आपल्या सार्वजनिक जगण्याची प्रत सुधारावी, दर्जा वाढावा म्हणून कामं करणाऱ्या लहान-मोठ्या सेवाभावी संस्था आणि त्यांना उभं राहायला, वाढायला मदत करणारी अक्षरश: हजारो माणसं हे चित्र सुखद आहे. अशा अनेक संस्था आज कार्यरत आहेत, हे महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि निरपेक्ष मदत करणारे अगणित दानशूर हे या संस्थांचंही भाग्य आहे…‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्ताने लेखिका आणि संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांनी केलेले विचारप्रवर्तक भाषण…

‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा करोनाकाळातला एक सुखद सोहळा आहे. ‘द’ म्हणजे देणारा… सुख देणारा. आणि दुसरा ‘द’ दहा वर्षांचा. दशकपूर्तीचा सोहळा. गेलं संपूर्ण वर्ष जगासाठी एक दु:सह वर्ष होतं. जानेवारीत चीनमध्ये करोनाचा पहिला उद्रेक झाला आणि अकल्पित वेगाने हा विषाणू जगभर पसरला. त्याने इटली आणि स्पेनमध्ये घातलेलं मृत्यूचं थैमान बातम्यांमधून ऐकताना, पाहताना जे दडपण आलं ते आपल्याकडच्या फैलावानं हळूहळू वाढतच गेलं.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

लॉकडाऊन, कॅन्टन्मेंट झोन्स- सोशल डिस्टन्सिंग… नवनवे शब्द दहशत निर्माण करत गेले. गोंधळ तर उडालाच. शासनाचा उडाला. सार्वजनिक यंत्रणांचा उडाला. माणसांचाही उडाला. पोट भरण्यासाठी शहरात आलेली माणसं उपासमारीच्या आणि मरणाच्या भीतीनं आपापल्या गावांकडे धावत सुटली आणि त्यांची दैना उडाली. त्यांची दुर्दशा पाहताना वाटणारी दुबळी हताशा आणि भयग्रस्त स्थलांतरितांच्या वाट्याला आलेलं अनाकलनीय दु:ख… भयाचा दरारा, दडपण, दहशत, दैना, दुर्दशा, दु:खं… ‘द’ची ही बाराखडी कधी संपणार असं दीनपणे विचारणारा दुर्दैवी वर्तमान!

या सगळ्यातून सावरताना ‘द’ची दुसरी बाजू लक्षात आणून देणारंही काही घडत होतंच. आणि ते मोठं दिलासादायक होतं. माणसं परस्परांना मदत करत होती, खुशाली विचारत होती. स्वत:ची आणि इतरांची काळजी करत होतीच; पण काळजी घेतही होती. अनोळखी वाड्या-वस्त्यांवर धाव घेत होती. सफाई कामगार आणि पोलिसांपासून शिक्षकांपर्यंत आणि स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्या कार्यकत्र्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत अनेक जणांनी या काळात  ‘दया’ आणि ‘दान’ यांचे मलिन अर्थ झटकून इतकं मोठं देणं या काळात दिलं, की त्या देण्याला एकदम मानवजातीच्या आस्थेचंच मोल आलं.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा त्याच काळातला उपक्रम! दरवर्षी गणेशोत्सवात गेली दहा वर्षं चाललेला. या वर्षीचा गणेशोत्सव खरं तर नेहमीसारखा नव्हता. अगदी असाधारण परिस्थितीत तो आला. अनावर गर्दी आणि अलोट उत्साह लोकांनी संयमानं दूर ठेवला. मात्र, निराश करणाऱ्या करोनाच्या बातम्यांवर मात करत ‘सर्वकार्येषु सर्वदा’चा उपक्रम जाहीर झाल्यावर त्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी दानशूरांची गर्दी उसळली. कोटी-कोटींचा निधी दहा संस्थांकडे पोचता झाला.

