06 August 2020

News Flash

मतकरी विद्यापीठ

मतकरींनी मला फार काही न विचारता सरळ तालमीलाच उभं केलं.

आज मागे वळून पाहताना मला मतकरींकडे माझं जाणं हा माझ्या आयुष्यातला एक मोठा भाग्ययोग होता असंच वाटतं.

दिलीप प्रभावळकर – dilip.prab@gmail.com

नाटक, साहित्य, स्तंभलेखन, चित्रकला, चित्रपट, मालिका, वक्तृत्व, सामाजिक कार्य अशा चौफेर क्षेत्रांमध्ये आयुष्यभर मनमुक्त मुशाफिरी करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे रत्नाकर मतकरी नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारे मान्यवरांचे खास लेख..

त्यावेळी मी खूप दबदबा असलेल्या ‘रंगायन’ या संस्थेच्या नाटकात काम करत होतो. विजय तेंडुलकरांच्या ‘लोभ नसावा, ही विनंती’मध्ये. स्पर्धेसाठीचं ते नाटक होतं. कॉलेज आणि कॉलनीबाहेरचं माझं हे पहिलंच नाटक. अरविंद देशपांडे नाटकाचं डायरेक्शन करत होते. ‘रंगायन’च्या सूत्रधार विजयाबाई.. विजया मेहता.. त्यावेळी लंडनला गेल्या होत्या. त्या नाटकात मी दोस्तराष्ट्रांच्या हॉस्पिटलमधील छावणीतील सैनिकांपैकी एक होतो. न्यूझीलंडच्या किवीचं काम मी करत असे. मधुकर नाईक हे नट आमच्या या नाटकात आर्मी ऑफिसरची भूमिका करीत होते. चित्रा पालेकर नायिका होती. एकदा नाटक संपल्यावर मधुकर नाईक मला म्हणाले, ‘तुला रत्नाकर मतकरींच्या बालनाटय़ात काम करायला आवडेल का?’  त्यावेळी मिळेल ते नवं काम करण्यासाठी मी उत्सुकच होतो. मी लगेचच ‘हो’ म्हटलं. त्यानंतर एके दिवशी शाळेच्या युनिफॉर्ममधला अजय वढावकर मतकरींचा निरोप घेऊन माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ‘तुला मतकरींनी बोलवलंय.’ तो मला हिंदू कॉलनीतील नप्पू रोडवरच्या शिशुविहारात.. जिथे मतकरींच्या नव्या बालनाटय़ाच्या तालमी सुरू होणार होत्या.. तिथे घेऊन गेला. मतकरींनी मला फार काही न विचारता सरळ तालमीलाच उभं केलं. आज मागे वळून पाहताना मला मतकरींकडे माझं जाणं हा माझ्या आयुष्यातला एक मोठा भाग्ययोग होता असंच वाटतं. त्यांनी मला आपल्या संस्थेत दाखल करून घेतलं. माझं स्वागत केलं. रत्नाकर आणि प्रतिभा (मतकरी) यांचं हे अनौपचारिक स्वागत करणं, तसंच त्यांचं अगत्य व प्रेम पुढली पन्नास र्वष मला अखंड मिळत राहिलं. मी त्यांच्याशी कायम जोडलेला राहिलो.. मग मी त्यांच्या नाटकात वा संस्थेत काम करत असो वा नसो.. त्यांचं हे अनौपचारिक प्रेम मला कायम मिळत राहिलं.

त्यावेळी मतकरींनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याने माझाही आत्मविश्वास वाढत गेला. मी त्यांच्या संस्थेत बरीच नाटकं केली. सहा बालनाटय़ं आणि सहा मोठय़ांची नाटकं, चार-पाच एकांकिका.. त्यात ‘पोर्ट्रेट’ ही खूप गाजलेली एकांकिका होती.. शिवाय व्यावसायिक रंगभूमीवरही मी त्यांची तीन नाटकं केली. ‘वटवट सावित्री’, ‘घर तिघांचं हवं’ आणि ‘जावई माझा भला’! त्यातलंही एक  मतकरींनीच बसवलेलं होतं.

