बळवंतरावांस काही उमजेनाच. ब्रिटानिकापासून मोल्सवर्थापर्यंतचे अनेक शब्दसंग्रह त्यांनी उलटेपालटे केले. थिसोरस चाळले. अडकित्त्यात सुपारीवर सुपारी कातरली. तिची खांडांवर खांडे खाल्ली. माडीवरील अभ्यासिकेत पाय दुखेस्तोवर चकरा मारल्या. पण त्या शब्दाचा अर्थ काही त्यांच्या ध्यानी येत नव्हता.
(ओह! वाचकहो, सॉरी हं! हे बळवंतराव म्हणजे कोण हे तुम्हांस सांगावयाचे राहूनच गेले. नाही, बळवंतराव lok01म्हणजे आमचे पिताश्री नव्हेत. म्हणजे तसे पिताश्रीच; पण आमच्या पत्रकारितेचे. त्यांचे आडनाव ‘टिळक’!)
..तर दाढेत अडकलेल्या बडिशेपूच्या दाण्याप्रमाणे त्या एका शब्दाने बळवंतरावांना अस्वस्थ करून सोडले होते.
‘प्रेस्टिटय़ूट’! काय असेल बरे या शब्दाचा अर्थ? माध्यमकर्मीबाबत वापरलाय म्हणतात. पण आपण एवढे संपादक, गीतारहस्यकार.. आणि या शब्दाचे रहस्य आपणांस उलगडत नाही?
त्यांनी गोपाळरावांकडे पाहिले. ते निवांतपणे अंकाची घडी घालून अंनिसचे अंक चाळत बसले होते. त्यांना वाटले, हे सुधारक कधी सुधारणारच नाहीत!
‘‘गोपाळराव, काय असेल हो याचा अर्थ?’’
गोपाळरावांनी अंकाची घडी मोडली. अंक बाजूला ठेवला. थोडेसे खोकले. त्यांचा हा केजरीवाली खोकला फार पूर्वीपासूनचा.. फर्गसनात असल्यापासूनचा. मग त्यांनी नुसतीच प्रश्नार्थक मुद्रा केली.
‘‘हा शब्द हो.. कोणी वि. कु. सिंग आहेत. लष्कराचे माजी प्रमुख. त्यांनी पत्रकारांस उद्देशून प्रेस्टिटय़ूट म्हटलेय..’’
गोपाळराव म्हणाले, ‘‘प्रेस्टिटय़ूट..? हं, काहीतरी मिल्ट्रीतला असेल. सोजिरांच्या तोंडी असतात अशी lr08विकारविलसिते!’’
बळवंतराव म्हणाले, ‘‘परंतु सध्या ते हिंदुस्थानच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत.’’
गोपाळराव म्हणाले, ‘‘म्हणजे मोदींचे मंत्री? मग नक्कीच विकारविलसित! हाती काम नाही ठेवलेले फार.. मग बोलत राहतात असे काहीबाही. या अप्पाजींस विचारा..’’
आम्ही हडबडलोच.
‘‘ओ. आम्हांला काय विचारा? आम्ही काय केलं? आम्हांला साधे पीटीआयचे भाषांतर कधी जमले नाही नीट. परवा एका नेत्याला कार्डियाक गुन्ह्याखाली अटक असे लिहिले! चीफ-सब एवढा पिसाटला, की त्यालाच कार्डियाक अरेस्ट यायची वेळ आली! परवा ते औटलूकवाले विनोद मेहता आलेत इथे. त्यांना विचारा.. त्यांचा या विषयावर चांगला अभ्यास होता. डेबोनेर काढायचे ते.’’
बळवंतराव म्हणाले, ‘‘अहो, एवढी खंडीभर पत्रे चाळता तुम्ही रोज. तुम्हांस ही भानगड काय ते माहीतच असले पाहिजे. कुठल्याशा पत्रात काही लिहून आलेच असेल ना! ‘लोकसत्ता’ काय म्हणतोय? ठोकले नाही का अजून त्यांनी त्या वि. कुं.ना.. अगम्य आंग्ल शब्द वापरतो म्हणून? तुम्हांस सांगतो, हल्ली पत्रकारितेतील अशी तालीम परंपरा दुर्मीळच.. सगळेच तेलमालिशवाले दिसतात अलीकडे..’’    
