News Flash

इतिहासाचे चष्मे : जादुई स्मृतींचे वास्तव

माध्यमांचा प्रभाव समाजावर किती प्रमाणात पडतो, हे आजच्या खासगी आणि सामाजिक माध्यमांच्या बजबजाटामुळे आपण सारेच रोज पाहतो व जाणतो.

हंपी येथील विष्णू मंदिरातील रथ

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com

महाकाय भारतीय इतिहास, संस्कृती किंवा धर्मव्यवस्थांचं स्वरूप समजून घेण्यासाठी कोणतीही एकच एक साचेबद्ध अभ्यासप्रणाली पुरेशी पडत नाही. या अभ्यासासाठी कधी परस्परविसंगत, तर कधी एकमेकांवर साचल्या जाणाऱ्या किंवा पूरक ठरणाऱ्या अशा अभ्यासतत्त्वांचा आधार घ्यावा लागतो. या लेखमालेद्वारे भारतीय इतिहासाला समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील असे २५ चष्मे सादर करण्यात येतील..

राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमद्भतम् ।

केशवार्जुनयो: पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहु:।।

 

भगवद्गीता १८.७७

 

भगवद्गीतेतील शेवटच्या अध्यायातील हा श्लोक. ‘‘हे राजा, हा श्रीकृष्ण-अर्जुनाचा अद्भुत संवाद आठवून आठवून मी पुन:पुन्हा आनंदी होत आहे,’’ असे म्हणत ‘दिव्य दृष्टी’ लाभलेला सारथी संजय आपल्या राजाकडे स्वत:चे भारावलेपण व्यक्त करतो आहे. महाभारतातील युद्ध संजयाने आपल्या दिव्य दृष्टीने पाहून धृतराष्ट्राला त्याचे वर्णन केले. हे म्हणजे टोनी ग्रेग किंवा सुनील गावस्कर क्रिकेट मॅचची लाइव्ह कॉमेंट्री करतात तसेच संजयाने केले असे साधारणत: लोकांना वाटते. रामायण-महाभारत या ग्रंथांची ताकदच मुळी त्याच्या अद्भुत अशा दृश्यवर्णनांची आहे. त्यामुळे दूरचित्रवाणीवर ऐंशीच्या दशकातील या महाकाव्यांवरील मालिकांमधूनही लोकांनी तेच पाहिले.

खरे तर संस्कृत भाषेतील मूळ गीता वाचल्यास गीतेच्या सुरुवातीच्या श्लोकात ‘मामका पांडवाश्र्चैव किमकुर्वत।’ (‘धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाला जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय बरे केले?’) असा प्रश्न धृतराष्ट्र विचारतो. या संस्कृत श्लोकातील ‘अकुर्वत’ हे क्रियापद पूर्ण-भूतकालवाचक आहे. पुढील अनेक श्लोकांमध्ये अशी अनेक पूर्ण-भूतकाळवाचक रूपे (शंख वाजवला, पुढे गेला, खाली बसला, श्री भगवान म्हणाले, इत्यादी) गीतेत दिसतात. महाभारत कथेची सत्यासत्यता आणि आर्ष महाकाव्यांमधील अपूर्व-अद्भुताचा भाग आपण श्रद्धा आणि भावनांचा भाग म्हणून किंचित बाजूला ठेवल्यास, संजय बहुधा युद्ध पाहण्यास प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपस्थित असावा आणि युद्धोत्तर हकिगती सांगण्यासाठी आपल्या राजाला भेटायला जात असावा अशी शक्यता ग्रंथकारांनी नमूद केली असावी.

