पं. सत्यशील देशपांडे

भारतीय अभिजात संगीताचे जतन करण्याच्या हेतूने पंडित सत्यशील देशपांडे यांनी निर्माण केलेले ‘अर्काइव्ह’ कलावंत आणि अभ्यासकांसाठी अतिशय उपयोगी आणि दिशादर्शक ठरणारे आहे.  संगीताकडे कलावंत, अभ्यासक आणि रसिक म्हणून पाहताना त्यांनी केलेली ही काही निरीक्षणे कलेबद्दलची जाण अधिक उंचावणारी आहेत..

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची अभिव्यक्ती रागसंगीतातून होते. कोणताही राग बंदिशीच्या माध्यमातून मांडला जातो. ‘मालकंस’ रागाची बंदिश असली तरी सगळा मालकंस त्या बंदिशीमध्ये गायला जात नाही. मुळातच आपल्या संगीताचा स्वभाव हा उत्स्फूर्त गप्पा मारण्याचा आहे. म्हणूनच गप्पा पुन्हा पुन्हा मारल्या जातात. देशाच्या दोन-तृतीयांश भागांत शास्त्रीय संगीत गायले जाते. सांस्कृतिक आणि सामाजिक संयोगातून बनलेल्या संस्कृतीमुळे संगीत समृद्ध झाले आहे. राग एकच असला तरी त्याच्या सादरीकरणामध्ये कलाकाराच्या उपजत अंगाने त्या रागाची बांधणी नवी होत असते. म्हणूनच एका कलाकाराने एकच राग दररोज गायला तरी दररोज त्याची अभिव्यक्ती वेगळी आणि स्वतंत्र असते. जणू नव्याने गप्पा माराव्यात, त्याप्रमाणे!

सध्याच्या काळाचा विचार करताना पूर्वी संपर्क माध्यमे प्रगत नव्हती. त्यामुळे गंडाबंद तालीम आणि रियाज या दोन गोष्टींतूनच कलाकाराची जडणघडण व्हायची. अतिरिक्त माहिती मिळण्याची संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे गुरुमुखी विद्या आणि रियाज म्हणजेच सराव करून गळा तयार करण्यावर भर दिला जात होता. अभिजात गायकीमध्ये सौंदर्यमूल्य तेच राहते, पण घराण्याच्या गायकीनुसार अभिव्यक्ती बदलते. मध्य लय खुलविणे हेच मुळात आपल्या संगीताचे पारंपरिक कलामूल्य आहे. ख्याल भरताना मुखडा घेऊन समेवर येण्याची जागा निश्चित नाही. गायक ही बेवफा आणि चतुर जात आहे. उत्तम आवर्तन घेऊन मुखडा बांधत समेवर येण्याला कोणत्या घराण्यामध्ये मनाई आहे का?

‘फोर्ड फाउंडेशन’च्या सहकार्याने संगीताचे अर्काइव्ह करण्याचा प्रकल्प मी यशस्वीपणे पूर्ण केला. मात्र, आपल्या संगीत परंपरेत रस घेण्यासाठी युवा पिढीकडे वेळ नाही. उरलेली जागा भरणे हे व्यक्तिसापेक्ष आणि संस्कृतिसापेक्ष आहे. भक्त घराणी करतात. अनुयायी वारसा पुढे नेत असतात. शास्त्रीय गायन हा खेळ स्वत:ला स्वत:शी खेळता आला पाहिजे. रागाची चौकट आणि बंदिश ठरलेली असली, तरी संगीताच्या आविष्कारामध्ये पूर्वनिश्चित असे काही नाही. त्यामुळे त्याच गवयाचा तोच राग ऐकायला तेच लोक जातात. चित्रपटामध्ये आपण बदल करू शकत नाही. एम. एफ. हुसेन यांचे चित्र चितारून झाल्यानंतरच आपण पाहतो. संगीताची मैफील हे माध्यम असे आहे, की ते आपल्या समोर घडत असते. गायन कसं जमतंय, पडणार की बिघडणार, हे ते ऐकल्याशिवाय समजत नाही.

मी काही समाजसेवक नाही, पण संगीताविषयी मला झालेले आकलन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. मला निर्मितीचा आनंद घेता आला, तो सर्वाना घेता यावा, हीच त्यामागची भूमिका असते. आता कलाकारांच्या जीवनामध्ये ‘एक्झिबिशन’, ‘टॅलेंट’, ‘एज्युकेशन’ आणि ‘अर्निग’ हे सगळं एकाच वेळी सुरू होते. काही कलाकारांना असुरक्षित वाटते. रियाज याचा अर्थ सवय लागणे असा होतो. एका घराण्याच्या गायकीची सवय लागली की दुसऱ्या घराण्याचे चांगले त्या कलाकाराच्या गळ्यातून येत नाही.

