कमलाकर नाडकर्णी

मुंबई हे भारतीय रंगभूमीचं केंद्रच आहे. परिवर्तनाच्या काळात- म्हणजे प्रामुख्याने १९६० ते १९९० या तीन दशकांत केंद्रस्थानी असलेल्या  रंगभूमीवर आमूलाग्र बदल घडत गेले. हे बदल मुंबईतील ज्या तीन वास्तूंच्या छताखाली घडले, त्या वास्तूंतील ‘घडण्यांचा’ धांडोळा घेणे या उद्देशाने ज्येष्ठ समीक्षक शांता गोखले यांच्या संपादकत्वाखाली एक इंग्रजी ग्रंथ सिद्ध करण्यात आला (‘सीन वुई मेड’). नाटय़समीक्षक माधव वझे यांनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद राजहंस प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे.  त्याचाच हा परामर्श.

‘भुलाभाई इन्स्टिटय़ूट’, ‘वालचंद टेरेस’ आणि ‘छबिलदास हायस्कूल’ या तीन वास्तूंच्या अवकाशात मुंबईतली नाटय़परंपरा विकसित झाली याबद्दल दुमत नाही. नावीन्याची असोशी, वेगळेपणाचा शोध, ते आपलंसं करण्याची प्रचंड ऊर्जा आणि तेच एकमेव लक्ष्य हे त्यावेळच्या रंगकर्मीचं उद्दिष्ट होतं. अर्थात झपाटलेपणाला शिस्त नसते. काटेकोरपणा नसतो. उद्रेक हा अखेरीस उद्रेकच असतो. त्याची व्याख्या करता येत नाही. परिणामी या सगळ्या प्रवासाचा लेखाजोखा ठेवण्याचे भान कुणाला नसले तर नवल नाही. पण म्हणून जी धडपड एकूणच रंगभूमीला प्रगतिपथावर नेण्यासाठी कारणीभूत झाली, ती अंधारात ठेवण्यापेक्षा रसिकजनांसमोर आणणं अनेक अर्थानी महत्वाचं आहे. अन्यथा या समृद्ध ठेव्यापासून नाटय़ रसिक आणि अभ्यासक वंचित राहतात. ही त्रुटी बऱ्याच प्रमाणात भरून काढण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न ‘प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक’ या पुस्तकाने केला आहे. त्यात निर्देश केलेल्या तीन वास्तू डोळ्यासमोर उभ्या राहाव्यात म्हणून त्या, त्या वास्तूंची वर्णनं या पुस्तकात आहेत. या तीन जागी ज्यांनी तालमी केल्या त्या व्यक्तींबद्दल आणि त्यांनी स्वत: केलेल्या किंवा पाहिलेल्या नाटकांबद्दल जे काही बोलणं झालं, तेही येथे नमूद केलेलं आहे. प्रायोगिक रंगभूमी म्हणजे नक्की काय किंवा तिच्या विश्लेषणाचा पट या पुस्तकातून उभा राहत नाही हे तर खरंच, पण प्रायोगिकतेचा सतत शोध घेणं, हाच तर त्या तरुण मंडळींचा निरंतर ध्यास असतो. तेव्हा प्रायोगिक नाटक म्हणजे नक्की काय, या प्रश्नाची चर्चाच अप्रस्तुत आहे. ज्याची अमुक एक म्हणजे प्रायोगिक अशी व्याख्याच होऊ शकत नाही, तेच प्रायोगिक- असं ढोबळमानाने म्हणायला हरकत नाही.

‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ूट’ ज्यांची कर्मभूमी होती त्या सर्वानीच तिच्याबद्दल भरभरून लिहिलं आहे. या सर्वानी आपल्या शब्दांतून जणू निसर्गाच्या पार्श्वभूमीवरचं एक लॅंडस्केपच उभं केलं आहे. ही वास्तू म्हणजे चित्रकार, संगीतकार, नृत्यकार, शिल्पकार आणि नाटकवाले यांचं दररोज भरणारं एक सळसळतं संमेलनच होतं. सर्व प्रयोगजन्य कला एकत्र आल्या तर त्या एकमेकांना पूरकच ठरतात, या मूलभूत कल्पनेवर आधारित नंतर ठिकठिकाणी ज्या संस्था उभ्या केल्या गेल्या, त्यांचं बीज प्रथम ‘भुलाभाई’मध्ये अध्र्या शतकापूर्वी पडलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. इथले विख्यात नाटय़गुरू इब्राहिम अल्काझी यांच्या गुणवत्तेची, नाटय़कर्तृत्वाची आणि त्यांच्या नाटय़विषयक धारणांची फार नेटकी ओळख सर्वच शिष्यांच्या उद्गारांतून प्रकट झाली आहे. गिरीश कार्नाड त्यांच्याबद्दल म्हणतात, ‘‘आम्ही जे काही केलं त्यामध्ये अल्काझींचा वाटा म्हणजे त्यांनी आम्हाला कुठं नेलं ते नाही, तर त्यांनी आम्हाला कशापासून दूर केलं, हा आहे. अल्काझींनंतर आलेल्या श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी कोणकोणती नाटकं केली, तालमी कशा घेतल्या, कलावंत कसे मिळवले, वगैरे तपशील येतो. थिएटर ग्रुप, थिएटर युनिट वगैरे चमू कसे तयार झाले, हेही कळते. अलेक पदमसी, अलकनंदा समर्थ, श्याम बेनेगल, गर्सन डा’कुन्हा, प्रफुल्ला डहाणूकर, पिलू पोलखनवाला, अकबर पद्मसी, मीना नाईक, रत्ना पाठक, अरुण काकडे, इ. कलावंतांनी आपापल्या सहभागाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘भुलाभाई मेमारिअल’ची जागा बांधकाम उद्योजकाने घेतल्यानंतर नाटकवाल्यांना तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली ती उदारहृदयी आणि नाटकवेडय़ा विनोद दोशी कुटुंबाने. सत्यदेव दुबे यांच्या नाटकावर खूश होऊन त्यांची मागणी विनोद दोशींनी ताबडतोब पूर्ण केली आणि भारतीय रंगभूमीला आकार देण्याच्या कार्यासाठी एक बैठकच बहाल केली. (मुंबईत मी शाळेत असल्यापासून व्यावसायिक नाटकं बघत होतो आणि मी पाहिलेल्या प्रत्येक प्रयोगाला पहिल्या रांगेत शुभ्रवेशधारी पिळदार मिशांचे कुणी धनिक मी बघत असे. ते होते लालचंद हिराचंद. त्यांचं हे नाटकवेड त्यांच्या सुपुत्रातही उतरलं होतं.)

पुस्तकाच्या पहिल्या टप्प्याचे सर्वेसर्वा अल्काझी आहेत, तर दुसऱ्या टप्प्याचे नायक पं. सत्यदेव दुबे हे आहेत. उपनायक अमोल पालेकर. ‘वालचंद टेरेस’ला भेटलेल्या सर्व कलावंतांच्या मुलाखतींतून ‘सत्यदेव : एक संपूर्ण नखशिखांत नाटकवाला’ उभा राहतो. त्यांची नाटकाविषयीची सुस्पष्ट धारणा, त्यांचा नावीन्याचा शोध, त्यांची निर्भीडता, त्यांचा कमालीचा चक्रमपणा, त्यांचा संताप आणि ‘सारे काही नाटकासाठी’ हे चित्र अगदी यथार्थपणे प्रत्ययाला येते.

‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘आधे अधुरे’ अशा काही वेगळ्या नाटकांना कवेत घेण्याच्या धडपडी- अमोल पालेकरांमधला नट कसा निर्माण झाला किंवा चिं. त्र्यं. खानोलकरांनी बंगाली गीतांची केवळ लय आणि चाल ऐकून त्याचा बसल्या जागी अप्रतिम अनुवाद कसा केला तो प्रतिभावान अनुभव, कलावंत आणि नाटकांच्या निर्मितीच्या कथा, इ. सर्वच भाग केवळ किश्श्यांपेक्षाही अधिक काही प्रकट करतो. वाचकाला गुंतवून टाकतो. ‘सखाराम बाइंडर’ नाटकावरील सेन्सॉरच्या हरकतीची कथा कमलाकर सारंग सांगतात. कलावंतांच्या अनुभवांत पुनरावृत्ती असली तरी त्यामुळे काही गोष्टी अधोरेखित होतात. मतप्रदर्शन करण्याकडे मात्र बहुतेक कलावंतांचा कल दिसत नाही. रंगभूमीला क्रांतिकारक वळण देण्यामागे फार मोलाचे साहाय्य कुमुदबेन मेहता यांनी केले. या नाटय़जाणकार आणि विद्वान महिलेच्या सर्वाधिक महत्त्वाच्या अपरिचित रंगकार्याची नोंद या पुस्तकाने ठसठशीतपणे घेतली आहे आणि त्यांच्या कार्याला विस्मृतीत जाण्यापासून वाचवले आहे. गिरीश कार्नाड यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नाटककाराने आपलं नाटक ‘वालचंद टेरेस’ या वास्तूलाच अर्पण केलं होतं, खरं तर एवढं एकच उदाहरण या वास्तूचं महत्त्व पटवायला पुरेसं आहे. पुस्तकाच्या या दुसऱ्या प्रकरणात गिरीश कार्नाड, अमोल पालेकर, गो. पु. देशपांडे, हेमू अधिकारी, अच्युत वझे, श्याम बेनेगल, सरयू दोशी, दीपा श्रीराम या रंगकर्मीशी संवाद साधण्यात आला आहे. ते या वास्तूतील ज्या वेगवेगळ्या नाटकांच्या जडणघडणीबद्दल बोलले आहेत ती नाटकं- अनुष्ठान, आधे अधुरे, हयवदन, गाबरे, वल्लभपूरची दंतकथा,  अंधारयात्रा, सखाराम बाइंडर, अवध्य, चूप! कोर्ट चालू है, सुनो जनमेजय, इ.

