किंबहुना आपण सगळे मूलत: आस्तिकच, म्हणजे पॉझिटिव्ह आहोत. कारण तसं पाहिलं तर रोजच्या जगण्याबद्दल आपल्या असंख्य तक्रारी आहेत. पण तरीही आपण नेटाने जगत असतो आणि नुसते असे-तसे नाही तर रोज नव्या उमेदीनं नवी स्वप्ने पहात आणि जगण्यातले छोटे-मोठे आनंद घेत जगत असतो. कदाचित कधी आपण आपल्या प्राणांची किंमत मोजून आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊ शकलो इतकंच नव्हे तर तो पारही पाडू शकलो तरच आपण खरे ठीॠं३्र५ी ठरू. पण अतिशय दुर्लभ अपवाद सोडता आपल्या कुणालाच हे जमणार नाही, हे निदान स्वत:शी तरी कबूल केलेलं बरं. पण देव कल्पना आणि त्यातून येणारी भक्तिभावना या गोष्टी पायाभूत धरून विचार केला तर मग माझी ही दुटप्पी भासणारी भूमिका जन्म घेते. म्हणजे मी नास्तिकही नाही, आस्तिकही नाही किंवा उलटपक्षी मी आस्तिकही आहे आणि नास्तिकही आहे.

आपल्याभोवती पसरलेलं हे सगुण आणि निर्गुण विराट विश्वरहस्य ही माझी, माझ्यापुरती ईश्वर कल्पना आहे. माझ्या या मूलभूत जाणिवेच्या अनेक खुणा माझ्या कविता-गीतांतून ठायी-ठायी दिसतात. अगदी आरंभ काळात पुणे रेडिओवर संगीतकार राम फाटक आणि गायक पं. भीमसेन जोशी यांच्यासाठी मी एक प्रार्थनागीत लिहिलं होतं, तेव्हा ही माझी सुप्त भूमिका नकळत, पण प्रथमच व्यक्त झाली.

हे नायका.. जगदीश्वरा

भवतारका.. अभयंकरा

तुझिया प्रसादे उज्ज्वला

नवरत्नगर्भा ही धरा..

 

तिमिरात तेजोगोल तू

वणव्यात शीतल चंद्र तू

सृजनातही आरंभ तू

ओंकार-रूप शुभंकरा..

 

गीतांतला शब्दार्थ तू

शब्दांतला भावार्थ तू

भावांतला गूढार्थ तू

सत्यातल्या शिव-सुंदरा..

 

अशिवास दे शुचिमानता

प्रीतीस अर्पणशीतला

विश्वास दे एकात्मता

दे बंधुता जनसागरा..

त्यानंतरही पुन्हा पुणे रेडिओवरच गायक विठ्ठल शिंदेना एक अभंग-सदृश कविता लिहून दिली.

आभाळ निळे हे तुझे रूप आहे

जळाच्या गळ्यात तुझा सूर वाहे

चांदण्यात सांडे तुझे शुभ्र हांसू

फुलांचे अत्तर तुझा श्वास आहे

पहाटेचे दंव तुझे आनंदाचे आंसू

वाऱ्याची झुळूक तुझा स्पर्श आहे

कोसळत्या धारा तुझ्या आरतीची धून

तेथे माझा प्राण गुंतलेला आहे

संगीतकार आणि ज्येष्ठ हृदयमित्र रामभाऊंनी पुन्हा यालाच समांतर अभिव्यक्तीसाठी आग्रह धरला तेव्हा ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ म्हणत एक नवी कविता आलीच.

अरूपास पाहे रूपी, तोच भाग्यवंत

निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत

कधी पावसाच्या धारा

भणाणता केव्हा वारा

पहाटेस होऊन तारा.. हंसे रूपवंत

ग्रीष्म रक्त पेटविणारा

शिशिर आग गोठवणारा

मनोगते मेळविणारा.. फुलारी वसंत

कुशीमध्ये त्याच्या जावे

मिठीमध्ये त्याला घ्यावे

शाश्वतात विरुनी जावे.. सर्व नाशवंत

‘तुझियासाठी’ या शीर्षकाचा गायक मुकुंद फणसळकर आणि संगीतकार आनंद मोडक यांच्यासह ध्वनिमुद्रितही झालेला एक गीतसमूह दीर्घकाळ त्रिशंकूप्रमाणे अधांतरी तरंगतो आहे.. त्यामधील एक प्रार्थनादेखील हीच साक्ष देईल.

हे अपार, हे असीम, हे चिरंतना

ठायी ठायी ठेविल्यास.. ईश्वरी खुणा..

गहन ह्य़ा तमात तूच

कोमल तेजात तूच

ओंकारा तू अंकुर होशी जीवना..

आशीर्वच सदय तूच

निर्दय आघात तूच

तूच झुळूक सौख्याची.. तूच वेदना

तुजविण मी जाऊ कुठे

तुजविण मी राहू कुठे

गुजही हे सांगू कुणा.. हे तुझ्याविना?

हे अपार हे असीम हे चिरंतना..

किंबहुना परम-ईश्वर ही शब्दाची फोड ध्यानी घेतली तर माझ्या दृष्टीने परमेश्वर या शक्तीचं अस्तित्व या विराट विश्वापरतं दुसरं नाही आणि या अर्थाने मी पूर्ण आस्तिक आहे.

पण मानवनिर्मित ३३ कोटी देवदेवता, त्यांचे अनेक उप आणि उग्र-अवतार, त्यांचं कर्मकांड, त्यातून उद्वणाऱ्या नाना विकृत रुढी, त्यातील अमानुष कर्मठपणा याचा जन्मजात तीव्र तिटकारा जोपासणारा कट्टर नास्तिकही मीच आहे. शेवटी कवीदेखील एक माणूसच. त्यामुळं या मानवनिर्मित धर्मकल्पनांचा तिटकारा व्यक्त करताना तो आग बरसतो ती पुन्हा देवावरच..

