मुरली रंगनाथन

१९ व्या शतकातील पश्चिम हिंदुस्थानातील बुद्धिवंतांच्या ब्रिटिश सत्तेला असलेल्या विरोधाचा शोध हा इतिहास संशोधक जे. व्ही. नाईक यांचा ध्यास होता. अस्सल पुराव्यांच्या आधारे त्यांनी इतिहासातील अनेक अज्ञात व्यक्तींना उजेडात आणले. नुकत्याच झालेल्या त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्ताने..

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र

आपल्या पदव्युत्तर संशोधनाकरिता १९७० साली जे. व्ही. नाईक (खरं तर ‘जेव्ही’ म्हणूनच ते अधिक ओळखले जात.) यांनी ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हा विषय निवडला होता. या धार्मिक आणि सामाजिक बदलाची चळवळ उभारणाऱ्या समाजाचा उदय दादोबा पांडुरंग यांच्या पुढाकाराने १८६० च्या मुंबईत झाला. दादोबा हे शिक्षक आणि समाजसेवक होते. मराठीतील पहिले आत्मचरित्र लिहिणारे बहुधा दादोबाच असावेत. या आत्मचरित्राचे संपादन अ. का. प्रियोळकरांनी केले. या पुस्तकाचे प्रकाशन १९४७ मधील आहे. उपलब्ध लेखनाची समाप्ती अचानकपणे १८४७ ला होते. वास्तविक हा १९ व्या शतकातील व्यक्तीने नोंदलेला अस्सल दस्तावेज म्हणता येईल.

दादोबांचा धाकटा भाऊ भास्कर पांडुरंग हा १८४७ मध्ये वारला. योगायोगाने या शिल्लक राहिलेल्या कागदांचे अखेरचे पान त्याच्याविषयीच आहे. जाता जाता दादोबा सहज नोंदवतात की, ‘भास्कर हा ‘अ हिंदू’ या टोपणनावाने १८४० मध्ये इंग्रजी वृत्तपत्रांतून ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराविरुद्ध सडकून टीका करणारी पत्रं लिहीत असे.’ १९२० पर्यंत याबद्दल अनेक विद्वानांना ठाऊक होते, पण कुणीही त्या पत्रांचे महत्त्व जाणवून शोध घ्यायचा प्रयत्न केला नाही. जेव्ही नाईक यांनी एशियाटिक वाचनालयात आणि राज्य अभिलेखागृहात बसून त्यासंबंधीची माहिती खणून काढली. १८४१ च्या बॉम्बे गॅझेटमध्ये ‘अ हिंदू’ नावाने प्रकाशित झालेली आठ पत्रे त्यांना सापडली. या पत्रांत ब्रिटिश वसाहतवादी सरकारच्या कारभारावर खरमरीत टिप्पणी होती : ‘तुमचा राज्यकारभार म्हणजे आमच्या देशाला आजवर कधी मिळाला नव्हता असा शाप आहे. आमच्या देशाची सारी दौलत ग्रेट ब्रिटनला रवाना झाली आहे. आम्हाला काही कमाईचे साधनच शिल्लक राहिलेलं नाही. आमचा देश एका सैतानी वृत्तीच्या वंशाच्या लोकांच्या हातात  गेला आहे. ज्या वृत्तीला आमच्याकडील सारा मौल्यवान खजिना लुटून, आम्हाला कंगाल करून इथले तरुण-तरुणी भिकेला लागल्याखेरीज समाधान मिळणार नाही.’

दादाभाई नौरोजींनी पुढे काही दशकांनंतर एक प्रमेय- इकॉनॉमिक ड्रेनची थिअरी- मांडले. ते ‘आर्थिक लूट प्रमेय’ म्हटले जाते. हे प्रमेय भास्कर पांडुरंगांनी त्यापूर्वीच मांडले होते. त्यामुळे त्याचे श्रेय भास्कर पांडुरंगांनाच मिळाले पाहिजे असे वाटून जेव्ही नाईकांनी भास्कर दादोबांचे महत्त्व आपल्या लेखनातून वाचकांच्या मनावर ठसवले. नाईक यांनी इतिहासकार म्हणून काम करताना समाजातील अनेक अज्ञात, कमी ज्ञात नायक अत्यंत आदरपूर्वक प्रकाशात आणले. त्यापैकी भास्कर पांडुरंग हे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. १९७५ साली लिहिलेल्या या त्यांच्या महत्त्वपूर्ण लेखात त्यांनी त्या आठ पत्रांच्या संदर्भासह भास्कर पांडुरंगांवर झालेल्या इतर प्रभावांची नोंद करून त्यांना त्यांच्या संकल्पनेचे श्रेय पुरेपूर दिले. जेव्ही नाईक यांचा हा पहिला संशोधनात्मक निबंध त्यांनी ‘हिस्टॉरिकल रिसर्च कॉन्फरन्स’मध्ये सादर केला होता.. जो नंतर मुंबई विद्यापीठाच्या जर्नलमध्ये ‘अ‍ॅन अर्ली अप्रायझल ऑफ ब्रिटिश कलोनियल पॉलिसी’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. ज्यामुळे बिपीनचंद्र पाल आणि इरफान हबीब यांच्यासारख्या त्याकाळच्या नामांकित इतिहासकारांचे लक्ष नाईक यांच्या लेखनाकडे गेले.