एवढी वैविध्यपूर्ण नाटकं मला ‘रंगायन’मध्ये करायला मिळाली असती की नाही, याबद्दल मला शंका आहे. मतकरी संस्थेतल्या प्रत्येकाला संधी देत. त्यांच्यावर विश्वास टाकत. पुढे मिळालेल्या त्या संधीचं सोनं करणं हे त्या नटावर अवलंबून असे. ते प्रत्येकालाच मोकळेपणानंच वागवत. संधी देत. मतकरींकडे मला अत्यंत वेगवेगळी आणि वैचित्र्यपूर्ण नाटकं करता आली. त्यातून मला स्वत:चा एक नट म्हणून तर शोध घेता आलाच; शिवाय रंगभूमीवरील अनेक नव्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.. सापडल्या. मुख्य म्हणजे एक नट म्हणून आव्हानात्मक भूमिकांतून स्वत:ला तपासायची, जोखायची, कसाला लावण्याची संधी मला मिळाली. एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते वा संस्थाचालक म्हणून मतकरी आणि माझं छान टय़ुनिंग जमलं. आजपर्यंत त्यांच्या नाटकांएवढी नाटकं इतर कुणाही नाटककाराची मी केलेली नाहीत. त्यांच्या नाटकांतून मी कळत-नकळत घडत गेलो.. एक नट म्हणून आणि काही अंशी व्यक्ती म्हणूनही. मतकरींच्या नाटकांतून मला रंगमंचावरील वावर, आवाजाचा वापर, अभिनयशैली, भूमिकेचा आलेख आणि एकूणच तिचं नाटकातलं स्थान इत्यादी गोष्टी कशा तऱ्हेनं समजून घ्यायच्या, अभिनयातून त्या कशा प्रकारे पोचवायच्या हे सारं हळूहळू कळत गेलं.

मतकरींची बालनाटय़ं ही एका अर्थानं अभिनयाची प्रयोगशाळाच होती. प्रेक्षकांशी कसा संवाद साधायचा हे त्यांतून कळत गेलं. पुढे मी अनेक नाटकं केली, त्यांची बीजं मला वाटतं मतकरींकडे केलेल्या नाटकांतूनच मला सापडत गेली. त्यांनी मला दिलेल्या भिन्न भिन्न भूमिका हे माझ्यासाठी प्रत्येक वेळी एक सरप्राइझच असे. ते त्यातून नकळत मला घडवत होते असं आज मागे वळून पाहताना वाटतं. संस्थेतले आम्ही सारे नेहमीच आता आपल्याला मतकरींच्या नव्या नाटकात कोणती आव्हानात्मक भूमिका करायला मिळणार याबद्दल कायम उत्सुक असू. त्याकरता करावे लागणारे निरनिराळे ‘प्रयोग’.. आवाजाचे, अभिनयाचे, शैलीचे.. त्याचंही एक कुतूहल असे.

‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकिणीच्या भूमिकेसाठी माझी झालेली निवड काय, किंवा ‘पोर्ट्रेट’ एकांकिकेतील आर्मी ऑफिसरची भूमिका मला करायला लावणं काय.. हे माझी उपजत अंगकाठी वा माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या विपरीत होतं.. न शोभणारंच होतं. परंतु मतकरींनी हे असले धाडसी ‘प्रयोग’ हट्टानं केले आणि ते यशस्वीही करून दाखवले. माझ्या चेटकिणीचा त्याकाळी खूपच गवगवा झाला होता. समीक्षकांनीही तिची भरभरून वाहवा केली होती. चेटकिणीच्या कपट-कारस्थानांचा बालप्रेक्षकांना प्रचंड राग येई आणि तिची फटफजिती झाली की ते जोरजोरात टाळ्या पिटत. प्रचंड हशा-टाळ्यांनी गोंधळ घालत. त्यांचा तो कानठळ्या बसवणारा आरडाओरडा करत डोक्यावर घेतलेलं नाटय़गृह.. तो आवाज आजही माझ्या कानांत घुमतो.

