प्रा. भालचंद्र माधव उदगावकर यांच्या निधनाने समाजाचे सजग भान असलेला एक वैज्ञानिक आपल्यातून गेला. समाजाचे भान असणारा वैज्ञानिक सापडणे ही तशी दुर्मीळ गोष्ट आहे. १४ सप्टेंबर १९२७ साली जन्मलेले उदगावकर सुरुवातीला दादरच्या महापालिका शाळेत आणि नंतर राजा शिवाजी विद्यालयात शिकले. पुढे भौतिकशास्त्र घेऊन ते एम. एस्सी. झाले मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून. ते मॅट्रिकला पहिले आले. एम. एस्सी.लाही ते मुंबई विद्यापीठात पहिले आले. इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या श्रेयनामावलीत भाभा, वि. वा. नारळीकर (जयंतरावांचे वडील), एम. जी. के. मेनन अशा दिग्गजांबरोबर उदगावकरांचे नाव झळकते आहे. उदगावकरांचे वडील डॉ. माधवराव उदगावकर हे डॉ. बाबासाहेब जयकर अध्यक्ष असलेल्या श्रद्धानंद महिलाश्रमाचे कार्यवाह आणि संस्थापक सदस्य होते. समाजसेवेचे बाळकडू प्रा. उदगावकरांना असे घरातूनच लाभले होते.

एम. एस्सी. झाल्यावर त्यांनी घरच्या ओढगस्तीमुळे स्टेट बॅंकेत नोकरी करावी असा सल्ला त्यांना मिळाला होता. पण तेवढय़ात टाटा इन्स्टिटय़ूूट ऑफ फण्डामेंटल रिसर्चची जाहिरात आली. खुद्द डॉ. होमी भाभांनी त्यांची मुलाखत घेतली व त्यांची निवड केली. त्यानंतर सद्धान्तिक भौतिकशास्त्रात प्रा. उदगावकरांनी एवढे मूलभूत काम केले, की ते होमी भाभांचे उजवे हात बनले. परदेशातील अनेक नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांबरोबर lr23उदगावकरांनी काम केले आणि नाव तसेच प्रतिष्ठा मिळवली. १९७० सालापासून आपल्या संस्थेचा फायदा विज्ञानशिक्षण, विज्ञानशिक्षक आणि हुशार विद्यार्थ्यांना कसा करून देता येईल याकडे त्यांचे लक्ष होते. रूईया, रूपारेल, झेवियर, एल्फिन्स्टन यांसारख्या महाविद्यालयांतील हुशार मुलांना टीआयएफआरमध्ये आठवडय़ातून एकदा बोलावून त्यांना शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करण्याची संधी त्यांनी मिळवून दिली. त्यातून तयार झालेला अभय अष्टेकरांसारखा विद्यार्थी आज जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहे. मुंबईच्या महाविद्यालयांतील भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना आठवडय़ातून एकदा बोलावून ते त्यांच्या शंकांचे निरसन करीत. सिद्धार्थ महाविद्यालयातील मधु दंडवते यांच्यासारखे प्राध्यापक त्यांचे विद्यार्थी होते. मुंबई विद्यापीठ जरी १८५७ साली सुरू झाले असले तरी तेथे भौतिकशास्त्राचा विभाग नव्हता. ती जबाबदारी टीआयएफआरने घ्यावी यासाठी त्यांनी जंग जंग प्रयत्न केले. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेले प्र. बा. गजेंद्रगडकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असतानाही ते जमले नव्हते. अखेर प्रा. उदगावकरांच्याच प्रयत्नांनी मुंबई विद्यापीठात हा विभाग १९७२ साली स्थापन झाला.

