अडवाणी, मोदी, नितीशकुमारांपासून राहुल गांधींपर्यंत एकजात सर्वाना पंतप्रधान व्हायची मनापासून इच्छा आहे. त्यात गैर काहीही नाही. मग उघडपणे ती मान्य करायला काय हरकत आहे? त्याकरता देशसेवा, त्याग, निधर्मवाद यांसारख्या निर्थक शब्दांच्या ढाली कशाला पुढे करायच्या? खरं म्हणजे आपण भारतीयांच्या रक्तातच हा दांभिकपणा पुरता भिनलाय. म्हणूनच ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा हा खेळ खेळला जातो. आणि आपणही समजून-उमजून त्या खेळात सामील होतो.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं राजीनामानाटय़, त्या पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची केवळ नियुक्ती झाली एवढय़ानेच ‘आता आले आमचे दिवस..’ असं भाजपला वाटू लागणं, त्यानंतर मोदी जातीयवादी असल्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना झालेला दृष्टान्त आणि त्यामुळे नितीशकुमार हे खरे निधर्मीवादी असल्याची पंतप्रधान मनमोहन सिंग यांना झालेली उपरती..
एव्हढय़ातल्या एव्हढय़ात घडलेल्या इतक्या साऱ्या नाटय़पूर्ण घटना प्रश्नांचा मोहोळ उठवून देतात.
या प्रश्नांना भिडण्याची सुरुवात सर्वात ज्येष्ठ अशा लालकृष्ण अडवाणी यांच्यापासूनच करता येईल. मोदी यांना पुढे केलं गेल्यावर ते खूप नाराज होते. याच नाराजीच्या काळात आपला पक्ष काही योग्य मार्गाने चाललेला नाही असं त्यांच्या लक्षात आलं. आता जो पक्ष योग्य मार्गाने चाललेला नाही, त्या पक्षात राहायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडला असेल तर ते तसं योग्यच. त्यामुळे तेव्हा अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. नंतर आवश्यक त्या सर्वानी त्यांची मनधरणी केल्यावर, आपला पक्ष तितका काही अयोग्य मार्गानं चाललेला नाही, असं त्यांना जाणवलं तेव्हा त्यांनी आपला राजीनामा मागेही घेतला. परंतु इतकं सगळं करायच्या ऐवजी अडवाणी- ‘भाजपत सर्वाधिक अनुभवी मी आहे. वयानेही मी सर्वात मोठा आहे. तेव्हा पंतप्रधानपदावर माझाच अधिकार आहे..’ असं थेट का नाही म्हणू शकले? तसं ते म्हणाले असते तर ज्यांना त्यांच्याविषयी आदर आहे, तो कमी झाला असता का? आताही समजा, अडवाणी यांनी भूमिका घेतली असती आणि सांगून टाकलं असतं की, पंतप्रधानपदाची माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही.. तर काय हरकत होती? पंतप्रधानाच्या खुर्चीत आपण बसलोय असं स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण तरीही आपली मंडळी तसं म्हणत नाहीत. प्रत्येक प्राध्यापकाला आपण प्राचार्य, कुलगुरू व्हावं असं वाटणं जितकं साहजिक आहे, तितकंच प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं किंवा खासदाराला पंतप्रधान व्हावंसं वाटणं हे नैसर्गिक आहे. हेच विधान प्रत्येक व्यवसायाला लागू आहे. अगदी पत्रकारितेसकट! तेव्हा सर्वोच्च पदाची अभिलाषा ठेवण्यात गैर ते काय? अशी अभिलाषा असणं, त्यासाठी महत्त्वाकांक्षी असणं, त्यादृष्टीनं एखाद्यानं प्रयत्न करणं, हे सगळंच साहजिक आहे. त्यात लाज बाळगण्यासारखं ते काय? तसं ते नसेल, तर त्याला सेवेचा खोटा मुलामा का द्यायचा? म्हणजे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणाऱ्यानं उघडपणे म्हणायचं नाही- ‘मला पंतप्रधान व्हायचंय.’ तर तो म्हणणार- ‘मला देशाची सेवा करायचीये.’
ही बाल्यावस्थेतली लबाडी आपण किती काळ करणार? या लबाडीमुळे होतं काय, तर धड खरेपणानं ध्येयप्राप्तीचे प्रयत्न होत नाहीत आणि हातून सेवाही होत नाही. खरं पाहायला गेलं तर ती होणार नसतेच. कारण तो काही उद्देश नसतोच. आणि दुसरं असं की, देशाची सेवा करायची असेल तर त्यासाठी किमान पंतप्रधान व्हावं लागतं अशी काय अट थोडीच आहे आपल्याकडे?  