मतकरींच्या बहुतेक सगळ्या बालनाटय़ांमध्ये आवाजाचं प्रोजेक्शन, वेगवेगळे एक्सपरिमेंट्स करायला ते आम्हाला वाव देत. त्यासाठी प्रोत्साहित करीत. म्हणूनचे नवनवे प्रयोग करायचं धाडस आम्ही बिनधास्त करत असू. नाटकात त्यांनी मुद्दाम मोकळ्या जागा ठेवलेल्या असत. तालमींत दिग्दर्शनातून ते त्या मग भरत जात. नटांनाही त्यात आपलं योगदान देण्यासाठी वाव असे. त्यांनाही प्रयोग करून बघायची ते संधी देत. ते चित्रकारही असल्यानं संपूर्ण नाटक त्यांनी व्हिज्युअलाइज केलेलं असे आणि दिग्दर्शक या नात्यानं मग ते तालमींत त्यात हळूहळू रंग भरत जात. या सगळ्यातून प्रयोग साकारत असे.

त्यांच्याकडे काम करताना मला रंगमंचाची एक समज येत गेली. त्यांच्या नाटकांचं प्रेझेन्टेशन जरी साध्या पद्धतीचं असलं तरी त्यात कल्पकता असे. आज आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य केल्या जातात, तसं त्याकाळी नव्हतं. नेपथ्य, प्रकाशयोजनेत ते जाणीवपूर्वक वेगवेगळे प्रयोग करीत. रंजनाबरोबरच मुलांवर संस्कार करण्याचं, त्यांच्या कल्पकतेला चालना देण्याचं काम ते बालनाटय़ांतून करीत. उद्याचा अभिरुचीसंपन्न प्रेक्षक आणि नट घडविण्याची प्रक्रिया त्यांनी त्यांच्या नाटकांतून राबवल्याचं आज ध्यानी येतं.

आणखी एक.. ते संस्थेचे सूत्रधार व निर्मातेही असल्यानं सगळ्या गोष्टींचं नियोजन, त्याचबरोबर संस्थेतली मुलं व नटांना समजून घेत, त्यांच्याकडून आपल्याला हवं तसं काम करवून घेण्याचं कौशल्य मतकरींकडे होतं. माणसं जोडण्याचं, त्यांना सांभाळण्याचं व्यवस्थापन कौशल्य त्यांच्यापाशी होतं. ते एखाद् दुसऱ्या नटावरच कधी अवलंबून राहिले नाहीत. प्रत्येकाला ते स्कोप देत. त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो ही भावना कुणाच्या मनात येत नसे. म्हणूनच ‘बालनाटय़’ संस्था इतकी र्वष टिकू शकली. काळानुरूप नवी मुलं, माणसं त्यात जोडली गेली. त्यांच्या संस्थेत काम करून पुढे वेगळ्या क्षेत्रांत गेलेलेही त्यांच्याशी पुढेही जोडलेले राहिले, याचं कारण मतकरी पती-पत्नीचा त्यांच्याशी असलेला आपुलकीचा आणि मनमोकळा व्यवहार! लेखक व दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर संस्थेचे सूत्रधार म्हणूनही मतकरी मला भावतात, ते यासाठी!

एक गंमत सांगतो.. खरं तर चेटकिणीची भूमिका करायला तेव्हा संस्थेत अनेक अभिनेत्री इच्छुक होत्या. परंतु मतकरींनी का कुणास ठाऊक, ही भूमिका पुरुष असूनही मला करायला लावली. आणि त्यांचं गणित यशस्वी ठरलं.

