News Flash

जगणे.. जपणे.. : कलावंतांचा जनसहयोग

लोकप्रतिनिधी पक्ष बदलतात तसे मंच बदलला तरी या दोन मंचांमधले दुवा बनण्याचा दावा मात्र ते करू शकत नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

मेधा पाटकर

महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निवडणूकपूर्वच्या एका टप्प्यात अनेक सिनेकलाकारांची भेटगाठच नव्हे, तर त्यांची प्रशंसा करून गेले. सिनेउद्योग म्हणून वाहवा करताना ते कलाकारांकडून स्वत:साठीही वाहवा मिळवून गेले. ‘आमच्या उद्योगाकडे नेत्यांनी कधी असे लक्ष देणे, जवळीक साधणे केलेच नव्हते,’ असे म्हणणारे कलाकार, कुठे तरी इतर उद्योगपतींप्रमाणे, याही उद्योगाचे समाजातील घडामोडी आणि राजकीय नाटय़ यांपासून अलिप्त की तुटलेले राहणेही नोंदवून गेले. तसे पाहिले तर वैजयंतीमाला ते हेमामालिनीपर्यंत अनेकांना राज्यसभेत स्थान देणाऱ्या राजकीय पक्षांनी वा एखाद्या पक्षाचे अ‍ॅम्बेसेडर बनणाऱ्या कलाकारांनी एकमेकांची दखल घेतल्याचे दाखवता येईलही; पण एखाद्या कंपनी वा उत्पादनाच्या जाहिरातीत झळकलेल्या कलाकाराचा त्यांच्याशी संबंध नसतोच, तसेच काहीसे राजकारण आणि कलाकर्मीचे असते. म्हणजे खऱ्या अर्थाने नाते नसतेच असे म्हणता येईल. राज्यसभेतच काय, निवडून आल्यानंतर गोविंदासारख्या कलाकारांना ना लोकसभेत, ना लोकांच्या जनसभेत कधी कुठली जनसमस्या मांडताना वा सोडवताना कुणी पाहिले. एखादी स्मृती इराणी, राज बब्बर वा शत्रुघ्न सिन्हा पूर्णत: कलाक्षेत्र सोडून राजकीय रंगमंचावरच उतरले ते आपली रंगीली दुनिया झटकून अन् जगण्याचे रंगढंगही बदलून! पूर्वजीवनातली कलाकुसर आणि कुशलता की नामांकितता त्यांच्या कामी येत असेल, नव्हे असतेच- ती गोष्ट वेगळी. लोकप्रतिनिधी पक्ष बदलतात तसे मंच बदलला तरी या दोन मंचांमधले दुवा बनण्याचा दावा मात्र ते करू शकत नाहीत.

याच संदर्भात फार मोलाचे ठरतात ते सामाजिक बांधिलकी म्हणजे समाजभान घेऊन सामाजिक संस्था- समारंभापलीकडे जनसंघटना आणि जनआंदोलनापर्यंतही पोहोचणारे कलाकार. त्यामध्ये त्यांनी आपली रंग-वेशभूषा उतरून येण्याबरोबरच आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठाही अनेकदा जोखमीत ढकललेली असते, तेही कुठला गाजावाजा न करता! आपल्या भोवतालच्या एखाद्या घटनेने वा अनुभवाने हातातील कला – कुंचल्यासह भारावून जाऊन त्याचे प्रकटीकरण कलाकार करतो. तसेच जनतेच्या प्रश्नानेच नव्हे तर दु:खाने द्रवित होऊन वा आक्रोशाने जागे होऊन ते आंदोलित जनशक्तीकडे झेपावतात. अशा कलाकारांमध्ये साहित्यिक, लेखक-कवी तसेच रंगकर्मीही असतात, केवळ नट-नटय़ा नव्हेत आणि ते सारेच इतरांपेक्षा सखोल सामाजिक  जाणिवेने आपले वेगळेपण त्यापूर्वीही जाणवून देणारे असतात. अशांच्या सहभागाने, एखाद प्रसंगाच्याही संघर्षशील गरिबांना समाजाच्या, अन्यथा कोऱ्या कॅनव्हासवर थोडीशी जागा- स्पेस- मिळतेच. परंतु अधिक दीर्घ प्रक्रियेत जर ते संघटनेसह राहिले तर ते एचआयव्ही एड्स वा तंबाखूविरोधी जाहिरातीत सामील झाल्यागत नव्हे, तर जनशक्तीबरोबर जोडून घेऊन त्यांच्या प्रयत्नांना समाजाची साद देणे असते. शासनकर्ते कधी त्यामुळे संवादास तयार होतात तर कधी अलीकडे ‘सेल्फी’ घेतात तसे त्यांच्या उपस्थितीत एखादे स्वागत घडवूनही ‘येरे माझ्या मागल्या’चीच प्रचीती देतात, हाही अनुभव आम्हा संघटनांना येतोच. मात्र समाजाच्या मन:पटलावर कुठे तरी एखादा रंग वा शब्द चितारणे असे समर्थक नक्कीच साधतात. त्यातून पुढे चित्र वा भाष्य निर्माण करणे संघटनेच्याच हाती असते. त्यात अनेकदा आम्ही कमीच पडतो; आमच्याच कार्यपद्धतीत, परंपरेत बुडून राहिल्याने, हेही खरेच.

