रेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ ही कॉमेडी पाहताना याचा साक्षात् प्रत्यय आला. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’चा दिग्दर्शक होता जॉन टिलिंजर. त्याने प्रयोग ‘कनसिव्ह’ करण्यातच गडबड केली होती. नाटकाच्या नावात ‘डिनर’ होतं, पण जे पाहिलं ते स्टार्टर्ससुद्धा नव्हते. या नाटकानं जाणीव करून दिली, की बाबा रे, ब्रॉडवेवरचं सगळंच चांगलं असा समज करून घेऊ नकोस. हे लोक काही जगावेगळे नाहीत. इथे जशी उत्तम नाटकं होतात, तशीच वाईटही होतात.

न्यू यॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरवर असलेल्या ‘टीकेटीएस्’ या नाटकाची तिकिटं मिळणाऱ्या बूथसमोर उभा होतो. नाटकांच्या नावाची यादी वाचत होतो. एका नाटकाच्या नावावर नजर स्थिरावली.. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’- दोन अंकी फार्स. मला बरेच दिवस ब्रॉडवेवरचा एक तरी चांगला फॉर्स बघायचा होताच. मी बूथच्या खिडकीवर जाऊन नाटकाचं तिकीट काढलं. दुपारचे दोन वाजले होते. तीनचं नाटक होतं. नाटक टाइम्स स्क्वेअरपासून पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. दि अमेरिकन एक्सप्रेस थिएटर, फॉर्टी सेकंड स्ट्रीट. मी खूश झालो होतो. कारण शनिवार असूनही मला चांगलं तिकीट मिळालं होतं. थिएटरवर पोहोचलो. थिएटर नेहमीपेक्षा जरा वेगळं वाटत होतं. इमारतीच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्याबरोबर मोठ्ठा पॅसेज होता. खाली कारपेट आणि दोन्ही बाजूच्या भिंतींवर अंतरा-अंतराने लावलेली पेंटिग्ज. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्येच आपण शिरतोय असं मला वाटलं. थिएटर खूप जूनं नसावं, किंवा नुकतंच नूतनीकरण केलेलं असावं. मुख्य नाटय़गृहाच्या आत शिरलो. चांगलं प्रशस्त नाटय़गृह होतं. पण मला काहीतरी वेगळं वाटत होतं. नाटय़गृहात शिरल्यानंतर जसं वाटतं तसं वाटत नव्हतं. मी लवकर पोहोचलो असल्यामुळे माझ्या सीटवर जाऊन बसलो आणि निवांतपणे प्लेबिल वाचायला सुरुवात केली.
हे अमेरिकन एक्सप्रेस थिएटर १९१८ साली बांधलेलं होतं. तेव्हा त्याचं नाव होतं- सेल्वायन थिएटर. १९३० साली या नाटय़गृहाचं चित्रपटगृहात रूपांतर झालं. आणि २००० साली डागडुजी करून राऊंड अबाऊट थिएटर कंपनीने हे नाटय़गृह पुन्हा  सुरू केलं. नाटय़गृहाच्या बाबतीतला माझा अंदाज अगदीच चुकलेला नव्हता हे लक्षात आलं, त्यामुळे जरा बरं वाटलं.
‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ हे मार्क कॅमोलिती नावाच्या फ्रेंच नाटककाराच्या फार्सचं रॉबिन हॉडनने केलेलं इंग्रजी रूपांतर होतं. मूळ नाटकाचं नाव होतं- ‘पायजमास फॉर सिक्स.’ फ्रान्समध्ये हा फार्स गाजला होता. रॉबिन हॉडन हा चांगला नाटककार आहे हे माहीत होतं. त्यामुळे इंग्रजी रूपांतर चांगलंच झालं असणार अशी माझी खात्री होती. रॉबिन हॉडनने लिहिलेलं ‘बर्थडे स्वीट’ नावाचं इंग्रजी नाटक मी दिग्दर्शित केलं होतं. त्यामुळे या नाटककाराची थोडीशी ओळख झाली होती.
