‘आम्ही मेष राशीचे नाही, आम्ही सिंह राशीचे आहोत!’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं सुभाषित आपल्या कृतीतून जगाला ओरडून सांगणारी ‘दलित पॅँथर’ या नावाची एक लढाऊ संघटना महाराष्ट्राच्या भूमीत १९७२ साली उदय पावली, काही काळ अवकाशात लखलखली नि आसमंत उजळून क्षणात विजेसारखी लुप्तप्राय झाली. या ऐतिहासिक घटनेला आता उणीपुरी ४१ वर्षे पुरी होत आहेत. त्यानिमित्त रविवारच्या ‘लोकसत्ते’त (‘लोकरंग’: ७ जुलै) लोकांचे स्मरणरंजन व्हावे म्हणून ‘पॅँथर’ या संघटनेवर दोन ‘नमुनेदार’ लेख छापलेले आढळले.
त्यापैकी एक : अ‍ॅड्. सुनील दिघे यांची पत्रकार मधु कांबळे यांनी शब्दांकित केलेली ‘धारदार’ मुलाखत : ‘पँथरची पहिली झेप’! आणि दुसरा : नाटककार संजय पवार यांचा ‘तटस्थ’ लेख : ‘पँथरचा ‘सॉफ्ट टॉय’ होताना..!’ आता ते धड इकडेही नाही नि तिकडेही नाहीत, असे ‘तटस्थ’ असल्यामुळे त्यांना काय माहीत, की मी फक्त प्रारंभीची पाच वर्षेच ‘पॅँथर’ या नावाने वावरलो. आणि १९७८ नंतरच आपणाला ‘पॅँथर’चा ‘सॉफ्ट टॉय’ होताना आढळला असावा! त्यात आपला दोष नाही. असलाच तर आपल्या बाल्यावस्थेचा असावा. कदाचित तेव्हाही आपण ‘चोख्याच्या पायरीवर’ बसून असावेत!
यापेक्षा माझे मित्र सुनील दिघे यांचा मुलाखतवजा लेख ‘उजवा’ वाटला. कारण तो ‘पॅँथर’च्या घडामोडींवर आणि चलनवलनावर अधिक उजेड टाकतो. याचा अर्थ त्यात ‘पुराण’ (मिथ्य!) अथवा ‘कीर्तन’ नाही, असे नाही. उदाहरणार्थ, ते आपल्या निवेदनात मोघमपणे म्हणतात : ‘पँथरचा जाहीरनामा जसा गाजला, तशाच या लहान-लहान चळवळीही गाजल्या.’ असं म्हणून मध्येच ते एका ‘बंद दरवाजा’चं पिल्लू (!) सोडून देतात. ते म्हणतात : ‘सिद्धार्थ होस्टेलच्या एका खोलीमध्ये दोन दिवस कोंडून घेऊन राजा ढाले, नामदेव आणि मी असा तिघांनी चर्चा करून तो जाहीरनामा तयार केला होता.’
आता आली का पंचाईत! कारण दरवाजा बंद असल्यामुळे आत काय चाललंय, हे बाहेरच्या कुणालाही कधीही काहीही कळणार नाही!!!
म्हणजेच नामदेवच्या भाषेत- ‘बाई मी नाही त्यातली आन् कडी लावा आतली!’ आता ही दोन दिवसांची गुप्त बैठक ‘पँथरची भूमिका’ तयार करण्याची वा ‘जाहीरनामा तयार करण्याची’ असेल तर त्या बैठकीला सुनील दिघे हजर होते, ते कसे काय? कुठल्या नात्याने? ते ‘दलित पॅँथर’च्या संस्थापनेपासून आमच्यासोबत काम करीत होते काय? नाही. ते ‘दलित पॅँथर’च्या संस्थापकांपैकी एक होते काय? नाही. ते तेव्हा आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सभासद होते काय? नाही! मग त्या बैठकीला सुनील दिघे उपस्थित असण्याचे प्रयोजनच काय? तर ते फक्त दलित पॅँथरचे तत्कालीन स्वत:ला सर्वेसर्वा समजणारे नामदेव ढसाळ व त्यांचे मित्र सुनील दिघे यांनाच माहीत! कारण मी त्या बैठकीला हजरच नव्हतो. तिची मला गंधवार्ताही नव्हती. परंतु ‘जाहीरनाम्या’चा घडलेला हा ‘बनाव’ खरा वाटावा म्हणून या ‘बंद कमऱ्या’तल्या हकिकतीत मला गोवले आहे. आणि तेही ‘अग्रक्रमा’ने! याला काय म्हणावे? अहो, सुनीलजी! तुम्ही आणि नामदेवसारखा दोन-दोन दिवस बंद कमऱ्याआड बसायला मी काय तुमच्यासारखा ‘बेकार’ होतो काय? मला ‘नोकरी’ होती! नंतर ती मी सोडली.
आता तुमच्या (वाचकांच्या) लक्षात येईल की, या मुलाखतभर जागोजागी सुनील दिघे यांनी ओढूनताणून ‘जाहीरनाम्या’ची तारीफ का केलीय ते! परंतु त्यांना हे माहीतच नाही की, या ‘जाहीरनाम्या’वर ‘जाहीरनामा की नामाजाहीर’ या खरमरीत टीकेच्या पुस्तिकेचे दोन भाग मी त्या काळातच प्रकाशित केले होते. नामदेव ढसाळपुरस्कृत हा जाहीरनामा ‘प्रकाशक : संरक्षणमंत्री नामदेव लक्ष्मण ढसाळ यांनी छापलेला असून, त्या जाहीरनाम्याचा लेखक त्यात जाहीरपणे म्हणतो, ‘आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला देशाचे राज्य पाहिजे.’ हे वाक्य मला सुचणे शक्य नाही. नामदेवला सुचणेही शक्य वाटत नाही. मग हे स्वप्न पडले आहे कुणाला? तर ब्राह्मणांचा शेजार ज्यांना कायम लाभला आहे- त्यांना. इथे हा जाहीरनामा कुणी लिहिला असावा याचा रहस्यभेद होतो आणि त्यातून सुनील दिघे सुटू शकत नाहीत!
आमच्या मूळच्या ‘सामाजिक संघटने’ला ‘राजकारणा’चे रंगलेपन करणारे सुनील दिघे आहेत, हे त्यांनी कथन केलेल्या पुराव्यावरूनच सिद्ध होते.