तसे पाहता महाभारत हा ग्रंथ म्हणजे प्राचीन काळात विशिष्ट राजघराण्याच्या इतिहासाची कहाणी सांगणारे एक माध्यम आहे. महाभारताचा ‘जय ते महाभारत’ हा ग्रंथविस्ताराचा साधारण इतिहास आपल्याला माहिती असतो. ग्रंथविस्ताराच्या प्रक्रियेत मूळ कथानकात पडलेली भर, अद्भुतरम्यता, उपाख्याने आणि रचनात्मक फेरबदल इत्यादी विषयांवर देशातील आणि विदेशातील पारंपरिकांनी, विद्यापीठातील अभ्यासकांनी केलेले विपुल काम आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहे. मात्र, तरीही महाभारताविषयी किंवा रामायणाविषयी जनसामान्यांच्या मनातील दृश्य कल्पना या मूळ ग्रंथातील तपशिलापेक्षा पुष्कळ वेगळ्या आणि अधिक अतिमानवीय  आहेत. याला कारण आहे- अर्थात दूरचित्रवाणीवरून झालेल्या नाटय़रूपांतराचे दर्शन!

माध्यमांचा प्रभाव समाजावर किती प्रमाणात पडतो, हे आजच्या खासगी आणि सामाजिक माध्यमांच्या बजबजाटामुळे आपण सारेच रोज पाहतो व जाणतो. सारथी संजय हा तर प्रत्यक्ष युद्धाचा वार्ताहर असल्यासारखा युद्धभूमीवर पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटना आणि थराराचे  यथास्मृत वर्णन राजाला सांगतो. तो तपशील महर्षी वेदव्यास-वैशंपायन-सौती-लोमहर्षण अशा विद्वान-सृजनशील ऋषी-विद्वान परंपरेतून पुढे शेकडो-हजारो सूत, भाट, शाहीर, पुराणिकांपर्यंत पोहोचतो. या मौखिक स्मृतिमाध्यमांद्वारे फोडणी, मसाला लागून वेगवेगळ्या संस्करणांद्वारे तो आपल्यापर्यंत येतो. आधुनिक पाश्चात्त्य तंत्रज्ञानातून निपजलेल्या दृश्यमाध्यमांनी या स्मृतींना आणि त्या स्मृतींतून आलेल्या धारणांना आणखी नवी परिमाणे प्रदान केली. या महाकाय कालप्रवाहात महाभारत- कथेतील आख्यानांच्या तपशिलांत त्या- त्या काळातील लोकरीती, धारणा, ज्ञाननिष्ठा, तत्त्वविचार आणि सामाजिक अभिसरणाचे लाखो संदर्भ आले आहेत.

हे संदर्भ लोकमानसात वेगवेगळ्या स्मृतींच्या रूपात रुजले, रूढ झाले. महाभारत खरेच घडले की घडलेच नाही, हे तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या खुणादेखील या स्मृतिव्यापारांनी ग्रासून टाकल्या. यातून अशी प्रतिमा निर्माण झाली की, हे महाकाव्य एकात्म असून, ते एकाच काळात एकाच व्यक्तीकडून रचले गेले आहे. ‘भारतीय समाजाचे सामूहिक चारित्र्य’ घडवण्याचे श्रेय महाभारताला दिले जाते. याचे कारण तपासताना हजारो वर्षांतील नानाविध संदर्भ, मतप्रवाह, सामाजिक अभिसरणाचे सारे भलेबुरे पॅटर्न्‍स महाभारताने जसे स्वीकारले, तसेच या समाजातदेखील ते आपसूक मुरले गेले, हे मान्य करावे लागते. यातून या उपखंडाच्या इतिहासाचे आणि समाजव्यवस्थेचे एका विशिष्ट आकाराने युक्त नसलेले, अनाकार (amorphous) असे स्वरूपदेखील आपसूक ठळक होते.