नाटक सुरू झालं. प्रयोगाला खूप गर्दी होती. नाटक घडतं ते बर्नार्डच्या पॅरिसपासून दोन तासावर असलेल्या फार्महाऊसमध्ये. बर्नार्ड आपल्या बायकोला- म्हणजे जॅकलिनला वीकएन्डला तिच्या आईकडे जायला सांगतो. ती तयार होते. बर्नार्ड खूप खूश असतो. कारण बायकोला घराबाहेर पाठवून त्याने त्याच्या मैत्रिणीला- सुझ्ॉनला येण्याचा मार्ग मोकळा केलेला असतो. नाटकाच्या सुरवातीलाच लक्षात येतं की, ही सेक्स कॉमेडी आहे. प्रेक्षकही त्याच दृष्टीने नाटक पाहायला तयार होतो. जॅकलिनला संशय येऊ नये म्हणून बर्नार्डने आपला जिवलग मित्र रॉबर्ट याला रात्री राहायला बोलावलेलं असतं. आणि बायको जाणार म्हणून जेवण बनवायला एक स्वयंपाकीण मागवतो; जिचं नाव असतं-सुझेट. थोडक्यात काय, तर जॅकलिनला संशय आलाच, तर दोन साक्षीदार असलेले बरे. जॅकलिन आईकडे जायला निघते इतक्यात घरचा फोन वाजतो. जॅकलिन फोन उचलते. तो बॉन अॅपिटाइट या एजन्सीचा असतो. हे सांगायला, की स्वयंपाकीण सुझेट त्यांच्या घराकडे यायला वेळेवर निघाली आहे. जॅकलिनच्या लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. ती बर्नार्डला त्याबद्दल विचारणार इतक्यात परत फोन वाजतो. ती उचलते. फोन रॉबर्टचा असतो. तो तिला सांगतो की, वीकएन्डला तो त्यांच्या घरी राहायला येतो आहे. हे जॅकलिनला माहीत नसतं. तिला शॉक बसतो. पण ती खूप खूश होते. कारण तिचं आणि रॉबर्टचं अफेअर असतं. हे आपल्याला त्यांच्या फोनवरच्या संभाषणावरून उमगतं. फोन ठेवल्यावर जॅकलिन बर्नार्डला सांगते की, ती तिच्या आईकडे जात नाहीए. कारण तिच्या आईला फ्ल्यू झाला आहे. बर्नार्ड गडबडतो. अगदी टिपिकल फार्समधली घटना! इथून पुढे गोंधळांना सुरुवात होणार याची ही नांदी!
प्रेक्षक प्रयोगाला चांगल्यापैकी दाद देत होते. पण मी मात्र अचंबित झालो होतो. कॉमेडी फार्स हा माझा आवडता प्रांत.. करायला आणि बघायलासुद्धा! विनोदाला भरभरून दाद द्यायला मला आवडतं. हसायला आलं तरी न हसता मख्ख चेहरा ठेवणाऱ्या प्रेक्षकांपैकी मी नाही. पण.. पण.. पण माझ्यासमोर नाटकाच्या नावाखाली जे काही सुरू होतं, त्याने मला अजिबात हसायला येत नव्हतं. हसणं सोडा; हळूहळू वैतागच यायला लागला होता. म्हणजे नाटक सुरू झाल्या झाल्या अगदी पहिल्या दहा मिनिटांतच! ‘माझ्या आजूबाजूचे प्रेक्षक जर नाटक एन्जॉय करत आहेत, तर मग माझंच असं का होतंय?’ हा विचार झटकून टाकून मी पुढे नाटक बघायला लागलो. मनात आशा होती की, नाटक पुढे पिकअप् होईल. कारण प्लॉटला तर हात घातला होता नाटककाराने! पुढे घडणाऱ्या घटनांसाठी पायाभरणीही केली होती.