मग ही माणसं या खोटेपणात का अडकतात?
याचं कारण असा खोटेपणा आणि दांभिकता या गोष्टी सांस्कृतिकदृष्टय़ा आपल्यात भिनल्यात आणि आपल्या जगण्याच्या सर्व अंगांत पसरल्यात. एखाद्याच्या शरीरात कर्करोग पसरावा तशा. त्यानं सर्वच क्षेत्रांना ग्रासलंय. इतकं, की विजय तेंडुलकरांसारख्या लेखकालाही ही दांभिकता टाळता येत नाही. त्यांना जेव्हा पद्म पुरस्कार जाहीर झाला तेव्हा विचारलं गेलं की, ‘सरकारविरोधात इतकी भूमिका घेणारे तुम्ही..! मग त्याच सरकारने दिलेला पुरस्कार कसा काय स्वीकारता?’ त्यावर तेंडुलकर असं नाही म्हणाले की, ‘पुरस्कार मिळावा अशी माझी इच्छा होतीच.’ ते म्हणाले : ‘या पुरस्काराचा उपयोग मी सरकारविरोधात लढताना अस्त्र म्हणून करीन.’ पुढे जाऊन विचारस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वगैरे तेंडुलकरांनी विचारस्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या विद्याचरण शुक्ल यांच्यासारख्या विधिनिषेधशून्य राजकारण्याकडूनही पुरस्कार स्वीकारला. वर म्हणाले, ‘मला माहितीच नव्हतं- पुरस्कार शुक्ल देणार आहेत ते!’ थोडक्यात मुद्दा हा, की दांभिकता ही काही फक्त राजकारण्यांचीच मक्तेदारी नाही. ती आपल्या अस्तित्वात अगदी त्वचेखाली जाऊन बसलेली आहे.
सध्या नवे हिंदुहृदयसम्राट होऊ पाहत असलेले नरेंद्र मोदीदेखील याला अपवाद नाहीत. गुजरातसारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर सलग तीन-तीनदा बसल्यावर जर त्यांना आपण पुढच्या यत्तेत जावं आणि पंतप्रधान व्हावं असं वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही. पण तरी तेही तसं उघडपणे म्हणाले नाहीत. ‘इतके दिवस मी गुजरातची सेवा केली, आता भारतमातेच्या सेवेची इच्छा आहे..’ असं तद्दन भंपक- अगदी आसाराम किंवा अनिरुद्ध वगैरे बापूंच्या सत्संगातच शोभावं असं विधान त्यांनी केलं. आता ते केल्यावर ही सेवा म्हणजे काय, हा प्रश्न उपस्थित होणारच. आणि तो झाल्यावर- ‘म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये जे काही केलं, ते आता देशात करायचंय का?,’ असं मोंदींना विचारलं जाणारच. त्यापेक्षा ‘तीन- तीन वेळा मुख्यमंत्री झाल्यावर एकदा पंतप्रधानपदाचा प्रयत्न करून पहावा म्हणतो..’ असं सरळ-सोपं विधान मोदी यांनी केलं असतं तर काय बिघडलं असतं? त्यांना जे मतं देणार आहेत, त्यांनी ती तरीही दिलीच असती. अशावेळी आपल्या इच्छेला ‘सेवा’ नावाच्या अगम्य पुडीत बांधून ती जनमानसात सोडायचा अट्टहास का?