नाही दया ना जिव्हाळा

देव दगड आंधळा

 

ऐन वणव्यात फेकी उग्र ज्वाळांचे फुत्कार

त्याचा वसा अमृताचा, तरी ओकतो विखार

कैक ग्रीष्म पचवुनी त्याचा स्वभाव उन्हाळा..

 

साऱ्या स्वप्नाच्या नशिबी देतो मातीचा आलेख

देहधारी चैतन्याची थंड मूठभर राख

त्याचे हृदय गोठले.. जणू युगांचा हिवाळा..

 

माणसांच्या दुर्दैवाचे तोच मांडतो सोहाळे

त्याच्या पावलांना ऊन खाऱ्या पाण्याचे डोहाळे

त्याच अभिषेकासाठी आसवांचा पावसाळा..

आयुष्याच्या वळणा-वळणावरचे हे विविध भावतरंग मागे वळून पाहताना गंमत वाटते.. पण एक सत्य त्यातूनही प्रकट होते. निर्गुण शक्तीचं सगुण रूप म्हणजे निसर्ग अशी माझी कधीपासूनची भावना आहे पण तरीही हा विराट निसर्ग किंवा विराट विश्व म्हणजे तरी नक्की काय? हा संभ्रम खूप काळपर्यंत होताच.

एकेदिवशी जीवलग मित्र देबू देवधरकडून अचानक तेही उत्तर मिळून गेलं. एका फिल्मच्या लोकेशन- संशोधन मोहिमेवरून परत येत होतो. दोघेच होतो. अखंड चाललेल्या आमच्या गप्पासत्रात कुठेतरी ईश्वर- कल्पना हा विषयही येऊन गेला होता. पाय मोकळे करायला थोडे थांबलो. समोर सुरेख सूर्यास्त होत होता. देबू एकदम म्हणाला, ‘‘हा जो समोर लालभडक गोल दिसतोय ना, तो माझा देव बरं का..’’ ते केवळ काव्यमय बोलणं नव्हतं. एक निष्णात सिनेमाटोग्राफर आपली तर्कसिद्ध देवकल्पना सांगत होता. ‘‘प्रकाश हे माझ्या कामाचं मूलतत्त्व.. आणि हा तर मूलभूत लाइट सोर्स.. म्हणून माझ्यासाठी हा आणि हाच देव..’’

इतक्या दिवसांचा ईश्वर-स्वरूपाविषयी असलेला माझा संभ्रम त्या दिवशी कायमचा मिटला. त्या दिवसापासून माझ्याही दृष्टीने माझ्या परमेश्वर कल्पनेचं समूर्त रूप एकच ठरलं. तेजाळ सूर्य.. रोज नेमाने उगवणारा- मावळणारा, तरीही उद्याही तो उगवणारच अशी एक अदम्य आस्तिक श्रद्धा तुमच्या आमच्या अंत:करणात कायम प्रदीप्त ठेवणारा आणि प्रखर ओजस्वी सत्याचं लखलखीत आणि धगधगीत प्रतीक असलेला असा हा एकमेवाद्वितीय सूर्य! माझ्या आजच्या डोळस आस्तिकतेला बैठक आहे ती जगातील सर्व कडूजहर सत्य स्वीकारून प्रखर बनलेल्या या झळझळीत सूर्य- सत्याची..

‘‘प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो

तरिही वसंत फुलतो..

तरिही वसंत फुलतो

उमले फुले इथे जे ते ते अखेर वठते

लावण्य-रंग-रूप सारे झडून जाते

तो गंध तो फुलोरा अंती धुळीस मिळतो..

जे वाटती अतूट जाती तुटून धागे

आधार जो ठरावा त्यालाच कीड लागे

ऋतू कोवळा अखेरी तळत्या उन्हांत जळतो..

तरिही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने

तरिही फिरून श्वास रचती सुरेल गाणे

तरिही फिरून अंत.. उगमाकडेच वळतो

तरिही वसंत फुलतो..

पूर्वी फग्र्युसन हिलवरून त्याला रोज उगवताना डोळे भरून न्याहाळायचो.. अगदी आत्तापर्यंत ‘मुक्तछंद’ वास्तव्यात एन.डी.ए. रोडवरून तोच अनुभव दररोज घेत होतो.. अशा वेळी, वडिलांच्या तोंडून अनेकदा ऐकलेले, विश्वाच्या अस्तित्वाच्या, पृथ्वी- आप- तेज- वायू आणि आकाश या चिरंतन पंचतत्त्वांची आळवणी करणारं देववाणीतील एक देखणं निसर्गसुक्त मनात घुमत असायचं..

पृथ्वी सुगंधां, सरसस्तथाप:

स्पर्शश्च वायु: ज्वलनं सतेज:

नभ: सशब्दं, महतां सहैव

कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम

एके दिवशी अचानक त्या निसर्गसूक्ताचा मायबोलीतला प्रतिध्वनी अंत:करणात उमटला आणि परम सुखावलो. आता रोज कुठेही असलो तरी ती प्रार्थना दररोज माझ्या मनात घुमत असते.

पृथ्वी सु-गंधा

सु-रसाळ पाणी

स-स्पर्श वारा

स-तेज अग्नी

स-शब्द आकाश..

ही थोर तत्त्वे

करोत रमणीय प्रभात माझी..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2013 12:03 pm

Web Title: prayer
Next Stories
1 दुसरी बाजू..
2 ‘अशोक-चक्रांकिता..’
3 ‘व्यर्थ न हो बलिदान..’
Just Now!
X