डॉ. अलीम वकील यांचा ‘एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी’ हा ग्रंथ मराठी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घालणारा आहे. भारतात आठव्या शतकातील शंकराचार्याच्या प्रबोधनानंतर भक्ती-चळवळीला सुरुवात झाली. साधारणत: याच शतकात इस्लाम धर्मावर आधारित सूफींचे नवे विचार प्रकट होऊ लागले. त्यानंतर या दोन्ही चळवळींचे विशिष्ट संप्रदायात रूपांतर झाले आणि पुढे सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत समांतर रेषेत दोन्ही चळवळी विचारमंथन करू लागल्या. दोन्हींचे ईश्वरावरील आत्यंतिक प्रेम व श्रद्धा आणि ईश्वरी अवस्थेत विलीन होणे हे उद्दिष्ट होते. डॉ. अलीम यांनी या ग्रंथात उभय संप्रदायांचा उगम, विकास व संघटन यांची अतिशय व्यासंगपूर्ण व तुलनात्मक मांडणी केली आहे.
भक्ती व सूफी संप्रदायांचा तौलनिक अभ्यास असल्यामुळे डॉ. अलीम यांनी दोन्ही संप्रदायांची पूर्वपीठिका, उद्दिष्टे व त्यातील श्रेष्ठ संतांचा व सूफींच्या कार्याचा परामर्श घेतला आहे. हे दोन्ही संप्रदाय वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात अस्तित्वात आले असले तरी त्यांच्या विचारांचे आकलन सारखेच होते. फक्त त्यांचे मार्ग वेगळे होते.
डॉ. अलीम यांनी भक्ती व सूफी संप्रदायातील गूढवादी व गहन तत्त्वज्ञानाचे विश्लेषण प्रभावी शब्दात केले आहे. हिंदू संस्कृतीतील कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तीमार्ग यांचा ऊहापोह केला आहे. सातव्या आणि आठव्या शतकात बौद्ध व जैन धर्माला उतरती कळा लागली आणि हिंदू धर्मात ज्ञानमार्ग व कर्ममार्ग मुक्तीसाठी पुरेसे नसल्यामुळे त्या काळातील विचारवंतांना ही पोकळी भरून काढण्यासाठी नवी दिशा हवी होती, ती सूफी व भक्तीमार्गाच्या माध्यमातून मिळाली. खऱ्या भक्ताची व्याख्या करताना डॉ. अलीम म्हणतात, ‘भक्त भक्ती करतो याचा अर्थ आपली प्रत्येक कृती ईश्वराला अर्पण करतो.’ भक्त त्याच्यात (ईश्वरात) सामावूनही शिल्लक राहतो. ईश्वर त्याच्यावर असीम कृपा दर्शवतो. तसेच ईश्वरात किंवा ईश्वराच्या एखाद्या गुणवैशिष्टय़ामध्ये स्वत:ला विलीन करणे हे सूफी संतांच्या ईशप्रेमाचे गमक आहे.
सूफी या शब्दाचे अनेक अर्थ डॉ. अलीम यांनी दिले आहेत. महंमद पैगंबरसाहेब हे लोकरीचा जाडाभरडा अंगरखा घालत असत. त्यांच्या आधीच्या प्रेषितांनीही हीच परंपरा जोपासली होती. सफ म्हणजे लोकर. लोकरीचे अंगरखे किंवा इतर वस्त्रे वापरणारे ते सूफी अशी या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. ती इतरांच्या तुलनेत जास्त योग्य वाटते. ‘खरा सूफी उच्च कोटीचा आणि उदात्त असतो. त्याला सर्व रहस्ये उलगडलेली असतात. अनंत प्रेम व सौंदर्याच्या मार्गावरील तो प्रवासी आणि मार्गदर्शक असतो.’
डॉ. अलीम यांनी सूफी संप्रदायाचे विवेचन करताना विविध सूफी पंथ व आदर्शभूत तसेच श्रेष्ठ सूफी संतांची माहिती दिली आहे. सूफी तत्त्वज्ञान हे दिसावयास सोपे भासले तरी ते अतिशय गुंतागुंतीचे व गूढ स्वरूपाचे आहे. सूफी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी इस्लामची मूलतत्त्वे व इतिहास समजावून घेणे आवश्यक ठरते.