आठवते ते श्रीराम लागू आणि सदाशिव अमरापूरकरांसारख्यांचे नर्मदेच्या खोऱ्यात पोहोचणे. मणिबेलीचा सत्याग्रह कारागृहापर्यंत पोहोचला होता तो काळच असा होता की, जंगल -पहाडामध्ये पोलिसबळाच्या नाटय़ाला सामोरे जात असताना, सतत बुडिताचे आक्रमण संभव असल्याने टांगती तलवार होतीच! पहिल्या सत्याग्रही तुकडीतील ११ जणांवर- जे मात्र झेंडा घेऊन झोपडीच्या रूपात उभारलेल्या सत्याग्रह केंद्राकडे चालून जात होते, हल्ला होताच संघर्ष विशेष पेटून उठला. नंतरच्या टप्प्यात गावातील जवळजवळ सर्वच पुरुषांना अटकेत घेतल्यावर आम्ही भूमिगत होऊन गावातच, पण साधारण व्यक्तीच्या घरातच स्वत:ला डांबून घेतले. मात्र आदिवासी स्त्रियांच्या बळावर, मध्य प्रदेशातील निमाडच्या शेतकरी कुटुंबातील ज्या स्त्रियाही आपला घुंघट सोडून सामील होत राहिल्या- त्यांच्यासह संघर्ष पुढे रेटला जात होता. त्याच दरम्यान काही कि. मी. अंतर चालूनच पोहोचण्याच्या मणिबेलीत श्रीराम लागूंचे पोहोचणे सर्वानाच प्रेरणादायक होते. आंध्र प्रदेशचे क्रांतिकारी वकील कन्नाबिरन यांच्यासह त्या वेळचे अनुसूचित जनजाती आयुक्त

डॉ. ब्रह्मदेवजी शर्मा हेसुद्धा तिथे पोहोचून १५ ऑगस्टचा झेंडा फडकावून, आमच्या अनुपस्थितीत सत्याग्रहास जिवंत ठेवण्याचे कार्य केले. शर्माजी हेसुद्धा साहित्यिक अधिकारी आणि आदिवासींच्या जीवनावर कथा, कविताही लिहिणारे आणि आदिवासी विकास उप – योजना (Tribal Sub Plan – TSP) तसेच १९९६ चा आदिवासी स्वशासन कायदा या शासकीय कायदा – धोरणाचा पाया उभारणारे!

अमरापूरकरजी त्यानंतर बऱ्याच वर्षांनी पोहोचले- ते पुनर्वसाहतीत त्यांची शारीरिक स्थिती फार ठीक नसतानाही. महाराष्ट्र सरकार उरलेल्या काही हजार आदिवासींसाठी, खासगी जमीन विकत घेऊन अथवा उजाड जंगलजमीन शोधून वसवत नव्हते म्हणून चाललेल्या जमीन हक्क सत्याग्रहात! त्यांनी तिथे मूळ जमीनमालकांशी चाललेल्या विवाद सोडवण्यात, तर नंतर मंत्रालयात आदिवासींची बाजू मांडण्यात जी भूमिका बजावली त्यांचे विस्मरण कठीणच! एरवी खलनायकाची किंवा डोळे वटारणाऱ्या पोलिसाची भूमिका बजावणारे सदाशिवराव किती संवेदनशिलतेने पेश यायच, तेच आम्ही पाहिलेच; नंतर आदिवासींच्या होळीतल्या रंगात  आणि नाचातही दंग झालेलेही!