पहिल्या दोन अंकांचे जनक अल्काझी आणि पं. सत्यदेव दुबे होते, तर तिसऱ्या अंकाचे- छबिलदास नाटय़ केंद्राचे नायक होते अरुण काकडे. तिन्ही नाटय़केंद्रांत सर्वाधिक काळ- म्हणजे १८ वर्षे कार्यरत असलेले हे बिनव्यावसायिक प्रयोगस्थळ होते. सुलभा देशपांडे आणि माधव साखरदांडे यांच्या छबिलदास शाळेशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे ते माफक भाडय़ावर ‘आविष्कार’ नाटय़संस्थेला उपलब्ध झाले. या केंद्रात कार्यरत राहिलेल्या रंगकर्मीनी या नाटय़स्थळाच्या त्रुटी जशा नोंदवल्या आहेत, तद्वतच या स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रागतिक रंगभूमीला या स्थळाने दिलेले योगदान याचीही आवर्जून नोंद घेतली आहे. छबिलदासमुळे नवे काही करू इच्छिणाऱ्यांना एक हक्काचा मंच प्राप्त झाला. नाटककारांना प्रेरणा मिळाली. कमानी रंगमंचाशिवाय नाटक होऊ शकतं, हा आत्मविश्वास मिळाला. रंगभूमीविषयीची कमालीची जवळीक निर्माण झाली आणि सर्वाना छबिलदास नाटकघर हे आपलंच घर वाटू लागलं. जमेची बाजू इतकी भरघोस होती, की त्यापुढे ती चळवळ होती का उपक्रम होता, हा प्रश्नच नगण्य ठरावा. कुठल्याही नव्या उपक्रमाचे स्वत:चे म्हणून काही आयुष्य असते, त्या मुदतीनंतर तो उपक्रम केवळ जगत असतो, पण जिवंत नसतो. ‘छबिलदास’चं तसंच झालं. सातत्य हा ‘छबिलदास’चा सर्वात मोठा गुण. त्यामुळेच अनेक फलितं प्राप्त झाली आणि त्यामुळेच छबिलदास ‘आओ- जाओ, घर तुम्हारा’ झालं. दर्जा घरंगळण्यास हा सातत्याचा सोस कारणीभूत झाला. एक मात्र निर्विवाद खरं आहे की, या छबिलदासच्या प्रेरणेने महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटी छोटी नाटय़केंद्रे युवकांनीच चालू केली आणि आपल्या मगदूराप्रमाणे कार्यरत ठेवली. ‘छबिलदासनंतर’ या अखेरच्या प्रकरणात संपादिकेने ‘पृथ्वी थिएटर’ आणि ‘एनसीपीए’ या मुंबईतील दोन प्रायोगिकांचे पाठबळ ठरलेल्या नाटय़घरांचा आणि त्यात वावरणाऱ्यांचा त्रोटक परिचय करून दिला आहे. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंचा’चीही नोंद घेतली आहे. मराठी अनुवादाच्या संपादकांनी ‘तीन अंकी गोष्ट’ या प्रास्ताविकात ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक छबिलदासमध्ये प्रयोगान्वित न केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ती विवाद्य आहे.

हे पुस्तक म्हणजे काही स्वातंत्र्योत्तर काळातील प्रायोगिक रंगभूमीचा संपूर्ण इतिहास नव्हे. मुंबईत मुलुंड, डोंबिवली, विलेपार्ले, गोरेगाव, वांद्रे या ठिकाणीही ‘प्रायोगिक’ ऊर्जा प्रकट होतच होती. साहित्य संघ (अमृत नाटय़ भारती), आय. एन. टी., कलाघर याही संस्था प्रायोगिकतेत आपला सहभाग देत होत्या. त्या सर्वाच्या रंगकार्याचा दस्तावेज तयार होईल तेव्हाच प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासाला पूर्णत्व लाभेल. पण तोपर्यंत परिश्रमपूर्वक हे जे हाती गवसले आहे तेही तितकेच मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. या पुस्तकातून व्यक्तिचित्रांबरोबरच विविध कार्यस्थळांची, नेमक्या स्थानांची दर्शने झाली असती (तालमीच्या जागा- गच्चीवरचा रंगमंच आणि प्रेक्षक, छबिलदासचा रंगमंच आणि प्रेक्षक) तर हा इतिहास अधिक रोचक झाला असता. प्रत्येक नाटय़रसिकाने आणि नाटय़अभ्यासकाने आवर्जून वाचावा असा खिळवून ठेवणारा हा तीन अंकी मामला आहे.

‘प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक’, मूळ इंग्रजी ग्रंथ संपादन- शांता गोखले, अनु. व संपादन- माधव वझे, राजहंस प्रकाशन, पृष्ठे- १८७ रुपये, मूल्य- २७५रुपये.

kamlakar74@gmail.com