.. इतक्यात रॉबर्ट येतो. बर्नार्ड त्याची वाटच बघत असतो. रॉबर्ट आल्या आल्या बर्नार्ड त्याला त्याच्या आणि सुझॅनच्या अफेअरबद्दल सांगतो. सुझॅन कुठल्याही क्षणी येऊन पोहोचेल अशी अवस्था. बर्नार्ड रॉबर्टला विनंती करतो की, जॅकलिनला रॉबर्टने सांगावं- सुझॅन त्याची गर्लफ्रेंड आहे! रॉबर्ट त्याला ‘नाही’ म्हणतो. कारण पुढे त्याला धोका दिसत असतो. जॅकलिन येते. ती रॉबर्टला बघून खूश होते. पण रॉबर्ट मनातून हबकलेला असतो. जॅकलिनला बर्नार्डने सांगितलं, की सुझॅन माझी गर्लफ्रेंड आहे, तर काय होईल, याची त्याला भीती वाटत असते. बर्नार्ड जॅकलिनला घेऊन वाणसामान आणायला जातो. ते गेल्या गेल्या सुझी येते. म्हणजे कोण? तर सुझेट स्वयंपाकीण! ती स्वत:चं नाव सुझी सांगते. रॉबर्टला वाटतं- हीच सुझॅन आहे. त्यामुळे बर्नार्ड आणि जॅकलिन आल्यावर तो ती तिची ओळख आपली गर्लफ्रेंड म्हणून करून देतो. बर्नार्ड या गोंधळामुळे हैराण होतो. जॅकलिन रॉबर्टवर चिडते. कारण तिला वाटत असतं की, ती एकटीच रॉबर्टची गर्लफ्रेंड आहे. बर्नार्ड आणि रॉबर्ट सुझेटला जास्त पैसे देऊन रॉबर्टची गर्लफ्रेंड असल्याचा अभिनय करायला सांगतात. ती तयार होते. एवढय़ात सुझॅन येते. आता हे उघडच होतं की सुझॅनला ते दोघं स्वयंपाकीण बनवणार! घडतंही तसंच. सुझॅन खूप चिडते. पण तिच्यापुढे आता पर्याय नसतो. जॅकलिन रॉबर्टला जाब विचारते, तेव्हा पुढे येणारा प्रलय टाळायला रॉबर्ट तिला सांगतो की, वास्तविक सुझेट ही त्याची भाची आहे.
इथे नाटकाचा पहिला अंक संपला.
इथवर माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत फारसा फरक पडलेला नव्हता. मधे एखाद् दुसरा प्रवेश जरा बरा वाटला. पण तरीही मला हा फार्स मनसोक्त हसवत नव्हता किंवा अतक्र्य घटनांमध्ये गुंतवतही नव्हता. दुसऱ्या अंकात काहीतरी धमाल होईल या आशेवर मी होतो. अगदी लोटपोट नाही तरी प्रेक्षक बऱ्यापैकी हसून नाटकाला दाद देत होते. नाटकाच्या प्लॉटमध्ये गंमत होती, घटना घडत होत्या. व्यक्तिरेखा एका परिस्थितीतून सुटून दुसऱ्यात अडकत होत्या. तरीही मजा येत नव्हती. अभिनय म्हणाल तर खरी स्वयंपाकीण सुझेटचं काम करणारी अभिनेत्री वगळता इतर सगळे बेताचेच होते. मध्यंतरात बाहेर लॉबीत फिरताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो. बरेचसे प्रेक्षक खूश दिसत होते. मी एका वयस्कर प्रेक्षकाला विचारलंसुद्धा, कसं वाटतंय? तर तो म्हणाला, ‘चांगली करमणूक आहे.’ वर म्हणाला, ‘मला सेक्स कॉमेडीज् आवडतात.’
दुसरा अंक बघायला प्रेक्षागृहात जाऊन बसलो. ब्रॉडवेवरची किंवा वेस्ट एन्डवरची बरीचशी नाटकं बघताना मी जितका खूश झालो होतो, तितकाच आज निराश. प्रयोग सुरू व्हायला पाच मिनिटं होती म्हणून मी परत प्लेबिल उघडलं. वाचायला लागलो. तेव्हा मला कळलं की, मार्क कॅमोलितीच्याच गाजलेल्या ‘बोईंग बोईंग’ नाटकाचा हा सीक्वेल होता. ते वाचल्यावर मी अधिकच निराश झालो. कारण ‘बोईंग बोईंग’ हा टेरिफिक फार्स होता.