मतकरींनी स्वत: नाटकाचा अनुभव घेत असतानाच त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांनाही रंगभूमीवरील नानाविध ‘प्रयोगां’चा अनुभव दिला. त्याचवेळी त्यांचं अन्य लेखनही सुरू असे.. म्हणजे गूढकथा, ललितलेखन वगैरे. परंतु या लेखनाची त्यांनी कधी गल्लत केली नाही. त्या- त्या लेखनाचे वेगळे, स्वतंत्र कप्पे करण्याची कला त्यांना साध्य होती. म्हणूनच ते इतकं विपुल लिहू शकले.

मी त्यांच्याकडे केलेल्या ‘पोर्ट्रेट’ एकांकिकेचा एक वेगळाच किस्सा आहे.. छबिलदास चळवळ तेव्हा ऐन भरात होती. तिथे बादल सरकार, अमोल पालेकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या अनेक दिग्गजांची नाटकं मी पाहिल्याचं आठवतंय. आमच्या संस्थेच्या चार एकांकिका आम्ही तिथं केल्याचं स्मरतंय. तर.. ‘पोट्र्रेट’ एकांकिकेत मी आणि रवी पटवर्धन असे आम्ही दोघं काम करत होतो. ही एक अगदी वेगळ्याच धाटणीची आणि आव्हानात्मक एकांकिका होती.  दोनच पात्रं. एक चित्रकार आणि दुसरा आर्मी ऑफिसर. त्यातल्या हुशार, इंटेलिजन्ट, समोरच्या व्यक्तीच्या अंतरंगाचा ठाव घेत त्यातून आपल्याला जाणवलेलं त्याचं व्यक्तिमत्त्व चितारणाऱ्या चित्रकाराचं काम मी करत होतो. तो मितभाषी होता. चित्रांतूनच तो व्यक्त होत असे. तर रवी आर्मी ऑफिसरचं काम करत असे. माझ्या वाटय़ाला अगदी जुजबीच वाक्यं होती. त्या चित्रकाराच्या सर्जनशीलतेवर या आर्मी ऑफिसरच्या बायकोला ‘क्रश’ होता. तर.. हा डिफेटेड, परंतु बडेजावखोर असा आर्मी ऑफिसर! त्याचं चित्र रेखाटलं जात असताना तो स्वत:बद्दल बऱ्याच फुशारक्या मारत होता. त्यातला फोलपणा चित्रकाराला अर्थातच कळत होता. चित्रातून त्याने तो व्यक्त केला होता. मात्र, पूर्ण झालेलं आपलं ते व्यक्तिचित्र पाहून तो आर्मी ऑफिसर संतापतो आणि चित्रावर गोळ्या झाडतो. आपलं डिफिटेड रूप त्याला सहन होत नाही.. असं ‘पोट्र्रेट’चं कथानक होतं.

एकांकिकेच्या प्रयोगाच्या चार दिवस आधी अचानक रवी पटवर्धनला काही मेजर प्रॉब्लेममुळे काम करणं शक्य होणार नसल्याचं त्यानं सांगितलं. आता काय करायचं? पण हार मानतील तर ते मतकरी कसले! त्यांनी मला सांगितलं, तू आर्मी ऑफिसरची भूमिका कर. मला तो धक्काच होता. कुठल्याही अंगानं मी आर्मी ऑफिसर वाटणं शक्यच नव्हतं. आणि हे काय सांगताहेत? पण त्यांनी मला मोठय़ा कन्व्हिन्स केलं. अखेर ती भूमिका करायला मी राजी झालो. पण पॅडिंगबिडिंग न करताच मी ही आर्मी ऑफिसरची भूमिका केली. आवाजाचा वापर आणि अभिनयशैली यावर मी त्यात भर दिला. आणि आश्चर्य म्हणजे प्रेक्षकांनी मला त्या भूमिकेत स्वीकारलंही.