विविध गोष्टींचा संयोग घडवून नामानिराळा राहणारा या अर्थाने माझे वडील वामनराव देशपांडे ‘कॅटलिस्ट’ होते. पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीमध्ये त्यांनी जयपूर घराण्याच्या गायकीचे बीजारोपण केले. घराण्याची चौकट मोडण्याची इच्छा असलेल्या किशोरीताई आमोणकर यांना त्या काळात वामनरावांनी आधार दिला होता. प्रा. बी. आर. देवधर यांचे मासिक बंद पडता कामा नये अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळेच ‘‘संगीत कलाविहार’ बंद करायचे नाही,’ असे त्यांनी निक्षून सांगितले होते. समाजातील गुणी लोकांशी संपर्क व्हावा या उद्देशातून सनदी लेखापाल या नात्याने वामनराव मुंबई मराठी साहित्य संघ, शिक्षण प्रसारक मंडळी, स. प. महाविद्यालय आणि एशियाटिक सोसायटी या संस्थांचे फुकट काम करायचे. अनेक कलाकारांना त्यांनी मिरजेतून तंबोरे घ्यायला लावले. सर्व घराण्यांच्या लोकांना वामनरावांचे घर हे आपले घर वाटायचे. सवाई गंधर्व यांचे जावई डॉ. नानासाहेब देशपांडे हे वामनरावांचे चुलत बंधू.

मो. ग. रांगणेकर, आचार्य अत्रे, अनंत काणेकर असे दिग्गज आमच्या घरी येत असत. घरामध्ये साहित्यिकांनी दिलेली पुस्तके होती. घरी येणाऱ्या पाहुण्यांसमोर वडील मला गाणं म्हणायला सांगायचे. या मोठय़ा लोकांचे कधी माझ्यावर दडपण आले नाही. त्यामुळे लहानपणी मी ‘हीरो’ होतो. मलाही या ज्येष्ठांच्या गप्पा रंजक वाटायच्या. वामनराव देशपांडे आवर्तन सुंदर बांधायचे. पण परफॉर्मर व्हायचे नसल्याने त्यांनी कधी तयारी केली नाही. ते गायक झाले असते तर विविध घराण्यांचा तौलनिक अभ्यास हे संगीत क्षेत्रातील वेगळे काम त्यांनी केले नसते.

‘घरंदाज गायकी’ ग्रंथाचा मी मूक साक्षीदार आहे. प्रत्येक कलाकार आपलेच घराणे कसे श्रेष्ठ- हे वामनराव देशपांडे यांना सांगायचे. या ग्रंथातील एकेका प्रकरणाच्या वाचन फैरी घडवून आणताना श्रोता म्हणून मीही सहभागी होत असे. माझी आई वसुंधरा चांगली गात असे. पण गायनाचा गुण विकसित करण्याची संधी त्यावेळी तिला मिळाली नाही. पं. कुमार गंधर्व यांच्याकडे देवासला जाण्यापूर्वी मी मुंबई आकाशवाणीचा ब श्रेणीचा कलाकार होतो. ‘उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या जातकुळीचा नसला, तरी त्या दर्जाचा सुरेलपणा पं. कुमारजी यांच्याकडे आहे,’ असे वामनरावांनी लिहिले आहे. किराणा घराण्याप्रमाणे ते सुरांचे काम करत नव्हते. कुमारजींचे गाणे लयदार होते. पण ते लयकारी करायला बसले नाहीत. अष्टांगाकरिता गाणं की गाण्यासाठी अष्टांग, हा प्रश्न कुमारजींनी उपस्थित केला. गाण्याचे व्याकरण सांगता येते. लयकारी सांगता येते. पण ती जाणवली, तर ती कला समजदार असे म्हटले जाते. बंदिशीला तानक्रिया शोभून दिसते. तिथे लयकारी ‘सूट’ होत नाही. स्वत:ला कंटाळा न येऊ देता तीच गोष्ट परत परत करण्याची वृत्ती दिसते. स्वरभाराने जड झालेल्या गाण्यातील ‘साँग’ला कुमारजींनी बाहेर आणले. तीन तासांच्या मैफिलीमध्ये उन्मनी होण्याचा कालावधी तीन मिनिटांचा असतो.

खरं तर मी भीमसेनजी यांच्या गायकीचा निस्सीम चाहता होतो. पण बंधू मनोहर याच्यामुळे मला कुमारजींची गोडी लागली. हट्टी आणि दुराग्रही घराण्याचे अनुशासन करतात; पण कोणत्याही शिस्तीचा आग्रह धरला नाही म्हणून मी कुमारजी यांच्याकडे गेलो. माझी आणि मुकुल शिवपुत्र अशी आम्हा दोघांची तालीम एकाच वेळी सुरू झाली. माझ्या गंडाबंधन कार्यक्रमास कुमारजी आणि पु. ल. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले होते. माझ्या गायनाला मुकुलने तबल्याची साथ केली होती. कुमारजींकडे मातीतून आलेले शहाणपण होते.

माझ्याकडे टेपरेकॉर्डर असल्याने मला ध्वनिमुद्रण करण्याची- म्हणजेच रेकॉर्डिगची आवड होती. पुष्पा भावे यांचे बंधू रमेश सरकार यांच्याकडून मी ध्वनिमुद्रणाचे तंत्र शिकलो. फोर्ड फाउंडेशनच्या ‘एज्युकेशन अँड प्रेझेंटेशन प्रोग्राम’अंतर्गत कलात्मक संवेदनांचे जतन करण्यासाठी जोआना विल्यम्स यांनी माझ्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यावेळी वर्षांसाठी १ लाख २९ हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. हे अनुदान नंतर दोनदा मिळाले. संगीताचे अर्काइव्ह करताना तौलनिक अभ्यासाची वास्तविकता ध्यानात आली. त्यामुळे गायक आणि संगीत अभ्यासक म्हणून मी समृद्ध झालो.