News Flash

इस्पिकची राणी!

सांगायला आनंद वाटतो की, या मातृसत्ताक व्यवस्थेत मराठी महिलांचा सिंहाचा वाटा होता.

|| अरुणा अन्तरकर

शशिकला पडद्यावर ‘व्हॅम्प’ म्हणून गाजली. परंतु ‘व्हॅम्प ही नायिकेइतकीच सुंदर असली पाहिजे; नाहीतर नायिकेला सोडून नायक तिच्याकडे आकर्षित होईलच कसा?’ हे तिचं म्हणणं होतं. हे तिचं केवळ चमकदार वाक्य नव्हतं, तर ते अनुभवसिद्ध सुभाषित होतं.

विश्वास बसणं अवघडच आहे, तरीदेखील ही वस्तुस्थिती आहे. इतिहास आहे की (कोणे एकेकाळी, पण प्राचीन नव्हे!), पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या काळात या देशात सर्वसामान्य स्त्रियांना आरक्षणाचं नावही न घेता बसमध्ये बसायला जागा मिळायची. त्याचप्रमाणे ‘बॉलीवूड’ नावाच्या (आणि नावाच्याच!) चंदेरी-रूपेरी सृष्टीत नायिकांना समान अधिकार होते. चित्रपटाच्या सर्वेसर्वा नायकांप्रमाणे नायिकांनाही बरोबरीचं स्थान होतं. गुणवत्तेला वाव मिळत होता. आणि यानंतरचं गुणवर्णन करताना कंठ दाटून येतो, तरी सांगायलाच हवं की, ‘दीदार’ नावाच्या सुरेख चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये नर्गिसचं नावसुद्धा अशोक आणि दिलीप या दोन बलाढ्य बॉक्स ऑफिस कुमारांच्या आधी पाहिल्याचं आठवतं आहे.

त्या सोनेरी दिवसांत तरुण, सुंदर, यशस्वी नायिकांनाच नाही, तर चरित्र भूमिका करणाऱ्या आई, माई, ताई, अक्का, आत्या, मावशी, मामी, भाभी, दादी, नानी… अगदी देशस्थांमध्ये(च) असू शकतील इतक्या सगळ्या नात्यांतल्या स्त्रियांना रूपेरी पडद्यावर विनाशर्त मुक्त प्रवेश आणि ठिकाणाही होता. सुरय्या, निम्मीपासून मधुबाला यांच्याबरोबरच हेलन, कुमकुम आणि टुणटुण गुण्यागोविंदाने नांदत होत्या. पडद्यावर एकछत्री (आणि एकसुरीसुद्धा!) अंमल गाजवणारे असंस्कृत महानायक तेव्हा नव्हते. त्यामुळे महिलावर्ग चित्रसृष्टीत आणि पडद्यावर सुखासमाधानानं वावरत होता.

सांगायला आनंद वाटतो की, या मातृसत्ताक व्यवस्थेत मराठी महिलांचा सिंहाचा वाटा होता. मक्तेदारी म्हणावं इतका त्यांचा सर्व विभागांत वावर होता आणि ऐतिहासिक म्हणावी अशी त्यांची कामगिरी होती. ‘आवाज कुणाचा?’ असा प्रश्न उभा राहिला तर त्याचं सुरेल उत्तर होतं- ‘लता-आशाचा’! टॉप टेन नायिकांमध्ये नलिनी जयवंत, नूतन आणि नंदा यांचा दिमाखात समावेश होता. चरित्र अभिनयात दुर्गा खोटे, लीला चिटणीस आणि ललिता पवार यांची मिरासदारी होती. आणि अभिनयाच्या या आगळ्या दालनाची संपन्नता शशिकला आणि शुभा खोटे यांनी वाढवली होती. स्त्रियाही चांगला विनोेदी अभिनय करू शकतात हे शुभानं दाखवून दिलं. शशिकलानं रूपेरी खलनायिकेला वेगळा ढंग दिला. ज्युनिअर खलनायिकांमध्ये तिचा अव्वल नंबर होता. खरं म्हणजे ती निव्वळ खलनायिका (व्हॅम्प) नव्हती; ती सहनायिका होती. तिची आणि शुभाची वाटचाल समांतर आणि समकालीन होती.