गंमत म्हणजे त्यावेळी माझी ‘चिमणराव’ ही मालिका खूप पॉप्युलर झाली होती. त्यामुळे मला यातल्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत प्रेक्षक कसं काय स्वीकारतील असं मला वाटत होतं. परंतु मतकरी ते काही मानायला तयार नव्हते. त्यांनी मला वकिली बाण्याने पटवून या भूमिकेसाठी अखेर राजी केलंच. ‘उदय कला केंद्रा’च्या स्पर्धेत या भूमिकेसाठी मला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. त्या स्पर्धेचे परीक्षक असलेल्या माधव वाटवे यांनी मला रंगपटात येऊन ‘मी तुला ओळखलंच नाही,’ असं म्हटलं होतं. माझ्यातल्या नटाकरता ही मोठीच दाद होती. माझ्या आवडत्या भूमिकांपैकी ‘पोट्र्रेट’मधली ही एक महत्त्वाची भूमिका. पण सांगायचा मुद्दा हा, की असली धाडसं मतकरी बिनदिक्कतपणे करीत आणि ती यशस्वीही करून दाखवीत.

मतकरींनी मला ‘प्रेमकहाणी’मधला शरद गोडबोले ते ‘अलबत्या’मधली चेटकीण आणि ‘आरण्यक’मधल्या विदुरापासून ते ‘पोट्र्रेट’मधील आर्मी ऑफिसपर्यंत.. इतक्या बहुविध रेंजच्या वेगवेगळ्या भूमिका आवर्जून दिल्या. त्या माझ्याकडून उत्तमरीत्या करवूनही घेतल्या. त्यांच्यात माणसं, टॅलेन्ट आणि नटाला जोखण्याचं जबरदस्त कौशल्य होतं यात काहीच वाद नाही.

‘आरण्यक’सारखं महाभारताच्या उत्तरकालावरचं अभ्यासपूर्ण फिलॉसॉफिकल नाटक त्यांनी वयाच्या ऐन पस्तिशीत लिहिलं. त्यासाठी त्याआधीची बरीच र्वष त्यांचा महाभारताचा सखोल अभ्यास आणि त्यावरचं चिंतन, मनन सुरू होतं. पुन्हा हे पद्यमय शैलीतलं नाटक. या शैलीचा म्हणून एक वेगळाच ताण आणि वजनही! नाटक लिहून झाल्यावर त्यांनी धों. वि. देशपांडे, दुर्गा भागवत अशा त्यावेळच्या विद्वज्जनांना त्यात काही चुका वा दोष राहू नयेत म्हणून वाचायला दिलं होतं. काही अंशी त्यांनी या नाटकात लिबर्टी घेतलीय; परंतु अर्थाचा अनर्थ होणार नाही, ही दक्षता घेऊनच. अशा नाटकात मला विदुराची भूमिका करायला मिळाली. या भूमिकेसाठीचा अभ्यास, आकलन वगैरे गोष्टी मी त्यावेळीही केल्याच; परंतु अलीकडे पुन्हा मतकरींनी ‘आरण्यक’ बसवलं तेव्हा आम्ही.. म्हणजे मूळ संचातले मी, रवी पटवर्धन आणि प्रतिभा मतकरी यांनी.. अधिक समजेनं, अधिक परिपक्व अनुभवांनिशी आपापल्या भूमिका साकारल्या असं आम्हाला जाणवलं. इतर नव्या कलाकारांकडूनही मतकरींनी तितक्याच इन्टेसिटीनं, सिन्सिअ‍ॅरिटीनं त्यांच्या भूमिका बसवून घेतल्या होत्या, हे आवर्जून सांगायला हवं. चाळीसेक वर्षांपूर्वीचा मतकरींचा तोच उत्साह, जोश आणि समर्पितता मला यावेळीही पाहायला मिळाली.