रत्नाकर मतकरींनी अनेका समस्यांवर मात करत न केवळ आदिवासी जग पाहिले, तर त्यांची चित्रकार म्हणून ओळखही आम्हाला करून दिली- ती सुंदर रंगचित्रे तयार करून ते जग इतरांना दाखवण्याची. आंदोलन पुढे जाताना संघर्ष पेटला असताना एका पुरस्कार घेण्याच्या समारंभातही त्यांनी खेद व्यक्त करून सहजासहजी विस्थापितांची वेदना न समजणाऱ्या अशा प्रस्थापितांनाही जाणीव करून दिल्याने त्यांचे योगदानही महत्त्वाचे होते. आजही त्यांची ती सुंदर चित्रे झळकावीत अशी जपून ठेवली असल्याचे श्रेयही त्यांचेच!

विजय तेंडुलकरांशी आमचे नातेही नर्मदेनेच अधिक घनिष्ठ केले. माळगावापर्यंत चालून अनेक कि. मी. तेंडुलकर पोहोचले होते. आदिवासींच्या डोमखेडीतील होडीत नुकतेच आलेले अनोखे सोलारचे दिवे म्हणजे प्रकाश टाळून नाच नाच नाचणाऱ्या तरुण युवांचे किती कौतुक केले होते त्यांनी. आणि स्वत: फार तरुण नसतानाही डोंगरी चढ-उतार सहन करतच त्यांनी आंदोलनाच्या वर्षांनुवर्षांची हकीकत टिपली, रेकॉर्ड केली आणि एका फिल्मचा मसुदाही कागदावर आखला, तो चॅनेल ‘IV’ नावाच्या ब्रिटनच्या गाजलेल्या माध्यमासाठी. मात्र माझ्यासारख्या कार्यकर्तीवर आंदोलन चालू असताना फिल्म रेखाटण्यास मला विरोध करावाच लागला आणि क्लॅक्स्टन (Claxton) या फिल्ममेकरचा राग ओढवून घेतला तेव्हा तेंडुलकरांची संवेदनाच त्याला आणि मलाही शांत करून एका आदिवासी स्त्रीवर कथा आखून, शबाना आझमीला कलाकार म्हणून तयार करू शकली! तेंडुलकरांची शांत, विचारी मुद्रा कागदावर वा भाषणात (अर्थात साहित्य संमेलनातले एक तेज भाषण वगळून) अनुभवणारे अनेक असतील; मात्र त्यांचा शांतच नव्हे, तर प्रेमळ स्वभाव मी अनुभवला तो माळगावी पोहोचल्यावर मला कडकडीत ताप भरल्यावर. तिथून चालत धडगावपर्यंत १६ कि. मी. जाणे शक्य नसल्यामुळे, सारे पुढचे कार्यक्रम बदलून, तिथेच मुक्काम ठोकणाऱ्या तेंडुलकरांचा! त्यांनीच प्रियालाही आमच्याशी जोडले आणि त्यांच्या एखाद दुसऱ्या मित्राचा आमच्यावरचा रागही समजून घेत, आमच्या संपूर्ण विचार- आचारांना साथ देतच ते गेले!

शबाना आझमी त्यापूर्वीच जोडलेली आणि नर्मदेच्याच नव्हे तर तिच्या जवळच्या सहकाऱ्यांसह मुंबईतील गरिबांच्या, उच्चवर्गीयांकडून झिडकारल्या जाणाऱ्यांच्या ‘घर बचाओ – घर बनाओ’ म्हणून गुंजणाऱ्या सभेतही सामील झालेली. आजही आमच्या गरिबांना तिची आठवण येते. मात्र तिचे खरे कौतुक झाले ते तिने स्वामी अग्निवेश आणि लक्ष्मीचंद जैन यांच्यासह आमच्या क्षेत्रातच घेतलेल्या जनसुनावणीत आणि त्यानंतर दिग्विजयसिंहजींना नर्मदा खोऱ्यातल्याच मेळाव्यात, ‘एक खेत नही, एक देश नही, हम सारी दुनिया मांगेंगे’ या तिच्या नाऱ्यानेही ती गाजली. मुस्लीम म्हणून तिच्यावर झालेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवरही पुन्हा नर्मदेबाबतचा अन्य मान्यवरांचा अहवाल लोकार्पित करण्यासाठी हिमतीने इन्दौरला पोहोचली म्हणूनही!