या लबाडीमुळे होतं काय, तर- आपला सगळा प्रयत्न होतो तो कोणत्याही मुद्दय़ावर एकवाक्यता कशी होईल, यावर! ‘मतभिन्नता म्हणजे अनादर’ असा बावळट समज मोठय़ा प्रमाणावर आपल्याकडे असल्यामुळे सासू-सुना संबंधांपासून ते पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार इथपर्यंतच्या सगळ्या संबंधांत सगळं कसं छान छान आहे असं दाखवायचा आपला अट्टहास असतो. मग हीच सवय सगळ्यांना लागते. त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही, की आपली लोकशाही बेगडी आहे. लोकशाहीचा हा आभास आहे. प्रत्यक्ष लोकशाही नाही. हीच सवय राजकीय पक्षांनादेखील लागलेली आहे. त्यामुळेच एकही राजकीय पक्ष प्रामाणिकपणे अंतर्गत निवडणुका घेत नाही. होतात ते निवडणुकीचे उपचार! आणि ते झाल्यावर ‘अमुकतमुकला सर्वानुमते अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला..’ अशा खोटय़ा घोषणा! आतादेखील भाजपच्या प्रतिनिधींनी समजा ठरवलं असतं, की आपल्या पक्षातल्यांचा कौल काय आहे- ‘अडवाणी की मोदी?’ ते मतदानानं ठरवायचं, तर? काँग्रेसजनांनी ठरवलं- राहुल गांधी की आणखी कोणी, यावर गुप्त मतदान घ्यायचं, तर? हे होत नाही. का?
याचं खरं कारण आपल्याला सत्ता हवी असते; पण तसं म्हणायचं नसतं. आणि सत्तेपाठोपाठ येणारी जबाबदारी टळली तर बरी, असंही वाटत असतं. मग ती कशी टाळायची? तर त्यासाठी हे ‘जनतेची सेवा’ वगैरे बुडबुडय़ांचे शब्द हवेत सोडायचे. बुडबुडेच अशासाठी, की ते दिसतात, पण त्यात काही नसतं. सेवा करायची आहे म्हणजे काय? याचं उत्तर आपल्यालाच काय, पण हे शब्दप्रयोग करणाऱ्यांनाही देता यायचं नाही. आणि हे काही केवळ भाजपलाच लागू आहे असं नाही.
पंतप्रधानपदी जाऊन बसणं आपल्याला झेपणारं नाही, हे जेव्हा सोनिया गांधी यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तरी दुसरं काय केलं? त्यांनी आतल्या आवाजाचा दाखला दिला आणि पंतप्रधानपदावर मनमोहन सिंग यांना बसवलं. वास्तविक हा पूर्णपणे त्यांच्या फायद्याचाच असा सौदा होता. त्याची कारणं दोन : आपलं परदेशीपण विसरून समजा- त्या रेटून पंतप्रधानपदावर बसल्या असत्या तर कोणत्याही क्षुल्लक कारणानंदेखील ते अंगाशी येऊ शकलं असतं. भ्रष्टाचार, एखादी मोठी चूक असं काहीही झालं असतं तरी ते थेट त्यांच्या परदेशीपणावर शेकलं असतं. त्यांनी त्यामुळे दुसरा मार्ग निवडला. अत्यंत सुरक्षित असा. मनमोहन सिंग यांना सत्तेवर बसवायचं आणि सूत्रं आपल्या हाती ठेवायची. तोपर्यंत सोनियाबाई भारताला सरावलेल्या असणार. कारण भारतीयांचा दांभिकपणा त्यांनी बरोबर हेरला आणि त्यांनी पंतप्रधानपद दुसऱ्याला देण्याचा त्याग (?) केला. वास्तविक याच्याइतकी लबाडसोय दुसरी नाही. कारण कागदोपत्री आणि कायदेशीरदृष्टय़ा सोनिया गांधी यांच्या हाती काहीही अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांच्या अंगाला काहीच चिकटत नाही. आणि तरीही सत्तेची सूत्रं हाती असल्यामुळे त्यांना हवं ते करताही येतं. सत्तेच्या सावलीत राहताही येतं आणि वर जबाबदारीही नाही. हे असं करताना मधल्या मधे आपल्याला त्यागाची कहाणी मात्र त्या चतुराईनं विकून गेल्या. कारण त्याग, सेवा वगैरे शब्द आपल्या समाजाला भावतात. आणि ते वापरणाऱ्याला चांगलं गिऱ्हाईक मिळतं.
