News Flash

समंजस करणारी प्रौढ कादंबरी

राजन खान यांची ‘रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा’ ही कादंबरी वाचल्यानंतर मागील सहा-एक वर्षांत मराठी कादंबरी केवळ कथाकथन करून करमणूक करण्याच्या उद्देशाला फारकत देऊन

| November 2, 2014 05:08 am

राजन खान यांची ‘रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा’ ही कादंबरी वाचल्यानंतर मागील सहा-एक वर्षांत मराठी कादंबरी केवळ कथाकथन करून करमणूक करण्याच्या उद्देशाला फारकत देऊन प्रौढ झाल्याची जाणीव होते. यासाठी भालचंद्र नेमाडेच पुन्हा एकदा कारणीभूत ठरले असे म्हणावयास अनेक कारणे सापडतील. राजन गवस, आनंद विनायक जातेगावकर, कृष्णात खोत, प्रवीण बांदेकर, महेंद्र कदम यांच्या आशावाद नव्याने उत्पन्न करणाऱ्या कादंबऱ्या आल्या आहेत. याच धारेत राजन खान यांची प्रस्तुतची कादंबरी विचार करायला लावणारी आहे. आपल्याकडे कादंबरी म्हटल्यानंतर निश्चित असे दीर्घ कथानक असलेले बाड अशी समजूत होती. त्या कादंबरीच्या कथानक परंपरेचा कणा नेमाडय़ांच्या ‘कोसला’ने मोडून काढला आणि हा दीर्घ आशय जीवनदर्शनाचा असतो, जीवनातील अनेक गोष्टींचे ऊध्र्वपातन त्यातून करता येते, हे पोरसवदा नायकाकरवी (स्वत: कादंबरीकारही त्याच वयातले) सांगितले. आता पुन्हा ‘हिंदू’करवी एक वेगळी जाणीव प्रसृत केली. कुठलाही लेखक कितीही नाही म्हणत असला तरी एखादी चांगली कलाकृती आल्यानंतर आपली कादंबरी वेगळी कशी होईल अशी गीषा निर्माण करून लिहितो आणि ती निर्माण होणे संस्कृतीच्या हिताचे असते. ‘रजे हो..’ या कादंबरीत व्यापक समाजहित दडले आहे.
ही कादंबरी एका राज्याची राजकीय आणि सामाजिक मानसिकता उकलून दाखवते. राजकीय गोष्टी साहित्यात आडपडद्यातून आणून राजकारण्यांचा रगेल-रंगेलपणा दाखवून आपली कलाकृती रंजक व चुरचुरीत या अर्थाने वाचनीय करून घेतली जाते. परंतु राजन खान यांनी राजकारणावरच सुंदर कादंबरी लिहिली आहे. मागील तीस-चाळीस वर्षांत राजकारण हा दररोजच्या अन्नाइतका महत्त्वाचा विषय झाला आहे. या जगण्याच्या अविभाज्य घटकाला कुठे तरी, केव्हा तरी उप-उपकथानक म्हणून रंगविणे आपल्या सांस्कृतिक खुजेपणाचे लक्षण आहे.  खान यांनी ही कादंबरी लिहून राजकारणाकडे सर्जनाच्या दृष्टीने कसे पाहता येते, याचे उदाहरण घालून दिले आहे.
राजकारण हा तिरस्करणीय, काहीसा गॉसिपिंग व चऱ्हाट असणारा विषय असा एक समज रूढ आहे. या समजाला खान यांनी स्वच्छ केले आहे. राजकारण हे मूळचे समाजकारण आहे. ते कल्याण मंडळ असते. वैधानिक असते. जनकल्याण व जनहित हेच त्याचे ब्रीद असते. पण इतके महत्त्वाचे राजकारण मराठी साहित्यात हास्याचा विषय झाले आहे. खान यांनी अत्यंत संयतपणे, जबाबदारीने आणि गंभीरपणे हा विषय हाताळला आहे. बाई-बाटली याविषयी अवाक्षरही न लिहिता वाचकांना त्यांनी शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे. राजकारणात तेजस्वीपणासह घाण असणारच. कारण राजकारणी शेवटी माणसेच असतात. त्यांना आपण आपल्या वतीने आपल्यासाठी निर्णय घेण्याकरता बसविलेले असते, हे या कादंबरीचा नायक सांगतो.
कादंबरीचा नायक साहेब हा वयाच्या पंचविसाव्या वर्षी जन्मदात्या पित्याच्या विरोधात अपक्ष म्हणून विकासाच्या मुद्दय़ावर निवडून येतो. साहेबचे वडील चार-पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले एक अमंगळ पुरुष असतात. राजकारणात राहून स्वच्छ चारित्र्याचा हा आमदार घाणेरडा असतो. तंबाखू- गुटखा खाणे, विडय़ा फुंकणे, चार- चार दिवस स्नान न करणे, महिनोन् महिने दाढी न करणे अशा सवयींचा हा लोकप्रतिनिधी. त्यांची पत्नी त्यांच्या विरुद्ध स्वभावाची. चार वेळा आमदार असून एक पडका वाडा, चार एकर जिरायत जमीन ही वडिलोपार्जित संपत्ती. त्यामुळे मुलाच्या जगण्याचा प्रश्न येतो. आमदार पित्याने एकही पैसा न खाता, काम न करता, मुंबईलाही न जाता वीस वर्षे आमदारकी केली. शेवटी मुलाकडूनच पराभव झाला. तो स्वीकारता न आल्याने जगाचा लवकरच निरोप घेतला.