ही कठीण गोष्ट होती. आर्थिक घडी पूर्ण विस्कटलेली. नोकरदार घरी बसलेले. व्यवसाय ठप्प झालेले. छोट्या उद्योगांना जबर फटका बसलेला. उत्पादन बंद आणि आवकही पूर्ण बंद. ही परिस्थिती बदलून पूर्वस्थिती यायला वर्ष- दोन वर्षं तरी लागतील, असं तज्ज्ञ सांगत असलेले. तरीही मदतीचे हजारो हात दानासाठी पुढे आले.

सार्वजनिक संस्थांसाठी तर काळ कठीणच होता. अशा बहुतेक संस्थांना स्वत:ची उत्पन्नाची साधनं सहसा असत नाहीत. कित्येक संस्था संस्थाचालकांच्या, परिवाराच्या, स्नेही मंडळींच्या आणि समाजातल्या दानशूरांच्या मदतीवरच उभ्या असतात. त्या सुरू करताना माणसांच्या प्रेरणा वेगळ्याच असतात. तळमळ वेगळीच असते. कितीतरी जणांनी अंधारातच उडी घेतलेली असते. ‘हे दिसतंय, हे ठीक नाही. हे बदलायला हवंय. काहीतरी करू या. मी करीन. आपण करू…’ अशा एका ऊर्मीनं ही माणसं कामात उतरतात.  म. म. देशपांडे हे आमचे कवी म्हणतात तशी तहान त्यांना लागते…

‘सारा अंधारच प्यावा

अशी लागावी तहान

एका साध्या सत्यासाठी

देता यावे पंचप्राण’

अशी अंधार हटवण्याची, तो पिऊन टाकण्याची तहान फक्त वेड्यांनाच लागू शकते. आणि अशा वेड्यांकडूनच नि:स्वार्थी कामं उभी राहू शकतात. या कामांच्या- लहान लहान कामांच्या काठ्यांवर खरं तर समाजाच्या प्रगतीचा गोवर्धन उचलला गेलेला असतो आणि त्याच्या निवाऱ्याला अनेक जण आलेले असतात. शोषित असतात, वंचित असतात, दुर्लक्षित असतात, दुर्बल असतात… अनेक असतात.

अशी संस्थात्मक कामं उभी करणारी माणसंही दान-संस्कृतीचाच वारसा चालवतात. आपले पदरचे पैसे, श्रम, वेळ, बुद्धी खर्च करून ते अशी कामं उभी करतात. त्या कामाला- पर्यायानं समाजालाच त्यांचं ते देणं असतं. कारण देणं हे नेहमी धनरूप असतं असं नव्हे. ते केवळ वस्तुरूप असतं असंही नव्हे. कलावंत काय, शास्त्रज्ञ काय, कवी-साहित्यकार काय; यांचं देणं जे असतं ते अदृश्य देणंच असतं. आणि ते कुणाचं देणं देतात? कुणाचं देणं लागतात? त्यांच्या कामाचं, संशोधनाचं, कल्पनांचं, स्वप्नांचं देणं लागतात ते. स्वत:चं, किंबहुना मानवी जीवनाचंच देणं ते देत राहतात.

अशा माणसांच्या नफ्यातोट्याची गणितंही वेगळी असतात. ती तुमच्या-आमच्या सामान्य अर्थकारणात बसणारी नसतात. यांचं काम वाढतं तेव्हा त्या, त्या क्षेत्रातल्या प्रश्नांचा ‘आ’ वासलेला जबडा मोठा मोठा होत नाही, तर तो मिटत जातो. त्या प्रश्नांची व्याप्ती कमी कमीच होत जाते. रस्त्यावरची उनाड मुलं जितकी कमी होतात, वाया जाण्यापासून जितकी दूर होतात, तितकं ‘सार्थक’ संस्थेचं यश वाढतं. जितके  प्राणी बाहेर मुक्तपणे निरोगी आणि निर्भय जगू शकतात, तितकी ‘करुणाश्रमा’तल्या प्राण्यांची संख्या रोडावते. आणि हे संस्थेचं दु:खं नसतं, तो त्यांचा आनंद असतो. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या जितकी कमी होते तितकं ‘डोअरस्टेप स्कूल’च्या संचालकांचं समाधान वाढतं.

