रिकी – एक गूढ कलाकार
 ‘लिव्हीन् ला विदा लोका’ हा आशुतोष जावडेकर यांचा लेख वाचला. रिकी मार्टिन हा खूप उत्तम कलाकार! आपल्या लैंगिकतेविषयी पालकांना कळू नये म्हणून तो कमालीचा जागरूक असे. पण त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो आपल्या लैंगिकतेविषयी उघडपणे बोलू लागला. सार्वजनिक ठिकाणी त्याला लैंगिक वर्तनाबद्दल अटकही झाली होती. परंतु हा सगळा अनुभव त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये  मांडला. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कलाकारांभोवती ड्रग, लैंगिकता, नातेसंबंध यांचा वेढा असतो.
– सुधीर के.

 स्वतंत्र विचारांची मुलेही आहेत
‘लोकरंग’ (१८ मे) मधील ‘चुका करण्याचे स्वातंत्र्य’ हा डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचा लेख वाचला. लेखिकेचा मुद्दा खूप बरोबर आहे. मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लहानपणापासूनच असले पाहिजे; परंतु लेखिकेच्या सगळ्याच उदाहरणांमध्ये असं दिसून येतं की, मुलं आई-वडिलांवर खूपच अवलंबून आहेत. उलट माझ्या ओळखीतल्या अनेक नातेवाईक व मित्र-मैत्रिणींमध्ये अशी  उदाहरणे आहेत, ज्यात मुलं त्यांचा निर्णय घेण्यास सक्षम आहेत. निदान छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये तरी ती नक्कीच आई-वडिलांवर अवलंबून नाहीत. मुलांनी एखादी गोष्ट पालकांना विचारून करणे आणि त्यांच्यावरच अवलंबून असणे यात फरक आहे. आजच्या पिढीतील मुले स्मार्ट आहेत आणि पालकही त्यांना पाठिंबा देताना दिसतात.

– अदिती अलाबदे, अंधेरी, मुंबई.

 वस्तुनिष्ठ मूल्यमापन
श्रीकांत उमरीकर यांनी आशय महत्त्वाचा असतो. राव ही चॅनल फोर लाइव्ह या कादंबरीची केलेली वस्तुनिष्ठ समीक्षा वाचली (लोकरंग, १ जून). अत्यंत प्रभावीपणे त्यांनी या लेखनातील कणसूर बाबी मांडल्या आहेत. बाबा कदम शैलीत लिहिलेला मोठय़ांचा चांदोबा अशी माझी पहिली प्रतिक्रिया या कादंबरीविषयी झाली. लेखकाला कादंबरीचा पट, विस्तार, व्यक्तिरेखांची मांडणी, कथासूत्राला आवश्यक असणाऱ्या वास्तवाचे दर्शन हे काहीही झेपलेले नाही. यातील व्यक्तिरेखा, प्रसंग आणि ’landscape  हा आंतरराष्ट्रीय वाहिन्यांचा आणि माणसे मात्र मध्यमवर्गीय प्रवृतीची ही बांधलेली मोट अतिशय कृत्रिम आहे. त्यामुळे एकूणच कादंबरी काल्पनिकतेच्या प्रदेशातून आभासी, फसव्या, खोटय़ा जगात प्रवेश करते आणि वाचक आपोआप अलिप्त होतो. मूळ रेसिपी बिघडल्यामुळे यातील प्रणय, सत्तासंपत्ती, ऐषोआराम ही फोडणी सपक झाली आहे. सनसनाटीपणाच्या मगरमिठीत यातील अशक्त कथासूत्र आणखी गुदमरून गेले आहे. कादंबरी काय किंवा कथा काय फसू शकते, पण ती फसताना लेखकाच्या व्यावसायिक वकुबाबद्दल, आकलन शक्तीबद्दल जेव्हा ती प्रश्नचिन्ह निर्माण करते, ती बाब अधिक गंभीर आहे

– गार्गी बनहट्टी, दादर, मुंबई

 अप्रतिम वर्णन!
‘लोकरंग’ (४ मे) मधील ‘लिव्हीन् ला विदा लोका’ हा आशुतोष जावडेकर यांचा लेख वाचला. लेखकाने रिकी मार्टिन आणि जे. लो यांचे नेमक्या शब्दांमधून अप्रतिम वर्णन केले आहे. त्यामुळे अगदी जशाच्या तसे ते दोघे वाचकांसमोर उभे राहतात; अगदी त्यांच्या प्रेमात पडावे इतके बोलके आणि सुंदर!

– डॉ. अपर्णा फडके