१३ एप्रिलच्या अंकातील संजय पवार यांचा ‘दोन परफेक्शनिस्ट’ लेख वाचला. आता ज्यांच्यासाठी त्यांनी हा लेख लिहिला, ते सचिन तेंडुलकर व आमिर खान यांच्या वाचनात हा लेख येईल की नाही कुणास ठाऊक. मग तो कुणासाठी लिहिला? दर आठवडय़ाला सदर लिहिणं खरोखरच सोपं नाही. नियमित सदर लिहिणारा एकजण सांगत होता, ‘इट इज अ हार्ड वर्क. तुमचे ३०% लेख उत्तम जमतात. ५०% बरे जमतात. राहिलेले २०% अगदीच सो-सो असतात. आणि असं झालं तरी तुम्ही स्वत:ला चांगले लेखक म्हणवून घ्यायला हरकत नाही.’ पवारांना आपला हा लेख २०% मधला आहे हे माहीत असेल तर ठीक; पण जर त्यांना आपला ‘परफेक्ट पुरोगामी’पणा लेखातून दाखवायचा असेल तर चार गोष्टी त्यांनी समजून घ्यायला हव्यात.
सचिनला लोकांनी, राजकारण्यांनी, उद्योगपतींनी डोक्यावर घेतलं हा त्याचा दोष नाही. असलाच तर आपल्या क्रीडाविषयक धोरणाचा आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्याने गोल्फ खेळावे की नाही, हा त्याचा प्रश्न आहे. तो क्रीडाक्षेत्रात आहे, अजून वृद्ध झालेला नाही, तेव्हा तो नवीन नवीन गोष्टी करून पाहणारच. हा मनुष्यस्वभाव आहे. आधी एकांकिका लिहिणारे नंतर दोन अंकी नाटक लिहितात, मग प्रायोगिक चित्रपटांसाठी पटकथा-संवाद लिहितात. आधी मराठीसाठी लिहितात, मग हिंदीसाठी लिहितात. आता हे सगळं ते ‘जगतामध्ये समता प्रस्थापित व्हावी, अन्यायाचे निवारण व्हावे’ या उदात्त हेतूनेच करतात का? तसेच सचिनने काय करावे, हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो बाकी काय करत असेल-नसेल, पण त्याच्या पैशातून आज किमान शंभर मतिमंद मुलांना आयुष्याचा आधार मिळालेला आहे आणि त्यांच्या पालकांना आयुष्यभराचा दिलासाही!
जी गोष्ट सचिनची- तीच आमिरचीही. त्याच्या कार्यक्रमातून स्फूर्ती घेऊन आज अनेक तरुण, ज्येष्ठ स्वत:पलीकडे जाऊन काहीतरी विधायक काम करीत आहेत. एकटय़ा नगरच्या स्नेहालय संस्थेला त्याने एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. त्यातून अनेक पीडित महिला-बालकांची आयुष्यं उभी राहणार आहेत. ‘मुस्लीम मानसिकतेबद्दल तू बोल, मग आम्ही तुला मानू,’ असं त्याला सांगणं हा शुद्ध भंपकपणा आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांचे मेरुमणी प्रा. नरहर कुरुंदकर यांनी या विषयावर अत्यंत विवेकाने, पण परखडपणे लिहिले आहेच. पवारांसारख्यांनी यातलं स्वत: काय केलंय? त्यांचे लेख वाचून एका तरी तलाकपीडित महिलेला किंवा भरकटलेल्या अशिक्षित मुस्लीम तरुणाला न्याय मिळाला का? ‘सगळ्यांनी सगळंच करावं’ या न्यायाने उद्या मेधा पाटकरांनी फुरसुंगीच्या कचऱ्याच्या प्रश्नावर कविता केली नाही म्हणून तुम्ही त्यांना मोडीत काढाल. किंवा संजय पवारांसारख्या लेखकाला विस्थापित काश्मिरी पंडितांवर नाटक लिहायला सांगाल. त्यांनी तसं केलं तर चांगलंच आहे; पण तसं केलं नाही तरी त्यांचं काम कमी किंवा लहान ठरत नाही.
