हिंदी चित्रपटगीतं आणि आपलं इतकं तरल नातं आहे, की आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाशी त्यांची आपल्याला निरंतर साथसोबत असते. निसर्गाचे मूड्स जसे बदलत जातात तसतसं आपलं मनही झोके घेत राहतं. साहजिकच त्या मूडशी निगडित चित्रपटगीतंही आपल्या मनाचा ठाव घेतात. विशेषत: पावसाळी सर्द दिवसांत! ‘सावन’ हा तर मनभावन महिना. पाऊसधारांत सचैल स्नान करून सृष्टीनं नव्यानं कात टाकलेली असते. आपलं मनही त्याबरोबर हल्लक होऊन भूतकाळातल्या उत्कट, सुंदर आठवणींच्या गोफात रंगून जातं. तर कधी जीवलगाविषयी वाटणारी अनावर ओढ, कधी काळीज जाळणारा त्याचा विरह, तर कधी त्याच्या सहवासानं फुलून येणारा आसमंत.. सगळं कसं हवंहवंसं.. बेधुंद करणारं..
सावनगीतांसारखं..
तोयेतो.. खूप वाट बघायला लावून, जिवाची तडफड, अंगाची काहिली झाल्यावर. आजूबाजूचं शुष्क जग हेच शाश्वत सत्य- अशी खात्री पटायला लागल्यावर. आणि मग असा येतो, की शरीर भेदून थेट काळजावर धारा बरसतात. आत्तापर्यंत उदास वाटणारं विश्व क्षणार्धात विलक्षण आनंदी होतं. आणि येतो- सावन का महिना! ‘सावन’ ऋतूचं आपल्याकडे खूप कौतुक, लाड.. एक सेलिब्रेशन आहे. एकतर पाऊस हा सुखाच्या क्षणी चित्तवृत्ती उल्हसित करणारा सुखवर्षांव आहे, तसाच दु:खाच्या क्षणी डोळ्यांच्या अश्रुधाराच पाऊस बनतात. म्हणजे प्रत्येक भावावस्थेत तो आहेच की! ‘रिमझिम’ या शब्दालाच किती सुंदर नाद आहे! म्हणूनच या ‘सावन’ ऋतूच्या निमित्ताने हे ‘रिमझिम के तराने..’
हिंदी चित्रपटांत ‘पाऊस’ ही काही दिग्दर्शकांची नायिकेला भिजवण्याची सोय असली तरी गीतकार, संगीतकारांची प्रतिभा मात्र प्रत्येक वेळी पावसाचं वेगळं रूपडं दाखवताना झळाळून उठलीय. अगदी खूप मागे गेला नाही तरी ‘सावन के नजारे है, आहा आहा..’ (गुलाम हैदर) किंवा ‘सावन के बादलों, उनसे ये जा कहा’ (नौशाद) असो, वेगवेगळ्या संगीतकारांनी पावसाकडे कसं पाहिलं, ते  बघणं खूप रंजक आहे. नौशादचा ‘सावन’ म्हणजे ‘रुमझुम बरसे बदरवा’ किंवा ‘ये सावन रूत तुम और हम..’ ‘तारारारारम’ हे वेस्टर्न रंग घेऊन आलेलं गाणं.
‘कहता है दिल मेरा चलिये वहाँ
हर पल हो सावन ही सावन जहाँ’
या रफीच्या हाकेला सुरैयाचा तो घरंदाज आवाज-
‘हम तुम हो, रिमझिम का इक साज हो
बस, तेरी और मेरी आवाज हो..’
असा प्रतिसाद देतो तेव्हा-
‘दिल नाचे रे छम छम छम..’ अशी आपली अवस्था होऊन पावलं नाचरी कधी होतात, कळत नाही. याच नौशादजींचं पुढच्या काळातलं ‘सावन आये या ना आये, जिया जब झूमे सावन है’ हे एक सुंदर गाणं. ‘सावन’ हा ‘बाहेर’ नाही, तर आपल्या ‘आत’च आहे की! आपण चिंब, तर जग चिंब. आपण धुंद, तर ही हवा धुंद. सारंग रागाची अचूक योजना करून नौशादमियाँ माहोल जमवतात.
