‘मारेकरी डॉक्टर!’ हा गिरीश कुबेर यांचा (लोकरंग- १ सप्टेंबर) लेख योग्य वेळी लिहिलेला आणि अत्यंत मुद्देसूद असा होता. पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम्, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया, कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि नेते या सर्वाच्याच भाषणांतून एक प्रकारचा दर्प आणि उद्दामपणा जाणवतो. गरीबांची तोंडदेखली सेवा करण्याचा आव मात्र ते आणत असतात. ‘कोलगेट’ प्रकरणातील फाइली गहाळ झाल्या त्याला मी जबाबदार नाही, असे पंतप्रधान निलाजरेपणे सांगतात. खासदारांचा पाठिंबा विकत घेऊन त्यांनी आपले सरकार वाचविले आहे. लालूप्रसाद यादवांसारख्या भ्रष्ट राजकारण्यांचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले आणि वेळोवेळी ते वाचवलेही. मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी प्रदीर्घ काळ भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात आहेत. विरोधकांतील दुहीमुळे आपल्या सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही, हे ठाऊक असल्याने अनेक मंत्री आणि रेणुका चौधरी व दिग्विजयसिंह यांच्यासारखे कॉंग्रेसचे वाचाळ प्रवक्ते रोज निल्र्लज्जपणे बौद्धिक उन्मत्तपणा पाजळीत आहेत.
संपत्तीची लूट करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा गैरवापर केला जात आहे. या बॅंकांची कर्जे बुडविणारे बडे थकबाकीदार त्यामुळे सोकावले आहेत. सरकारपुरस्कृत कर्जे ही बुडित खाती जमा करण्याकरताच असतात असे मानले जाऊ लागले आहे. व्यावसायिक बॅंकांना वेठबिगारासारखी वागणूक दिली जात आहे. परिणामी त्यांची अवस्था बुडणाऱ्या जहाजांसारखी झाली आहे. काही प्रामाणिक अपवाद करता समाजाचे सारे आधारस्तंभ अशा तऱ्हेने भ्रष्टाचाराने पोखरले आहेत. एकीकडे  लोकसंख्या आणि भ्रष्टाचाराची, संवेदनाहीनतेची चढती कमान आणि दुसरीकडे रुपया मात्र वेगाने घसरत चालला आहे. रस्ते आणि पायाभूत सुविधांचा दर्जा भयावह आहे. जनतेला शाळा, घरे, पिण्यायोग्य पाणी, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्यसुविधा पुरवायचे सोडून आपण जिथे काहीही हाती लागणार नाही अशा मंगळावर मोहिमा काढतो आहोत. श्रीमंत राष्ट्रांना असले चोचले परवडतील. तशात आपले सगळे राजकीय पक्षही जातपात व धर्म यांचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजू इच्छितात. कुख्यात दहशतवादी भटकल याला अटक झाल्यावर मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने या प्रकरणाला राजकीय रंग देऊन म्हटले की, या देशात केवळ मुस्लीमधर्मीयांनाच लक्ष्य केले जात आहे. आणि हे सगळं आपण असहायपणे हताश होऊन पाहतो आहोत, हे आपलं दुर्दैव. या देशाचा विनाश आता कुणीही रोखू शकणार नाही.
– सुधीर भावे, जोगेश्वरी.

आर्थिक धोरणाचा पर्दाफाश
‘मारेकरी डॉक्टर!’ हा लेख सरकारच्या आर्थिक धोरणांचा पर्दाफाश करणारा असून सामान्यजनांचे डोळे उघडणारा आहे. २००९ साली सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर ‘शंभर दिवसांत महागाई कमी करू,’ अशी घोषणा करणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडचे निराशाजनक भाषण म्हणजे एक प्रकारे सरकारच्या आर्थिक अपयशाची कबुलीच आहे. गेल्या काही महिन्यांत सातत्याने रुपयाची घसरण होते आहे. त्याचबरोबर इंधन तेलांच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे र्सवकष दरवाढीला जणू आमंत्रण मिळाले आहे. मात्र, ही परिस्थिती बदलण्याचा सरकार प्रयत्नही करताना दिसत नाही.
रुपयाचे अवमूल्यन ही बाह्य़ घडामोडींची प्रतिक्रिया आहे, असे सांगून त्याचे समर्थन करणे हे अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांना शोभणारे नाही. भारताप्रमाणेच अन्य देशांच्याही चलनात घसरण होत असल्याचा दाखला देऊन त्यांनी खांदे झटकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांत लाखो कोटी रुपयांचे अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आले. ही प्रचंड संपत्ती काही मोजक्याच लोकांच्या घशात गेली. या घोटाळ्यांमुळे सरकारी तिजोरीवरचा ताण वाढला. हा ताण कमी करण्यासाठी करवाढी आणि दरवाढी केल्या गेल्या. या सगळ्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. गेल्या काही वर्षांत निरनिराळ्या राज्यांतही खनिज घोटाळ्यांनी कहर केला. त्यांची त्वरित चौकशी करून दोषींना सजा देण्याऐवजी ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने सर्व खाणीच बंद केल्या गेल्या. परिणामी खनिजाची निर्यात थांबून आयातीवरचा ताण कमालीचा वाढला. या घोटाळ्यांशी संबंधित फायलीच गायब असल्याने न्यायालयातले खटलेही रेंगाळले आहेत. या नाजूक अर्थस्थितीवर शस्त्रक्रिया करण्याऐवजी अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री डॉ. पी. चिदंबरम् यांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सव्वादोन लाख कोटी रुपयांची अन्नसुरक्षा योजना लागू करणे म्हणजे मृत्युशय्येवर असलेल्या रुग्णाचा व्हेंटिलेटर काढून घेण्यासारखेच आहे. या अर्थाने या डॉक्टरांना ‘मारेकरी डॉक्टर’च म्हणावे लागेल.
– विवेक ढापरे, कराड.

