देशाचा सांस्कृतिक आलेख
वेद, उपनिषदे, यज्ञ, प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये भगवद्गीतेने केलेला प्रयत्न, बुद्धमत आणि संबंधित तत्कालीन प्रचलित मते याविषयीची माहिती भारतवर्षांची सांस्कृतिक जडणघडण या पुस्तकात करण्यात आली आहे. वेदकाळापासून योगी श्री अरविंद यांच्यापर्यंतचा असा हा देशाचा सांस्कृतिक आलेख आहे. यात देशाची जडणघडण, राष्ट्राची व्यापक कल्पना, राष्ट्राची सांस्कृतिक घडण, देवता आणि त्यांची वैशिष्टय़े याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
भारतवर्षांची सांस्कृतिक घडण – शं. बा. मठ, अरविंद प्रकाशन, पृष्ठे – ११२, मूल्य – १४० रुपये

वास्तववादी कविता
दैनंदिन जगण्यातील वास्तवाशी कवीमनानं केलेली नोंद म्हणजे पी. विठ्ठल यांचा ‘माझ्या वर्तमानाची नोंद’ हा कवितासंग्रह. रोजच्या भिडणाऱ्या वास्तवाकडे ते कसे पाहतात, हा दृष्टिकोन त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतो. कवीच्या या अनुभवविश्वात संवादी, विसंवादी, अंतर्विरोधी संवेदना डोकावतात. जागतिकीकरणातून निर्माण होणाऱ्या जीवनशैलीतून व्यक्त झालेला हा आशय आहे.
माझ्या वर्तमानाची नोंद – पी. विठ्ठल, गोदा प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठे – १२८, मूल्य – १२० रुपये  

काव्यमय कथा
ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांच्या निवडक कथांचा संग्रह म्हणजे ‘स्वप्नभ्रांतीचा प्रदेश’. या संग्रहात यापूर्वी प्रकाशित झालेल्या जोंधळे यांच्या  ‘मूरलँड्स’, ‘निरंग जांभूळ’, ‘तळभोवरा’ या तीन कथासंग्रहांतील निवडक २६ कथांचा समावेश केला आहे. हे तीनही कथासंग्रह सध्या बाजारात उपलब्ध नसल्याने त्यातील काही कथा वाचकांना या संग्रहामधून वाचता येऊ शकतात. प्रवाही भाषा, आशयाचा नेमकेपणा आणि वाचनीयता हे या संग्रहातील कथांचे विशेष सांगता येतील.  या संग्रहाची प्रस्तावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी लिहिली आहे. या कथांमधून कथाकाव्य अनुभवयाला येते, हा कोत्तापल्ले यांचा निर्वाळा हा संग्रह वाचताना येतो, एवढे मात्र खरे.
स्वप्नभ्रांतीचा प्रदेश – महावीर जोंधळे अक्षर मानव प्रकाशन, पुणे पृष्ठे – १३०, मूल्य : १४० रुपये