दोघींनीही नायिका बनण्याचा प्रयत्न करून पाहिला. ते स्वाभाविकच होते. पण याबाबतीत दोघीही कमनशिबी ठरल्या. शुभाला ‘दीदी’ हा चांगला चित्रपट मिळाला. शशिकलाला ‘सुनहरे कदम’! प्रथम श्रेणीतले नायक, दिग्दर्शक मिळवण्यासाठी शशिकलानं ‘करोडपती’ नावाचा चित्रपट काढला. पण तो आपल्या नावाला जागला नाही. तिकीट खिडकीवर त्याचे बारा वाजले. मोहन सैगल यांच्यासारखा दिग्दर्शक, किशोरकुमार हा त्या काळातला नावाजलेला विनोदी नायक आणि शंकर- जयकिशन यांच्यासारखे खंदे संगीतकार असूनही ‘करोडपती’ साफ कोसळला. ‘आप हुए मेरे, मैं तुम्हारी हुई’ हे फडकदार गाणं किंवा आशानं जीव ओतून गायलेलं ‘सावन बन गये नैन’ हे भावार्त गीतही ‘करोडपती’ला तगवू शकले नाही.

‘सुनहरे कदम’चा पायगुण बरा ठरला नाही. मुळातच तो दुय्यम श्रेणीचा होता. ‘मांगने से जो मौत मिल जाती, कौन जिता इस जमानें में’ हे नितांतसुंदर गीत सोडता त्याच्यापाशी काही म्हणजे काहीच चांगलं नव्हतं.

‘व्हॅम्प’ म्हणून शशिकलाने भरपूर पुण्याई जमा केली होती. त्या बळावरच शशिकला या दोन्ही चित्रपटांचं जबर अपयश पचवून खलनायकीच्या वामपंथावर परतली. श्यामा आणि नादिरा यांच्याशी शशिकलाला जबरदस्त स्पर्धा करावी लागली. तिघींकडे आपापलं वैशिष्ट्य होतं. नादिरा म्हणजे मूर्र्तिमंत खलता! तिच्या वागण्या-बोलण्यातून कुजकटपणा ओसंडायचा. तिच्या चेहऱ्यावर कुर्रेबाज आणि समोरच्याला तुच्छ लेखणारा हेटाळणीचा भाव होता. ती नुसती समोर येऊन उभी राहिली तरी करोना होण्याची भीती वाटावी असा जहरीपणा तिच्यात होता. तिच्या मानानं शशिकला आणि श्यामा अगदी ‘सोबर’ होत्या. सुस्वरूपसुद्धा होत्या. दोघींपाशी गोडवाही होता. त्यामुळेच शशिकलाप्रमाणे श्यामालाही नायिका बनून बघण्याचा मोह आवरला नाही. पण शशिकला आणि शुभा यांच्याप्रमाणे श्यामालाही नायिकापद लाभलं नाही… मानवलं नाही. गुरुदत्त आणि जॉनी वॉकर यांच्याबरोबर दुय्यम श्रेणीचे चित्रपट तिला करावे लागले. (गुरुदत्त तेव्हा थरार/ गुन्हेपट करणारा ‘आरपार’वाला वाल्या होता. ‘प्यासा’पासून लाभलेलं वाल्मिकीपण तेव्हा त्याला दूर होतं.) ‘आन’नंतर नादिराला तरी कुठे नायिका बनवणारा चित्रपट मिळाला? तिलाही ‘श्री ४२०’मध्ये खलनायिकाच बनावं लागलं. तात्पर्य- शशिकला, श्यामा, नादिरा यांना खल-किंवा आजच्या भाषेत निगेटिव्ह भूमिकांमध्येच प्रथम श्रेणीचे चित्रपट व नाव यांचा लाभ व्हायचा होता. ते त्यांचं विधिलिखित होतं.

तिघींच्या या स्पर्धेत शशिकला जास्त टिकली. शिवाय तिच्या चेहऱ्यावरच्या गोडव्यामुळे तिला बिमल रॉय (‘सुजाता’), हृषिकेश मुखर्जी (‘अनुपमा’) आणि बी. आर. चोप्रा (‘वक्त’) या तालेवार दिग्दर्शकांकडे सहनायिकेच्या सकारात्मक भूमिका मिळाल्या. ‘सुजाता’मध्ये ती हरिजन सावत्र बहिणीच्या पाठीशी उभी राहिलेली सहृदय स्त्री होती, तर ‘अनुपमा’मध्ये ती हृषिदांच्या ‘आनंद’ची सख्खी बहीण होती… तशीच आनंदी, उमदी आणि जीवनावर भरपूर प्रेम करणारी!