तेव्हा जरी तेंडुलकर आणि आमिर खानच्या वाचनात हा लेख आलाच, तरी त्यांनी या भानगडीत पडू नये. उगाच शब्दांचे बुडबुडे उडवण्यापेक्षा त्यांच्या विहित कामाने चार पीडितांचे अश्रू तरी पुसले जातील. मग ‘परफेक्ट पुरोगामी’ने त्यांना मानलं नाही तरी चालेल. कारण घरबसल्या तिरकस लिहिणं सोपं आहे, कृती करणं फार दुर्मीळ आणि अवघड आहे. पवारांसारख्या ‘चळवळी’तल्या माणसाला हे सांगायला नको. कळलंच असेल त्यांना- तिरकस लिहिणं तसं सोपं असतं.
शेवटची सरळ रेघ : परिवर्तनाच्या चळवळीतल्या लोकांनी व्यवस्था कशी बदलायची ते सांगावं; जे त्यांच्या परीने अरविंद केजरीवाल सांगत/ करत आहेत. उगाच माणसांना बदलायला सांगून काय उपयोग? आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांनी हे चळवळीतल्या लोकांना सांगावं?
– दत्ता वाईकर, सातारा

राजकीय कादंबरी : दोन भूमिका
‘लोकरंग’मध्ये (२७ एप्रिल) ‘मराठीत प्रगल्भ राजकीय कादंबऱ्या का नाहीत?’ हा अरुण साधू व ‘साधू, तुम्ही काय बोलताय?’ (४ मे) हा  विजय तापस यांचा लेख वाचला.  हे दोन्ही लेख काही वर्षांपूर्वी वाचलेल्या Irving Howe  यांच्या ढPolitics And The Novel व Robert Boyers यांच्या Atrocity And Amnesia : The Political Novel Since  1945 (१९८७) या ग्रंथांचे स्मरण झाले. Howe यांनी दोस्तोवस्की, स्तांधाल, ऑरवेल, कोस्लर यांच्या कादंबऱ्यांची चिकित्सा करीत आपली सद्धांतिक भूमिका मांडली आहे, तर Robert Boyers यांना गॉíडमर, गॅब्रियल गार्सयिा, माक्र्वेझ, गुंतर ग्रास, डोरीस लेसिंग, कुंदेरा, इ.च्या कादंबऱ्यांचे मूल्यांकन करताना Howe यांची समीक्षादृष्टी पुरेशी वाटलेली नाही.
Howe यांचे राजकीय कादंबरीचे नमुनारूप काहीसे लवचिक व ऐसपस आहे. त्यांनी विचारार्थ मांडलेले काही मुद्दे असे :
१) राजकीय कादंबरीत अमूर्त कल्पनांना स्वतंत्र गती असते. २) राजकीय कादंबरी अमूर्त विचारप्रणाली किंवा कल्पना (Idea) यांना चतन्यशील पात्रांमध्ये रूपांतरित करते. ३) तिच्यात ‘राजकीय विचारप्रणाली’ व ‘मानवी संवेदना’ समोरासमोर येतात. ४) राजकीय कादंबरी वाचकाची मनुष्यस्वभावाचा अनुभव घेण्याची क्षमता समृद्ध करते. ५)राजकीय कादंबरीच्या मूल्यांकनाचे निकष इतर कुठल्याही कादंबरीपेक्षा वेगळे नसतात.
Howe यांना जेव्हा विचारले गेले की, ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ ही राजकीय कादंबरी आहे का? तेव्हा त्यांनी ‘ज्याला ती राजकीय वाटते त्याने तिचा तसा विचार करावा,’ असे संदिग्ध उत्तर दिले होते. Robert boyers यांना ही भूमिका प्रत्ययवादी वाटते. Howe यांच्या विवेचनातील पहिले दोन मुद्दे ते स्वीकारतात. मात्र, अधिक खोलात जाऊन ते राजकीय कादंबरीचा विचार करतात. त्यांच्या दृष्टीने- १) राजकीय कादंबरीत राजकीय घटनांना कथानकामागे सोडलेले पडदे एवढेच फक्त स्थान नसते, तर त्या घटना अधिक महत्त्वपूर्ण असतात. २) राजकीय कादंबरीत पात्रांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांच्या वाटय़ाला येणारे भोग (fate) राजकीय किंवा सामाजिक घटनाक्रमांचे परिपाक असतात व राजकीय कृती करणाऱ्या किंवा राजकीय समीकरणे मांडणाऱ्या व्यक्तीच फक्त त्यांचे नियंत्रण करू शकतात. ३) राजकीय साहित्यकृतीत आकस्मिक घटनांची केवळ मालिका नसते, तर अशा साहित्यकृतीतील पात्राची एखादी कृती, प्रत्येक प्रतिमा वा चिन्हे-संकेत काही विशिष्ट अर्थ व्यक्त करीत असतात.