आठवणींना उजाळा देणारा लेख
‘बंदिशीतला श्रावण’ अतिशय सुंदर लेख आहे. पूर्वी संगीताचे जाहीर कार्यक्रम होत असत. त्यांत शास्त्रीय संगीताचेदेखील कार्यक्रम होत. त्यात ‘भैरव के प्रकार’, ‘मल्हार के प्रकार’ असे कार्यक्रम होत आणि गायक-गायिकादेखील ख्यातनाम असत. जसे पंडित भीमसेन जोशी, डॉ. प्रभा अत्रे, आदी. एकदा डॉ. प्रभा अत्रे यांची खास सकाळची बैठक ठेवली होती. कारण भैरव हा प्रात:कालीन राग आहे. त्याचे सर्व प्रकार त्या गायल्या अन् इतका दर्जेदार व सुंदर कार्यक्रम त्यांनी पेश केला, की अजूनही त्यांचे स्वर कानांत अन् मनात खोलवर कायमचे रुजले गेले आहेत. तसेच पंडित भीमसेन जोशी यांचे गायन! जसे ऋतूत ऋतू पावसाळा तसाच मल्हार रागांत मियॉं मल्हार हा सर्व मल्हार रागांचा राजा. पंडितजींचे दोन तानपुरे असे काही लागलेले असत, की यथोचित वातावरणनिर्मिती होई आणि त्यांनी आवाज लावला की मल्हारचे दोन निषाद लागताच मियॉं मल्हारची पुढची बंदिश ऐकू येत असे. पर्जन्यदेवतेची प्रार्थना असावी.. ‘करीम नाम तेरो’.. त्यांच्यासारखा घनगंभीर आवाज, भरपूर दमसास, दोन-दोन आवर्तनांच्या पल्लेदार ताना, विजेच्या कडकडाटासारखी तानांची चमक फक्त तेच गाऊ शकतात. बऱ्याच दिवसांनंतर या लेखामुळे या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या रागप्रकारांत दोन रागांची नावे मात्र राहिली आहेत. ती म्हणजे रामदासी-मल्हार आणि जयंत-मल्हार. ते रागसुद्धा अनेक गायक बैठकीत गातात.
– जयश्री केळकर, नागपूर</strong>

विवेक व प्रयत्नांची कास
लोकरंग- १८ ऑगस्टच्या अंकात ‘माझिया मना’ सदरातील डॉ. अद्वैत पाध्ये यांचा लेख खूपच उद्बोधक व मनाला भावला. सध्याचा ज्वलंत प्रश्न असलेली जीवघेणी स्पर्धा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या जटील समस्या यावर त्यांनी सुरेख मार्गदर्शन केले आहे. सुशिक्षित-अशिक्षित अशा सर्वच थरांतील पालकांना त्यांच्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर कोणती पथ्ये पाळणे आवश्यक आहे, हे खुबीदारपणे पटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मुलांनी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर प्रगती करण्यासाठी रात्रंदिवस त्यांच्या पाठी अखंड ससेमिरा लावून व इतर मुलांबरोबर अनुचित तुलना करून त्यांची कोमल मने घायाळ करण्याचे कसे टाळले पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांनी आपल्या मनात विवेकी विचारांची प्रतिष्ठापना करून त्यास अनुसरून भावनांची जोड दिली म्हणजे प्रगतीची वाटचाल सुरू होते. हे सकारात्मकतेने सांगण्याचा प्रयत्न या
लेखात केला गेला आहे. विवेकी विचार पालकांनी मनी रुजवला व त्याप्रमाणे कृती केली तर तो
पुढे मुलांमध्ये रुजतो आणि आत्मप्रगतीचा मार्ग
प्रशस्त होतो ही शिकवण लेखकाने दिली आहे. विवेक व प्रयत्नवाद ही तर परिणामकारक शस्त्रेच नव्हेत का?
मधुमालती पुजारे, देवनार.