इतिहास, समाज, संस्कृती यांचा अभ्यास करताना स्मृती हे तत्त्व अभ्यासकीय चौकटीत महत्त्वाचे मानले जाते. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून जनस्मृतींचा अभ्यास मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, साहित्य-समीक्षक वगैरे मंडळी करत आली आहेत. इतिहास लेखनशास्त्राच्या क्षेत्रात १९८० च्या दशकापासून जनस्मृतींच्या अंगाने विश्लेषण अधिक जोर धरू लागल्याचे दिसून येते. भारतीय इतिहासाबाबत जनस्मृतींचा अभ्यास हा पाश्चात्त्य विश्वातील स्मृतिअभ्यासक्षेत्राच्या तुलनेत पुष्कळसा मागे आहे. मात्र, ‘इंडॉलॉजी’ या ज्ञानशाखेच्या प्रगतीसोबत वेगवेगळ्या समूहांच्या मौखिक-लिखित परंपरांचा अभ्यास झाला. त्यांनी जपलेल्या सांस्कृतिक स्मृतींची टिपणे घेतली गेली. त्यांची शास्त्रशुद्ध रीतीने चिकित्सा करण्यात येऊ  लागली. या अभ्यासातून वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील स्मृती भारतीय राजकारण, समाजकारण व संस्कृतिकारणात अनन्यसाधारण महत्त्व राखून आहेत याचा अंदाज अभ्यासकांना आला.

प्रारंभीच्या अभ्यासकांकडून उपखंडातील स्मृतिपर नोंदींची छाननी करताना स्मरणशक्तीवर बेतलेल्या, धार्मिक महत्त्व लाभलेल्या मौखिक साधनांचा- अर्थात् श्रुती आणि स्मृती अशा साधनांचा परामर्श घेतला गेला. ओघाने त्यासोबतच संस्कृत, पाली, प्राकृत भाषांतील अभिजात साहित्याचा अभ्यासदेखील झाल्याचे दिसून येते. श्रुती म्हणजे ऐकवून पाठ करावे लागलेले साहित्य. मौखिक माध्यमांविषयीचा आदर व्यक्त करताना परंपरेच्या पाईकांनी स्मृतिविद्येचा अतिरेकी वाटावा इतपत अभिमान बाळगल्याचे दिसून येते. हा अभिमान बाळगताना लिखित साधनांचा निषेध करण्यापर्यंत, त्यांची निंदा करण्यापर्यंत परंपरानिष्ठांची मजल गेल्याचे अनेकदा दिसून येते. यातून निर्माण झालेल्या अनेक तांत्रिक गुंतागुंतींमुळे दक्षिण आशियाई, हिंदू-जैन-बौद्ध परंपरांविषयीच्या स्मृतींचा अभ्यास पाश्चात्त्य स्मृतीविषयक अभ्यासपद्धतींपेक्षा काहीशा वेगळ्या अंगाने करावा लागत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. वेगवेगळ्या समाजांकडून जपल्या गेलेल्या, पुनरुज्जीवित केल्या गेलेल्या किंवा स्वत:च्या समाजाशी व कुटुंबाशी जोडल्या गेलेल्या स्मृती बहुस्तरीय आणि अनेकदा परस्परविरोधी असल्याचं दिसून येतं.

विविध समाजांकडून जपलेल्या, पुनरुज्जीवित केल्या गेलेल्या किंवा स्वत:च्या समाजाशी व कुटुंबाशी जोडल्या गेलेल्या स्मृती अनेकदा वेगवेगळ्या ऐतिहासिक कारणांनी प्रभावित झालेल्या दिसतात. म्हणून या सामाजिक-सांस्कृतिक स्मृती समजून घेताना, एकमेकांवर साचल्या जाताना (overlap) मिळणारे पूरक ऐतिहासिक घडामोडींचे संदर्भही लक्षात घ्यावे लागतात. या घडामोडी ज्या भूभागात घडत असतात, त्या भूभागातील समाज वेगवेगळ्या आहार-विहार-श्रद्धा-विचारसरणीविषयक धारणांच्या आधारे त्या स्मृतींची वेगवेगळी रूपडी (व्हर्जन्स) घेऊन वेगवेगळ्या दिशेने वाढत जातो. परिणामत: एकाच भूभागात राहणाऱ्या समाजातील लोकांनी वेगवेगळ्या काळात स्वीकारलेल्या ऐतिहासिक स्मृती एकमेकांशी विसंगत, परस्परविरोधी रूपात अभिव्यक्त होताना दिसतात.