या संस्थांनी किती प्रकारच्या प्रश्नांना हात घातला आहे हे पाहिलं की समाजाच्या बहुजिनसीपणाची, बहुपदरीपणाची, बहुस्तरीय असण्याची तीव्रतेने जाणीव होते. जाणीव होते की सामाजिक उत्कर्ष केवळ मोजक्या पृष्ठस्तरीय अशा घटकांच्या उत्कृष्ट प्रगतीवर मापायचा नसतो. तसं असतं तर सार्वत्रिक शिक्षणाचा आनंद व्यक्त करताना सुहित, सार्थक किंवा डोअरस्टेप स्कूलसारख्या संस्थांची गरजच नसती. आरोग्याच्या केवळ सुविधांची अत्याधुनिकता महत्त्वाची असती तर मेळघाटातलं डॉ. कोल्हे यांचं काम किंवा अभय आणि राणी बंगांचं काम, हेमलकसा- आनंदवनाचं काम वाढतं राहिलंच नसतं. स्त्रियांच्या नेत्रदीपक कर्तबगारीचा थक्क करणारा चढता आलेख दाखवताना तिच्यावरचे बलात्कार, अत्याचार, तिची वाढती असुरक्षितता आणि इतर अनेक प्रश्न उपस्थित झालेच नसते. त्यामुळे हे लक्षात घेतलंच पाहिजे, की सामाजिक उत्कर्ष केवळ काही घटकांच्या काही क्षेत्रांतल्या प्रगतीवर अवलंबून नसतो, तर तो पायाभूत अशा छोट्या छोट्या परिसंस्थांच्या विकासकार्यावरही अवलंबून असतो.

यासाठीच आपल्या सार्वजनिक जगण्याची प्रत सुधारावी, दर्जा वाढावा म्हणून कामं करणाऱ्या लहान-मोठ्या संस्था आणि त्यांना उभं राहायला, वाढायला मदत करणारी अक्षरश: हजारो माणसं हे चित्र सुखद आहे. अशा अनेक संस्था आज कार्यरत आहेत, हे महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि निरपेक्ष मदत करणारे अगणित दानशूर हे या संस्थांचंही भाग्य आहे.

समाजकारणातलं जैववैविध्य टिकवून ठेवणाऱ्या परिसंस्था म्हणून पायाभूत पातळीवरच्या या कामाचं महत्त्व ‘लोकसत्ता’नं ओळखलं आणि दानसेतू म्हणून स्वत:ची भूमिका निर्माण केली. या अशांत काळात सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात चाललेल्या प्रचंड कोलाहलातून या संस्थांचे लहान लहान आवाज ऐकणं ही कठीणच गोष्ट. करोनाकाळात प्रदूषण- सर्व प्रकारचं प्रदूषण- कमी झाल्यावर माणसांना जणू प्रथमच वसंतातले लहान लहान पाखरांचे आवाज ऐकू आले. एरवीच्या जगण्याच्या कल्लोळात ते ऐकूच येत नव्हते. ही गोष्टही तशीच घडते आहे. नवं जग हे तर जाहिरातीचं जग आहे. इथे जाहिरात करून मातीही सोनं म्हणून विकता येते. अशा वेळी शांतपणे विधायक कामांमध्ये गुंतलेल्यांचे आवाज ऐकणं आणि त्यांच्या कामांचं अस्सल मोल समाजाच्या लक्षात आणून देणं ही गोष्ट महत्त्वाची आहे.

जागतिकीकरणाने फार झपाट्याने जगाचं स्वरूप बदलून टाकलं आहे. तंत्रज्ञानाचा झपाटा विस्मयकारी आहे. पण या प्रगतीबरोबरच अनेक प्रकारची पडझडही झालेली आहे. स्त्रीविषयीच्या दृष्टीची झाली, तिच्या प्रतिमेची झाली, तिच्या पूर्वसंमत भूमिकांची झाली, एकत्र कुटुंबाची झाली, विभक्त कुटुंबांचीही झाली. स्त्री-पुरुष संबंध बदलले. आई-वडील आणि मुलांचे संबंध बदलले. एकूणच मानवी नातेसंबंध बदलून गेले. वंचित-शोषितांकडे पाहण्याच्या पूर्वग्रहांची पडझड झाली. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आणि आपल्याकडे येणाऱ्या त्यांच्यासंबंधीच्या जबाबदारीची इतरांना जाणीव झाली. दया आणि कणव यांची जागा कर्तव्य आणि सहानुभाव यांनी घेतली. समाजाची पूर्वीची बांधणी निखळली. सृष्टीशी असलेले माणसाचे पूर्वबंध निखळले.