त्यांच्या मते, राजकीय साहित्यकृतीतील ‘राजकीय सूत्र’ वाचकाला कुठेही भरकटू न देता त्या सूत्राच्याच दिशेने विचार करावयास भाग पाडते. इतर कादंबऱ्यांच्या तुलनेत राजकीय कादंबरीत ‘काळ व अस्तित्व’ (Time and Being) या संकल्पना अधिक वेगळ्या पद्धतीने येतात. अशा कादंबरीत दोन काळांतील तुलना असते. त्या काळात बदललेल्या कल्पनांमागील हेतू, कल्पना बदलल्या नसल्यास बदल नाकारणाऱ्या कल्पनांचे स्वरूप व कारणे याविषयी विचार मांडत त्या जगातील गोष्टी कल्पनांच्या आधारेच कशा चाललेल्या असतात, हे दाखवत साहित्यकृतीच्या ‘अस्तित्वा’बद्दलच्या संवेदनाही विकसित करतात. म्हणूनच जगाला धक्का देणाऱ्या सत्ता व कल्पना यांतील संबंधांचा त्या शोध घेऊ शकतात. ‘काळ व अस्तित्व’ याकडे घेऊन जाणारा एक घटक म्हणून त्यांनी ‘अदृश्य कारण’ (Absent Cause) अशी एक संकल्पना योजली व तिचे सविस्तर विवेचनही केले. हा घटक कथानकात दृश्यमान केव्हा होतो? तर एखादी घटना घडण्यामागील दृश्य कारण तर काही दिसत नाही, परंतु तरीही अपरिहार्य वाटावी अशा तऱ्हेने ती घटना घडते व त्यातून कथानकातील संघर्षांची रूपे उलगडतात, अशा ठिकाणी ‘अदृश्य कारण’ हा घटक कार्य करीत असतो. या घटकाची नेमकी व्याख्या करता येत नाही, परंतु प्रत्येक राजकीय कादंबरीतील कथानकानुसार या घटकाविषयीची जाणीव बदलती असते. राजकीय कादंबरीतून मांडला जाणारा नतिक विचारही इतर कादंबऱ्यांपेक्षा भिन्न असतो. तीत स्थिर नतिक संकेत असण्यापेक्षा अशा कादंबरीतील संघर्ष, वादविवाद यांतून वाचकानेच सर्वमान्य अशा राजकीय संस्कृतीचा शोध घ्यावा, असे ही कादंबरी सुचवीत असते. कुठलीही आदर्श राजकीय संस्कृती कधी अस्तित्वात नव्हती/ नाही; परंतु तिच्यासाठी माणसाची सतत धडपड मात्र चालू आहे याचे भान ही कादंबरी देते.
‘राजकीय कादंबरीच्या मूल्यांकनाचे निकष इतर कादंबऱ्यांच्या मूल्यांकनाच्या निकषांहून वेगळे नसतात,’ हे ऌ६ी यांचे मत इ८ी१२ यांनी नाकारले आहे. राजकीय कादंबरीत ज्या वैशिष्टय़पूर्ण शब्दसंगती निर्माण झालेल्या असतात त्यांचा वेगळा विचार केला पाहिजे. अशा कादंबरीत वातावरण हा घटक प्रभावी असतो व तो विशिष्ट विचारप्रणालीचे चित्र वाचकमनावर ठसवतो. तसेच या कादंबरीतील कल्पना आणि विचारप्रणाली यांच्या अनुषंगाने केलेले वाचन वाचकाला वेगळा अनुभव देऊन जाते. इतर साहित्यकृतीतून मिळणाऱ्या अनुभवापेक्षा हा अनुभव वेगळा काढायलाच हवा असे त्यांना वाटते.
 – प्रा. डॉ. प्रतिभा कणेकर
ते तबलावादक  पं. मारुती कीर आणि पं. समताप्रसाद
‘पिया तोसे’ या गाण्यातल्या तबल्याच्या अप्रतिम तुकडय़ांचे श्रेय पं. मारुती कीर आणि पं. समताप्रसाद यांचे आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी वाजवलेला तबला ‘मोसे छल किये जाय’ या गाण्यात आहे अशी माहिती पं. उल्हास बापट यांनी दिली. तसेच ‘क्या हो फिर जो दिन..’ हे गीत मजरूह सुलतानपुरी यांचे आहे.
– डॉ. मृदुला दाढे-जोशी