आता या ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्मृती आणि समाजमनावर वेगवेगळ्या रीतीने पडणारा प्रभाव याची काही महत्त्वाची उदाहरणे आपण पाहू या. महाभारताप्रमाणेच रामायण हे भारतीय, विशेषत: हिंदुधर्मीय समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण काव्य. रामायणातील कथेची वेगवेगळी संस्करणे वेगवेगळ्या परंपरांतून पुढे आलेली दिसतात. कर्मठ वैदिक-पौराणिक विश्वापासून ते आदिवासी समाजातील लोककथांपर्यंत रामकथा ज्या वेगवेगळ्या कथानकांतून पुढे येते, ती कथानके आजच्या दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या प्रमाणित रामकथेचा प्रभाव असलेल्या जनमानसाला अस्वस्थ करू शकतात. विमलसूरी या जैन आचार्यानी प्रवर्तित केलेल्या ‘पउमचरिय’ या रामकथेची सुरुवातच मुळी ‘‘काही वानर बलाढय़, जगज्जेत्या राक्षस राजाला हरवू शकतील का? रावणासारखा जैन तत्त्वे पाळणारा, नीतिमान माणूस मांस-मद्य भक्षण करेल का? उकळते तेल कानात घातले असूनही, महाकाय हत्ती अंगावरून चालवले जात असतानादेखील कुंभकर्ण झोपेतून उठणार नाही का? मुळात तो सहा-सहा महिने झोपणे शक्य आहे का? रावण इंद्रादी देवांना बंदी बनवू शकेल का? हे सारं खोटं आहे आणि कल्पनेच्या पलीकडचे, अशक्यकोटीतील नाही का?’’ अशा प्रश्नांनी होते.

जैन परंपरेच्या मते, ‘‘राजा श्रेणिक याला गौतम नामक आचार्य सांगतात, आपल्या जैन आचार्याच्या मते- रावण दैत्य होता, नरभक्षक, मांसभक्षक होता वगैरे भाकडकथा मूर्ख कवींनी पसरवलेल्या आहेत.’’ ही जैन रामकथा रामाच्या रघुवंशाच्या वर्णनाने सुरू न होता रावणाच्या वंशाच्या वर्णनाने सुरू होते. रावण हा या संस्करणाच्या मते, जैनांच्या त्रिषष्टिशलाकापुरुषांपैकी (जैन परंपरेतील ६३ महात्म्यांपैकी) एक असून, त्याने तप:सामर्थ्यांच्या जोरावर विविध गूढविद्या आणि शस्त्रविद्या आत्मसात केल्या होत्या. सीतेचे अपहरण करण्याची चूक तो करत असला तरीही रावणाविषयी सहानुभूती किंवा प्रसंगी कौतुकपर भावना निर्माण व्हावी असे त्याचे चित्रण या ग्रंथातून झालेले दिसते. या कथेत रामदेखील ६३ महात्म्यांच्या श्रेणीत असून, तो तीन पत्नी असलेला जैन तपस्वी आहे. आणि जैन शिकवणीच्या प्रभावामुळे तो स्वत: रावणवध न करता लक्ष्मणाला रावणवध करायला लावतो आणि स्वत: कैवल्य (मोक्ष) प्राप्त करतो.