प्रगतीच्या पोटात अशी पडझड असतेच. ती अटळ असते. आवश्यक असते. पण कधी ती अनावश्यकही होत जाते. कधी अजाणताच पोषक आणि सत्त्वयुक्त गोष्टीही नष्ट होतात. मृत गोष्टींबरोबर जिवंत गोष्टीही नाहीशा केल्या जातात. हे घडतं आहे याची जाणीव होणं आणि त्याविषयी नकाराचे नारे लावण्यापेक्षा किंवा आक्रोश करण्यापेक्षा त्या घटनांवर मात करण्याचा, समाजातली शक्तिस्थळं वाचवण्याचा प्रयत्न करणं यांची गरज अधिक असते. जुन्या-नव्या प्रश्नांचं बदलतं स्वरूप ओळखणं महत्त्वाचं. प्रश्न बदलतात, त्यांच्या सोडवणुकीची साधनं बदलतात. याचा अंदाज सर्वसामान्यांना नाही येत. प्रगतीची यशोगाथा सांगताना या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. हे साहजिक असतं, पण समर्थनीय नसतं. हे लक्षात घेऊनच सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते काम करत असतात. काळाचा मोहरा फिरवू शकतील अशी प्रभावशाली माणसं आज कमी आहेत. हा काळ उंच  माणसांनी आभाळ पेलून धरल्याचा नाही. अशा वेळी ती जबाबदारी आज एकीकडे सार्वजनिक संस्थांवर आली आहे आणि दुसरीकडे समाजमाध्यमांवर आली आहे. ‘लोकसत्ता’नं या उपक्रमातून जबाबदारीचा आपला वाटा उचलला आहे.

दहा वर्षांत शंभरहून अधिक संस्था या उपक्रमामधून समोर आल्या आहेत. त्यांनी दान-संस्कृतीचा आपला वारसा चालवला आहे. ज्यांच्याजवळ पुरेसं आहे त्यांनी गरजूंसाठी थोडं देत जावं, ही आपली संस्कृती आहे. जे आहे ते वाटून घ्यावं अशी आपल्याकडची आवर्जून दिली जाणारी शिकवण आहे. एक तीळ सात जणांत वाटून खाण्याची ही शिकवण आहे. संस्कृतीचं एक मोठं लक्षण आहे ते. आणि संस्कृती म्हणजे विशिष्ट धर्म नव्हे, ही एकूण भारतीय समाजाचीच जीवनरीत आहे… शतकांची रीत आहे.

‘मी’ नव्हे, ‘आपण सगळे’ हे आपल्या संस्कृतीत भिनलेलं तत्त्व आहे. दारी आलेल्याला विन्मुख पाठवू नये, सर्वांना द्यावं, मग आपण खावं, गाई-गुरांसकट सगळ्यांसाठी घास काढून ठेवावे, हा इथल्या गृहस्थधर्माचा भाग होता. लोकसंस्कृती ही तर खुलभर दुधाने सारा गाभारा भरून टाकण्याची संस्कृती आहे. सर्वांना देऊन, वाटून उरलेलं दिलं तर ते इथल्या ईश्वाराला अधिक आवडतं… अशा कहाण्या इथे घराघरांमधून ऐकू येणाऱ्या आहेत. दान देणं हे जगण्यात इतकं घोळलेलं तत्त्व आहे, की त्याची वेगळी जाणीवही होऊ नये. भूदान किंवा श्रमदान हे शब्द माणसांना इतके आपलेसे झालेले, की फार मोठ्या चळवळी त्यातून समाजधुरिणांना उभ्या करता आल्या.

