News Flash

प्रत्येकाने स्वत:तला राम शोधावा!

पडसाद

(संग्रहित छायाचित्र)

प्रत्येकाने स्वत:तला राम शोधावा!

‘लोकरंग’मधील समीर गायकवाड यांच्या ‘गवाक्ष’ या सदरातील ‘बिनमंदिराचे राम’ (२० जानेवारी) हा लेख वाचला. खूप भावला. आज ग्रामीण संस्कृतीही नागर होत चाललेली असताना परिणामी होणारे बदल टिपताना गायकवाड आपल्या सरळ-साध्या शैलीतून गावगाडा समोर उभा करतात आणि खरोखरच आमच्या गावची आठवण होते. तंत्रज्ञानाच्या विळख्यात शहर व गावातले अनेक दुवे तुटत आहेत. गावोगावी मंदिराचे जीर्णोद्धार करून थाटात नवे कळस उभारले जात आहेत. परंतु विचारांची उंची वाढली आहे का? या वास्तवातच रुबाबात डोळ्याला गॉगल लावून गावातल्या तरुणांचे भलेमोठे फ्लेक्स झगमगू लागले आहेत. आणि इकडचे तिकडे करण्यात धन्यता मानणारे अनेक ‘बिनमंदिराचे राम’ बाहेर पाहायला मिळतात. या शतकातल्या रामायणात राम आणि रावण यांत फरक करता येणे कठीण आहे. कारण वर्तमान चिमटीत पकडणे हाताबाहेर आहे. हे सर्व असले तरी प्रत्येकाने स्वत:मधला राम शोधायला हवा असे वाटते.

– प्रतीक प्र. जाधव, सातारा

आमच्याच पायावर आम्ही धोंडा मारला!

‘लोकरंग’मधील (२७ जानेवारी) ‘आशा नाम मनुष्याणां..’ हा आनंद करंदीकर यांचा लेख वाचला. आजचा पदवीधर खरंच आपली क्षमता न जाणता ‘एमपीएससी’ या मृगजळामागे धावत आहे. कुणीतरी आपला व्यवसाय चालावा म्हणून हजारातून एखादा कसा अधिकारी झाला, हे पटवून देतो आणि आपल्या क्लासेसकडे आकर्षित करतो. पण आमचा पदवीधर इंजिनीअर, वाणिज्य शाखेचा असूनही स्वत:च्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करीत नाही आणि एमपीएससीमागे लागून वय व पैसा वाया घालवतो. आवश्यकतेपेक्षा जास्त डीटी एड्., बी.एड्. कॉलेज असल्याने अनेक विद्यार्थी डीटी एड्., बी.एड्. झाले. शिक्षणसम्राटांचे कॉन्व्हेंट सुरू झाल्याने जि.प., सरकारी, निमसरकारी विद्यालये रिकामी होऊ  लागली. विद्यार्थीसंख्या पुरेशी नाही म्हणून शिक्षक भरती नाही. आमच्याच पायावर आम्ही धोंडा मारला. सरकारी विद्यालयातील संख्या आम्हीच घटवली. आता शिक्षक भरती नाही म्हणून उलटय़ा बोंबा सुरू झाल्या. अशात अनेक तरुण स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देऊ  लागले. हे सर्व पाहता, आपण जे शिकलो, त्यातील कौशल्य विकसित करण्यातच आपले यश आहे.

– संतोष ढगे, बुलढाणा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:19 am

Web Title: readers reaction on lokrang articles 14
Next Stories
1 सोशल शेअर मार्केट
2 पार्ला वेस्ट
3 स्वातंत्र्याचा दुसरा मार्ग
Just Now!
X