News Flash

आकाशवाणी (रेडिओ)

‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो, की ‘बहनो और भाईयो’ ही विविध भारती आणि

‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो, की ‘बहनो और भाईयो’ ही विविध भारती आणि रेडिओ सिलोनवरील साद असो. मधला काही वर्षांचा काळ सोडला, तर आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेला रेडिओ दिवसाचे १८ ते २० lok03तास आपल्याबरोबर असतो. आता तर भ्रमणध्वनीमुळे तो सदासर्वकाळ कानालाच चिकटलेला असतो. ध्वनी लहरींचे विद्युत लहरींमध्ये रूपांतर करण्याच्या शोधाने  संवाद माध्यमांचा पाया घातला. पुराणकथांमध्ये वर्णन केलेली आकाशवाणी प्रत्यक्षात आली.
विद्युत चुंबकीय लहरी वातावरणातून पुढे जाण्याची शक्यता जेम्स मॅक्सवेलने १८७३ मध्ये प्रथम कागदावर गणिते करून दाखवून दिली. या संकल्पनेवर अनेक शास्त्रज्ञ १७८९ पासून काम करीत होते; पण १८८६ मध्ये हैन्रीक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले. त्याने शोधलेल्या ‘हर्ट्झच्या लहरी’ (रेडिओ लहरी) अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने एका व्याख्यानाच्या वेळी हर्ट्झच्या लहरींचे ५० मी.    अंतरावर प्रक्षेपण करून दाखवले. १८९६ मध्ये मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचे स्वामित्व हक्क (Patent) मिळवले आणि या तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग सुरू झाला. संगीत आणि आवाजाच्या प्रक्षेपणाचे काही प्रयोग २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाले, पण रेडिओ तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला तो पहिल्या महायुद्धात, लष्करी उपयोगासाठी! १९२० पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासामुळे लहरींचे विस्तारीकरण (Amplification) करणे सोपे झाले आणि १९२० नंतर बातम्या, गाणी, भाषणे ऐकवणारा रेडिओ महत्त्वाचे लोकमाध्यम बनला.
कसा चालतो हा रेडिओ?
कुठल्याही रेडिओ यंत्रणेचे दोन मुख्य घटक असतात.
१. प्रक्षेपक (Transmitter)
२. ग्राहक (Receiver)
चित्र क्र. १ आणि २ मध्ये दाखवल्याप्रमाणे, प्रक्षेपक एका बाजूने आलेला श्राव्य (Audio) स्वरूपातील संदेश स्वीकारतो, तो सांकेतिक भाषेत साइन लहरीमध्ये मिसळतो आणि रेडिओ लहरींच्या स्वरूपात बाहेर सोडतो.lr14 ग्राहक आलेल्या रेडिओ लहरी पकडतो, त्यातील साइन लहरींमधील सांकेतिक भाषेतील संदेश उलगडतो आणि ध्वनिवर्धकामार्फत बाहेर सोडतो. प्रक्षेपक आणि ग्राहक हे दोघेही त्यांच्या कामासाठी अँटेना वापरतात.
चित्र क्र. २ मध्ये दाखवली गेलेली लहर ही साइन लहर म्हणून ओळखली जाते. साइन लहरींचे एक लक्षण म्हणजे त्यांची वारंवारिता (Frequency), म्हणजेच एका सेकंदात किती वेळा ती लहर वर-खाली होते ती संख्या. अट रेडिओवरील कार्यक्रम ऐकत असताना आपण सुमारे ५३५ ते १७०५ किलोहर्ट्झ वारंवारितेच्या लहरी रेडिओ पकडत असतो, FM रेडिओ स्थानके सुमारे ८८ ते १०८ मेगाहर्ट्झच्या पट्टय़ातील लहरी प्रक्षेपित करतात. टी.व्ही, भ्रमणध्वनी, रेडिओ, पोलीस, उपग्रहाद्वारे होणारे प्रक्षेपण अशा अनेक कारणांकरिता प्रसारित होणाऱ्या रेडिओ लहरी आपल्या आसपास फिरत असतात. प्रत्येक प्रकारच्या लहरीची वारंवारिता वेगळी असल्यामुळे या लहरी एकमेकांच्या आड येत नाहीत. या लहरींमध्ये ध्वनी संकेत मिसळण्याकरिता तिला प्रमाणित (Modulate) करावे लागते. हे प्रमाणीकरण तीन प्रकारे करता येते.
