‘लोकरंग’मध्ये (२२ जून) गानतपस्विनी धोंडूताई कुलकर्णी यांचे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी जे अप्रतिम असे विवेचन केले आहे, ते वाचून एखादी नादमय स्वरबद्ध बंदिश ऐकावी आणि मुग्ध व्हावे, तसा अनुभव आला. प्रत्येकाचा गुरू वेगळा, त्याला मिळणारी तालीम, त्याचा स्वत:चा (शिष्याचा) वकूब वेगळा, बुद्धी आणि अनुभव यातून प्रकट होणारे असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व.. असा दीर्घ विचार सांगताना त्यांनी धोंडूताईंचे वैशिष्टय़ मोकळेपणाने कथन केले आहे. किशोरीताईंच्या लेखाच्या बाजूलाच उत्तरा दिवेकर यांचा लेख आहे. धोंडूताईंवर त्यांनी पुस्तकच लिहिले आहे. त्या नातलग असल्यामुळे त्यांनी धोंडूताईंची प्रसिद्धीपराङ्मुखता उन्मेखून अधोरेखित केली आहे. ‘लोकरंग’ने धोंडूताईंना या लेखांद्वारे खरोखरीच भावपूर्ण अशी शब्दांजली वाहिली आहे.

या चित्रपटांतील गाण्यांचाही उल्लेख हवा होता..
‘लोकरंग’ पुरवणीतील ‘रहे ना रहे हम’मध्ये डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी रोशन यांच्या प्रसन्न गाण्यांचा रसास्वाद घेतला आहे. त्यात यही बहार है, यह कैसी अदाए (रागरंग), ब्रिज के नंदलाला, दिल भी तेरा हम भी तेरे (टाकसाल), तू हमको देख (जिंदगी और हम), बता दो कोई कौन गये शाम (मधू), फलक क्या मिलेगा तुझे (घर घर में दिवाली), अखियों से स्नान कराकर मै मंदिर जाके आयी (रंगीन राते) यांसारख्या गाण्यांबरोबर नौबहार, शिशम, माशुका, दो रोटी अशा चित्रपटांतीलही गाण्यांचा समावेश असता तर अधिकच आनंद वाटला असता.

– अशोक प्र. काळे, रत्नागिरी</p>

 वाचनीय ‘जनात-मनात’
डॉ. संजय ओक यांचे ‘जनात-मनात’ हे सदर खूप वाचनीय असतं. ८ जूनच्या पुरवणीत त्यांनी लिहिलेला ‘सुंदर भिंत’ हा लेख उत्तम आहे. ‘साध्याही विषयात आशय, मोठा कधी सापडे’ असं त्यांचं लिखाण असतं. ‘भिंतीवरची कॉफी’ ही खरोखरीच वैचारिक प्रगल्भता आहे. एक चहा, एक कॉफी, एक जेवण आपण अगदी सहज देऊ शकतो. पण अशी कल्पना राबवणे हे आपल्याकडे कठीणच काम आहे. कारण अशी ‘सुंदर भिंत’ आपल्याकडे केव्हाही ‘रंगवून’ ठेवतील. असो. पण कल्पना फारच सुंदर आहे. कशा प्रकारे ती राबवावी याचा विचार ‘मनात’ सुरू असून ‘जनात’आणायचा विचार आहे. २२ जूनच्या अंकात या सदरातील ‘गाणे’ या लेखात गाण्याविषयी लिहिले आहे. काही जुनी गाणी  आपल्या आठवणींशी, प्रसंगांशी निगडित असतात. एखादी जरी जुन्या गाण्याची ओळ कानावर आली, तरी एखादी थंडगार वाऱ्याची सुगंधित झुळुक आल्यासारखी वाटते आणि मन प्रसन्न आणि शांत होते. एवढेच नव्हे तर अंतर्मुख होते. मदनमोहनचे संगीत आणि तलतचे गाणे अप्रतिम. काही गाणी तर अशी आहेत की, काव्य, संगीत, गायकाचा आवाज यांचा अगदी अप्रतिम मेळ जमला आहे. उदा. ‘मेरा प्यार मुझे लौटा दो’ किंवा ‘मेरा जीवनसाथी बिछड गया.’

 – जयश्री केळकर, नागपूर</p>