संस्कृतीची व्याख्या विनोबांनी फार सोपी केली आहे. प्र-कृती म्हणजे ‘प्रकर्षानं कृती’ हा निसर्गाचा स्वभाव आहे. वि-कृती म्हणजे या नैसर्गिकतेत होणारा बिघाड आणि संस्कृती म्हणजे तसा बिघाड होऊ नये यासाठी करायचे संस्कार. भूक लागली म्हणून खाणं ही प्रकृती आहे, दुसऱ्याचं हिसकावून  घेऊन खाणं ही विकृती आहे आणि स्वत:मधलं किंवा स्वत: उपाशी राहून भुकेलेल्याला खाऊ घालणं ही संस्कृती आहे. संस्कृतीचा प्रवास असा पशुत्वाकडून विश्वाबंधुत्वाकडे आहे.

प्रकृतीवर संस्कार करण्यासाठी नाना साधनं माणूस वापरतो. त्यांच्या मदतीनं बाह्य जगावर संस्कार करत जातो. आणि बाह्य जगाचा उपभोग योग्य रीतीने घेता यावा यासाठी स्वत:वरही संस्कार करत जातो. या संस्कारांमध्ये दानाचं महत्त्व मोठं आहे. आपल्या संस्कृतीच्या घडणीतच काही वैशिष्ट्यं आहेत. आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतंच. फळ चांगलं मिळायचं असेल तर चारित्र्यही चांगलं हवं. म्हणून चारित्र्यसंपन्न असण्याची प्रेरणा संस्कृतीतच सामावलेली आहे. आणि त्याग व दान या संकल्पना त्या चारित्र्यसंपन्नतेशी जोडलेल्या आहेत. दान- आणि तेही सत्पात्री दान याचं फार मोठं महत्त्व त्यासाठीच आहे. हे महत्त्व आज नीट लक्षात घेतलं पाहिजे. नवी जागतिक संस्कृती ही ज्ञानाधिष्ठित किंवा श्रमाधिष्ठित संस्कृती नाही. ती धनाधिष्ठित संस्कृती आहे. आज भांडवल मुक्त झालं आहे आणि माहितीलाच भांडवलाचं स्वरूप आलं आहे. त्याचे लाभ मोठे आहेत, पण त्याचे दुष्परिणामही मोठेच आहेत. ते टाळण्यासाठी आता मानवी जीवनाची मूलभूत प्रतिष्ठा राखणाऱ्या विचारांची आणि ते विचार कृतीत आणणाऱ्या माणसांची, संस्थांची मोठी गरज आहे.

आपला- म्हणजे एकूण भारतीय माणसांचा मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ इहवादी नाही, यांत्रिक नाही. तो जैविक आहे, भावात्मक आहे. सहजपणे भारतीय माणूस तत्त्वज्ञान जगत असतो. आपण एकटे जगत नाही, तर समाजात जगतो म्हणून या जीवनाचं आपल्यावर ऋण आहे, असं म्हणत इथला रॉय किणीकरांसारखा एखादा कवीही ऋणकल्पनेचा भव्य विस्तार करतो.

‘ऋण नक्षत्रांचे असते आभाळाला।

ऋण फळाफुलांचे असते या धरतीला।

ऋण फेडायाचे राहून माझे गेले।

ऋण फेडायास्तव पुन्हा पाहिजे मेले।’

हे इथल्या साध्या कवीचेही उद््गार असतात. मग संत-संस्कृतीचे काय सांगावे!

सदयता, परोपकार, निष्काम कर्म आणि दान यांचा बडिवार इथे असला तर नवल नाही. साधू-संन्याशांची आपली कल्पना रानावनात जाऊन, समाजापासून फटकून राहण्याची नाही. साधुत्वाची आपली व्याख्या सर्वांना सहजपणे सर्व काही देण्याची आहे. ईश्वार सर्वांभूती आहे असं मानून जीवमात्रावर प्रेम करण्याची आहे. म्हणून तर ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ अशी साधुत्वाची आणि देवत्वाची खूण सांगितली जाते. आणि पूजेसाठी नदीवरून पाण्याने भरून आणलेली घागर एकनाथांसारख्या ज्ञानी संतपुरुषाकडून वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात रिती करून त्याला जीवदान देण्यातच देवपूजेची सार्थकता समजली जाते.