सर्वाधिक प्रसिद्धी पावलेला आणि विरोध भोगलेला सहभाग अर्थातच आमिर खान यांचा. ते अतुल कुलकर्णीसह २००६ च्या उपोषणाच्या प्रसंगी दिल्लीला पोहोचले तेव्हा साहजिकच सारे साथी हरखून गेलेले. धरणस्थळी पोहोचण्यापूर्वी इस्पितळात येऊन भेटून ते चक्कलोकांमध्येही उतरले, म्हणूनही कौतुक झालेच, पण त्यांची परीक्षा ही त्यानंतरच्या गुजरातच्या प्रतिक्रियेनेच! त्यांच्या ‘फना’ नावाच्या फिल्मवरचा बहिष्कारच नव्हे तर एका मराठी चॅनेलवर गुजरातच्या भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकारी अमित ठक्कर या गुंडागतच पेश आलेल्या व्यक्तीने माझ्याबरोबरच त्यांनाही अपमानजनक प्रश्न विचारले त्या कार्यक्रमामुळेही! मात्र अखेपर्यंत पुनर्वसनातील अन्यायाला मी साथ दिली आणि त्यात काही चुकले नाही ही भूमिकाच ठामपणे मांडणारे आमिर खान खरेपणामुळे अधिक भावले. आमचे प्रश्न पर्यावरणाचे, लाभहानीचेही! आज सरदार सरोवराबाबत खरे ठरलेले; तरीही पटलेल्या मुद्दय़ांपुरतीही कलाकाराची साथ मोलाची असते, हे आम्ही कार्यकर्तेही समजून असतोच ना! कधी राहुल बोस तर कधी मन्सूर खान अशांनीही खोऱ्यात येऊन बळ देताना, सारी जोखीम मान्य केलेली! आज तर धरणच काय, विकासाच्या संकल्पनेवरही प्रश्न उठवताच, अगदी तात्त्विक चर्चा करताही शासकांचा वरदहस्त काढून घेऊन दट्टय़ा भोगायला लावणारी परिस्थिती! त्यातही आपले जगणेच जपण्यासाठी, कुठे छत राखण्यासाठी वर्षांनुवर्षे लढणारे आमचे मुंबईतील दरशथ भाई, जैनुद्दिन भाई असो वा गोळीबारच्या प्रेरणाताई आणि साऱ्या बाया-पोरे.. ही जितकी धिटाईची- तितकी नाही तरी या समर्थकांनी दाखवलेल्या हिमतीची दाद देत आम्ही वाटच पाहतो अशांच्या समर्थनाची!

कुणी म्हणेल- नव्हे म्हणतातही, अशा मान्यवरांना मानच कशाला द्यायचा? त्यांची दुनिया वेगळी, त्यांचे विचार तरी किती सारगर्भित आणि एखाद् दोन दिवसांची साथ तरी किती मोलाची? आमिर खान यांच्या कोकाकोलाच्या जाहिरातीतील भूमिका ही परस्परविरोधी म्हणून त्यांना उलटा प्रश्न टाकण्याचा प्रकारही घडला होताच. आम्ही मात्र आपली स्पष्ट भूमिका कायम ठेवूनही त्यांचे स्वागतच केले आणि करतो. (अर्थात प्रत्येकच कलाकार दीर्घ संपर्क ठेवू इच्छिणे शक्य नाही) ते दुसऱ्या दुनियेत कष्टकऱ्यांच्या कष्टाची झलक तरी पोहोचावी म्हणूनच एका अर्थी भारत आणि इंडियातला बहुचर्चित फरक कुठेतरी छिद्राछिद्रांतून येणाऱ्या हवेच्या झोकामुळे स होत नाही; दृश्य तरी होतोच!

