शिवाजीमहाराज आणि औरंगजेब यांच्यातील अविरत संघर्षांवर आधारीत मेधा देशमुख-भास्करन यांच्या ‘फ्रंटियर्स’ या ऐतिहासिक कादंबरीचा नंदिनी उपाध्ये यांनी केलेला ‘रणसंग्राम’ हा अनुवाद  मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील संपादित अंश..

पहाटेची, फज्रची नमाज अदा झाली होती. जवळच्या मनोऱ्यातील बांग देणारे मुएझिन केव्हाच मशिदीत गेले होते. डोंगराच्या रांगांमागील पूर्वेकडचं क्षितिज केशरी दिसू लागलं होतं. दख्खन प्रांतातील मुघलांचं औरंगाबाद हे राजधानीचं शहर सकाळच्या सूर्यकिरणांत न्हाऊन निघालं होतं. वसंत ॠतूच्या आल्हाददायक वातावरणात पक्षी बेभान होऊन गात होते. मुघलांनी निजामशाही खालसा केली, त्यावेळी औरंगजेब केवळ वीस वर्षांचा होता. दख्खनी प्रांताचा सुभेदार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. दख्खनी प्रांतातील राजकीय हालचालींचं औरंगाबाद हे मुख्य ठिकाण झालं.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
Everything You Need To Know About Pune Famous Tourist place sarasbag history name and many more
पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…

त्याच औरंगाबादमध्ये नौखंड या आपल्या उंचावरील महालाच्या सज्जात औरंगजेब उभा होता. आपल्या लाडक्या शहराचं सौंदर्य निरखत होता. भलीमोठी तटबंदी असलेल्या औरंगाबाद व त्याच्या आसपासच्या परिसरातील सर्व गोष्टी त्याला फार प्रिय होत्या. पाणलोटाच्या क्षेत्रातील दरी हे त्याच्या भटकंतीतील सर्वात आवडतं ठिकाण होतं. तेथील शांत निळ्या जलाशयात अस्मानी आकाश त्यातील पांढऱ्याशुभ्र बगळ्यांच्या माळेसह प्रतिबिंबित होत असे. त्या बलाकमालांच्या आठवणीशीच त्याच्या छोटय़ा पक्ष्याची- ‘शेरबाझ’ची आठवण निगडित होती.

याच महालात घडलेल्या त्या घटनेला वीस र्वष उलटून गेली होती. परंतु औरंगजेबाला मात्र काल घडल्यासारखं लख्ख आठवत होतं.. सुभेदार म्हणून त्यानं प्रथमच दरबारात पाऊल टाकलं होतं. त्याचवेळी दरबारातील गर्दीतून वाट काढत एक कृश व्यक्ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली होती. आसपासच्या खेडय़ातील कुणी आदिवासी असावा तो. त्याच्या मनगटावर एक बहिरी ससाणा बसलेला होता. त्याचे डोळे कपडय़ानं झाकलेले होते. राखी रंगाच्या त्या पक्ष्याच्या शरीरावर मोठमोठे करडे पट्टे होते. त्या पक्ष्याला पाहून, केवळ लंगोटी नेसून आलेल्या त्या माणसाला अडवण्याचं धैर्य पहारेकऱ्यांना झालं नाही. ‘‘शहजादे, आपल्यासाठी हा पक्षी आणला आहे!’’ आपल्या मोडक्या तोडक्या उर्दूत अडखळत बोलत त्यानं तो पक्षी औरंगजेबाला सादर केला. दरबारातील एखाद्या उमरावाचा चेहरा मौल्यवान हिरा अर्पण करताना जसा अभिमानानं फुलून आला असता, तसाच अभिमान त्याच्या चेहऱ्यावर त्यावेळी झळकत होता. ‘‘हा शेरबाझ आहे, ससाण्यांतील शेर! मोठय़ा गिधाडांपेक्षा हा छोटय़ा छोटय़ा पक्ष्यांची शिकार फार हुशारीनं करतो,’’ आपल्या पक्ष्याचं गुणवर्णन करताना त्यानं जरा ठसक्यातच सांगितलं होतं. औरंगजेबानं जरा घाबरतच त्या रानटी पक्ष्याच्या डोक्यावरील आच्छादन बाजूला करून पिवळसर डोळ्यांत पाहिलं होतं. त्या गर्विष्ठ ससाण्यानंही औरंगजेबाच्या नजरेला नजर देत त्याच्याकडे रोखून पाहिलं होतं. जणू काही तो विचारत होता, ‘काय बच्चमजी, कोण आहेस तू?’ अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागातून आणलेल्या पक्ष्याला दौलताबादच्या किल्ल्याच्या पायथ्याजवळील जंगलात प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतरची काही वर्षे शेरबाझला कबुतरांच्या शिकारीला नेणं हा औरंगजेबाचा एक विरंगुळा झाला होता. शेरबाझनंही कधी आपल्या मालकाला निराश केलं नव्हतं. त्याचा हा आनंद ज्या दिवशी नष्ट झाला, तो दिवस औरंगजेब कधीही विसरू शकला नाही. झालं असं की, त्या दिवशी शेरबाझनं आकाशात उंच भरारी घेतली. आकाश निरभ्र होतं. नुकतंच पंखात बळ आलेलं कावळ्याचं एक छोटं पिल्लू तेवढय़ात कुठून तरी आलं. त्या पिल्लाला काही कळण्याआधीच शेरबाझनं त्याच्यावर झेप घेतली आणि त्याला आपल्या पंखाखाली ओढलं. पण कुठून तरी कावळ्यांचा मोठा थवा अचानक आला. त्यांच्या कर्कश आवाजानं सारा आसमंत दुमदुमून गेला. औरंगजेबच्या लक्षात येण्यापूर्वीच त्याच्या शेरबाझला त्यांच्यातील काहींनी चारी बाजूंनी घेरलं. काहींनी आपले पंख पसरत शेरबाझवर झेप घेत त्याला टोच्या मारायला सुरुवात केली. हा सारा विलक्षण प्रकार हतबुद्ध होऊन पाहणारा मुघल तख्ताचा शहजादा एक मोठा धडा शिकला होता.. जेता व जिता यांच्यामध्ये केवळ एक बारीक रेषा असते. क्षणापूर्वी जेता वाटणारा दुसऱ्या क्षणी पराभूतही होऊ  शकतो.