आपल्या अण्णांच्या (सी. रामचंद्र) ‘जारी जारी ओ कारी बदरिया’ची जादू काही निराळीच. तो अण्णांचा लाडका ठेका.. ‘मत बरसो..’वरचा तो अत्यंत गोड हेलकावा.. गंमत म्हणजे दोन्ही गंधारांचा तो कल्पक उपयोग.. ‘जारी कारी बदरिया’वर कोमल गंधार, तर ‘परदेस गए है सांवरिया’ ही भावना ठळक करणारा ब्राइट, शुद्ध गंधार. अण्णांची अजरामर मेलडी आहे.. ‘जारी जारी.’
तिकडे सलीलदांचा वेगळाच नूर. मुळात सलीलदांची शैली म्हणजे स्वरांची बिकट वाट आणि आपल्या स्वप्नातही येणार नाही अशी स्वरमांडणी. तीच त्यांच्या सावनगीतांमध्येही दिसते. ‘ओ सजना बरखा बहार आयी..’ हे गाणं म्हणजे दोन अंतऱ्यांचं एक छोटुकलं, पण ‘कन्टेंट’च्या दृष्टीनं ज्यावर चार पानं लिहिता येतील असं ‘मोठं’ गाणं. त्यात पावसाच्या टप्पोऱ्या थेंबासारखा सतारीचा तो मंद्र सुराचा टणत्कार. ‘ओ सजना..’ असं म्हटल्याबरोबर सरसर शिरवा यावा तशी येणारी ती सतार. ती निरागस साधना अधिक गोड, की ‘ओ सजना..’ ही साद अधिक मधुर? सतारीबरोबर येणारा तो तबल्याचा ठेका अधिक डौलदार, की तिच्या डोळ्यांच्या हालचाली? तर, ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’ म्हणजे ‘िझगुर बोले चिकीमिकी’ म्हणत ऐकणाऱ्याला त्या ‘मीत मेरे सुनो जरा हवा कहे क्या..’च्या चढउतारावर झुलवत नेणारं गाणं. हे शब्द सुरेल आणि अचूक वजनाने म्हणणं सोपं नाही. ज्यांनी या गाण्याला हात घालायचा प्रयत्न केलाय त्यांना चांगलंच ठाऊक असेल. त्यात तो ‘आहाहा..’ कुठल्या कुठे जातो. उंच आकाशात विजेची रेघ चमकून कल्पनेपलीकडे क्षणार्धात निघून जावी तसा तो दीदींचा स्वर भासतो.
‘झिरझिर झिरझिर बदरवा बरसे..’ किंवा ‘रिमझिम झिम बदरवा बरसे..’ या गाण्यांबरोबरच सलीलदांचं एक महत्त्वाचं सावनगीत म्हणजे ‘हरियाला सावन ढोल बजाता आया..’ किती मोठा कॅनव्हास आहे या गाण्याचा! हा सावन कसा? तर ‘मिट्टी में जान जगाता आया..’ बास. आणखी काय हवं?
‘इक अगन बुझी
इक अगन लगी
मन मगन हुआ
इक लगन लगी..’
शब्द ‘खेळवणं’ म्हणजे काय असतं.. एक आग विझली, पण दुसरी लागली. पडद्यावर बघताना तो जल्लोष, निष्पाप आनंद बघून अंगावर रोमांच उभे राहतात.
‘ऐसे बीज बिछा रे,
सुख चन उगे, दुख दर्द मिटे
ननो में नाचे रे सपनों का धान हरा..’
सावन म्हणजे सर्जन. निर्मिती. किती अर्थगर्भ शब्द! संपूर्ण गाण्याला एक मस्त रांगडा बाज. खरंच पाऊस यावा तर असा! या गाण्याचं ‘टेकिंग’ बघता ‘लगान’च्या ‘घनन घनन’च्या प्रेरणा कुठे कुठे असल्या पाहिजेत याचा अंदाज येतो. ‘उरजगजग.. उरजगजगी..’ म्हणणारा कोरस अस्सल ग्रामीण. कुठेही शहरी वाटत नाही हे गाणं याबाबतीत. याच्या तुलनेत ‘मदर इंडिया’ची गाणी आहेत. ‘दुखभरे दिन बीते रे..’ किंवा ‘ओ गाडीवाले गाडी धीरे हाक रे..’मधले मुख्य आवाजआणि कोरस विलक्षण रांगडे.. कुठलेही ‘सॉफिस्टिकेशन’ नसणारे वाटतात, हेच या गाण्यांचं यश आहे. ‘हरियाला सावन’च्या नाचाच्या स्टेप्ससुद्धा साधी, खेडय़ातली माणसं जशी नाचतील, तशा. ‘कोरिओग्राफी’ वगरे शब्दही आठवत नाहीत ते बघताना.
