माणसाला आकाशातील चंद्र-ताऱ्यांचे कुतूहल फार पूर्वीपासून आहे, पण ज्या शक्तीने या विश्वाला जन्म दिला त्याचेच आपणही घटक आहोत. माणूस अशीच एक जगावेगळी निर्मिती आहे, त्यामुळे त्याला मी कोण आहे, हा प्रश्न तुलनेने थोडा उशिरा पडला असला तरी आता त्याबाबतही आपल्याला बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे. माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा परिणाम आहे.
उत्क्रांती या विषयावर मराठीत फार थोडी पुस्तके असली तरीही हा विषय आता नवीन राहिलेला नाही; पण रोजच्या संशोधनागणिक त्यात आणखी काही हरवलेले दुवे सापडत आहेत. त्यामुळे उत्क्रांतीवर जेवढी चर्चा करावी तेवढी अपुरीच राहणार आहे. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’ हे पुस्तक मानवी उत्क्रांतीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून वेध घेणारे आहे. त्यात उत्क्रांती व जनुकशास्त्र यांच्यातील अन्योन्य संबंध उलगडला आहे.  पुस्तकाच्या सुरूवातीलाच एक चित्र आहे. त्यात काही जाळी एकमेकात गुंफलेली आहेत व त्यातून एका मोठय़ा जाळ्याचा गोफ विणलेला आहे. साध्या साध्या रचनातून बनत गेलेले हे जाळे शेवटी गुंतागुंतीचे होत जाते. लेखिकेने उत्क्रांतीच्या मार्गावरील प्रत्येक थांब्यावर अतिशय सुबोध विवेचन करीत सुरूवातीला अवघडातील सोपेपणा दाखवला आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे पुस्तक विज्ञान विषयक असले तरी प्रत्येक ठिकाणी उपमांचा छान वापर केला आहे. त्यामुळे दुबरेधता कमी होते. उत्क्रांती आणि जनुकशास्त्र हे दोन्ही विषय एरवी सामान्य माणसाच्या सहज पचनी पडणारे नाहीत. किंबहुना त्याविषयी कुतूहल असले तरी त्यावर फार चर्चा होत नाही, पण त्यापासून फार काळ फटकून राहता येणार नाही. कारण केव्हा ना केव्हा जनुकसंस्कारित मोहरी, वांगे ही पिके आपल्या स्वयंपाकघरात आल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा त्यात नेमके काय विज्ञान आहे हे जाणून घेण्याशिवाय गत्यंतर नाही. मी कोण आहे ? कोठून आलो ? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाच्या अनेक शाखांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात रसायनशास्त्रात जॉन मिलर या वैज्ञानिकाने प्रीमॉर्डियल सूपची कल्पना मांडली व जीवसृष्टीच्या निर्मितीवेळी नेमकी काय रासायनिक क्रिया झाली, हे प्रयोगातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. चार्लस् डार्विनने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडून जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला. खगोलविज्ञानाने विश्वाची प्रयोगशाळेत निर्मिती करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले. जीवसृष्टीचा हा विणलेला गोफ उकलून दाखवताना ‘ल्युका’ नावाचा आदिजीव ते माणूस अशी संपूर्ण प्रक्रिया डॉ. ब्रह्मनाळकर यांनी चित्रदर्शी शैलीत उलगडली आहे. उत्क्रांती ही केवळ बाह्य़ अंगांनी झाली नाही तर या संपूर्ण क्रियेत जनुकांमध्येही बदल घडत गेले. त्यामुळे त्यांनी जनुक म्हणजे काय, पेशी म्हणजे काय, जिनोमचे पुस्तक या सर्व संकल्पना अधिक सोप्या करीत उत्क्रांती आणि जनुकशास्त्र यांची सांगड घातली आहे. जिराफाची मान उंच का असते, याचे उत्तर आज पाठय़पुस्तकात सांगितले जाते ते नाही, तर वेगळे आहे, असे त्या सांगतात. त्यावरून त्यांनी या सगळ्या विषयाची उकल जनुकशास्त्राची जोड देऊन करण्याचा प्रयत्न केला आहे, हे दिसते. उत्क्रांतीचा आढावा घेताना त्यांनी वेगवेगळ्या जीवशास्त्रीय गटातील प्राण्यांच्या ज्या खुब्या सांगितल्या आहेत व त्याची जी कारणमीमांसा केली आहे त्यामुळे निश्चितच या पुस्तकाची रंजकता वाढते. जीवसृष्टीचे रहस्य, उत्क्रांती व मानवी जग अशा तीन विभागात त्यांनी हा सगळा विषय मांडला आहे. सर्वात शेवटच्या विभागात त्यांनी उत्कांती व जनुकशास्त्र यांचे विवेचन तत्त्वज्ञानाच्या व नैतिकतेच्या अंगाने केले आहे. सुप्रजनन या संकल्पनेचा गैरअर्थ काढून वर्णवाद, वर्चस्ववाद जोपासण्याचे प्रयत्न झाले, विज्ञानाचा तो गैरवापर होता, असे विवेचन त्या करतात. पण तो अतिरेकी विचार बाजूला ठेवून निरोगी संततीसाठी जनुकशास्त्रातील ज्ञानाचा वापर करण्यात गैर काही नाही, ही दुसरी बाजूही त्यांनी मांडली आहे. जर एखादी व्यक्ती जनुकीय दोषांमुळे असाध्य रोग घेऊन जन्माला येणार असेल तर माहीत असूनही आपण त्याला जन्म देणे हे अयोग्य आहे. आता इंग्लंडमध्ये मनोवांच्छित संतती तंत्रास मान्यता देणारा कायदा होणार आहे. प्रत्येक गोष्टीत जनुकांना दोष देऊन भागत नाही हे लेखिकेने मांडलेले मत शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिद्ध झालेले आहे. जर आपण चांगले पोषक अन्न सेवन केले व आपल्या आजूबाजूची परिस्थितीही आनंददायक असेल तर जनुकातही अनुकूल बदल होतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एपिजेनेटिक्स ही शाखा दोन जुळ्यांमध्ये असलेल्या फरकाचे जे विश्लेषण करते ते यावरच आधारित आहे. आजूबाजूच्या पर्यावरणाचा जनुकांवर बरं-वाईट परिणाम होत असतो, त्यातून या जुळ्यांमध्ये पुढे फरक दिसू लागतो. एकूणच हे पुस्तक आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे नेते; पण तरीही तोपर्यंत या अवघडातील सौंदर्य आपल्याला पुरेसे जाणवल्याशिवाय राहत नाही. पेशाने बालरोगतज्ज्ञ असल्याने डॉ. ब्रह्मनाळकर यांनी  बारीक सारीक तपशील समजून घेऊन मांडला आहे. त्यामुळे एक अगम्य वाटणारे अविश्वसनीय विश्व आपल्या कवेत आल्याचा अनुभव वाचकाला येतो.
‘गोफ जन्मांतरीचे’- डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर, राजहंस प्रकाशन, पृष्ठे- ३२२, मूल्य- ३०० रु.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…