दुसरा अंक सुरू झाला. रॉबर्ट आणि सुझेट डान्स करत असताना एखाद्या पार्टीत जशी धम्माल सुरू असते तसंच काहीसं वातावरण. बर्नार्डच्या जॅकेटमध्ये जॅकलिनला एक चॅनेल कोट विकत घेतल्याची पावती सापडते. त्याच्यावर ‘फॉर सुझी’ असं लिहिलेलं असतं. त्यावरून जॅकलिनला वाटायला लागतं की, सुझेट आणि बर्नार्डचं अफेअर आहे. सुझॅनला पण तसंच वाटत असतं. दोघी त्याचा बदला घ्यायचं ठरवतात. जॅकलिन बर्नार्ड आणि सुझीच्या अंगावर बर्फ टाकते. सुझॅन खुश होते. पण जॅकलिनचं समाधान होत नाही. ती बर्नार्डच्या अंगावर सोडय़ाचा स्प्रे उडवते. त्या गोंधळात सुझेट रॉबर्टची भाची नाही, हे उघडकीला येतं. सुझेट बर्नार्डला सांगते की, तिचं लग्न झालेलं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव जॉर्ज आहे. त्याला पुसटशी जरी शंका आली, की सुझेटचं नाव कुणाबरोबर जोडलं जातंय, तर तो त्या व्यक्तीला ठारच मारेल.
जॅकलिन खूप विचार करते आणि शेवटी बर्नार्डला आपल्या अफेअरबद्दल सांगते. कुणाबरोबर आहे, त्याचं नाव मात्र सांगत नाही. बर्नार्ड चिडतो. म्हणतो- मी तुझ्या याराला ठार मारीन. जॅकलिन रॉबर्टचं नाव सांगते. त्यावर तो काही करणार, इतक्यात सुझेटला न्यायला जॉर्ज येतो. त्याचा अवतार बघून सगळ्यांचं धाबं दणाणतं. पण जॉर्जला तिथं काय घडलंय याची कल्पना नाही. बर्नार्ड आणि रॉबर्ट ‘सुझॅन त्याची बायको आहे’ असं जॉर्जला पटवायचा प्रयत्न करतात. जॉर्ज खवळतो. मग ते दोघं त्याला सांगतात- सुझेट शेजारच्या घरात गेली आहे. ती येईपर्यंतच हे नाटक करायचं आहे. जॉर्ज ऐकत नाही. शेवटी सुझेट आतल्या खोलीतून बाहेर येते. सगळ्यांना सगळं कळतं आणि त्यामुळे सर्व प्रकरण निस्तरलं जातं. जॉर्ज व सुझेट जातात. बर्नार्ड आणि जॅकलिन आपल्या बेडरूममध्ये झोपायला जातात. थोडय़ा वेळात सुझॅन आपल्या खोलीतून बाहेर येते. रॉबर्टला बाहेर बोलावते. ते दोघं एकमेकांच्या मिठीत विसावतात. नाटक संपतं.
फक्त दोन तास पाच मिनिटांचं नाटक; पण मला दोन दिवस नाटक बघत असल्यासारखं वाटलं. ब्रॉडवेवरची सर्वच नाटकं चांगली असतात असा माझा समज होत चालला होता, त्याला या नाटकाने चांगलाच धक्का दिला. वाईट म्हणजे किती वाईट असावं? एकीकडे अत्यंत विचारपूर्वक, खूप मेहनत घेऊन केली जाणारी नाटकं; तर दुसऱ्या बाजूला संख्येने कमी, पण ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’सारखी नाटकं! मला नाण्याची दुसरी बाजू बघायला मिळाली नव्हती. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ने ती दाखवली. फार्सला आवश्यक असलेली प्लॉटची गुंतागुंत या नाटकात होती. एका प्रसंगातून सुटून दुसऱ्यात अडकवणारी पात्रं होती. वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखा होत्या. ‘मिस्टेकन आयडेंटिटीज्’ होत्या. फार्सला आवश्यक असलेले सर्व घटक छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात नाटकात होते. पण तरीही नाटक परिणामकारक होत नव्हतं. निदान माझ्यासाठी तरी! असं का घडलं असेल, याचा मी विचार करायला लागलो. नाटकाची दोन भागात विभागणी होते- संहिता आणि प्रयोग. संहितेत गंमत असेल तर ती प्रयोगात रूपांतरित होण्याची शक्यता असते. पण आडय़ातच नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार? मी ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ नाटकाचं पुस्तक घेऊन वाचलं. संवादांमध्ये पुरेशी मजा नव्हती. त्यांनी विनोदनिर्मिती होत नव्हती. मूळ फ्रेंच नाटकात होत असेलही; पण रूपांतरात मात्र ती नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे फार्समधल्या वेडेपणालाही त्याचं म्हणून एक शास्त्र असतं. एकदा आपण तर्काच्या पलीकडच्या घटना घडणार हे मान्य केल्यानंतर त्या आपल्याला धक्के देत यायला पाहिजेत. इथे तसं होत नव्हतं. सगळं ठरवलेलं वाटत होतं. नाटकाची संरचना ओघवती नव्हती. प्रेक्षकांना पूर्वानुमान करता येईल अशाच घटना घडत राहतात. लिखाणात पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक जरा बरा होता. पण ‘बोईंग बोईंग’ या फार्सच्या लेखनात जी मजा होती, ती या नाटकाच्या लेखनात नव्हती.