जयदेवजींच्या संगीतात पाऊस हा ‘परिष्कृत’ भेटतो. ‘ये नीर कहाँसे बरसे है, ये बदरी कहाँसे आयी है..’ हे खूप मधाळ पाऊसगाणं. पावसाला ‘नीर’ हा किती गोड शब्द! ‘रात भी है कुछ भीगी भीगी’मधला पाऊस किंचित कामुक छटा घेऊन येतो. अशा चिंब रात्री तू आलास तरच या पंजण पापण्या उघडतील.. पावसानं काही वेगळाच नूर आणलाय. ‘आज अजब है दिल का आलम..’ जयदेवच्याच ‘ये दिल और उनकी निगाहों के साये..’मध्ये पावसाळी हवेतला छायाप्रकाशाचा लपंडाव ‘ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे’ म्हणत व्यक्त होतो.
शंकर-जयकिशन या जोडीनं खूप सुंदर पाऊसगाणी दिलीत. ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याइतकंच सुंदर काय असेल तर त्याआधीचे त्यांचे संवाद. प्रेमाची कबुली तर द्यायचीय.. धो-धो पाऊस सुरू होतोय. निष्कांचन राजकडे चहावाल्याला द्यायला पसे नसणं. एकाच छत्रीची ती देवाणघेवाण. डोळ्यांनी तर केव्हाच सांगितलं एकमेकांना; पण बोलणार कोण? कसं? प्रेमात तर पडलो, पण पुढचा रस्ता कठीण आहे- या वास्तवाचं भान ठेवत त्या आणाभाका. ‘गीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ..’ हे राज-नíगसच्या संदर्भात किती खरं आहे! ‘मं ना रहूंगी, तुम न रहोगे..’ हा या गाण्याचा चरमिबदू. असंच पाऊसगाण्यांमध्ये फार वरचं स्थान असलेलं ‘बरसात में..’ हे तसं आर्त गाणं. त्यात ‘तुमसे मिले हम’च्या गुंजनात ऐकणारा अडकतोच. असा उच्चार- ‘हम’ या शब्दाचा पुन्हा होणे नाही. शेवटची- काळजाचा ठाव घेणारी तान किती जीव तोडून गायली असावी. ‘तुम बिन सजन बरसे नयन’, ‘का रे बदरा तू न जा न जा’, ‘लपक झपक तू आ रे बदरवा’ ही आणखीन काही सुंदर पाऊसगाणी. ‘लपक झपक’चा शास्त्रीय बाज एकीकडे, तर ‘मोरे अंग लग जा बालमा’ची मस्ती निराळीच. हे गाणं पडद्यावर बघताना जाणवलं, की अभिनयाचं काम आशाबाईंच्या आवाजानंच पार पाडलंय. पण निदान त्यांच्या गळ्यातून जाणाऱ्या अफाट एक्स्प्रेशन्सवर चेहऱ्याच्या काही रेषा बदलण्याचेही कष्ट नायिका घेत नाहीए. असो.
आणि ‘अजहू न आए बालमा’ विसरून कसं चालेल? इतक्या भारदस्त गाण्याला पडद्यावर विनोदाची ट्रीटमेंट.. त्यात ‘और भी मोरा मन ललचाए’मध्ये ‘मन’ शब्दावरची रफीसाहेबांची जागा नोटेशनच्या पलीकडचीच. आणि सुमन कल्याणपूरांच्या नाजूक आवाजातल्या दमदार जागा.. दुसऱ्या अंतऱ्याच्या शेवटी ‘जाए रे’वरची त्यांची जागा इतकी अप्रतिम! सिंधु भरवीतलं हे गाणं- त्या रागाचंच सोनं करतं.
‘उमड घुमड कर आयी रे घटा’ हे वसंत देसाईंच्या सावनगीतांमधलं मुकुटमणी असलेलं गाणं. भरत व्यास िहदी भाषेचं सौंदर्य, लालित्य दाखवून देतात..
‘जब सनन पवन का मदन ‘तीर’
बादल को ‘चीर’ निकला रे ‘नीर’
हे शब्द गद्यस्वरूपात म्हटले तरी एक प्रकारचा आनंद होतो, तर वसंतरावांचा सुरेल स्पर्श झाल्यावर त्यात एक अनुपम निर्मिती दिसते. लताबाईंच्या प्रचंड दमश्वासाचा आविष्कार घडवणारं हे गाणं. तसंच ‘डर लागे गरजे बदरवा’ हेही वसंतरावांचंच एक बंदिशप्रधान गाणं. आणि सत्तरच्या दशकात गाजलेलं त्यांचं गाणं म्हणजे ‘बोले रे पपीहरा..’