जेव्ही नाईकांचा जन्म निम्न मध्यमवर्गातील बेताची आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबात त्याकाळच्या पोर्तुगीजांच्या अंमलाखालील गोव्यात झाला. त्याकाळी त्यांना अर्थार्जनाची फारशी सोय तेथे नव्हती. त्यामुळे १९५० ला त्यांनी मुंबईला प्रयाण केले. कुटुंबाला एका वेळी दोन मनीऑर्डरी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे जेव्हींनी मॅट्रिक गोव्याहून केले, पण वर्षभरासाठी मोठा भाऊ पदवीधर होईस्तोवर मधेच त्यांनी शिक्षण थांबवले होते. रामू रामनाथन या नाटककाराला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खालसा कॉलेज आणि जयहिंद कॉलेजातील आरंभीच्या दिवसांच्या आठवणी नमूद केल्या आहेत. त्या काळात त्यांनी लहान-मोठय़ा कार्यालयांत कामं केली. ते खोताच्या वाडीपासून फोर्टपर्यंत चालत जाऊन ट्रॅमचे पैसे वाचवत. पुढे १९६० मध्ये एलफिन्स्टन कॉलेजात असिस्टंट लेक्चरर म्हणून १६८ रुपयांवर ते रुजू झाले.

जेव्ही नाईक यांनी सुरुवातीचं संशोधनात्मक काम जुन्या, धुळीने भरलेल्या धुरकट वातावरणातील लेखसंग्रहालय आणि वाचनालयांतील जीर्ण वृत्तपत्रे, मासिके यांची पाने चाळून केलं. त्यांना ओढ होती ती अस्सल मूळ पुरावे मिळवण्याची. त्यासाठी ते अथक प्रयत्न करीत असत. जातिवंत संशोधक असल्याने त्यांचे ब्रीद होते- ‘पुरावे नसतील तर इतिहास नाही.’ १९ व्या शतकातील पश्चिम हिंदुस्थानातील बुद्धिवंतांच्या ब्रिटिश सत्तेला असलेल्या विरोधाचा शोध घेणं हा त्यांच्या अभ्यासाचा ध्यास होता. या समाजमनावर ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या मालिकेत इतिहासातील इतर अनेक ख्यातीप्राप्त विद्वानांचाही समावेश आहे. तसेच त्यात काही तुलनेने अप्रसिद्ध लोकदेखील आहेत. जसे की, १८४१ ला सुरू झालेल्या ‘प्रभाकर’ या मराठी साप्ताहिकाचे संपादक भाऊ महाजन; तसेच रामकृष्ण विश्वनाथ हेदेखील आहेत. त्यांनी (१८४३ च्या काळातील) ‘हिंदुस्थानातील कालच्या नि आजच्या आर्थिक परिस्थितीवरील विचार आणि त्याचा भविष्यावर होणारा परिणाम’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात अत्यंत आश्चर्यकारक नेमकेपणाने हिंदुस्थानातील आर्थिक बाबींवर विश्लेषणात्मक विधानं, मुद्दे लिहिले होते. त्याकाळी महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक असे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते नि महानायकही होते. जेव्ही नाईक ज्या इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चसाठी लिहीत होते त्या ‘अर्ली मराठा इंटलेक्च्युअल नॅशनॅलिझम’वरील पुस्तकात हे सारेजण प्रामुख्याने समाविष्ट झाले असतेच! परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या आकस्मिक संकटांनी अधिकाधिक गंभीर रूप धारण केले. त्यांचे सारे काम मागे पडले. ना त्यांना आपला पीएच. डी.चा प्रबंध पुरा करता आला, ना त्यांचे पुस्तकाचे काम पुरे करता आले. अखेर जेव्हा त्यांनी पुन्हा संशोधनाला हात घातला तोवर त्यांच्या या बाकीच्या योजना मागे पडल्या.