माध्यमकर्ते म्हणून वाखाणलेले कुणी आपापले माध्यम घेऊन आंदोलनापर्यंत पोहोचतात, त्यात गौतम घोषांसारखे जगभर पुरस्कृतही असतात तर सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर आणि आता शिल्पा बल्लाळ यांसारखे नेमक्या वळणावर आंदोलनाचे नेमके प्रश्न मांडणारेही! सुमित्राताईंनी अनेक फिल्मफेअरची पारितोषिके घेतलीच, पण नर्मदाकाठी येऊन आदिवासी भाषेतल्या ‘लाहा’ नावाच्या मात्र वीस मिनिटांच्या फिल्ममधून जी वेदना मांडली, ती आजही आमचे साथी शेतकरी, मजूर मच्छीमार सारे अनुभवताहेत. घराघरातल्या एकेक ‘प्रतिनिधी’ने एकत्र येऊनच प्रत्येकाचे घर बांधून देण्याची आदिवासी परंपरा, विस्थापनातून पुनर्वास साधला तरी- कशी मोडून- कोलमडून पडते, तेच नेमके पकडून ही फिल्म झळकली ती मर्यादितच समूहांमध्ये.. कमी पडलो ते आम्हीच. अर्थात त्या वेळचा मीडिया आजच्या इतका ‘सोशल’ नसल्यानेही असेल. मात्र आजची बदलती परिस्थिती, त्यात ही उपभोगवादी संस्कृती आणि साधे स्वावलंबी जीवन यातील वाढती दरी लक्षात घेऊन संवेदना टाळणारे नसले तरी आपापल्या परीने जगण्याच्याच धावपळीत ती विसरणारे असे लाखो लोक असतात.. म्हणून त्यांच्या धिक्काराऐवजी त्यांना आवाहनातून बरेच काही स्वीकारायला लावणारी शिल्पाताईंची फिल्म आजही गाजते आहे. अशा कलाकारांचे आंदोलनाशी जोडले गेलेले नाते हे जडते आणि दोन दुनियांतील भिंतीचे जडत्वही गळूनच पडते.

