News Flash

राजधर्म

आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष चालू आहेत.

|| पराग कुलकर्णी

आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष चालू आहेत. भारत-पाकिस्तान, इस्राएल-पॅलेस्टिन, उत्तर आणि दक्षिण कोरिया, अमेरिका आणि चीन यांचे ‘ट्रेड वॉर’.. शीतयुद्ध संपले असे आपण म्हणत असलो तरी अमेरिका आणि रशिया यांचे एकमेकांवर चाललेले कुरघोडीचे प्रयत्न आणि सीरिया-इराकमध्ये तर कोण कोण, कोणाशी आणि का भांडतं आहे, याची तिथल्या नकाशासारखी रोज बदलणारी परिस्थिती! हा प्रत्येक संघर्ष समजावून घेताना त्याच्या इतिहासातून आपल्याला त्यामागची कारणे कळतात- आíथक, धार्मिक, भौगोलिक, वैचारिक असे आपण त्याला म्हणू शकतो. पण हे असे संघर्ष निर्माण होण्यात, वाढण्यात, कमी होण्यात आणि कधी कधी पूर्णपणे संपण्यात त्या राजकारणामागच्या विचारसरणीचा आणि तत्वज्ञानाचा एक मोठा वाटा असतो. अशी राजकारणाच्या संदर्भात नेहमी वापरली जाणारी एक व्यावहारिक संज्ञा आणि संकल्पना म्हणजे रिअलपॉलिटिक (Realpolitik).

१८५३ साली जर्मन राजकारणी आणि लेखक लुडविग वॉन रॉखाऊ याने त्याच्या पुस्तकातून हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला. रिअलपॉलिटिक म्हणजेच ‘रिअ‍ॅलिस्टिक पॉलिटिक्स’ किंवा वास्तववादी, व्यवहारी राजकारण. ‘ज्याप्रमाणे भौतिक जग गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार चालते, त्याच प्रमाणे सत्ता, सामथ्र्य, बळ यांवरच राजकारण चालते,’ असे सांगत रॉखाऊने रिअलपॉलिटिकची कल्पना मांडली. खरं तर याला पाश्र्वभूमी होती युरोप मधल्या १८४८ सालच्या उदारमतवादी लोकांच्या फसलेल्या क्रांतीची; ज्यात प्रस्थापित सरकारी व्यवस्थांनी आदर्शवादी उदारमतवाद्यांचे आंदोलन यशस्वी होऊ दिले नाही. केवळ उच्च आदर्श, मूल्ये, नतिकता असून उपयोगाची नाही, तर आजूबाजूच्या जगात टिकण्यासाठी त्याला व्यावहारिकतेची जोड हवी असाच त्याचा अर्थ. थोडक्यात, ‘बळी तो कान पिळी.’ जर आपण रिअलपॉलिटिकची व्याख्या काळजीपूर्वक बघितली, तर ही विचारसरणी नुसत्या आदर्शवादाला विरोध करते असे वाटू शकते. आणि हे एकप्रकारे खरे देखील आहे. याचे समर्थक याला व्यावहारिक विचारसरणी म्हणतात, तर विरोधक अनतिक, संधीसाधू आणि मूल्यांची चाड नसणारे राजकारण अशी त्याची संभावना करतात. यावरूनच या विचारसरणीची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.

रिअलपॉलिटिक हा शब्द जरी नंतर आला तरी युरोपला राजकीय वास्तववादाची ओळख त्या आधीच झाली होती. निकोलो मॅकियावेली (Niccolò Machiavelli) हा पंधराव्या शतकातील इटलीतला एक राजकारणी, मुत्सद्दी,  लेखक आणि कवी होता. ‘प्रिन्स’ या आपल्या पुस्तकातून राजकारणाबद्दलचे आणि विशेषत: राज्यकर्त्यांबद्दलचे विचार त्याने मांडले. मॅकियावेलीच्या म्हणण्यानुसार, एक चांगला माणूस असणे आणि एक चांगला नेता, राजकारणी असणे या पूर्णत: वेगळ्या गोष्टी आहेत. एका राज्यकर्त्यांचे काम असते आपल्या राज्याचे आणि पर्यायाने आपल्या जनतेचे अंतर्गत व बा संकटांपासून संरक्षण करणे. हे काम खूप आदर्शवादी, मूल्यांची चाड असणारा, पापभिरू माणूस करू शकत नाही; आणि त्यासाठी व्यवहारी, कपट कारस्थानात माहीर असलेला आणि प्रसंगी निष्ठुर होऊ शकणार धूर्त माणूसच हवा, असे त्याचे म्हणणे होते. सामान्य जनतेला राज्यकर्त्यांबद्दल प्रेम वाटले पाहिजे की भीती? याचे उत्तर मॅकियावेली- दोन्ही एकाच वेळेस मिळणे शक्य नसेल तर भीती- असे देतो. अर्थात भीतीचा अतिरेकही चांगला नाही. कारण मग तुमची प्रजा तुमच्याविरोधात बंड करू शकते ही त्यामागची व्यावहारिकता! या अशा विचारसरणीला विरोध झाला, चर्चने त्यावर बंदी आणली आणि आजही इंग्रजीमधे ‘मॅकियावेलीन’ (Machiavellian) हा शब्द धूर्तता, लबाडी, कपटीपणा या नकारात्मक अर्थासाठी वापरला जातो.