जैन परंपरा स्वत:ला अधिक तर्कनिष्ठ मानून वाल्मीकी रामायणातील अद्भुतरम्य भागाची संभावना मूर्खपणा म्हणून करते. अर्थात, या कथेमध्ये जैन मतानुरूप अद्भुतरम्यतेचा भाग येतोच, हा भाग अलाहिदा. वास्तविक जैन सांस्कृतिक विश्व आणि ‘हिंदू’/ पौराणिक-श्रद्धा विश्व हे एका विस्तृत भूभागात उदय पावलेले. जैनांनी वेदांचे आणि यज्ञादी ब्राह्मणी कर्मकांडांचे महत्त्व झुगारून दिले खरे, पण कुठल्याही दक्षिण आशियाई श्रद्धापरंपरेला साजेल असे स्वत:चे तत्त्वज्ञानपर श्रद्धाविश्व त्यातही निर्माण झाले. तिथे अर्हन अवस्था प्राप्त केलेले र्तीथकर, धर्माचार्य, सिद्ध, आचार्य, उवज्झाय अशी धर्माधिकार श्रेणी दिसून येते. अर्थात वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन इत्यादी धर्मव्यवस्था आणि त्यातील अधिकारांची उतरंड यांचा परामर्श आपण जात, बळ (power) या संकल्पनांची चर्चा करताना घेणार आहोतच. काही जैन रामकथांच्या संस्करणांतून सीता रामाची मुलगीच असल्याचे सांगितले गेले आहे. ‘दशरथजातक’ या बौद्ध रामकथेची कहाणी आणखी वेगळीच. या कथेत वाराणसीच्या दशरथ राजाचा पुत्र राम-पंडित हा बुद्धाचा पूर्वावतार असल्याचं नमूद केलं गेलं आहे. या बौद्ध संस्करणानुसार, सीता ही चक्क रामाची बहीण असल्याचं सांगितलं गेलं आहे.

कैकेयीला पित्याने दिलेल्या वचनाचा मान राखून राम, लक्ष्मण आणि सीता ही तीन भावंडे १२ वर्षे हिमालयात राहतात आणि १२ वर्षांनी अयोध्येत येऊन राज्यारोहण करतात. आदिवासी रामकथा किंवा महाभारतातील प्रसंगांवर बेतलेल्या काही लोकगीतांत नागर-भद्र समजल्या जाणाऱ्या समाजातील विधिनिषेध, लैंगिक धारणांच्या पलीकडे जाऊन पौराणिक पात्रे रंगवली गेली आहेत.

आहार, तत्त्वज्ञान, सामाजिक धारणा, श्रद्धा इत्यादी भेदांच्या आधारे समाजात वेगवेगळ्या लोकव्यवस्था, लोकश्रद्धा किंवा आचारप्रणाली निर्माण होतात. यातून निर्माण झालेल्या लोकस्मृतीसंबंधित लोकविश्वांच्या स्वतंत्र सामूहिक-राजकीय अस्तित्वांना चालना देण्यास कशा कारणीभूत ठरतात याचा अंदाज वरील उदाहरणांतून आपल्याला येऊ शकतो.

धार्मिक-राजकीय घडामोडी आणि त्या आधारावर निर्माण झालेल्या स्मृतींचे उदाहरण घेऊन आपण लेखाचा समारोप करू या. १९४७ सालची भारतीय उपखंडाची फाळणी ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक, हिंस्रता याचे प्रतीक मानली जाते. या भयकारी पर्वाच्या स्मृती भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील जनतेच्या मनात कधी परस्परांविषयी द्वेष निर्माण करतात, तर क्वचित गुगल-रियुनियनच्या सुप्रसिद्ध जाहिरातीतील फाळणीमुळे दुरावलेल्या मित्रांना ५०-६० वर्षांनी भेटताना पाहून मनाला कातर बनवतात. दोन्ही देश धर्मश्रद्धेच्या आधारावर विभागले गेले असले तरीही भाषा, आहाराच्या सवयी, सामाजिक-भौगोलिक रचनांतील अनेक समान वैशिष्टय़ांमुळे आणि समान इतिहासामुळे सामायिक सांस्कृतिक संचिताचे भागीदार ठरतात.

