‘लोकरंग’मधील (३० मे) ‘जपू या निसर्गाचा आनंदकंद..’ हा डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रबोधनपर लेख वाचला. अशा प्रबोधनाची, निसर्गप्रेमींच्या अनुभवाची शिदोरी अत्यावश्यक आहे. विकासातून विनाशाकडे होणारी वाटचाल अस्वस्थ करते. निसर्ग वारंवार सूचना देत असूनही तात्पुरती मलमपट्टी करण्यात आपण धन्यता मानतो. या लेखात नमूद केलेली ‘अधिकाऱ्यांची मानसिकता’ वाचून अस्वस्थता वाढली. आमच्याकडे अजूनही देवराया आहेत, निसर्ग तर वेड लावणारा आहे.. पण भविष्यात हे कितपत टिकेल? शहरीकरण आणि त्या अनुषंगे होणारी वाटचाल या विषयाबाबत धोरणे, हे सर्व काळजी वाढविणारे आहे. निसर्ग दयाळू आहे, आपली माय आहे, पण आपण असेच वागणार असू तर त्याचाही एक ‘न्याय’ आहे , हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. निसर्गदेवा सुबुद्धी दे रे!!!

मधुकर घारपुरे, सावंतवाडी.

उल्लेखनीय पुस्तक शिफारस

‘लोकरंग’मधील (१६ मे) ‘वाचू आनंदे.. घडू स्वानंदे..’ या पुस्तक शिफारशीमध्ये मान्यवरांनी सुचवलेल्या निवडक पुस्तकांची खूप मोठी जंत्री दिली आहे. मान्यवरांनी जरी त्यांच्या किशोर वयात व त्यानंतरही ती पुस्तके वाचली असतील आणि त्यांच्या जडण-घडणीत त्या पुस्तकांचा मोठा वाटा असेलही.. तरी कोणत्याही वयातील वाचकाने वाचावी अशीच ही पुस्तके आहेत. शाळकरी मुलांच्या दृष्टीने तर संग्रही ठेवावी अशी पुस्तक शिफारस आहे. क्रमिक पाठय़पुस्तकांत संदर्भ पुस्तकांची नावे एक तर पाठाच्या सोबत किंवा स्वतंत्र पानावर दिली जातात. पण पाठाची निवड जरी मुलांच्या वयानुरूप करण्यात आली असली तरी सर्वच संदर्भग्रंथ मुलांसाठी आकलन होण्याजोगी असतीलच असे नाही. त्यामुळे सर्वच नाही, पण काही संदर्भग्रंथ मुले तर सोडाच शिक्षक, मुख्याध्यापकही वाचन करणे टाळतात. या पुस्तक शिफारशीमुळे माध्यमिक शाळेसाठी कोणती पुस्तके खरेदी करावीत याचे बऱ्याचअंशी उत्तर मिळाले आहे. आपण दिलेल्या यादीतील पुस्तके संस्कारक्षम, वाचनीय, आकलन होण्याजोगी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे किशोरवयीन मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारी, त्यांचा मानसिक विकास करणारी व त्यांच्या विचारांना दिशा देणारी आहेत. या वयोगटातील मुलांच्या विचारांची बैठक बसवण्यामध्ये ही पुस्तके नक्कीच मदत करतील.

–  वि. बा. लखनगीरे, लातूर

ग्रंथ चळवळ हीच आदरांजली!

‘लोकरंग’मधील (२३ मे) ‘पुस्तक पंढरीचा पांडुरंग’ हा राजीव बर्वे यांचा लेख वाचला. मराठी ग्रंथविक्री आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यात अगदी ९८ वर्षांपर्यंत कार्यरत राहिलेले पांडुरंग कुमठा या कोकणी माणसाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. बॉम्बे बुक डेपो वास्तूत ग्रंथविक्रीचे दालन उघडून साहित्यविषयक उपक्रमाचे ते एक केंद्र बनले आहे. अभिरुची संपन्न पुस्तके घराघरांत पोहोचवून मराठी वाचकांची आवड त्यांनी ज्वलंत ठेवली असं म्हटलं तर वावगे ठरू नये. कुमठांचे वाचनावरील अफाट प्रेमामुळे ते केवळ पुस्तक/ ग्रंथविक्रेता हे बिरुद न लावता प्रकाशकांचे, ग्रंथपालांचे मार्गदर्शक ठरले. एखादे पुस्तक का विकले गेले नाही याचे विवेचन करण्याची केवळ आत्मीयताच नव्हती, तर त्यांना काही वेळेस आर्थिक मदत करण्यातही ते मागे नव्हते. कारण अशा असंख्य प्रकाशकांच्या आयुष्यातील एक कप्पा कुमठांनी प्रेमाने व्यापला होता. असे हे प्रेमळ व्यक्तिमत्त्व दीर्घ वास्तव्यानंतर लुप्त व्हावे याचे क्लेश अनेक ग्रंथप्रेमींना, प्रकाशकांना होणे हे क्रमप्राप्तच आहे. आज व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया यांच्या अतीव आकर्षणामुळे, तसेच इतर स्वच्छंदी जीवनपद्धतीत व्यग्र अशा आजच्या युवकांना ग्रंथ आणि पुस्तक याचे आकर्षण वाटत नाही याची खंत वाटते. या युवकांपर्यंत ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही चळवळ नेण्यासाठी प्रकाशकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तरच कुमठांना खरी आदरांजली अर्पण होईल.

– अरविंद बेलवलकर, अंधेरी