News Flash

रसग्रहण : संवेदनशील अभिनेत्याचं वेधक चरित्र

आपल्याकडे अभिनेता (वा अभिनेत्री) केवळ त्या सर्वनामाने ओळखला जात नाही. एक तर तो 'नायक' असतो किंवा मग नुसता अभिनेता वगैरे. छाकडं रूप, उत्तम देहयष्टी आणि

| October 14, 2012 08:20 am

आपल्याकडे अभिनेता (वा अभिनेत्री) केवळ त्या सर्वनामाने ओळखला जात नाही. एक तर तो ‘नायक’ असतो किंवा मग नुसता अभिनेता वगैरे. छाकडं रूप, उत्तम देहयष्टी आणि हिरोगिरीला साजेशी कामं पार पाडण्याची क्षमता असलेल्याला साहजिकच नायकाचा दर्जा मिळतो. या सर्व पात्रता नसलेल्यास नायकेतर कामं मिळतात आणि यथावकाश त्याच्यावर ‘चरित्र अभिनेता’ हा शिक्का बसतो. चित्रपट क्षेत्रातले पुरस्कार देतानादेखील ही वर्गवारी व्यवस्थित पाळली जाते.
भारतीय चित्रपटाचं रंगरूप गेल्या काही वर्षांत नखशिखांत बदललं असलं तरी अभिनेत्याला मोजण्याची परिभाषा मात्र अजूनही तीच आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणूनच नसिरुद्दीन शाह, परेश रावळ यांची अभिनयाची यत्ता कितीही श्रेष्ठ असली तरी त्यांना एका विशिष्ट श्रेणीत ढकललं जातं. असो..
नसीर, परेश यांच्या बरोबरीनं नाव घ्यावं असा आणखी एक जबर ताकदीचा अभिनेता म्हणजे ओम पुरी. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत ओम पुरीनं केलेल्या कामगिरीला ‘उत्तुंग’ म्हणावं की नाही, यावर वाद होऊ शकेल. कदाचित हिंदी चित्रपटापुरती त्याची कारकीर्द विचारात घेणाऱ्यांना तो तितका महान वगैरे वाटणार नाही. पण विदेशातले नावाजलेले चित्रपट आणि हिंदी नाटय़सृष्टी यांच्याशी परिचित असणाऱ्यांनी ओम पुरीचं श्रेष्ठत्व केव्हाच मान्य केलं असणार! तर ओमला पूर्णत: जाणून घेणाऱ्यांसाठी पर्वणी ठरावं असं त्याचं चरित्र मराठीत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. ‘अनलाइकली हिरो : ओम पुरी’ हे इंग्रजी पुस्तक ओमची पत्रकार पत्नी नंदिता सी. पुरी यांनी तीनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं. त्याचा मराठी अनुवाद अभिजित पेंढारकर यांनी केला असून तो वाचनीय ठरला आहे.
एखाद्या सेलेब्रिटी कलाकाराचं चरित्र खुद्द त्याच्या पत्नीनं लिहिल्यानंतर ते भाबडं ठरण्याचा धोका अधिक असतो. पण नंदिता पुरी या अनुभवी पत्रकार असल्यामुळे त्यांनी आपल्या मनस्वी, हळव्या, काहीशा स्वैर अशा या पतीचं चरित्र साकारताना बराच अभ्यास केल्याचं जाणवतं. त्यामुळेच चरित्रनायक हा आपला नवरा असला तरी त्याचं खरंखुरं व्यक्तिमत्व सोलीव रूपात जगापुढे यावं, याकरिता लेखिकेनं घेतलेली मेहनतही जाणवते. (मूळ इंग्रजी ग्रंथाच्या प्रकाशनाआधी चरित्रनायकाच्या लैंगिक संबंधांविषयीच्या मजकुरालाच नको तेवढी प्रसिद्धी दिली गेल्याचं आता आठवतं. अर्थात, इंग्रजी प्रकाशनविश्वाला साजेसंच ते होतं.)
ओम पुरीची सर्वात जुनी ओळख बहुतेकांना आहे ती म्हणजे ‘आक्रोश’मधला मुका, दलित लहान्या भिकू आणि ‘अर्धसत्य’मधला इन्स्पेक्टर प्रदीप वेलणकर. गोविंद निहलानींच्या या दोन चित्रपटांनी ओमला उदंड प्रसिद्धी मिळाली हे नाकारता येत नाही. पण अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द त्याही आधी सुरू झाली होती.
पूर्वीच्या पंजाबात आणि सध्या हरयाणात असलेल्या अंबाला इथं ओमप्रकाश पुरीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. मायाळू स्वभावाची तारादेवी आणि तापट वृत्तीचे टेकचंद पुरी या जोडप्याच्या नऊ अपत्यांपैकी केवळ दोन जगली. त्यातलाच एक ओमप्रकाश अर्थात ओम. प्रस्तावनावजा लेखात नसिरुद्दीननं म्हटल्याप्रमाणे ‘ओम तोंडात चांदीचा नव्हे, लाकडाचा चमचा घेऊन जन्माला आला’, ते खरंच. वडिलांच्या तापट स्वभावामुळे वारंवार बदलणाऱ्या नोकऱ्या, ओढग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून ओमनं वयाच्या सातव्या वर्षी हॉटेलात कपबशा विसळून लावलेला हातभार, घराशेजारच्या रेल्वेरुळावर पडलेले कोळसे इंधनासाठी आणण्याकरिता करावी लागलेली यातायात हा सारा तपशील ओमच्या करपलेल्या बालपणावर प्रकाश टाकून जातो.