‘सावन जो संदेसा लाए
मेरी आँख से मोती पाए’
म्हणत वाणी जयरामनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
बर्मनदांच्या गाण्यांमध्ये ‘देख के अकेली मोहे बरखा सताए’ ते ‘अब के सजन सावन में’ असा सुरेल प्रवास आहे. ‘देख के..’ची रिपरिप, ‘उई’ खूप बोलका, तर ‘काली घटा छाये’ विलक्षण प्रतिभा दाखवणारं. ‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’मध्ये एका छत्रीतून चालणारे देव-वहिदा. त्यांच्या डोळ्यांपुढे तरळणारे त्यांच्यातले ते प्रसंग.. गाणं पाश्र्वभूमीलाच आहे.
‘सुन के मतवाले काले बादलों का शोर,
रूम झूम घूम घूम नाचे मन का मोर..’
म्हणताना त्या ‘रूम झूम घूम घूम’चा इतका नादमय उच्चार गीता दत्त करते.. व्वा! आणि ‘मं ना बोलूँ’नंतरचा पॉज, सतारीचा छोटासा पीस.. सगळंच विलोभनीय. बर्मनदांनी ‘शर्मिली’साठी दिलेलं ‘मेघा छाये आधी रात’ आणखीनच वेगळं. ‘पटदीप’ रागाचा आधार या गाण्याला आहेच; पण काही ठिकाणी पाश्चात्त्य रंग का? तर- राखीचा डबल रोल असल्याने एक अत्यंत सालस, तर दुसरी बिनधास्त बहीण.. तर बिनधास्त राखीवरच्या सीन्ससाठी गिटार आणि वेस्टर्न ऱ्हिदम, तर सालस राखीसाठी सितार आणि तबला- अशी ही गंमत आहे. ‘अब के सजन सावन में’मधलं चुकचुकणं आणि इश.. तर भन्नाटच. पण मिश्कील ओमप्रकाश, धम्रेन्द्र पडद्यावर मजा आणतात.
ओ. पी. नय्यरसाहेबांचा ठेका आणि ठसका त्यांच्या ‘ठंडी हवा काली घटा’मध्ये मस्त उतरलाय. स्वििमग पूलवर मत्रिणींसोबत बागडणारी मधुबाला.. कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होऊ नये असं ‘टेकिंग’ आहे या गाण्याचं. सगळ्या हालचालींमध्ये एक सुंदर लय.. कल्पक अँगल्स.. सगळीकडे भरून राहिलेला तो यौवनाचा उत्फुल्ल मूड..
रोशनसाहेबांचा अभिजात रंग ‘गरजत बरसत सावन आयो रे’ हे सुंदर गाणं घेऊन आला आणि ‘जिंदगीभर नहीं भूलेगी ये बरसात की रात’ या गाण्यांनी तर अनेकांच्या पावसाळी रात्री रोमॅन्टिक केल्या. या गाण्याच्या नशिबात सौंदर्यखनी मधुबाला असल्यामुळे भारतभूषणला सहन करीत का होईना, हे गाणं आपण पाहतो.
पंचमचं (राहुल देव बर्मन) लतादीदींनी गायलेलं पहिलंवहिलं गाणं पावसाचंच होतं.. ‘घर आजा घिर आए..’ इतकी सुंदर मेलडी.. ‘टप.. टिप.. सुनत मं तो भई रे बावरिया..’’ हे विशिष्ट वजनाने पडणारे शब्द.. ते थबकणं.. मालगुंजी रागाची डूब असणारं खूप उत्कट असं हे गाणं. पंचमनं पावसाची खूप गाणी दिली. ‘रिमझिम गिरे सावन’, ‘अबके ना सावन बरसे’, ‘मेरे नना सावन भादो’, ‘बादल यूँ गरजता है’ आणि ‘पंचम नेहमी दंगामस्तीचीच गाणी देतो,’ असं म्हणणाऱ्यांचं तोंड बंद करणारं ‘सावन के झूले पडे..’ काय सुंदर, शांत, संयमी गाणं.. शुद्ध मेलडी.. रूपकच्या ठेक्याला आपलंसं करीत लांबवलेला तो ‘साऽऽवन..’ विलक्षण आर्जवी ‘तुम चले आओऽऽऽ..’ ही साद मधाळ स्वरांमध्ये चिंब भिजून येते. पण खास ‘पंचमी’ मस्ती ऐकायची तर खटय़ाळ आवाजाच्या किशोर-लताचं ‘भीगी भीगी रातों में..’