मात्र, सहनायिका म्हणून शशिकलाचे अभिनयगुण दिसले ‘देवर’मध्ये. मोहन सैगल या गुणी, पण उपेक्षित दिग्दर्शकाचा हा ‘मिनी क्लासिक’ म्हणावा इतका चांगला चित्रपट. एका उत्तम बंगाली साहित्यकृतीवर आधारलेला. त्यात या सुविद्य, सुसंस्कृत व सधन घराण्यातल्या तरुण स्त्रीचा विवाह अगदी विरुद्ध स्वभावाच्या रांगड्या, अल्पशिक्षित आणि तापट स्वभावाच्या पुरुषाशी होतो. विवाहाच्या पहिल्याच रात्री बंदुकीचे बार काढणाऱ्या पतीशी तिचं पटत नाही. आणि पुढे दोघांचीही फरफट होते.

शशिकलाने ही भूमिका अनपेक्षित संयमानं आणि अतिशय समंजसपणानं रंगवली. शेक्सपिअर वाचणारी सुविद्य स्त्री म्हणून ती शोभून दिसली. एरवी किंचित जास्तच लाडिकपणे, काहीसं कृत्रिमच वाटावं अशा ढंगानं बोलणाऱ्या शशिकलाचं वेगळंच रूप ‘देवर’मध्ये दिसलं. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उंच, घाटदार बांधा ही शशिकलाची लक्षात राहणारी खास वैशिष्ट्यं! स्त्रीसौंदर्याचा आदर्श म्हणावं अशी देहसंपदा तिला लाभली होती. छानदार उंची (पण तब्बूप्रमाणे ताडमाड, खटकणारी उंची नव्हे!), या उंचीला साजेशी मांसलता, पुष्टता, गोलाई… सारं वैभव शशिकलाकडे होतं. जे पाहिजे ते एक इंचही कमी नाही की जास्त नाही! अशी तिची मूर्ती म्हणजे कुण्या एका कवीनं    म्हटल्याप्रमाणे ‘सुंदर इमारत’च होती. नकारात्मक भूमिका करण्यासाठी लागणारा रुबाब तिच्या चेहऱ्यावर होता. म्हणून तर बी. आर. चोप्रांनी ‘वक्त’मधली राजघराण्यातल्या स्त्रीची भूमिका तिच्याकडे सोपवली.

कौतुकाची गोष्ट म्हणजे ऐंशीव्या वर्षापर्यंत शशिकलाची घाटदार देहसंपदा जशीच्या तशी होती. त्यात जराही उणं आलं नाही. मर्लिन मन्रोप्रमाणे शशिकलामधल्या मादकतेला चेहऱ्यावरच्या गोडव्याची जोड होती. त्यामुळे तिला नकारात्मक भूमिका तर मिळाल्याच, शिवाय दुसरा लाभ म्हणजे विविध भावछटा असलेल्या चांगल्या चरित्र भूमिका तिला मिळाल्या. ती निव्वळ व्हॅम्प नव्हती. तिच्यापाशी कोणतीही भूमिका साकार करण्याची क्षमता होती. प्रत्यक्ष दुष्कृत्यं आणि कटकारस्थानं करण्यापेक्षा काड्या घालणं, लावालावी करणं आणि साळसूदपणाचा आव आणून आपण जणू त्या गावचेच नाही असं भासवणं, हे तिच्या खलनायिकेचं वैशिष्ट्य होतं. त्याचा चांगला उपयोग कालिदास या दिग्दर्शकानं ‘भिगी रात’मध्ये करून घेतला आहे. महत्त्वाचा निरोप द्यायला विसरून गेल्याचं नाटक करून ती ‘निरागस’ बनेलपणानं नायक-नायिकेच्या प्रेमात बिब्बा घालते.

‘भिगी रात’, ‘फूल और पत्थर’ आणि ‘आरती’ या शशिकलाच्या ‘इस्पिकची राणी’ म्हणून गाजलेल्या कृष्णभूमिका! ‘गुमराह’मध्ये ती परपुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या विवाहित नायिकेला ब्लॅकमेल करणारी  ‘सॉफिस्टिकेटेड’ बदमाश स्त्री म्हणून नायिकेपेक्षा (माला सिन्हा) जास्त लक्षात राहिली. भाव खाऊन गेली म्हणा ना! किल्ली गोल गोल फिरवत नायिकेला टोचून बोलण्याची तिची लकब तर टाळी घेऊन गेली.