पाणी आणि विकासाच्या प्रश्नावर वडिलांना हरवून आलेला व फक्त मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेला हा साहेब आमदार झाल्यावर धडाकेबाज काम करतो. आपला मतदारसंघ समृद्ध करतो. स्वत:चा पक्ष काढतो. संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र बनवतो. राज्यकारभारात वाटेकरी होतो. पण किंगमेकर होऊन किंग होत नाही. lr13एकमुठी सत्ता अपेक्षित असलेला हा आमदार स्वत: एक पैचा भ्रष्टाचार न करता ऐश्वर्य भोगतो. काम करून आपल्या कार्यकर्त्यांना धनिक करतो. कार्यकर्ते समाधानी, सुखी तर नेता बिनघोर. ती त्याच्या अमर्याद पुढारपणाची शाश्वती असते हे सूत्र साहेब अवलंबतो.
तो आपल्या मतदारसंघाचा पाणी प्रश्न धसास लावतो. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, उद्योगव्यवसाय या सर्व गोष्टी पोटतिडिकीने सोडवतो. पण भ्रष्टाचाराचा एक साधा शिंतोडाही अंगावर पडू देत नाही. आपल्या पराक्रमाने ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण सार्थ करतो.
‘हागणदारीमुक्त गाव’ हा प्रकल्प साहेब हाती घेतो. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करतो. विरोधक टवाळी करतात तेव्हा त्यांना पुरून उरतो. प्रत्येकाच्या घरात शौचालय बांधण्यासाठी राज्यात ९८ अब्ज रुपये वाटतो. पण कलेक्टर, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच यांच्यामार्फत लाभधारकांना सहीनिशी पैसा वाटूनही शौचालये उभारली जात नाहीत. तेव्हा विरोधक विधानसभेत प्रश्न उपस्थित करतात. भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून रान उठविले जाते. साहेब भ्रष्टाचार न झालेली ही एकमेव योजना असल्याचे स्पष्टीकरण देतो. तो सच्चा असतो. विरोधकांना आव्हान देतो आणि कडक कायदा करून तीन महिन्यांत शौचालये बांधून घेण्याची सक्ती करून सरकार म्हणजे काय असते हे दाखवून देतो.
कायदा करून घाण करू नये हे सांगितले जाते, पण ज्यांच्या प्राथमिक गरजा भागलेल्या नाहीत, ज्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, ज्यांच्या हजारो पिढय़ा उघडय़ावर शौचाला जात राहिल्या त्यांच्यावर आणि ज्यांच्या घरातील पहिली पिढी शिकली आहे अशांच्यावर शौचालयाची सक्ती होऊ लागली. परिणामी हा प्रश्न कठीण होऊन काहींच्या मृत्यूच्या बातम्या झळकतात. तेव्हा हा कायदाच रद्द केला जातो. मारणाऱ्यांना शिक्षा होण्याच्या आश्वासनावर वातावरण निवळते.
‘रजे हो..’ ही कादंबरी एक अजिबात न भरकटलेली गोळीबंद अशी कादंबरी आहे. संपूर्ण प्रजेलाच कथन करून कथक सांगतो. कथनामध्ये रंजकता, बीभत्सपणा हागणदारी या विषयांमुळे येऊ शकली असती, पण कादंबरीकार थेट विषयाला भिडला आहे. विषय महत्त्वाचा असल्याने आशयाच्या सविस्तर वा रसदार स्पष्टीकरणाची गरज कादंबरीकाराला वाटली नाही. त्यांनी अत्यंत जबाबदारीने ही कादंबरी लिहिली आहे.
यातील पत्रकार, टीव्ही वाहिन्यांचा सुळसुळाट, फुकटे कार्यकर्ते, सच्च्या परिस्थितीतून शहाणपण मिळवलेला सचिव यांचे चित्रण कादंबरीकाराने अत्यंत त्रयस्थपणे केले आहे. कादंबरीकाराने ‘हागणदारीमुक्त गाव’ ही योजना का फसली याची २२ कारणे दिली आहेत. त्यावरून कादंबरीकाराने किती परिश्रम घेतले असतील याची कल्पना येते. समाज समंजस होण्यासाठी अशा साहित्याची आवश्यकता आहे.
‘रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा’ – राजन खान, मैत्रेय प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १५२, मूल्य – १६० रुपये.                                                          

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 5:08 am

Web Title: raje ho muddam bharkatleli katha
Next Stories
1 अलौकिकात अडकलेला नीरस अनुवाद
2 चिन्मय केळकर
3 ती आत्ता असायला हवी होती..
Just Now!
X