‘विविध सूफी संप्रदाय’ व ‘काही सूफी संत’ ही दोन प्रकरणे या पुस्तकाचा खरा गाभा आहेत. या दोन्ही प्रकरणांतून सूफी संप्रदायाचा उगम, त्याची उद्दिष्टे, संघटना व श्रेष्ठ संतांचे योगदान यांची अतिशय तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. वेगवेगळ्या सूफी संप्रदायांची व सूफी संतांच्या तात्त्विक विचारांची माहिती संकलित करून ती ग्रंथबद्ध करण्याचे काम स्पेनचे प्रकांडपंडित शेख मुहियुद्दीन इब्नुल अरबी (सन १२४१) व शेख अब्दुल करीम इब्न, इब्राहिम-ई-जिली यांनी केले आहे. सूफी संतांच्या नामावलीत संतशिरोमणी जुन्नून अल् मिसरी, बायनीद बुस्तामी, अबुसईद इब्न अबि’ल खैर, हसन मन्सूर अल् हज्जाज, इमाम गज़ाली, रूमी, उमर खय्याम, शेख सादी, हाफीज, जामी यांचा समावेश आहे. राबिया बसरी, बीबी हाफ़िजा व बीबी फातिमा खुद्रिया यांच्यासारख्या महिला सूफी संतही या काळात होऊन गेल्या.
भारतात उत्तरेत आणि दक्षिणेत अनेक सूफी संतांनी सूफी तत्त्वज्ञानाचा प्रसार केला व सर्वसाधारण लोकांशी जवळीक साधली. अली-उल् हुजवेरी, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, अमीर खुसरो हे संत उत्तर भारतातील अग्रगण्य संत होते. दक्षिण भारतात हेच कार्य बुऱ्हामुद्दीन गरीबशाह, मुन्ताजिबुद्दीन जरदरीबक्ष, जैनुद्दीन, ख्वाजा बन्दानवाज गेसूदराज, ख्वाजा अमीनुद्दीन आला इत्यादींनी केले.
हिंदुस्थानातील भक्तीमार्गाप्रमाणे ईश्वराप्रती गाढ श्रद्धा व प्रेम सूफींनीही अधोरेखित केले आहे. लौकिक जीवनाचा परित्याग करून ईश्वराशी तादात्म्य पावणे व ईश्वरी तत्त्वात विलीन होणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. सूफींच्या तत्त्वप्रणालीची दोन महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े डॉ. अलीम यांनी स्पष्ट केली आहेत. ही दोन्ही वैशिष्टय़े एका ईश्वरावर निष्ठा (तौहिद) आणि त्या अस्तित्वाची जाणीव यावर आधारित आहेत. ती म्हणजे ‘वहदतुल वजूद’ व ‘वहदतुल शुहूद’. वहदतुल वजूद म्हणजे ईश्वर एक असून त्याचे चराचर व्यापले आहे . त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक सूफीला असली पाहिजे.
हे दोन्ही सिद्धान्त इब्नुल अरबी यांनी सर्वप्रथम मांडले. ईश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी सूफी साधकाला अनेक आध्यात्मिक टप्पे (मकामात) पार पाडावे लागतात. हे टप्पे सूफी संतांच्या मते वेगळे असू शकतात. या टप्प्यांत ‘कुरआन’मधील ‘सुलूक’ (सद्वर्तन) व ‘हदीस’मधील एहसान (परोपकार) यावर भर देण्यात आला आहे. या वैशिष्टय़ांची तुलना डॉ. अलीम यांनी ‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी केली आहे.
भक्तीमार्गाप्रमाणे सूफी तरीक्यात गुरूला फार मोठे स्थान देण्यात आले आहे. सूफी तत्त्ववेत्ते बेकतशीस यांच्या मते माणसाचा जन्म दोनदा होतो- एकदा मातेकडून व दुसऱ्यांदा आपल्या गुरूकडून. अनुक्रमे पहिल्या प्रसवास ‘अंधाराचा प्रकाश’ म्हणतात, तर आध्यात्मिक गुरूचा शिष्य झाल्यावर ‘मार्गदर्शनाचा प्रकाश’ हे नाव दिले जाते. गुरू मिळाल्याशिवाय शिष्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर गुरूशिवाय माणूस पशू असतो.  भारतात ख्वाजा मईनुद्दीन चिश्ती, ख्वाजा कुतबुद्दीन बख्तियार काकी, फरीदुद्दीन गंजशकर, निजामुद्दीन अवलिया, बाबा फरीद, बुऱ्हानुद्दीन गरीबशाह, मुन्तजिबुद्दीन जरजरीबक्ष व शेख जैनुद्दीन हे सर्वश्रेष्ठ सूफी आचार्य होऊन गेले.