१. स्पंद प्रमाणीकरण (Pulse Modulation)
या प्रकारात साइन लहर चालू आणि बंद केली जाते. बिनतारी संदेश पाठवण्याकरिता या पद्धतीचा उपयोग करतात. चित्र  क्र. ३ मध्ये या लहरींचे स्वरूप दाखवले आहे.
२. तरंगरुंदी प्रमाणीकरण (Amplitude Modulation – AM)
आलेल्या ध्वनी लहरींच्या वारंवारितेनुसार साइन लहरींची तरंगरुंदी प्रमाणित केली जाते. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीमध्ये या प्रकाराने प्रमाणित केलेल्या लहरींचा वापर केला जातो. चित्र क्र. ४ मध्ये या लहरी दाखवल्या आहेत. या साइन लहरी त्यांच्या वारंवारितेवरून ओळखल्या जातात.
३. वारंवारिता प्रमाणीकरण (Frequency Modulation – FM)
प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची वारंवारिता ध्वनी लहरींच्या दर्जानुसार बदलून साइन लहरींना प्रमाणित केले जाते. चित्र क्र. ४ मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाणित केलेल्या लहरी FM  आकाशवाणी, दूरचित्रवाणीचे ध्वनी संदेश, भ्रमणध्वनी याकरिता वापरल्या जातात.lr15 या पद्धती मध्ये तयार झालेल्या लहरींवर स्थायिक (Static) विद्युत लहरींचा अत्यल्प परिणाम होतो. तसेच वारंवारितेत कमीत कमी बदल करून माहितीचा योग्य तो संकेत लहरीमध्ये टाकता येतो.
अट रेडिओमध्ये प्रक्षेपक निवेदकाचा आवाज लहरींची रुंदी प्रमाणित करून, त्या साइन लहरी विस्तारकाकडे पाठवतो. विस्तारक संकेताची (signal) ताकद सुमारे ५०००० वॅटपर्यंत वाढवून त्यांना अँटेनामार्फत अवकाशात पाठवतो.
ग्राहक (Receiver) काय करतो?
चित्र क्र. ५ मध्ये ग्राहकाची रचना दाखवली आहे. त्याचे घटक असे- १. अँटेना २. टय़ूनर ३. शोधक (Detector) ४. विस्तारक (Amplifier). lr16– अँटेना म्हणजे एक धातूची तार/दांडी, रेडिओ लहरी पकडते.
– टय़ूनर – अँटेनाकडे हजारो प्रकारच्या साइन लहरी येत असतात. टय़ूनर त्यातली हवी ती लहर निवडण्याचे काम करतो. त्याचे कार्य प्रतिध्वनी (Resonance) तत्त्वावर चालते.
– टय़ूनरने पकडलेल्या लहरीवर असलेले ध्वनी संकेत  शोधण्याचे काम शोधक (Detector) करतो. अट रेडिओमध्ये याकरिता ‘डायोड’ (जो फक्त एकाच दिशेने विद्युतप्रवाह वहन करू शकतो) हे उपकरण वापरतात.lr17 – शोधकाने शोधलेले संकेत विस्तारक वाढवतो. त्यासाठी ट्रांझिस्टर हे उपकरण वापरले जाते. हे विस्तारित संकेत ध्वनिवर्धकाकडे पाठवले जातात आणि आपण आवाज ऐकू शकतो.

दीपक देवधर  – dpdeodhar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2015 12:14 pm

Web Title: radio
Next Stories
1 इन्व्हर्टर
2 विजेची घंटा (Electric Bell)
3 मायक्रोवेव्ह ओव्हन (सूक्ष्म लहर भट्टी)
Just Now!
X