भारताला क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या पाकिस्तानच्या युद्धखोर लष्कराने स्वत:च्या क्षेपणास्त्रांची नावे गझनवी, घौरी, अब्दाली अशी ठेवली आहेत. रूढ ऐतिहासिक स्मृतींनुसार, या तिन्ही नावांनी प्रसिद्ध असलेले राजे भारतावर आक्रमण करून लुटालूट करणारी व्यक्तिमत्त्वे म्हणून प्रसिद्ध आहेत. भारताच्या ‘तबाही’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरलेली ही प्रतीके ज्या रूढ ऐतिहासिक स्मृती समोर ठेवून पाकिस्तानकडून वापरली जात आहेत, त्या स्मृतींची ऐतिहासिक छाननी केली असता मात्र या राजांनी नासधूस आणि हिंसेने नागवलेला बराचसा भूभाग आज पाकिस्तानच्या हद्दीतच येतो हे दिसून येईल. धर्म आणि इतिहास यांविषयीच्या आधुनिक राष्ट्रवादातून निर्मिल्या गेलेल्या स्मृती या दक्षिण आशियातील सामायिक सांस्कृतिक-वांशिक नातेसंबंधांना झाकोळून बसल्या आहेत. त्यामुळेच एकेकाळी आपल्या पूर्वजांना आणि मायभूमीला नागवलेल्या आक्रमकांच्या स्मृती धर्म-राष्ट्रभेदाच्या नावाखाली साजरा करायला लावण्याचे सामर्थ्य स्मृतींमध्ये असते हे यावरून दिसून येईल.

पिएर नोरा या अभ्यासकाने म्हटल्यानुसार, स्मृती म्हणजे एखाद्या विशिष्ट समूहाला (एका विशिष्ट काळाच्या, राजकारणाच्या संदर्भात उपयुक्त) हव्याशा अशा आठवणींना ‘पावित्र्य’ बहाल करते. त्या कृतक, सोयीस्कर पावित्र्याच्या जोरावर ती स्मृती अंध बनते आणि अधिकाधिक संकुचित, वैयक्तिक होत जाते. त्यामुळेच स्मृती आणि (शास्त्रशुद्ध लिहिला गेलेला) इतिहास या संकल्पना समानार्थी नसतात. स्मृती सोयीनुसार चलाखपणे वापरता येते, पुनरुज्जीवित करता येते किंवा तिचे दमन करता येते. तिच्या भागधारकांना जेवढे झेपते, हवे असते, तितके व तसेच ती स्वत:ला व्यक्त करते. मात्र, इतिहास हा त्या अर्थी कुणा एकाचा नसतो. त्याच्यात स्मृतींमधून व्यक्त होणारं जादुईपण नसल्याने तो नीरस असतो. पुन:पुन्हा तो कठोर विश्लेषण आणि चिकित्सेची कास धरतो.

इतिहासाचा अभ्यास करताना स्मृतींचे माहात्म्य नाकारता येत नाही, हे खरेच. मात्र, या स्मृतींचे शास्त्रशुद्ध रीतीने मूल्यमापन करताना भाषिक वैशिष्टय़े, सांस्कृतिक अनुबंध, समाजशास्त्रीय सिद्धांताच्या चौकटी आणि शास्त्रीय अभ्यासपद्धती इत्यादी आयुधे वापरून वेगवेगळ्या आयामांचा विचार करणे इतिहासकारासाठी आवश्यक असते. मानवी समाजाचे ज्ञात-अज्ञात पलू व उपजत स्वभाववृत्तींचा वेध घेताना समाजमनाचे  वेगवेगळे आयाम ऐतिहासिक घडामोडींच्या चौकटीतून तपासता येतात. यापैकी काही महत्त्वाच्या आयामांची चर्चा करताना हा ‘स्मृतिवेध’ निश्चितच उपयुक्त ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:22 am

Web Title: reality of magical memories lokrang itihaasa che chasme article abn 97
Next Stories
1 खेळ मांडला.. : इराणी खेळाडूंनाच देश नकोसा
2 पर्यावरणीय कथांचा नजराणा
3 माणसांच्या मुळांची शोधयात्रा
Just Now!
X