विज्ञानशिक्षणाबद्दलची त्यांची दृष्टी विशाल होती. केवळ पीएच. डी., बी. एस्सी., एम. एस्सी., एवढय़ापुरतीच ती मर्यादित न ठेवता सातवी ते नववीच्या मुलांसाठीही त्यांनी ‘बॉम्बे असोसिएशन फोर सायन्स एज्युकेशन’ (बेस) या संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शने घ्यायला सुरुवात केली. १९८० पासून ही प्रदर्शने देशाच्या सर्वच भागांत सुरू झाली. त्याचे उद्गाते प्रा. उदगावकर आहेत. त्यानंतर त्यांनी आपली नजर मुंबईतील म्युनिसिपल शाळांकडे वळवली. तिथेही त्यांनी विज्ञानशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यात प्रा. वि. गो. कुलकर्णी, प्रा. यशपाल ही मंडळी सामील झाली. त्यातूनच पुढे होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था सुररू झाली.
असंख्य महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यापीठांना परीक्षा घेण्याशिवाय अन्य कुठलेही काम करता येत नाही हे ओळखून त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाचे सभासद असताना काही चांगल्या महाविद्यालयांना स्वायत्तता द्यावी म्हणून १९७५ च्या सुमारास मागणी केली. त्याची फळे गेल्या दहा वर्षांपासून दिसून येत आहेत. या चळवळीचे नेतेही प्रा. उदगावकरच. उदगावकर नियोजन मंडळावरही सल्लागार म्हणून काम करत. तेथेही शिक्षण आणि संशोधनाचा मुद्दा ते लावून धरीत.

प्रा. उदगावकरांच्या प्रेरणेने मुंबईची होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था, भुवनेश्वरची भौतिक संशोधन संस्था आणि मुंबई विद्यापीठातील इन्स्ट्रमेंटेशन विभाग सुरू झाला. संशोधक म्हणून जागतिक पातळीवरचे काम करणारे प्रा. उदगावकर संशोधनातच राहते तर नोबेल पारितोषिकाचे मानकरी झाले असते. पंडित नेहरूंच्या विचारांनी भारावलेली ही पिढी देशाच्या पुढच्या पिढीतील मुलांसाठी शैक्षणिक संस्था उघडण्यात मग्न राहिल्याने भाभा, यशपाल, मेनन, उदगावकर ही माणसे नोबेल पुरस्कारापासून वंचित राहिली. पण त्याची खंत या माणसांना मुळीच नव्हती. ते आपल्याच मस्तीत मश्गुल होते.

जगात अणुयुद्ध होऊ नये म्हणून बट्र्राड रसेल यांनी स्थापन केलेल्या पग्वाश समितीचे प्रा. उदगावकर २० वष्रे सभासद होते आणि त्याचे अध्यक्ष होते प्रा. रॉटब्लेट. ते अमेरिकाधार्जणिे असल्याने ‘तुम्ही जागतिक संस्थेचे अध्यक्ष आहात’ हे भान त्यांना आणून देण्याचे काम प्रा. उदगावकर करीत. या समितीस तिच्या कामाबद्दल १९९५ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यातील अर्धा वाटा अध्यक्षांचा आणि अर्धा वाटा समितीचा होता. समिती सदस्य म्हणून प्रा. उदगावकर हा पुरस्कार घ्यायला ओस्लोला गेले होते. पण आपण नोबेल पुरस्काराचे मानकरी आहोत हे त्यांनी कधी आपल्या तोंडून कोणाला सांगितले नाही.

लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा, अंधश्रद्ध राहू नये, देशात विज्ञानप्रसार व्हावा म्हणून ते आयुष्यभर झटले. ते १९८२ ते १९९१ अशी नऊ वष्रे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने १९८७ साली भारत जन- विज्ञान जथ्था काढला तेव्हा त्या कार्यक्रमाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. देशभरच्या सर्व राज्यांतील विज्ञान परिषदांचे ते सल्लागार होते.
पद्मभूषण, हरी ओम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. आणि इतके असूनही ते विलक्षण प्रसिद्धीपराङ्मुख होते. अशा ऋषितुल्य माणसाला आम्ही पाहिले, हाच भाग आमच्या जगण्याला श्रीमंती देऊन गेला.