या घटनेनंतरच औरंगजेबाला काव्याच्या काही पंक्ती सुचल्या होत्या : ‘जीवन.. एका क्षणाची चमक, एक श्वास.. आता होता आयुष्याचा भास अन् आता आहे मृत्यूचा फास!’

या कवितेबरोबरच औरंगजेबाला शिवा भोसलेची आठवण झाली. त्या बंडखोरानं उत्तर कोकणात धुमाकूळ घातला होता. या काफीराला लुटालूट करण्याची बुरी आदतच लागली होती. दख्खन प्रांतातील इतरांप्रमाणे त्यालाही एका श्वासात संपवण्याची वेळ येऊन ठेपली होती. अशा माणसांना कसं संपवायचं, ते औरंगजेबाला चांगलंच माहीत होतं.

‘‘त्या शिवा भोसलेच्या माणसाला बोलवा. त्याच्या दोन्ही बाजूला शस्त्रास्त्रधारी माणसं ठेवा. त्याचबरोबर तंबूच्या भोवती पहारा द्या. त्यांना दक्ष राहण्यास सांगा!’’ औरंगजेबानं दाराशीच असलेल्या मुतामदला जरा ओरडूनच सांगितलं. दिवाणावर सावरून बसत त्यानं शेजारच्या मेजावर ठेवलेली जपाची माळ उचलली. नेहमीप्रमाणं आपले डोळे मिटून घेतले.

आज रघुनाथपंत फार अस्वस्थ होते. राजगडहून इथं येण्यासाठी त्यांनी उत्तरेकडे दीडशे मैल घोडय़ावरून प्रवास केला होता. हा प्रवास सुखाचा नव्हता. परंतु इथं आल्यावर त्यांनी जे काही बघितलं, ते पाहून काळजीनं त्यांना धस्स झालं. हा एक प्रचंड मोठा लष्करी तळ होता. सर्वत्र मुघल सैनिकांसाठी हिरव्या रंगाचे तंबू आणि रजपूत सैन्यासाठी केशरी तंबू होते. त्याचबरोबर तळावर निळ्या डोळ्यांचे उंचेपुरे परकीय सैनिक तैनात होते. हे सैनिक अफगाणिस्तानातून आलेले होते. युरोपमधून गौरवर्णीय सैनिकही आलेले होते. हा तळ न संपणारा वाटत होता. तिथं प्राण्यांच्या लांबलचक पागा होत्या, शस्त्रं तयार करणारे लोहार होते आणि त्यांच्याकडे इकडून तिकडे नेता येण्यासारख्या भट्टय़ा होत्या. गाडय़ा भरून आलेली जनावरं आणि मेंढय़ा, बकऱ्या व बोकडं, त्याचबरोबर विविध प्रकारचं सामान भरलेली दुकानं.. सारं सारं होतं! ते सर्व पाहून पंत भारावून गेले.