सोनिया गांधींची पुढची पिढीही या नाटकीपणाबाबत त्यांच्यापेक्षा अधिक चतुर. राहुल गांधी यांचे राजकीय कौशल्य आणि समज याविषयी शंका घेण्यास भरपूर वाव आहे; पण नाटकीपणाबाबत नाही. मध्यंतरी पक्षाच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी एकदम ‘सत्ता हे कसं विष आहे’ हे सांगत सर्वसंगपरित्यागी आव आणला. खरं तर इतका मोठा भंपकपणा भल्याभल्यांना जमत नाही. तो राहुलबाबानं याच वयात करून दाखवला. आता सत्ता हे जर विष आहे तर ते मिळवण्यासाठी राहुल गांधी का प्रयत्न करताना दिसतात? सत्ता हे विष असेल तर पक्षाचं उपाध्यक्षपद त्यांनी का घेतलं? खरं तर त्यांच्याजवळ जे आहे त्याला जर ते विष म्हणत असतील तर ते प्यायला देशातील लाखो उत्सुक आहेत. हा विषाचा प्याला सोडायची आहे का तयारी त्यांची? आणि आत्ता ते ‘हो’ म्हणाले आणि उद्याच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ आली तर पंतप्रधान व्हायला काय राहुल गांधी नाही म्हणणार आहेत? गंमत म्हणजे या विषाच्या चवीबाबत त्यांच्याच पक्षात मतभेद दिसतात. ‘राहुल हा काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा नैसर्गिक उमेदवार आहे,’ असं पंतप्रधान मनमोहन सिंग नुकतंच म्हणाले. म्हणजे एका बाजूला राहुल स्वत:च सांगतोय- ‘सत्ता हे विष आहे!’ आणि दुसरीकडे त्याच्याच पक्षाचे पंतप्रधान आपल्याला सांगताहेत- ‘राहुल हा सत्तेचा आमचा उत्तराधिकारी आहे.’ आता यातलं नक्की खरं काय? आज सत्तेला विष म्हणायचं, आणि उद्या ती हाती घ्यायची वेळ आली तर म्हणायचं, ‘माझी इच्छा नाही, पण पक्षकार्यकर्त्यांसाठी मला सत्ता हाती घेणं भाग आहे.’ म्हणजे पुन्हा टाळय़ा!
याच्याच जोडीला आणखीन एक मुद्दा या मंडळींनी जनतेला समजून सांगायला हवा. तो म्हणजे- निधर्मी कोणाला आणि का म्हणायचं, हा!  पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दोनच दिवसांपूर्वी नितीशकुमार यांना निधर्मी असल्याचं प्रमाणपत्र दिलं. इतके दिवस नितीशकुमार भाजपच्या साथीनं सत्तेच्या शाखेवर जायचे तोपर्यंत ते त्यांना निधर्मी वाटले नाहीत. आता नितीशकुमार यांनी गणवेश बदलला म्हणून लगेच ते निधर्मी? त्याआधी नितीशकुमार म्हणाले की, ‘भाजप आता धर्मवादी होतोय.’ मग गेली १७ वर्षे तो काय निधर्मी होता? या देशाच्या राजकारणाला मोठं धार्मिक वळण देणारे लालकृष्ण अडवाणी यांचं राजकारण स्पृश्य; आणि एकेकाळचा त्यांचा पट्टशिष्य नरेंद्र मोदी तेच करायला लागल्यावर तो मात्र अस्पृश्य- हे गणित कसं सोडवायचं? ही तत्त्वाची कसरत करण्यापेक्षा नितीशकुमार यांनी सरळ म्हणायला हवं : पंतप्रधानपदाच्या माझ्या रस्त्यावर नरेंद्र मोदी अडथळा ठरू शकतात. ते माझे स्पर्धक ठरतील. म्हणून आम्ही एकत्र नांदू शकत नाही.
असं समजा म्हणाले नितीशकुमार- तर त्यात गैर ते काय? त्याचवेळी भाजपापासून काडीमोड घेतल्यानंतर नितीशकुमार यांना शुक शुक करून बोलवताना मनमोहन सिंग हेदेखील असं का नाही म्हणू शकत, की आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला नमवण्यासाठी आम्हाला नितीशकुमार यांची मदत होऊ शकते, म्हणून आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करायला तयार आहोत.
जे काही आपल्याला म्हणायचंय, ज्याची आपल्याला इच्छा आहे, ती व्यक्त करण्यासाठी त्याग, सेवा, निधर्मवाद अशा कचकडय़ाच्या शब्दांच्या आधाराची या सर्वानाच गरज का वाटावी? दांभिकांचा हा मळा आपल्या देशातच इतका बहरून का यावा? याचं कारण कुठेतरी भौतिक सुख, संपत्ती, पद, मानमरातब यांची आस बाळगणं म्हणजे काहीतरी पाप आहे असं आपण आपल्यालाच बजावून ठेवलंय. ते काही अजून आपल्या रक्तातून जात नाही.
तेव्हा लवकरात लवकर आपण रक्तशुद्धी करून घेतलेली बरी!