कुठंतरी दूरवर शून्यात पाहत टिळकमहाराज बोलत होते.
आता त्यांना काय सांगायचे, की आलेय, सर्वत्र छापून आलेय. परंतु त्या वि. कु. सिंग महोदयांनी पत्रकारितेस जगातील एका सर्वात प्राचीन व्यवसायाची उपमा दिलीय, हे कसे सांगायचे ह्य़ांना?
तरीही मनी धीर धरून आम्ही बोललोच- ‘‘ते मीडियाला वारांगना म्हणताहेत!’’     
‘‘काय?’’ बळवंतराव कडाडले.
वनकेसरीचे दहाडणे याचि देही याचि कानी आम्ही कधी ऐकले नव्हते, ते आज कानी पडले!
‘‘हो. पत्रकर्मी म्हणजे पत्रांगना असल्याचे त्यांचे मत आहे.’’  
‘‘भयंकर.. भयंकर आहे हे. आणि तरीही तुम्ही गप्प? कसे सहन करता हे? लोकशिक्षणाच्या माध्यमाची ही बदनामी? आमच्या परंपरेची ही अवहेलना?’’ गोपाळराव संतापून म्हणाले.
‘‘नाही, नाही. आम्ही गप्प बसलेलो नाही. आम्ही तीव्र निषेध केलाय त्यांचा. तसा हा च्यानेलवाल्यांचा प्रश्न आहे. पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकणार आहोत. संपूर्ण बहिष्कार! त्यांची पेडन्यूजसुद्धा प्रसिद्ध करायची नाही. फोटो छापायचा, तर त्याला जाहिरातीचा दरच लावायचा. मुळात त्यांच्या पत्रकार परिषदेला जाहिरात प्रतिनिधी पाठवायचाच नाही. म्हणजे ना रहेगी जाहिरात, ना आयेगी बातमी!’’
‘‘व्वा! चांगला उपाय आहे. यामुळे मग लोक तुम्हांस वारांगनेऐवजी पत्रपतिव्रता म्हणू लागतील, नाही?’’ गोपाळरावांच्या वाणीला का कोण जाणे उपहासाची धार आली होती.
‘‘हो ना. शिवाय आम्ही ठरवलेय, की..’’
‘‘काय?’’ बळवंतरावांनी उग्र चेहऱ्याने विचारले.
‘‘नाही म्हणजे आम्ही ठरवलेय की फडणवीस सरकारकडे शिष्टमंडळ न्यायचे आणि त्यांना सांगायचे- एवढी कशाकशावर बंदी घालताच आहात, तर गेलाबाजार पेडमीडिया, प्रेस्टिटय़ूट तथा पत्रांगना या शब्दांवरही बंदी घाला आणि ते वापरणाऱ्यांवर हक्कभंग टाका. म्हणजे कसे, ना रहेगा बास, ना रहेगी बांसुरी! त्या बदल्यात गावोगावच्या पत्रकार संघांतून तुमचाही सत्कार करू. एखादा पुरस्कार देऊ. तसेही दरवेळी आम्हीच आम्हांला काय पुरस्कारायचे?’’
एवढे बोलून आम्ही आमचे चार शब्द संपवले व मान वर केली. तर पाहतो काय?
गोपाळराव आगरकरांनी बाजूस पडलेले सारे पत्रचघाळ फेकून आपलेच ‘विकारविलसित’ नाटक पुन्यांदा वाचावयास घेतले होते. आणि टिळकमहाराज पुन्यांदा अग्रलेख लिहिते झाले होते..
त्याचे शीर्षक होते-
‘टोणग्याचे आचळ!!’lok02