संडास संस्कृती या लेखातून अतुल पेठे यांनी सर्व नाटय़रसिकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आणि एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, मूलभूत सोयी नसल्यामुळे नाटकाला जाऊ नये असे वाटते. तिकिटाचे दर एवढे वाढवूनही या मूलभूत सोयी नाटय़गृह व्यवस्थापन करणारे देऊ शकत नाहीत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. संडासातील अस्वच्छता, पाण्याचा अभाव, बंद न होणारे दरवाजे, अंधार, या समस्या. नाटय़गृह बांधताना संडास किती आणि कुठे बांधावेत याचं नियोजन केलं जात नाही, हे विशेष खेदाची बाब आहे. काही ठिकाणी संडास इतके लांब असतात की, मध्यंतरात त्यांच्यापर्यंत जाऊन येणंही शक्य होत नाही. मुंबईतल्या रवींद्र नाटय़मंदिर या महानगरपालिकेच्या मालकीच्या संडासची अवस्थाही अशीच आहे, शिवाय पार्किंगमध्ये किती दिवसांपासून सांडपाणी वाहत आहे याचा हिशोब नाही.

विज्ञानावरील विश्वास वाढवा
२५ नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’ मधील मििलद बेंबळकर यांची प्रतिक्रिया वाचली. विद्युत चुंबकीय लहरींचे  non ionizing  आणि ionizing  हे वर्गीकरण त्याच्या शरीरपेशींवरील क्रियेनुसार आपण केले आहे.  ionizing विद्युत चुंबकीय लहरींचा पेशींवर आणि मुख्यत: त्यातील डीएनएवर  परिणाम होतो, प्रथिने विघटित होतात म्हणून ते ionizing.  तसे बघितले तर non ionizing  विद्युत चुंबकीय लहरी – प्रकाश लहरी, अतिनील प्रकाश लहरी, क्ष- किरण, गामा किरण असा एक सलग पटच विद्युत चुंबकीय लहरींचा आहे. पकी क्ष- किरण आणि गामा किरण हे आणि काही अंशी अतिनील प्रकाश किरण हे ionizing   समजले जातात. अतिनीलच्या खाली आणि इन्फ्रारेडच्यावर दृश्य प्रकाश लहरींचा प्रांत आहे. इन्फ्रारेडच्याही खाली microvave    आणि त्याखाली radio frequency  लहरी असतात, ज्यात आपल्याला मोबाइल फोन्समुळे रस आहे. या radio frequency (आरएफ ) आणि कॅन्सर याविषयी  जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ते पाहू- अल्पकालीन परिणामात, आरएफ लहरीमुळे मेंदूचे कार्य, त्याची ग्रहण शक्ती, झोप, रक्तदाब, नाडीचे ठोके यावर कोणताही परिणाम जाणवलेला नाही. दीर्घकालीन परिणाम पाहता पूर्वलक्षी पद्धतीने १३ देशांमधील आकडेवारीनुसार international agency for research on cancer कोणताही परिणाम १० वर्षांच्या वापरानंतरदेखील जाणवलेला नाही. ज्या international council for non ionizing radiation protection (आयसीएनआयआरपी)चा दाखला बेंबळकर देतात त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष असा आहे- ‘इंटरफोन हा पुरेसा मोठा अभ्यास आहे आणि याच्यात हाती आलेल्या आकडेवारीनुसार १०-१५ वर्षांच्या वापरानंतरदेखील मेंदूचा कॅन्सर आणि मोबाइल फोन याचा संबंध असण्याची शक्यता नाही.’ आणि निष्कर्षांचा शेवट करताना त्यात म्हटले आहे – ‘छोटा किंवा दीर्घकालीन परिणाम होतच नसेल असे छातीठोकपणे कधीच म्हणता येत नाही, पण सतत गोळा होत असलेली माहिती ही कॅन्सर आणि मोबाइलचा वापर यात असा संबंध असेल याच्या विरुद्धच आहे.’