आता प्रयोग.. राऊंड अबाऊट थिएटर कंपनीचं हे प्रॉडक्शन. विनोदी नाटकाच्या प्रयोगाची एक गंमत असते. ते तुम्ही जितक्या सीरियसली कराल, तेवढं जास्त वर्क होतं. म्हणजे रंगमंचावर जे काही चाललं आहे ते पाहून प्रेक्षकांना खूप हसायला येतं, पण काम करणारी पात्रं ते खूप गंभीरपणे करत असतात. ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’मधला बर्नार्ड अत्यंत हुशारीने एक प्लॅन आखतो आणि कसा त्यात अडकला जातो, याची मजा यायला पाहिजे. पण बर्नार्ड हे पात्र खरंच त्यात अडकलंय असं वाटायला हवं. इथे तसं होत नाही. नाटकातली सर्व पात्रं मुद्दाम प्रेक्षकांना हसवण्यासाठी जबरदस्तीने विनोदनिर्मितीचा प्रयत्न करताहेत असं वाटत राहिलं. रेक्स हॅरिसन या जगप्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्या एका पुस्तकात लिहिलं आहे- ‘एनी फुल कॅन प्ले अ ट्रॅजिडी, बट कॉमेडी इज डॅम सीरियस बिझनेस.’ अतिशय महत्त्वाचं विधान आहे हे. सर्वच अभिनेते विनोदनिर्मितीचा प्रयत्न करत होते. फक्त सुझेटचं काम करणारी स्पेन्सर केडन सोडून! या बाईने मात्र अफलातून काम केलं होतं. ती स्वयंपाकीण म्हणून सुरुवातीला या घरात येते. जराशी बुजलेली. चालण्या-बोलण्यात अवघडलेपण. हळूहळू घरात काय चाललंय, हे तिला कळायला लागतं. त्यानंतरचा तिचा बर्नार्ड आणि रॉबर्टबरोबरचा पैसे मागण्याचा प्रवेश. या प्रवेशात ती थोडी जास्त मोकळी झाली. हातवारे जरा मोकळेपणाने करायला लागली. बोलण्यातसुद्धा वाढलेला कॉन्फिडन्स तिनं दाखवला होता. शिवाय परिस्थितीचा फायदा घेण्याची वृत्ती उफाळून बाहेर आल्याचं सूचन पण तिनं शारीरभाषेतून छान केलं. नंतर दुसऱ्या अंकातला रॉबर्टबरोबर फ्लर्ट करण्याचा सीन आणि एक छोटासा विनोदी नाच यात तर तिने धमालच उडवून दिली. विशेषत: तिच्या कपडय़ांमध्ये झालेला बदल त्या- त्या ड्रेसप्रमाणे शारीरभाषा बदलून केडनबाईने फार मस्त दाखवला. सबंध नाटकात एन्जॉय करण्यासारखं काय असेल, तर तिचं काम! पण फार्सला टीमवर्क जबरदस्त लागतं. त्यामुळे तिचं एकटीचं चांगलं काम हा कोसळणारा डोलारा सावरू शकत नव्हतं.
‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’चा दिग्दर्शक होता जॉन टिलिंजर. त्याने हा प्रयोग ‘कनसिव्ह’ करण्यातच गडबड केली होती. प्रत्येक पात्र वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होतं. प्रत्येकाची स्वतंत्र शैली. एका प्रवेशातून दुसऱ्या प्रवेशात नाटक जात असताना ते प्रवाही असायला हवं, इथे तसं होतच नव्हतं. सगळ्यांचे सूर वेगवेगळे, त्यामुळे आवाजाच्या पट्टय़ा वेगवेगळ्या. पात्रं एकमेकांचं ऐकून बोलत आहेत असं बऱ्याचदा वाटत नव्हतं. जॉन लिबॅटीचं फार्म-हाऊस दिसायला बरं होतं, पण दिग्दर्शकाने त्याचा वापर एखाद् दुसरा प्रसंग वगळता नीट केलाच नव्हता. बऱ्याचदा अभिनेते स्टेजवर रांगेत उभे राहिल्यासारखे वाटत होते. अगदी आत्ता राष्ट्रगीत म्हणतील असं वाटावं असे. आकृतिबंध नावाची गोष्ट दिग्दर्शकाच्या गावीच नसावी. एकदा दोघंजण फोनच्या वायरमध्ये अडकतात तो प्रसंग आणि एकदा सर्वजण एकमेकांच्या अंगावर पडतात तो दुसरा प्रसंग असे काही अपवाद वगळता चांगले दृश्यबंध नाटकात नव्हतेच. नेपथ्यकाराने जागा दिल्या होत्या, पण त्याचा वापर शून्य! फार्स गतिमान हवा, प्रसंगांची लय समजून घेऊन, त्यातले चढउतार समजून घेऊन प्रयोगाची बांधणी करावी लागते, वगैरे गोष्टी तर प्रयोगात नव्हत्याच. नाटक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की, सर्वाना छोटय़ा छोटय़ा प्रतारणा करायच्या आहेत, पण तेही त्यांना धड जमत नाहीए. प्रयोग बघताना ‘बोईंग बोईंग’ नाटकात ज्या गोष्टी हीच माणसं- रॉबर्ट आणि बर्नार्ड शिताफीने करतात, ती करताना आता लग्न वगैरे झाल्यावर, मधे काही र्वष गेल्यामुळे गोंधळ होतोय, आता ती हुशारी उरलेली नाहीए. हे जरी खरं असलं तरी माझ्या मते, ‘डोन्ट ड्रेस फॉर डिनर’ हे स्वतंत्र नाटक आहे. तो ‘बोईंग बोईंग’चा सीक्वेल वाटत नाही.
नाटक किती दिवस चालेल, माहिती नाही. पण नाटक बघायला आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्रच असणार, असं प्रयोग सुरू असताना आणि प्रयोग संपल्यावर इतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून वाटलं. मला या नाटकाने धक्का दिला. खाडकन् जागं केलं. आणि जाणीव करून दिली, की बाबा रे, ब्रॉडवेवरचं सगळंच चांगलं असा समज करून घेऊ नकोस. हे लोक काही जगावेगळे नाहीत. इथे जशी उत्तम नाटकं होतात, तशीच वाईटही होतात. बऱ्याचदा काय होतं- आपण ब्रॉडवे किंवा वेस्ट एन्डवर नाटक बघायला जाताना ज्या नाटकांबद्दल चांगलं ऐकलं वा वाचलेलं असतं अशीच नाटकं बघायला जातो. त्यामुळे ती चांगलीच निघण्याची शक्यता वाढते. पण असं- नुसती नाटकाची यादी बघून, कसलीही पूर्वसूचना नसताना एखादं नाटक बघायला गेलं तर काय होईल, याचा प्रत्यय त्या दिवशी आला.
नाटकाच्या नावात ‘डिनर’ होतं, पण जे पाहिलं ते स्टार्टर्ससुद्धा नव्हतं. आणि मी पूर्ण जेवणाची भूक घेऊन  गेलो होतो. मी विचार केला- आता परत टीकेटीएसवर जावं, तिकीट काढावं आणि स्वीट डिश म्हणून एखादं नावाजलेलं चांगलं नाटक पाहावं, म्हणजे तोंडाची बिघडलेली चव तरी सुधारेल.
lokrang@expressindia.com