दानशूरांच्या कथा आपण फार प्रेमाने ऐकल्या, सांगितल्या आहेत. राजा हरिश्चांद्र, राजा शिबी, दानव्रती कर्ण- आपली धनदौलत, आपली सत्ता, आपली बायका-मुलंच नव्हे, तर आपले प्राणही दानासाठी पणाला लावणारे लोक संस्कृतीने आदराने गौरवले आहेत. ते शूर मानले गेले आहेत. कारण त्यांच्या दानामागे खरोखर एक पराक्रम आहे. माणसाच्या मूलभूत स्वार्थाची लढाई ते जिंकले आहेत. ते कुंपण त्यांनी तोडलं आहे. आपला स्वार्थ स्वत:पुरता, फार तर कुटुंब आणि परिवारापुरता विस्तारतो. पण ओळखदेख नसतानाही इतरांना चांगलं जगता यावं किंवा चांगल्याचं रक्षण व्हावं, यासाठी स्वत:जवळचं देण्यासाठी मनाचं औदार्य लागतं. स्वत:च्या मर्यादांपलीकडे उडी घ्यावी लागते. अशी माणसं संख्येनं वाढती असावीत यासाठी समाजातच औदार्य आणि ‘देण्याची’ वृत्ती रुजवण्याचे कितीतरी मार्ग आपल्या संस्कृतीने शोधले. सणाउत्सवांत, नित्यनैमित्तिकांत दानाचं महत्त्व आणि दानाची शिकवण गुंफून टाकली. कर्मकांडं महत्त्वाची करत तीच निमित्तं जेव्हा शोषणाचं साधन केली गेली तेव्हा या दानसंस्कृतीला शोषक संस्कृतीचं रूप आलं आणि त्या विकृतीविरुद्ध पुन्हा समाजचिंतकांना उभं राहावं लागलं.

आज स्वच्छपणे आपण या प्रक्रियेकडे पाहू शकतो आहोत, नको ते दूर करण्याचं सावधपण प्रकट करतो आहोत आणि हवं ते उचलण्याचं शहाणपणही प्रकट करतो आहोत. नव्या जगाचे घटक म्हणून पूर्वीच्या संस्कृतिसंबद्ध अशा कितीक मर्यादा आपण ओलांडल्या आहेत. धर्म, जात, भाषा, वंश… अनेक गोष्टी बिनमहत्त्वाच्या करत तंत्राचा पासवर्ड हातात घेऊन मानवजातीचं धुंद करणारं कर्तृत्व आपण अनुभवतो आहोत. पण या धुंदीत माणूस म्हणून आपल्या गाभ्याला  स्पर्श करणाऱ्या ज्या हाका आहेत त्या ऐकण्याचं भान आणून देणारी व्यासपीठं आणि उपक्रम हे फार अगत्याचे आहेत. धन हेच जगण्याचं केंद्र झाल्याची अपरिहार्यता जर स्वीकारावी लागत असेल तर ‘वापरा, वाचवा, वाढवा आणि वाटा’ ही चतु:सूत्री अवलंबणं फार गरजेचं आहे.

एखादा समाज केवळ भौतिकदृष्ट्या प्रगत म्हणून समृद्ध आहे, असं म्हणता येत नाही. सृजनशीलतेची, स्वप्नांची, नव्या कल्पनांची गजबज असणारा आणि परस्परांचा हात धरूनच त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असणारा समाज म्हणून त्याच्या समृद्धीची ओळख असली पाहिजे. अशी ओळख  निर्माण करण्यासाठी ज्या संस्था आणि माणसं काम करतात, त्यांना समोर आणणं आणि समाजानं शक्य ते आणि शक्य तेवढं त्यांच्या मदतीला पुढे येणं, हेच या उपक्रमाचं उद्दिष्टही आणि फलितही! देणं म्हणजेच कमावणं, मिळवणं ही दानाची व्याख्या मानणारी आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घेणारी उदंड माणसं इथे दिसत राहावीत, या सदिच्छेसह थांबते.

aruna.dhere@gmail.com