संजय पवार यांच्या ‘हिंदूंवरच्या वाढत्या जबाबदाऱ्या’ हा लेख वाचला. त्यांच्या ‘तिरकी रेघ’मधील उपरोधिक टिपण्णी असलेले मार्मिक लिखाण वाचायला खूप आवडते. त्यामुळे हा लेख त्यांनीच लिहिला आहे याचे सखेद आश्चर्य वाटले. हिंदू धर्मातील चालीरीतींमधील दोष सांगितल्याबद्दल बिलकूल राग नाही; परंतु या लेखात हिंदू धर्माविषयी दूषित ग्रह, तुच्छता व हेटाळणी जाणवली.    
बौद्ध धर्म हा भारतीय मातीतलाच; त्यामुळे मी धर्माने हिंदू असले तरी गौतम बुद्ध व त्याचे तत्त्वज्ञान मला व अनेकांना आपलेच वाटते. मात्र, पवारांनी ‘हिंदूंचे सणवार सुरू होतील’ हे वाक्य इतके त्रयस्थासारखे लिहिले आहे, जसे ते चीन वा कंबोडियामध्ये जन्मलेले बौद्धधर्मीय आहेत. इथल्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाशी त्यांचे काही नातेच नाही. हिंदू सणवार व संस्कृतीबद्दल इतका कडवटपणा बाबासाहेब आंबेडकरांनाही नव्हता. (त्यांना त्यातील अस्पृश्यता वगैरे वाईट गोष्टींबद्दल राग होता. हिंदू संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली राहावी असे वाटत असल्यामुळेच त्यांनी धर्मातराच्या वेळी बौद्ध धर्माला प्राधान्य दिले.)
एकदा सरकार बनले की ते सर्व जनतेचे असते; मग ते कॉंग्रेसचे असो, कम्युनिस्टांचे असो वा भाजपचे; कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला सदैव जागरूक असायलाच हवे. पण संजय पवारांना वाटते, की देशात भाजपचे सरकार आले म्हणजे फक्त हिंदूंच्या जबाबदाऱ्या तेवढय़ा वाढल्या.
हिंदू असल्याचा खेद, खंत आणि न्यूनगंड बाळगायची हिंदूंना गरज नाही. कारण जगाच्या इतिहासात धर्मातरांसाठी झालेले अत्याचार, गुलामांवरील अत्याचार, जागतिक महायुद्धातील जीत राष्ट्रातील सैनिकांवर व स्त्रियांवर झालेले अत्याचार या सगळ्यातील क्रौर्य, बीभत्सपणा वाचला, ऐकला की हिंदूंच्या धार्मिक, सामाजिक जाणिवेचा अभिमानच बाळगावा वाटतो.
अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे, हे गांधीजींनी जाहीरपणेच सांगितले होते आणि ते स्वीकारूनच गेल्या शंभर वर्षांत देशाची राजकीय व सामाजिक वाटचाल चालू आहे. खरे तर अस्पृश्यतेचे चटके त्या समाजाला ब्रिटिश राजवटीमुळेच जास्त बसले. कारण ब्रिटिशांनी स्वयंपूर्ण खेडय़ांची आर्थिक व्यवस्था बदलली. त्यामुळे आपोआपच समाजव्यवस्थाही बदलली आणि लिहिणे-वाचणे येणाऱ्या कारकुनांचे रोजगार वाढले. परिणामी गरीब शेतकऱ्यांबरोबर बारा बलुतेदारही बेकार झाले. समाजाच्या अर्थव्यवस्थेचा व त्यापाठोपाठ समाजव्यवस्थेचाही ढाचा बदलला. असे झाले की सर्वात नुकसान तळागाळातील लोकांचेच होते. इथे मला जातिव्यवस्थेचे व अस्पृश्यतेचे समर्थन करावयाचे नाही.
सांगण्याचा मुद्दा एवढाच, की सगळे बौद्ध धर्मीय समता व शांतीचे पाईक असते तर दुसऱ्या महायुद्धात जपानने शत्रूंवर व चिनी लोकांनी लाल क्रांतीनंतर स्वत:च्याच लोकांवर क्रूर अत्याचार केले नसते. गीतेत कृष्णाने सांगितल्याप्रमाणे तृष्णा, काम, क्रोध व द्वेष हेच माणसाचे शत्रू आहेत; कोणताही धर्म नव्हे. अन्यथा धर्मातरित बौद्ध राजकीय नेते १९४७ नंतर संविधानाचा लाभ घेऊन आपल्या समाजाचा विकास घडवून आणण्याऐवजी हिंदूद्वेषाच्या राजकारणावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजत बसले नसते.      
गणपती उत्सव वा दहीहंडी काय, सुरुवातीला कोणत्या उद्देशाने सुरू झाले, आणि नंतर गर्दीची समीकरणे, स्वार्थाचे राजकारण यात त्यांचे स्वरूप पालटून ते कुठच्या कुठे पोहचले. तरी अल्पसंख्य सुशिक्षितांच्या हातात हे सण सार्वजनिकरीत्या व्यवस्थापनाकरिता होते तोवर काही चांगले घटक त्यात टिकून होते. बहुसंख्य अशिक्षित लोक व स्वार्थी राजकारणी (आयोजक-प्रायोजक) यांच्या हातात हे सण व उत्सव गेल्यामुळे त्यांचा खेळखंडोबा झाला. याचा दोष हिंदू धर्माच्या शिकवणीला का द्यायचा?
बिंदूएवढे हिंदू समाजाचा गर्व नसलेले रिकामटेकडे काय करतात, ते माहीत नाही; पण स्वत:च्या धर्माविषयी सार्थ प्रेम असणारे हिंदूही सणाच्या वेळी होणारे ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढतात. कारण कोणताही धर्म कितीही उच्च मूल्ये देत असला तरी व्यवहारात, समाजात काही अनिष्ट चालीरीती शिरतातच. जगातील कोणताही धर्म व समाज याला अपवाद नाही.
त्याचबरोबर टीका सहन करण्याची क्षमता आहे म्हणूनच गेल्या दीडशे वर्षांत हिंदू समाज काळाबरोबर एवढा सुधारला. हिंदू धर्मातील सुधारकांची यादी खूप मोठी आहे. स्वत:च्या धर्मात काही न्यून नाहीच आहे व त्याबद्दल कुणी काही बोलले तर आमच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आली म्हणून काहीजण गळा काढतात, तशी सवय हिंदूंना नाही.
नवरात्र म्हणजे देवीची पूजा.  या माध्यमातून स्त्रियांचा सन्मान करायला शिकवणे, हे झाले हिंदू धर्माचे तत्त्व. परंतु जगभर सर्व समाजांतील सर्व धमार्र्तील स्त्रियांना प्रत्यक्ष व्यवहारात दुय्यम वागणूक मिळते, हे वास्तव आहे. कोणताही धर्म याला अपवाद नाही. मग फक्त हिंदू धर्मालाच का झोडपता?
तेव्हा केवळ हिंदूंचा द्वेष करून समाजातील तेढ वाढविण्याऐवजी संजय पवार यांनी लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगावे आणि त्यायोगे समाजाचा विकास घडवावा.
– गौरी जोशी
अंजन घालणारा लेख
‘लोकरंग’ (२४ ऑगस्ट) मधील आशुतोष जावडेकर यांचा ‘टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!’ हा लेख उत्तम होता. प्रयोगशीलता ही भारतीयांमध्ये अभावानेच आढळते. आणि हे सर्वच क्षेत्रांत दिसून येते. लेखकाचे हे म्हणणे तरुणाईने नीट समजून घेतले पाहिजे.