हे झाले पाश्चिमात्य जगात. पण हा सत्तेचा, सामर्थ्यांच्या राजकारणाचा खेळ इतका जुना आहे की, प्राचीन पौर्वात्य संस्कृतीत त्याबद्दल विचारमंथन झाले नसते तरच नवल. राजकारणाचे, युद्धाचे नियम सांगणारे चायनीज तत्वज्ञ सन त्झु याचे ‘आर्ट ऑफ वॉर’ आणि भारतातील चाणक्याचे ‘अर्थशास्त्र’ हे या विषयातील पौर्वात्य देशांचं मौलिक योगदान. ‘अर्थशास्त्रा’त राज्य कसे चालवावे यासंबंधीच्या सर्व पलूंचे अत्यंत व्यवहारी आणि विस्तृत विवेचन केले आहे. साम, दाम, दंड, भेद ही नीती त्याचीच साक्ष देतात. एवढंच कशाला, पाश्चिमात्य विचारवंत मॅक्स वेबरच्या मते, चाणक्यनीतीसमोर मॅकियावेलीचे विचार एकदमच निरुपद्रवी आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती समजावून घेण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी रिअलपॉलिटिकचा उपयोग अमेरिकेसारख्या देशांनी केला. वर वर आदर्शवाद आणि आतून आपल्या फायद्याचे, जगात आपले अस्तित्व टिकवणारे व सामथ्र्य वाढवणारे धोरण अशा स्वरूपात हे राबवण्यात आले. लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्क या मूल्यांचा पुरस्कार करणारे अमेरिकी धोरण अनेक ठिकाणी हुकूमशहांच्या पाठीशी होते आणि जगाच्या काना-कोपऱ्यात कोणाशी तरी छुपेपणाने किंवा खुलेपणाने लढत होते, या मागचं कारणही तेच होतं. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर १९४७ मधे स्वतंत्र झालेल्या भारताची सुरुवात आंतरराष्ट्रीय राजकारणात आदर्शवादी विचारसरणीनेच झाली. अलिप्त राष्ट्रगट चळवळ (NAM – Non- Aligned Movement- अमेरिका, रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होण्याचं धोरण) असो, की सुरक्षा परिषदेत भारताऐवजी चीनला स्थान मिळावे म्हणून आपणच दाखवलेला उत्साह असो. यामागे व्यावहारिक राजकारणापेक्षा आदर्शवादी, मूल्याधारित भूमिका जास्त होती. पण पुढे चीन, पाकिस्तान सोबत झालेली युद्धं, नव्वदच्या दशकात साम्यवादी रशियाचे झालेले विघटन आणि त्याच वेळेस भारतातील आíथक सुधारणांमुळे सुरू झालेलं जागतिकीकरण याच्या प्रभावामुळे, भारत पुन्हा एकदा जगाशी जोडला जाऊ लागला. १९९१ नंतर हळूहळू परराष्ट्रनीतीमध्ये व्यावहारिकतेकडे भारतानं पाऊल टाकणं सुरू केलं आणि आजचा ‘ये नया इंडिया है..’ म्हणणारे आपण त्याच रस्त्यावर अजून थोडं पुढे आल्याचेच हे द्योतक आहे.

आदर्श राजा, आदर्श राज्यकारभार आणि आदर्श युद्ध याची आपली कल्पना म्हणजे रामायण! मर्यादापुरुषोत्तम राम, रामराज्य आणि चांगलं विरुद्ध वाईट अशी सरळ सरळ विभागणी असलेलं राम आणि रावण यांचं युद्ध! पण हेच आपण महाभारताच्या बाबतीत म्हणू शकू का? पांडवांची बाजू न्यायाची होती असे जरी आपण गृहीत धरले, तरी तो न्याय मिळवण्यासाठी त्यांनाही अनेक नीतीनियम मोडावेच लागले. त्यामुळे एकप्रकारे व्यावहारिक राजकारणाने निर्माण झालेला महाभारतातला संघर्ष हा देव-दानव, चांगले-वाईट असा आदर्शवादी न राहता, नतिकतेचे आणि व्यावहारिकतेचे अवघड प्रश्न विचारणारा एक गुंतागुंतीचा मानवी संघर्ष होतो. माणसाच्या बुद्धीने निर्माण केलेले आदर्श, मूल्य, नीतिमत्ता आणि माणसानेच निर्माण केलेली आजूबाजूची परिस्थिती, याचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत असे संघर्ष चालूच राहणार. या संघर्षांकडे  केवळ चांगले विरुद्ध वाईट असं न पाहता, कोणासाठी काय चांगलं आणि काय वाईट असे पाहणेच जास्त व्यवहारी ठरेल. नाही का?

parag2211@gmail.com

राजकीय वास्तववादाची तत्त्वे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक हॅन्स मॉर्गनथाऊ  यांनी मांडलेली राजकीय वास्तववादाची तत्त्वे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 12:04 am

Web Title: realpolitik realistic politics mpg 94
Next Stories
1 शंभरावे नाटय़संमेलन : काही अपेक्षा
2 कलेतून स्वातंत्र्याकडे…
3 विकासाचे भकास चित्र
Just Now!
X