पतियाळातील महाविद्यालयीन जीवनात पंजाबी रंगभूमीवर केलेला अभिनय, पुढे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत मिळालेला प्रवेश, तेथील शिक्षणानंतर पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये घेतलेलं शिक्षण आणि मग चित्रपटांमध्ये झालेला प्रवेश हा ओमचा प्रवास मुळातच वाचण्याजोगा आहे.
अ‍ॅटेनबरोच्या ‘गांधी’मध्ये ओमची भूमिका असली तरी त्याला विदेशी चित्रपटाची दारं खऱ्या अर्थानं खुली झाली ती नव्वदच्या दशकात ‘सिटी ऑफ जॉय’च्या निमित्तानं. पुढल्या पंधरा वर्षांत किमान पंधरा विदेशी चित्रपटांमध्ये लक्षणीय अभिनय करून ओमनं विविध प्रकारचे मानसन्मान प्राप्त केले. दरम्यान, छोटय़ा पडद्यावरील कक्काजी कहिन, यात्रा, भारत एक खोज, किरदार इत्यादी मालिकांतील त्याचा सहभागही लक्षवेधी ठरला. (विदेशातल्या पाच मालिकांमध्येही तो चमकला.) दोन हजार सालानंतर ओमनं पुन्हा एकदा बॉलीवुडमध्ये गांभीर्यानं काम स्वीकारायला सुरुवात केली. त्याआधीचा ओमचा बॉलीवूड प्रवासही लक्षणीय होताच. काही समकालीन अभिनेत्यांप्रमाणे खलनायकी भूमिकांमध्ये न अडकता (अपवाद एन. चंद्राचा ‘नरसिंहा’) ओमनं आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य राखलं. राजकुमार संतोषीच्या ‘चायना गेट’मध्ये त्याला नायकसदृश्य प्रमुख भूमिका मिळाली तरी हा चित्रपट चालला नाही.
चरित्रनायकाचा कलात्मक प्रवास चितारत असताना त्याच्या खासगी आयुष्यातील प्रेमप्रकरणे, पौगंडावस्थेपासून लेखिकेशी झालेल्या दुसऱ्या लग्नापर्यंतच्या कालखंडात विविध स्त्रियांशी (किमान सहा ते सात) आलेल्या शारीरिक संबंधांचा तपशीलही या पुस्तकात वाचायला मिळतो. अर्थात, काही चमचमीत वाचायला देण्यापेक्षा त्या व्यक्तीचं सत्य रूप लोकांसमोर आणणं हा लेखिकेचा हेतू असावा, हे जाणवतं.
लेखिकेशी झालेलं लग्न, एकुलत्या एका मुलाचं दोघांनी केलेलं संगोपन, ओमला असलेला खाण्याखिलवण्याचा शौक इत्यादी तपशीलांमधूनही या कलाकारातला माणूस समोर येतो. स्वत: ओमनं भारतीय चित्रपटांवर एक छोटंसं टिपण लिहिलं असून नवोदित कलावंतांना मार्गदर्शनपर चार गोष्टीही सांगितल्या आहेत.
मात्र, लेखिकेनं एक माणूस आणि पती म्हणून ओमला ठाशीवपणे शब्दबद्ध केलं असलं तरी कलावंत या नात्यानं त्याचं पुरेपूर दर्शन घडवण्यात ती कमी पडल्याचं इथं जाणवतं. ओमच्या विविध चित्रपटांतल्या भूमिकांची धावती ओळख करून दिली असली, तरी त्याच्या एखाद्या भूमिकेचा सखोल चिंतनात्मक वेध घेतल्याचं जाणवत नाही. ओमच्या किमान पाच भूमिकांवर या पद्धतीनं लिहिता आलं असतं. लेखिका एक पत्रकार असल्यानं तर ही उणीव अधिक खटकते. अनुवादकानं हे चरित्र मराठीत आणताना ते ओघवत्या भाषेत मांडलंय, हे नमूद करायला हवं. परंतु मूळ लेखिका अमराठी असल्यानं मुंबईच्या गावदेवी परिसराचा उल्लेख ‘गामदेवी’, ‘अर्धसत्य’चे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांचा उल्लेख ‘श्री. डी. ए. पानवलकर’ या गफलती अनुवादातही तशाच उतरल्या आहेत. राजकुमार संतोषीच्या ‘घायल’ या चित्रपटाच्या जागी ‘घातक’ हा उल्लेख चित्रपटांच्या जाणकारांना खटकू शकेल. एका ठिकाणी अल्पसंतुष्ट वृत्तीच्या माणसाचा उल्लेख ‘विजिगिषु’ असाही चुकीचा झाला आहे. अर्थात, या त्रुटी असूनही हे चरित्र वाचनीय झालं आहे. एका संवेदनशील कलावंताला जवळून न्याहाळण्याची संधी हे पुस्तक देतं.
अनलाइकली हिरो : ओम पुरी,
मूळ लेखिका : नंदिता सी. पुरी, अनुवाद : अभिजित पेंढारकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे : १८४, मूल्य २२० रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 8:20 am

Web Title: rasgrahan sunil deshpande actor om puri unlikely hero
Next Stories
1 स्त्री : जगण्याचा पसारा!
2 रसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन
Just Now!
X