सुदैवाने या साऱ्याचा परिणाम त्यांच्या व्यावसायिक जीवनावर पडला नाही. १९६० ला ते एलफिन्स्टन कॉलेजात शिकवू लागले व त्यानंतर त्यांनी ईस्माइल युसूफ कॉलेजात शिकवलं नि १९९४ साली सेवानिवृत्त झाले तेव्हा ते मुंबई विद्यापीठात प्राध्यापक आणि इतिहास विषयाचे विभागप्रमुख होते. २००७ साली ते अत्यंत प्रतिष्ठेच्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष झाले. हा सन्मान भारतीय इतिहासकारांच्या जगात इतिहासतज्ज्ञाला हवाहवासा वाटेल असा मानाचा समजला जातो.

जेव्ही नाईकांचा भर नि आवड १९ व्या शतकातील महाराष्ट्राच्या अभ्यासाची होती; तरी अधूनमधून त्यांना कुणी असामान्य महानायक भावला की ते त्याचा शोध घ्यायला सुरुवात करीत. रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२- १९५३) हे त्यांपैकीच एक. हा माणूस म्हणजे अजिबात समझोता न करणारा, बुद्धिनिष्ठ विवेकवादी आणि आक्रमक नास्तिक होता. ज्याने आधुनिक भारतात कुटुंब नियोजन आणि लैंगिक शिक्षणाचा पाया घातला. नाईक हे नेमकेपणाने नोंदवतात की, कर्वेचा भर हा फक्त लोकसंख्या नियंत्रणावर नव्हता, तर स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि त्यांना लैंगिकबाबतीत निर्णय घेण्याची मुभा असावी यासाठीची ती एक प्रकारे चळवळ होती.

त्यांचे दुसरे हीरो होते द्वारकानाथ गोविंद वैद्य. (१८७७- १९४०) ते प्रार्थना समाजाचे अधिकृत इतिहासकार आणि ‘सुबोध पत्रिका’ या प्रार्थना समाजाच्या मुखपत्राचे प्रदीर्घ काळ संपादक होते. १८९६ साली ते प्रार्थना समाजाचे सभासद झाले. तेव्हाचे ते सर्वात तरुण सभासद होते. स्वत:च्या नैतिक आचरणाने आणि आध्यात्मिक आदर्शवादाने ते समाजासाठी एक उदाहरण ठरले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्ही नाईकांच्या महानायकांच्या यादीत नि लिखाणात कुणीही नायिका नाहीए. त्यांनी एका लेखात मात्र महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात उल्लेखनीय काम केलेल्या स्त्रियांच्या कामगिरीबद्दल लिहून त्यांची एक यादीच दिलीय. पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे, येसु सावरकर, अवंतिकाबाई गोखले, प्रेमाबाई कंटक, मृणालिनी सुखटणकर, सत्यभामा कुवळेकर, लीला आणि अन्नपूर्णा देशमुख, डॉ. हंसा मेहता, उषा मेहता इत्यादी. पण त्यांनी कधी त्यांच्या जीवन नि कार्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला नाही.

नाईकांचे विविधांगी लेखन सुरूच राहिले. त्यांचा १९ व्या शतकातील व्यक्ती आणि घटना यांचा शोध तेव्हाची बॉम्बे प्रेसिडन्सी- म्हणजे आजचा महाराष्ट्र कसा घडत गेला, हे सांगतो. ज्या व्यक्तींच्या कर्तृत्वाने १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या घटनांना आकार आला त्याचे त्यातून दर्शन घडते. ज्या घटना, संकल्पना, संस्था नि व्यक्ती नव्या महाराष्ट्राच्या घडणीस कारणीभूत होत्या, येणाऱ्या बदलाला आकार देत होत्या; त्यांच्यावर ते सातत्याने लिहीत होते. ते इंग्रजी आणि मराठीतून लेखन करीत होते- जे अभ्यासूंसाठी तसेच सामान्य वाचकांसाठीही असे. नाईकांचे १०० निबंध आणि लेख प्रकाशित झाले आहेत. १९९० च्या सुमारास नाईक यांनी आपले संशोधन आणि लेखन विशिष्ट विषयांपर्यंतच मर्यादित केले, जे त्यांच्या लेखनात प्रतिबिंबित होते.

‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’मध्ये प्राची देशपांडे नमूद करतात- ‘नाईक यांच्या नंतरच्या निबंधांतून ते गेली काही दशकं वसाहतवादाविरुद्धच्या राष्ट्रवादाविषयीच्या संकल्पना आणि वसाहतवादी आधुनिकता याविषयीचे विचार विविध अंगांनी ठेवतात. त्यातून वाचकांचे कुतूहल जागृत करतात.’