हे सर्व पाहिल्यावर ते मुघल शहजादा व मुघल साम्राज्याचा दख्खनचा सुभेदार असलेल्या औरंगजेबाच्या तंबूपाशी आले. त्यावेळी या साऱ्या श्रीमंती थाटाच्या पाश्र्वभूमीवर त्याच्या तंबूची कमालीची सादगी बघून ते अचंबितच झाले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक उच्चपदस्थ मुघल सरदार पाहिले होते. त्यांच्या तुलनेत करडय़ा लांबलचक दाढीतला मुघल साम्राज्याचा तिसरा राजपुत्र फारच सभ्य, सुसंस्कृत वाटत होता! त्याचा दिवाण साधा होता आणि त्यानं लांब बाह्य़ांचा, कदाचित चिटाच्या कापडाचा पायघोळ अंगरखा घातला होता. त्याला शोभेशी पगडी परिधान केली होती. जप करत तो माळ ओढत होता असं वाटत होतं.

‘‘मी, शिवाजी भोसल्यांचा वकील, सामथ्र्यशाली शहजादे व दख्खन प्रांताचे सन्माननीय सुभेदार यांना सलाम करतो.’’

डोळे मिटलेले असले तरी दूरवरून आलेल्या पाहुण्यांची रोखलेली नजर औरंगजेबाला जाणवत होती. त्याच्या लक्षात आलं होतं, की शिवाचा हा वकील चतुर, बुद्धिमान आहे. हा वकील कोणत्या तरी मागणीसाठी आला असणार असा अंदाज त्यानं बांधला.

‘‘माझे धनी- राजे शिवाजी भोसले यांनी आपली माफी मागितली आहे.’’ अभिवादन करतच पंतांनी आपल्या येण्याचा हेतू स्पष्ट केला. मराठय़ांच्या या सवयीचाही औरंगजेबाला फार राग येत असे! संवादाला सुरुवात करताना थोडंफार इकडचं तिकडचं बोलणं, थट्टामस्करी, ख्यालीखुशाली विचारणं किंवा शब्दांशी खेळणं असं काहीच न करता ते सरळ विषयालाच हात घालत!

औरंगजेबाच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांचा वेध घेत त्याच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेण्याचा पंतांनी प्रयत्न केला. पण तसं काही झालं नाही.

‘‘मोऱ्यांना मारले ते तुम्हीच ना?’’

‘‘ते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी करावं लागलं होतं!’’ सावधपणे पंत म्हणाले.

‘‘दिवसाढवळ्या शिवानं कल्याणमध्ये केलेल्या लूटमारीबद्दल काय म्हणणं आहे?’’ आपल्या मनात असलेला हा प्रश्न आणि संताप व्यक्त करण्यासाठी जणू काही फार दिवस औरंगजेब अधीर झाला होता असं वाटत होतं.

औरंगजेबाच्या या उद्धट बोलण्यावर न कचरता, कोणताही अपराधीपणाचा भाव चेहऱ्यावर न दाखवता पंतांनी उत्तर दिलं, ‘‘शहजादे, कल्याणची संपत्ती खरं तर आपली आहे. सल्तनतीच्या राजकर्त्यांनी त्यांचे प्रांत मुघल साम्राज्याच्या स्वाधीन केले हे खरं असलं, तरीही त्यांचा प्रतिनिधी हा सारा खजिना घेऊन पळत होता!’’

‘‘आमची काळजी वाटण्यासाठी शिवा हा आमचा प्रतिनिधी आहे का?’’

‘‘त्यांचं ते ध्येय आहे!’’ पंतांनी सांगितलं.

आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी पंत औरंगजेबाकडे रोखून बघत असतानाच अचानक त्यानं पंतांकडे बघत डोळे उघडले. त्याच्या फिक्या रंगाच्या बुबुळाकडे पाहताच पंतांच्या अंगावर भीतीनं शहारा आला! ‘‘तो अशी इच्छा बाळगून असेल तर तो आमचा शत्रू नसून आमचा होणारा नोकर आहे. म्हणून त्यानं साम्राज्याच्या प्रांतावर हल्ला करणं ही बंडाळी आहे. या राजद्रोहाला एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्युदंड!’’

जराही विचलित न होता पंतांनी उत्तर दिलं, ‘‘केलेल्या या चुकीमुळे राजांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. त्यानंतरच त्यांनी स्वत:ला साम्राज्याचा प्रतिनिधी मानून साम्राज्याच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यास सुरुवात केली आहे.’’