सूफी संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा      डॉ. अलीम यांनी आढावा घेताना त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. प्रत्येक सूफी संतांची शिकवण व परंपरा ईश्वराशी जवळीक साधण्याची असली तरी त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबलेले आहेत. राबिया बसरी या सर्वश्रेष्ठ महिला सूफी संत होत्या. ईश्वर भक्तीसंबंधातील त्यांचे विचार मनाला वेगळी प्रेरणा देणारे आहेत.
याव्यतिरिक्त डॉ. अलीम यांनी सूफी संप्रदायातील पूर्ण पुरुष, इन्सानुल कामिल, मकाम, हाल, हकीकत, तजल्ली, अवताद, कुतुब, नासूत, लाहूत, मारिफत, करामात, मौजिजा अशा व इतर सूफी संप्रदायाशी निगडित संज्ञांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर इस्लामी जगतातील व भारतातील सूफी संतांप्रमाणे हिंदू संत व त्यांच्या शिकवणुकीचा अतिशय व्यासंगपूर्ण अभ्यास केला आहे. दोन्ही पंथांतील साम्य व वेगळेपणा त्यांनी मार्मिकपणे वाचकांच्या नजरेसमोर आणला आहे.
पुस्तकातील पाचवे प्रकरण ‘भक्ती चळवळ’ हे डॉ. अलीम यांच्या अभ्यासूवृत्तीचे दर्शन घडवते. शंकराचार्य, रामानुज, मध्वाचार्य व निंबार्क यांच्याप्रमाणेच ज्ञानेश्वर, गोरखनाथ, संत कबीर, गुरुनानक, संत तुकाराम, श्री रामदास तसेच लिंगायत व नाथ संप्रदाय या व्यक्ती व पंथांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला आहे.
डॉ. अलीम यांनी जवळपास सर्व सूफी व हिंदू संतांचा उल्लेख व कार्याची माहिती दिली आहे. पण याबरोबरच त्यांनी कोकणातील दोन सूफी संतांचा नामनिर्देश केला असता तर अधिक बरे झाले असते. हे सूफी संत म्हणजे दापोली तालुक्यातील केळशीचे बाबा याकूत सर्वरी व माहीम मुंबईचे मगदूमशाह बाबा हे होत. छत्रपती शिवाजी महाराज हे संत बाबा याकूत सर्वरी यांचे मोहिमेवर जाण्यापूर्वी आशीर्वाद घेत. मगदूमशाह बाबा इस्लामी अध्यात्माचे गाढे व प्रज्ञावान अभ्यासक होते. त्यांनी अरबीमधून अनेक पुस्तके लिहिली. स्पेनचे श्रेष्ठ सूफी संत इब्नेअरबी यांच्या तत्त्वज्ञानावर ‘कशफुल जुलमात’ (अंधाराकडून प्रकाशाकडे) हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. याशिवाय ‘फिक़-ए-मगदूमी’ हा मुस्लीम धर्मशास्त्रावरील ग्रंथ ‘तर्जुमल लमआता इराकी’ (इराकींचे प्रकाशकिरण) व सूफी विचारावरील ‘इनामुल मलिकुल अल्लाम’ (ईश्वराची बहुमोल देणगी) ही त्यांची गाजलेली ग्रंथसंपदा आहे.
भक्ती आणि सूफी या दोन संप्रदायांच्या माहितीचा हा कोश आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. मराठीत सूफी अध्यात्माबद्दल त्यांनी नवे दालन उघडले आहे. मराठीत इस्लाम व इस्लामी संस्कृतीवर अतिशय थोडे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसाधारण मराठी  माणूस इस्लामविषयी माहिती व विचारमंथनापासून वंचित राहतो. ही उणीव या पुस्तकाने भरून काढली आहे. अतिशय गहन व गूढ अशा सूफी व भक्ती तत्त्वांचे सोप्या भाषेत विवेचन केले आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने समृद्ध अशी निवडक ग्रंथसूची दिली आहे. दोन्ही पंथांचे अभ्यासक व या विषयावर पूरक वाचन करणाऱ्यांना ती वरदान ठरावी. मात्र ग्रंथसूचीप्रमाणेच डॉ. अलीम यांनी पुस्तकातील पारिभाषिक अरबी व फारशी संज्ञा व त्यांचे मराठी भाषांतर यांचीही वेगळी सूची जोडली असती तर ती अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली असती.
एका पथावरील दोन पंथ : भक्ती आणि सूफी – डॉ. अलीम वकील, प्रतिमा प्रकाशन, पुणे पृष्ठे – ५४२, मूल्य – ७०० रुपये.