मात्र, तिचा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे ‘आरती’! फणी मजुमदार या गुणी दिग्दर्शकाच्या  या चित्रपटात मीनाकुमारी व अशोककुमार यांच्याइतकाच वाव असलेली भूमिका शशिकलाच्या वाट्याला आली. आगीतून फुफाट्यात- म्हणजे गरीब माहेरातून गरीब सासरात पडलेली ‘आरती’ची जसवंती सदा धुसफुसत असते. ‘आरती’सारख्या सुंदर, सालस, सुसंस्कृत आणि सुविद्य अशा साऱ्या विशेषणांनी संपन्न अशा धाकट्या जावेचा ती रागच नाही, तर द्वेष करते. आणि तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करून तिला घराबाहेर काढते.

भरदुपारी बाराच्या उन्हाची धग ओकणारी जसवंती आणि जणू चंद्रकिरणंच जिचा देह पांघरून ईहलोकी आल्यासारखी वाटावी अशी सालस, सुकुमार आरती यांचा सामना (अर्थात शाब्दिक!) ‘आरती’ मध्ये रंगला आहे. उठता- बसता आरतीला फटकारताना जसवंतीचं टोमण्याचं वाक्य (‘तकिया कलाम’ म्हणा हवं तर!) ठरलेलं आहे- ‘तेरे हात में जादू है और मेरे हात में झाडू.’ नाक उडवून, काहीसा हेल काढून शशिकलानं उच्चारलेलं हे वाक्य एकदम लोकप्रिय झालं. ‘शोले’च्या गब्बरप्रमाणे या वाक्याचा त्या काळात सर्वत्र उच्चार व्हायचा. टाळीचा संवाद वाट्याला आलेली शशिकला ही पहिली खलनायिका असेल!

आणखी एका दृश्यात ती आरतीचा मित्र असलेल्या डॉक्टर प्रकाशकडे धगधगत्या नजरेनं बघते. प्रकाश हा जातीचा बनेल

इसम आहे. पण जसवंतीच्या नजरेनं आणि धारदार बोलण्यानं तोसुद्धा सटपटतो. तिची भेदक नजर जणू त्याच्या पाठीला भोक पाडते. त्यामुळे पाठमोरा असूनही तिच्या नजरेतली ठिणगी अंगावर पडल्याप्रमाणे तो चपापून मागे वळून जसवंतीकडे बघतो आणि खजिल होतो.

जसवंतीच्या भूमिकेला लेखक-दिग्दर्शकानी अनेक कंगोरे ठेवले आहेत. ते शशिकलानं उत्तम साकारले. त्याची पावती- नव्हे, बक्षीस शशिकलाला मिळालं. त्या वर्षीचा (१९६२) सर्वोत्तम नकारात्मक भूमिकेचा फिल्मफेअर पुरस्कार शशिकलानं पटकावला.

‘तीन बहुरानीयां’मधली ग्लॅमरस सिने-हिरॉइन आणि ‘खूबसुरत’मध्ये ‘पिया बावरी’ या गाण्यात नृत्य करणारी शशिकला या तिच्या आणखी दोन लक्षात राहणाऱ्या भूमिका.

तिखट आणि गोड- दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये ठसा उमटवणाऱ्या शशिकलाला ‘पद्माश्री’ पुरस्कारही लाभला. पडद्यावरच्या जीवनात लाभलेली कृपा शशिकलाला प्रत्यक्ष जीवनात मात्र लाभली नाही. वैवाहिक जीवनातल्या अपयशाबरोबरच लाडक्या लेकीचा (शैलजा) अकाली झालेला मृत्यू तिला बघावा लागला. या प्रहारानं ती कोेलमडून गेली, पण खचली नाही. व्यसनाधीन झाली नाही. मन:शांतीसाठी तिनं मदर तेरेसा यांच्या मिशनचा आसरा घेतला. कुष्ठ व इतर असाध्य आजार झालेल्या दुर्दैवी जिवांची तिने दीर्घकाळ सेवा केली आणि जीवनाचा तोल  परत मिळवला. पडद्यावर ती ‘व्हॅम्प’ म्हणून गाजली. ‘व्हॅम्प नायिकेइतकीच सुंदर असली पाहिजे; नाहीतर नायिकेला सोडून नायक तिच्याकडे आकर्षित होईलच कसा?’ हे तिचं म्हणणं होतं. हे केवळ चमकदार वाक्य नव्हतं, तर ते अनुभवसिद्ध सुभाषित होतं. तिची सबंध कारकीर्द पाहता तिनं ते सप्रमाण सिद्ध केलं.

lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:08 am

Web Title: queen ispik vamp beautiful as the heroine akp 94
Next Stories
1 रफ स्केचेस :  पाण्यावरची सही
2 अरतें ना परतें… : आतल्या आवाजांचा गलबला
3 मोकळे आकाश… : लॉकडाऊन आणि बरंच काही…
Just Now!
X