पंतांचा हा अजब युक्तिवाद ऐकून आश्चर्यचकित झालेला औरंगजेब त्यांच्याकडे अविश्वासानं पाहतच राहिला!

‘‘तरीसुद्धा त्यानं जे काही केलं आहे त्यासाठी तो शिक्षेला पात्रच आहे. मग तो शत्रू असू दे वा आमचा नोकर. त्यानं इस्लामी साम्राज्याच्या विरोधात तलवार उचलली होती आणि आमचा मुलुख लुटला होता. हे खरं तर अल्लाच्या विरुद्ध बंड करण्यासारखंच आहे!’’

मनावर ताबा ठेवत पंतांनी आपलेच ओठ घट्ट मिटून घेतले. अशा माणसाबरोबर चर्चा करणंच निर्थक होतं. शरीयतच्या कायद्याप्रमाणे जे जे काही शिक्षेस पात्र आहे, त्याची औरंगजेब यादी करेल!

धूळभरल्या तळावर वास्तव्य केल्यामुळं पंतांच्या घशात खवखवत होतं. त्यांनी आपला घसा खाकरतच म्हटलं, ‘‘जर शहजाद्यांनी राजांच्या ताब्यात असलेल्या गावांचा व किल्ल्यांचा ताबा अधिकृतरीत्या राजांना दिला, तर मुघल साम्राज्याच्या दक्षिणी सरहद्दीचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते त्यांच्या सामर्थ्यांनिशी करतील.’’

‘‘मुल्ला महमदकडून हिसकावून घेतलेला खजिनासुद्धा परत कराल?’’

‘‘हो, अधिकृत मान्यता मिळाल्याबरोबर लगेचच!’’ पंतांनी पटकन सांगितलं.

संतापानं औरंगजेब थरथरू लागला. समोरच्या त्या वकीलाला धरून गदागदा हलवून फटके मारून कापून काढत त्याचे तुकडे कोल्ह्य़ा-कुत्र्यांना खायला घालावेत, असं त्याला वाटू लागलं! परंतु सध्या असं काही करणं शक्य नव्हतं. त्याच्या समोरचा कामाचा प्राधान्यक्रम बदलैला होता. त्याला त्याचं सारं लष्कर एका मोठय़ा शत्रूचा समाचार घेण्यासाठी सज्ज ठेवायचं होतं.

‘‘माशाल्ला! आम्हाला त्याच्या मदतीची गरज आहे असं शिवाला का वाटतं हे सांगू शकाल का?’’ जराशा उपहासानंच औरंगजेबानं विचारलं.

‘‘आपल्याला मदत करण्यापेक्षा आपली सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे.’’

शिवाचा हा वकील हुशार बदमाश आहे. आणि जवळजवळ सर्वच मराठे ‘डोंगरी चूहे’ आहेत, असं औरंगजेबाला वाटलं. शक्यता अशी होती की, शिवाला सम्राटांच्या आजारपणाचा ‘वास’ आला असेल. त्यानं अंदाज बांधला असेल की, औरंगजेब सम्राटांच्या समाचाराला जाईल आणि मग त्याच्या अनुपस्थितीत विजापूरचं सैन्य मुघलांच्या हल्ल्यापासून निश्चिंत होऊन त्याचा समाचार घेण्यास येईल. परंतु आता त्यानं शिवाजीचं म्हणणं मान्य केल्यास सारं चित्रच पालटेल. याचा सरळ सरळ अर्थ असा होता की, त्याला शिवाची गरज असण्यापेक्षा शिवालाच त्याची जास्त गरज होती!

‘‘शिवाला आमची चाकरी करण्याची इच्छा आहे तर! त्यानं अनेक अक्षम्य गुन्हे केले आहेत, तरीसुद्धा कदाचित आम्ही त्याच्या विनंतीचा विचार करू. त्याला व त्याच्या सैन्याला काही करावयाचे असेल ते करू दे. आम्ही त्याला भविष्यात कधीतरी सरकारी पत्र पाठवू.’’ हळूहळू मणी ओढणाऱ्या औरंगजेबानं आपला स्वर मुद्दामच कोरडा ठेवला होता. पिच्छा पुरवणाऱ्या लोकांना वरवर गोंजारत संपूर्णपणे टाळणं हा औरंगजेबाचा नेहमीचा डावपेच होता.

शिवाजीच्या वकिलाचं प्रयाण झाल्यावर औरंगजेबानं आपल्या लेखनिकाला पत्राचा मसुदा सांगण्यास सुरुवात केली. हे पत्र विजापूरच्या बडी साहिबाला उद्देशून होतं..