लक्ष्मीकांत-प्यारेलालच्या संगीताची भव्यता त्यांच्या सावनगीतांमध्ये दिसली नाही तरच नवल. ‘ओ घटा सावरी..’मध्ये ‘हो गयी है बरसात क्या’ वरची आवाजाची थरथर स्तिमित करणारी. ‘सावन का महिना पवन करे सोर’ या गाण्याइतकाच गाजला तो त्याआधीचा ‘शोर नहीं बाबा..’ हा संवाद. त्यांच्या सर्व गाण्यांत ‘मेघा रे मेघा रे’ची जादू अफाट आहे. भव्य ऑर्केस्ट्रेशन असलेली, अंतऱ्याच्या चालीमध्ये वैविध्य असणारी चाल आणि तो बहुचíचत एल. पी. ठेका.. रूपेरी पडद्याला व्यापून उरणारं संगीत! हा पाऊस चार िभतींत राहून बघण्याचा नाही, हे पडद्यावर गाणं न बघताही सांगता येईल. शेवटचा अंतरा विशेष सुंदर.. ‘मन का मयूरा आज मगन हो रहा है’ या सुरेश वाडकरांच्या ओळीला लताबाईंचा अंतर्मुख करणारा लो टोनमधला प्रतिसाद- ‘मुझे आज ये क्या सजन हो रहा है..’ या ओळीला ऑर्केस्ट्रेशन खूप कमी व्हॉल्यूमवर जातं. म्हणजे एकीकडे ‘तो’ एका वेगळ्या दुनियेत बोलावतोय, पण इथे ‘बाबुल का आँगन बिछडने लगा है..’ ही खंत प्रबळ होतीय. हा जो ‘पण’ आहे, तो या सगळ्या प्रकारातून व्यक्त होतो. ‘मीठेसे नश्तर’वरची जागा जाता जाता ठाव घेते. सगळे बंध तोडून भावना आतून फुटून बाहेर पडाव्यात तसं काहीसं या गाण्यात आहे. एल. पीं.चं सर्वात सुंदर पाऊसगाणं.. ‘मेघा रे मेघा रे..’
कितीतरी गाण्यांनी हा सावन समृद्ध केलाय. ‘सावन के महिने में इक आग सी सीने में’ म्हणत मदनमोहननं मद्यप्रेमींची दुखती रग ओळखली. ‘सावन को आने दो’ म्हणत राजकमलनी मजा आणली. ‘सोना करे झिलमिल..’मध्ये रवीन्द्र जैन यांनी ‘वृष्टी करे टापूर टिपूर’ म्हणत वेगळ्या ‘साऊंड’चं गाणं दिलं. उषा खन्नांच्या ‘बरखा रानी, जरा जमके बरसो’मध्ये ‘यार मेरा डरके मेरे सीने से लग जाए रे’ इतपत असलेला पाऊसप्रणय पुढे जरा जास्त उघड, शृंगारिक झाला. मग ‘भीगा बदन जलने लगा’, ‘जलता है जिया मेरा’, ‘आज रपट जाए तो’ अशी गाणी आली. पण हंसराज बहलचं ‘भीगा भीगा प्यार का समा’, चित्रगुप्तचं ‘का रे का रे बादरा..’ किंवा मदनमोहनच्याच ‘जारे बदरा बरी’मधला मुग्ध प्रणय मागे पडला.
एवढं होऊनही अनेक गाणी उरतातच. पाऊस निरंतर येत राहणार आणि पाऊसगाणीही. पण एक नक्की, की आपलं भावविश्व भारणारे शब्द-स्वर आपला स्वत:चा पाऊस शोधायला वाट दाखवतात. स्वानंदात राहण्याची मस्त कला शिकवतात. आणि मग त्या स्वर-सरींमध्ये आपण कसे चिंब होतो, कळतही नाही. ‘जीने का बहाना’ असाच तर मिळतो ना?
‘सावन की रातों में ऐसा भी होता है
राही कोई भूला हुआ, तुफानों में खोया हुआ
राह पे आ जाता है..
सावन की रातों में..’