नाईकांचा खरा हीरो वा महानायक अर्थातच महात्मा गांधी होते. पण ती आंधळी भक्ती नव्हती. त्यांना याची पुरेपूर जाणीव होती, की गांधींच्या जीवनात नि वागण्यात अनेक विरोधाभास होते. जरी नाईक यांनी त्यांच्याबद्दल फार कमी लिहिले असले तरी ते गांधीविचारांच्या प्रभावाखाली होते. गांधींच्या मुंबई वास्तव्याशी निगडित असलेल्या मणिभवन गांधी संग्रहालयाचे ते विश्वस्त होते.

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा प्रा. नाईकांच्या विद्वत्तेच्या, आपुलकीच्या ऋणी आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीबद्दल प्रभा रविशंकर म्हणतात, ‘‘त्यांची महाराष्ट्राच्या इतिहासावरील व्याख्याने इतकी माहितीपूर्ण आणि भावनिक तीव्रतेने भारलेली असत, की विद्यार्थी १९ व्या शतकाचा अनुभव घेत असत.’’ ते पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा समजावताना कुठल्याही विषयाच्या मूळ पुराव्यापर्यंत जाण्याचा सल्ला देत नि मेहनत करवत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना केवळ प्राध्यापक, शिक्षक न मानता गुरूचा दर्जा दिला.

मी २०१६ साली त्यांच्या निबंधांचे संपादन करायला घेतले तेव्हा त्यांना भेटलो. त्यावेळी ते ८२ वर्षांचे होते. इतिहास संशोधन त्यांनी  थांबवले होते. पण आधुनिक इतिहासाच्या क्षेत्रात काय नि कसं संशोधन केलं जातंय याचा ते वेध घेत असत. त्यांना देशातील विद्यापीठांमधील शिक्षणाचा आणि संशोधनाचा खालावलेला दर्जा पाहून चिंता वाटत होती. तसेच इतिहासाचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी होताना पाहून त्यांना उद्विग्नता येत  होती. त्यावेळी त्यांनी सत्ताधीश राजकारण्यांनी देशाच्या मूलभूत आदर्शाची पायमल्ली केल्याचा खेद व्यक्त केला होता. वैयक्तिक आयुष्यात धार्मिक असलेले नाईक हे सार्वजनिक जीवनात धर्माचा विकृत आक्रमकतेने वापर होऊ लागल्याचे पाहून अस्वस्थ होते.

‘द कलेक्टेड वर्क्‍स ऑफ जेव्ही नाईक : रिफॉर्म अँड रेनेसान्स इन् नाइन्टीन्थ सेंच्युरी महाराष्ट्र’ या त्यांच्या निवडक निबंधांचा ग्रंथ  २०१६ साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे परीक्षण करताना अलिगढ विद्यापीठाचे प्रोफे सर एमिरट्स इरफान हबीब म्हटलं होतं की, ‘‘प्राध्यापक नाईक यांचे निबंध हे सामान्य वाचक आणि संशोधक दोहोंसाठी अत्यावश्यक वाचनसामुग्री आहेत. यातून वाचकांना देशाच्या प्रबोधनात, परिवर्तनात महाराष्ट्राचे योगदान समजेल. इथे जी वैचारिक, बौद्धिक घुसळण झाली होती त्याची प्रचीती येईल.’’

या निबंधांसाठी करावं लागणारं संशोधन हे १९ व्या शतकातील उरलीसुरली मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रं, नियतकालिकं यांच्या आधारे केलं गेलं. कदाचित आता हे एवढेच संदर्भ शिल्लक राहिलेले असावेत. काही सार्वजनिक आणि खासगी संग्रहांतील हस्तलिखितंदेखील त्यांच्याकडून अभ्यासली गेली होती. गेल्या काही दशकांत या लिखित, छापील संदर्भाची अवस्था दयनीय झालेली आहे. ज्या संदर्भवस्तूंचा वापर व अभ्यास प्रा. नाईक यांनी संशोधनात केला असेल त्या वस्तू आता एकतर नष्ट झाल्यात किंवा अशा अवस्थेत आहेत की त्यांचा उपयोग करणे, वाचणे असंभव झाले आहे. प्रा. नाईक यांच्यासारख्या इतिहासतज्ज्ञाला मानाचा मुजरा करायचा असेल तर जो माहितीचा जुना खजिना असेल तो जपणे, नवीन अभिलेखागृहं स्थापन करणं; ज्याद्वारे आपल्या समाजाचा आणि इतिहासाचा सच्चा वारसा दृढपणे समोर येऊ शकेल असे वाटते.

अनुवाद : संजीवनी खेर