‘लोकरंग’मधील (२६ मे) ‘माझिया मना’ या सदरातील ‘माझं अवकाश’ हा लेख वाचला. हल्ली  ज्या ‘स्पेस’चा उल्लेख आपण करतो, तेच हे अवकाश! लेखातील स्त्री, तिचा प्रश्न आणि लेखकानं त्यावर सुचवलेला उपाय हा मला थोडाफार ‘सन्मान्य तडजोड’ या स्वरूपाचा वाटला. मुळात िहदू विवाहपद्धतीत वैवाहिक जीवनात प्रवेश करणे म्हणजेच व्यक्तिगत आशाआकांक्षांना तिलांजली देणे असा अर्थ आहे. प्रजोत्पादन, त्यांचे संगोपन व अर्थार्जन करत असताना गृहस्थाने पाळायचे नियम आणि त्याच्या पत्नीने करायची कामे हे अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे. वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर, विशेषत: स्त्रीने आपले ‘अवकाश’ निर्माण करणे हे तसे सोपे नसते. लोक काय म्हणतील? नवरा काय म्हणेल? मुलांना हे आवडेल का? अशा असंख्य प्रश्नांनी ती घेरली जाते. आणि सरतेशेवटी ‘आहे ती परिस्थिती’ निमूटपणे स्वीकारते. मानसोपचारतज्ज्ञ तिला निराशेच्या गत्रेतून फार तर बाहेर काढू शकतील; परंतु तिचा मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो. यावर उपाय किंवा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ‘सुरुवात’ म्हणू हवे तर- प्रत्येक स्त्रीने आपले अवकाश तरुण वयातच निर्माण करावे असे मला वाटते. सांगायला अतिशय आनंद वाटतो की, मी माझ्यापुरते हे ‘अवकाश’ वयाच्या फार आधीच्या टप्प्यावर निर्माण केले आहे. केवळ अर्थार्जनाची संधी म्हणजे हे ‘अवकाश’ मुळीच नाही. ही आपल्यापुरती एक छोटीशी खासगी स्पेस आहे, जिच्यावर फक्त आपला आणि आपलाच हक्क असतो. जिथे स्त्रीला व्यक्त होता येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या या अवकाशाचा स्वीकार सर्वप्रथम ती स्वत: आणि नंतर तिचे कुटुंबीय अतिशय खुल्या दिलाने करतात. हा थोडा ‘प्रीव्हेंटिव्ह मेजर’ स्वरूपाचा तोडगा वाटेल, परंतु माझ्या दृष्टीने तरी तो उपयुक्त ठरला आहे .
– मेधा गोडबोले, विलेपाल्रे.

 व्यासंगी व्यक्तिमत्त्व
ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ सत्त्वशीला सामंत यांच्या निधनाचे वृत्त वाचून तीव्र दु:ख झाले. त्यांचे मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषांवर विशेष प्रभुत्व असल्यामुळे ‘शब्दानंद’ हा त्रभाषिक शब्दकोश त्यांनी तयार केला. डायमंड प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला. अनुवादकांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरला आहे. सामंत यांचे इतरही मौलिक साहित्य प्रकाशित झाले आहे. मराठी भाषेचे व्याकरण व शुद्धलेखन यांच्या शुद्धतेविषयी त्यांचा विशेष कटाक्ष असे. याचे प्रत्यंतर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या व्यासंगपूर्ण लेखांतून येत असे. भाषा संचालनालयात उपसंचालक म्हणून कार्यरत असताना ‘शासनव्यवहारकोश’ तयार करण्याच्या कामी भाषा सल्लागार मंडळास त्यांची अत्यंत मोलाची मदत झाली होती. उपसंचालक म्हणून कार्यरत असताना वैयक्तिक कारणास्तव वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे भाषा संचालनालयात मोठीच पोकळी निर्माण झाली होती.
– व. वा. इनामदार, माजी सहायक भाषा संचालक.

‘गेला कुठे कंटाळा?’ अनुकरणीय
‘बालमैफल’मधील सुचित्रा साठे यांची ‘गेला कुठे कंटाळा?’ ही लहानग्यांसाठीची गोष्ट खूप आवडली. खरे म्हणजे ही गोष्ट प्रत्येक पालकाने वाचलीच पाहिजे आणि लहान वयातच आपल्या मुलांना कामाची सवय लावली पाहिजे. लेखिकेने जे शब्द लक्षात ठेवायला सांगितले आहेत तेही दुर्दैवाने हळूहळू लुप्त होत आहेत. शरद वर्दे यांचा ‘वानप्रस्थाश्रम’ही मनाला भावला. आपण कधीतरी थांबायला हवे, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे; म्हणजे आयुष्य खरंच सुखी होईल. वेगवेगळ्या रमणीय स्थळांची माहिती देणारे शेवटचे पानही वाचनीय असते.
अभय दातार, मुंबई.