मिलिंद बेंबळकर यांचा आरएफ लहरींचा melatonin या शरीरांतर्गत असलेल्या संप्रेरकावरचा परिणाम हा ना राजेंद्र येवलेकर यांच्या लेखात होता ना माझ्या त्यावरील प्रतिक्रियेत. राजेंद्र येवलेकर मधमाश्यांतील melatonin कमी झाल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते असेही म्हटले नव्हते. तेव्हा ही नवीनच माहिती आहे. त्यावर छाननी करता जे आढळले ते असे- melatonin  वरील परिणामाबाबत आणि त्यामुळे होणाऱ्या शरीरावरील परिणामाबाबत अनिश्चितता खूप आहे. इंग्लंडमधील advisory group on non ionizing radiation  या स्वतंत्र संस्थेने आपल्या अहवालात सर्व बाबी लक्षात घेऊन दिलेला निष्कर्ष असा- ‘आजच्या घडीला एकंदर गोळा झालेला पुरावा बघता आरएफ रेडिएशनमुळे melatonin बाधित होते किंवा त्यामुळे स्तनाचा कॅन्सर होतो असे म्हणता येत नाही.’ melatonin चे शरीरातील एकूण कार्य, पेशींचे कॅन्सरपासून संरक्षण करण्याची त्याची ताकत हे लेखात नमूद केलेले मुद्दे बरोबर आहेत. melatonin  वरील आरएफचे परिणाम विस्तृत http://www.baubiologie.net या संकेतस्थळावर सापडतात. त्यात melatonin ची पातळी आरएफ लहरींमुळे खालावत असल्याचे उल्लेख आहेत. परंतु त्यामुळे होणाऱ्या कॅन्सर किंवा अन्य परिणामांविषयी कोणताही ठोस निष्कर्ष नाही.
शरीरावरील किंवा पर्यावरणावरील दीर्घकालीन परिणाम निश्चित कळण्यास बराच अवधी लागतो आणि तोवर सावधगिरी बाळगणे, ती निर्मात्यांनी बाळगावी यासाठी नियमावली करणे, ते नियम काटेकोर पाळले जातात किंवा कसे, हे पाहणे अयोग्य आहे किंवा मला मान्य नाही, असे मी कोठेच म्हटले नाही अथवा दुरान्वयेही सुचवलेले नाही. परंतु अशी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलेला आहे, नियम बनवले आहेत त्याअर्थी ते धोकादायक आहेतच असे म्हणता येत नाही. त्याचबरोबर विज्ञान किंवा तंत्रज्ञान याबाबत लिहिताना माहिती अचूक असावी आणि मुख्य म्हणजे ती वस्तुनिष्ठ असावी एवढी अपेक्षा नक्की आहे. विज्ञान -तंत्रज्ञान याची धोकादायक बाजू नक्की मांडावी, पण ती संयत भाषेत आणि वस्तुनिष्ठ असावी. माझा आक्षेप मुख्यत: मूळ लेखातील अचूकतेविषयी आणि तो सनसनाटी करण्याविषयी आहे. विज्ञानाने एवढे दिले असतानादेखील सामान्यांचा त्यावरील असलेला तुटपुंजा विश्वास डळमळीत होईल, असे लेखन विस्तृत वाचकवर्गावर परिणाम करणाऱ्या माध्यमात नसावे असे वाटते. आज गरज असलीच तर विज्ञानावरचा विश्वास वाढवण्याची आहे.
-डॉ. अजय ब्रह्मनाळकर,  कऱ्हाड

ना विनोद ना सामाजिक आशय
२ डिसेंबरचा ‘लोकरंग’ वाचला. नीरजा, शफाअत खान यांचे अभ्यास आणि लालित्य यांचा सुंदर मिलाफ असलेले लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय होते.  ‘संडास संस्कृती’ हा लेख मात्र या पुरवणीत कसा याचे सखेद आश्चर्य वाटले. मुळात हा लेख अतुल पेठे यांच्या नाटय़दौऱ्याच्या वेळी त्यांना मुख्यत: नाटय़गृहाचे आणि तेथील संडासाचे आलेले अनुभव सांगणारा आहे. हा धड विनोदी लेख नाही ना काही सामाजिक आशय मांडणारा. अर्थात याचे कारणही उघड आहे. नेहमीच काही भूमिका घेण्याची सवय झालेल्यांना काही फुटकळ अनुभवातूनही आशय मांडायचा मोह होतो आणि मग ‘संस्कृती’ सारखे शब्द वापरून त्याला एक वैचारिक मुलामा द्यायचा प्रयत्न केला जातो, पण या लेखात तो पूर्णपणे फसलेला आहे. लेखाचा तीन चतुर्थाश मजकूर हा रंगमंचावरील समस्यांचा वेध घेणारा आहे. त्या अर्थाने शीर्षकाशी मजकुराने इमान ठेवले नाही. या ठिकाणी कुशल संपादनाची गरज होती. असो!
– शुभा परांजपे, पुणे.