ते नेहमी सांगत, की मी स्वत:साठी, प्रेक्षकांसाठी आणि त्या- त्या विशिष्ट नाटय़प्रकारासाठी म्हणून निरनिराळी नाटकं लिहीत आलो आहे. प्रत्येक वेळी नवं काही लिहायचं आणि ते प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठी जीवतोड कष्ट करून कृतीतही आणायचं, स्वत: तर तो अनुभव घ्यायचाच, आणि इतरांनाही द्यायचा.. असे मतकरी मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. त्यांना कधी स्वस्थ बसलेलं मी बघितलेलं नाही. रोज नवनवे प्लान्स.. लिखाणाचे वा अन्य कसले.. अनेकविध अ‍ॅक्टिव्हिटिज् यांत ते सतत मग्न असत. त्यांचं ‘राधा निवास’ हे घर म्हणजे आमचा अड्डाच होता. कधीही वेळी-अवेळी जा, घरभर मुक्त संचारा.. गप्पा, वाचन, तालमी, चर्चा, वादविवाद असं काही ना काही सतत तिथं सुरूच असे. मी त्यांच्या संस्थेबाहेर नाटकं करू लागलो तरी नेहमी त्यांच्या संपर्कात असे. कधी फोनवरून. कधी प्रत्यक्ष भेटीगाठी. ते जाण्याआधी आठवडाभर माझं त्यांचं बोलणं झालं होतं. नव्या नाटकाबद्दल आणि इतरही प्लान्सबद्दल ते तेव्हा भरभरून माझ्याशी बोलत होते. नवं नाटक, फिल्म, वाचन वगैरे.. आपण एक नवं नाटक करू या म्हणत होते. मी त्यांना म्हटलं, ‘आत्ता? या अशा परिस्थितीत?’ तेव्हा ते म्हणाले, ‘आत्ता नाही रे. तीन-चार महिन्यांनी.’ या अशा करोनाग्रस्त परिस्थितीतही त्यांचे नवे नवे संकल्प सुरूच होते. त्याबद्दल उत्साहानं ते सर्वाना सांगत होते. त्यांच्या सळसळत्या उत्साहाचा ‘संसर्ग’ त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नसे. असे मतकरी आज हयात नाहीत असं कसं म्हणायचं?

हळवे वडील!

‘ जावई माझा भला’ नाटकात मी लग्न झालेल्या मुलीच्या बापाची भूमिका केली खरी; परंतु मला स्वत:ला मुलगी नसल्यानं मुलीच्या बापाचं हळवेपण नेमकं काय असतं याचा मला प्रत्यक्षातला अनुभव मात्र नाही. परंतु मतकरींच्या मुलीच्या- सुप्रियाच्या लग्नात मी तो घेतला. मंगलाष्टकाच्या वेळी मी मतकरींच्या शेजारीच उभा होतो. कसा कुणास ठाऊक, मी मतकरींकडेच मुद्दाम निरखून पाहत होतो. मला त्यांच्यातले हळवे, मुलीच्या विरहामुळे कष्टी झालेले वडील त्यांच्या डोळ्यांत उत्कटतेनं जाणवले. त्यांच्यातला लेखक आणि आणखीही बरंच काही असलेला मोठा माणूस त्यांच्यातून गायब झाला होता. होता तो फक्त मुलीच्या विरहानं व्यथित झालेला बाप. ‘जावई माझा भला’ करताना मला मतकरींचं हे रूप आठवे. मला ती भूमिका करताना. नव्हे, जगताना  त्यांचं पाहिलेलं ते रूपच साहाय्यभूत ठरलं असावं असं मला नंतर वाटत राहिलं. म्हणूनच बहुधा ती भूमिका इतकी प्रभावी झाली असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 1:20 am

Web Title: ratnakar matkari article by dilip prabhavalkar dd70
Next Stories
1 नाटक जगलेला माणूस
2 हास्य आणि भाष्य : उद्योगपती व्यंगचित्रकार आणि नर्स
3 विश्वाचे अंगण : मधुघटचि रिकामे पृथ्वीवरी..?
Just Now!
X