लेखांच्या माध्यमातून उमटलेला आंदोलनांचा आवाज हाही आमच्या संजय संगवईसारख्या स्वत:च्या अपार व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या साथींमुळेही! संजय हा मुळात पत्रकार. मात्र, आंदोलन पुढे जात असतानाच, घडत आणि विकसित जाणारी भूमिकाही त्यातच गुंतून पडलेले कार्यकर्ते नाही मांडू शकत.. ते आरडतात – ओरडतात, तरी हे ‘लोकसत्ता’साठी लिहितानाही वेळ शोधत खरडत मी कसे कसे, ते पाहिल्यास ध्यानी येईलच की! आम्ही सारे काही नाही मांडू शकत, जितक्या सखोलतेने हवे तितक्या! अशा वेळेस आम्हाला भेटलेल्या, अनेक लेखक – कवींनी सारे भरून काढले. ती वर्षे उलटली तरी आजही गरज आहे नवनव्या उमेदीने जळाच्या तळाशी बुडलेले, पाण्यानेच नासवले गेलेले आणि खोटय़ा लाभ-हानीमुळे नाडवले गेलेले जग पाहून ते शब्दांकित करणाऱ्यांची! आज मुख्य प्रवाहातले मानलेले जे जे कुठे तरी अवकाश चोरत वा विकत असतात, त्यांच्यापुढे हात पसरणे तर सोडाच; त्यांना काही सुचवणे वा आवाहन करणेही आंदोलनकारी नाहीच करत! हा गुर्मीचा प्रकार नव्हे, तर स्वावलंबनामुळेच असावे. तरीही अनेक कॉलम लिहिणारे ते जनवादी पत्र चालवणारे, स्वतंत्र बाण्याचे समर्थक आम्हाला राज्याराज्यांत भेटले. त्यांची त्या त्या कठीण परिस्थितीतली हस्तक्षेपाची, लढणाऱ्यांच्या भावनांनाच नव्हे तर निर्धारालाही बळ देत, वाट करून देण्याची कसोटी फार मोलाची ठरली. ‘जलसमाधी’च्या अत्यंत कठोर लढय़ाच्या काळात आमचे, साऱ्यांचे भोग पुढे आणत, समाजाला आवाहन करणारे निखिल वागळे यांनी आज आमच्या राष्ट्रीय समन्वयाच्या संविधानाविरोधी परिस्थितीतल्या आव्हानाचाही पाठिंबा देत तेच नाते जपल्याचे दाखवले. केवळ वर्तमानपत्रापुरतेच मर्यादित न राहता, कैवारी बनूनच जनलढय़ाकडे अभ्यासपूर्वक पहणारे सतीश कामत वा प्रतिमा जोशी.. कधी उर्मिला पवार तर कधी उपोषणाच्या मंचावर उतरणारे नारायण सुर्वे आणि मंगेश पाडगावकरही त्याच समूहातले! या साऱ्यांच्याही पलीकडे उभ्या दिसतात त्या पुष्पाताई भावे- ज्यांच्या घरातच कवी ग्रेस यांच्यासह रुईया कॉलेजमधील दिवसांत झडलेल्या काव्य वाचनाच्या मैफिली आम्ही विसरू शकत नाही. त्यांची आंदोलनातली साथ-सोबत ही मात्र गांधी, आंबेडकर, मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानांच्या समन्वयातून, समजून उमजूनच नव्हे तर विचारांनी सजवून दिली गेलेली, म्हणूनच आंदोलनाची विचारवंतांशी नाळ जोडणारी. असेच अनेक मराठी वैचारिक व्यासपीठावर गाजलेले सहयोगी आम्हाला भेटले ते नरेंद्र दाभोलकर, विद्याताई बाळ, गजानन खातू.. असे अनेक- अशांची गरज अगदी काश्मीरमधील हिंसा-अहिंसेच्या खेळातच नव्हे, तर सत्ताधीशांपुढे सत्याधीन होऊन वारंवार वेगवेगळ्या मंचावरून सामोरे होणारे आम्ही सारेच जाणतो. म्हणूनच सिंगूर-नंदिग्रामच्या लढय़ात ममता बॅनर्जीची राजकीय आव्हानाची जितकी, तितकीच महाश्वेतादेवींच्या विचारशीलतेची आणि अपर्णा सेनच्या कलात्मक भावनिकतेची शिदोरी आम्हाला ताकत देत राहिली. केरळमधल्या कोकाकोलाविरोधी लढय़ात असो वा एन्रॉनविरोधात राष्ट्रीय ताकद उभे करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये.. असे अनेक कलाकार आंदोलनकारीच बनल्याचे आठवते. कधी सुकुमार अळिकोडे, कधी सारा जोसेफ.. यांसारखे अभ्यासक तर कधी गुजरातमध्ये स्वरूप ध्रुव! कर्नाटकनमध्ये यू. आर. अनंतमूर्तीनी तर जनआंदोलनकारींना साहित्यिकांतर्फे दिलेला सन्मान हा आमच्या संघटनेसाठी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’च होता. या साऱ्यांचा जनसहयोग हा आमच्याशी जोडलेल्या नि:स्वार्थी निवृत्त न्यायाधीश. वकील, प्राध्यापक, संशोधक, डॉक्टर्स, ते दानशूर होऊन इतरांनाही गरीब आंदोलनासाठी तंटय़ा भिलाप्रमाणे लुटणाऱ्या पाठीराख्यांपर्यंत सर्वत्र पसरलेला. आजही या अशा बांधिलकीची, कर्तव्य परायणतेची गरज सर्वाधिक असताना केवळ भूतकाळ आठवत राहणे योग्य नव्हेच; तरीही आठवणींनीही आत्मविश्वास वाढतो, तर इतरांना संदेश मिळू शकतो म्हणून हे पारायण – ‘जनसहयोग’ या १९८६ मध्येच नोंदलेल्या एका व्यापक आवाहन काय, अभिनयाचे, जे पुढेही न्यावे लागेलच!

medha.narmada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:16 am

Web Title: public collaboration with artists medha patkar narmada bachao andolan abn 97
Next Stories
1 टपालकी : आनंदाचा फारम्युला
2 ग्रेटाची हाक कोण लक्षात घेतो?
3 बहरहाल : अवकाळी अवदसा
Just Now!
X