News Flash

टपालकी : उद्याची पर्वा

भविष्यात डोकावण्याचा हा भुंगा माझ्या मागे तू लावून दिलास आणि देशाऐवजी भविष्यात मी कुठे, कसा असेन याचा विचार करू लागलो.

(संग्रहित छायाचित्र)

सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यांस,

सदू धांदरफळेचा नमस्कार,

काल बायकोने रद्दीवाल्याला देण्यासाठी काढलेल्या पेपरच्या गठ्ठय़ात तुझं एक जुनं पत्र मिळालं. वाईट वाटून घेऊ नकोस, मी पाठवलेल्या पत्रांची तुझ्या घरीही अशीच वासलात लावली जात असेल याची मला कल्पना आहे. अरे, जिथे नवऱ्यांचीच पत्रास ठेवली जात नाही तिथे पत्रांची काय पत्रास! कुणीतरी म्हटले आहे की जिथे वारंवार आपला अपमान होतो तिथे शहाण्या माणसाने पुन्हा जाऊ नये. आपण शहाणे नाहीत हे बरे आहे, नाहीतर आपले स्वत:च्या घरी जायचेच वांधे झाले असते. असो. तर तुझे ते पत्र चाळत असताना त्यातील एके ठिकाणी तू, दहा वर्षांनंतर आपल्या देशाचा चेहरा कसा असेल याबद्दल माझं मत विचारलं होतंस आणि मी नेहमीच्या वेंधळेपणाने तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं विसरून गेलो होतो. अरे नेहमीची आठ दहाची चर्चगेट लोकल आज कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल हेदेखील ज्याला सांगता येत नाही त्याला आठ-दहा वर्षांनंतरच्या भारताविषयी मत विचारणं म्हणजे सीतारामनबाईंकडून घसरणाऱ्या जीडीपीवर ठोस उपायांची अपेक्षा करण्याइतकंच भाबडेपणाचं आहे.

अरे, आज सगळं काही इतकं अनिश्चित झालेलं आहे, उद्याचाच काय अगदी पुढच्या क्षणाचा भरवसा देता येत नाही (म्हणूनच मी मुख्य जेवणाआधी स्वीट-डिश खाऊन घेतो आणि लोकांना वाटतं मी अधाशी आहे) अशा वेळेला तुझ्यामाझ्यासारखा माणूस भविष्याविषयी काय आडाखे बांधणार? अरे, काल मी एके ठिकाणी सत्संगाला गेलो होतो. तिथले ते प्रवचनकार स्वामीजी म्हणाले, ‘‘जीवन क्षणभंगुर आहे. माणूस हा नियतीच्या हातातली कठपुतळी आहे. माणूस आज आहे तर उद्या नाही’’ वगैरे, वगैरे.. स्वामीजी आपले पाण्याची पाइपलाइन फुटल्यासारखे बोलत होते आणि मी डोळे मिटून ऐकत होतो. अगदी तल्लीन झालो होतो. घरी आलेली विजेची, गॅसची, सोसायटीची, मोबाइलची बिलं, बँकेने पाठवलेली कर्जफेडीची नोटीस हे सगळं मला माझ्या मिटलेल्या डोळ्यासमोर दिसू लागलं. स्वामीजी म्हणतात तसं खरंच घडलं तर या सगळ्या बिलांच्या परतफेडीच्या झंझटीतून मुक्तता होईल या कल्पनेनेच नकळत माझ्या चेहऱ्यावर स्मित फुललं. स्वामीजींच्या तीक्ष्ण नजरेनं ते ताडलं आणि माझ्याकडे बोट दाखवून ते भक्तांना म्हणाले, ‘‘या माणसाच्या चेहऱ्यावरील तेज पाहा, आत्मा जेव्हा परमात्म्याशी बोलू लागतो तेव्हाच चेहऱ्यावर असे तेज येते.’’ काय बोलणार बोल!

भविष्यात डोकावण्याचा हा भुंगा माझ्या मागे तू लावून दिलास आणि देशाऐवजी भविष्यात मी कुठे, कसा असेन याचा विचार करू लागलो. दादू तुला माहीतच आहे, सध्या माझे दिवस वाईट आहेत. नोकरीत फार काही चांगलं चाललेलं नाहीये. आर्थिक परिस्थिती बेतास बात आहे. सोसायटी, ट्रेनचा ग्रुप आणि ऑफिसमधील चार-सहा टाळकी सोडली तर मला या शहरात कुत्रंदेखील ओळखत नाही. पण मला विश्वास आहे, एक दिवस असा येईल की मी नक्की मोठा माणूस बनेन, माझ्याकडे नाव, पसा, इज्जत, शोहरत आणि माँ असं सगळं काही असेल. मी इतका मोठा माणूस बनेन की मी मेल्यावर कदाचित शहरातील सर्व दुकानं जबरदस्तीने बंद ठेवली जातील, मी मेल्यावर कदाचित फेसबुकवर माझ्यासाठी कविता लिहिल्या जातील, मी मेल्यावर कदाचित माझ्याही अस्थिकलशाचे राजकारण होईल, मी मेल्यावर कदाचित माझ्याही मुला-पुतण्याची वारसा हक्कावरून भांडणं होतील, मी मेल्यावर कदाचित सरकारी तिजोरीतील हजारो करोडो रुपये खर्चून माझं अंतराळात स्मारक उभारलं जाईल, मी मेल्यावर कदाचित माझ्याही जीवनावर सिनेमा बनेल आणि मला पक्की खात्री आहे की त्या सिनेमात माझा बालपणीचा रोल महागुरू सचिन पिळगावकर आणि तरुणपणीचा रोल सुबोध भावेच करील! आणि असा सिनेमा बनलाच तर त्यातील माझ्या जिवलग मित्राच्या रोलसाठी स्वप्निल जोशीलाच घ्यावं अशी माझी शेवटून दुसरी इच्छा आहे (हल्ली मेल्यावर, ‘माझा मोबाइल कुणी पाहण्याआधी फॉरमॅट करा’ हीच सगळ्यांची शेवटची इच्छा असते, हे तुला माहीत असेलच)असो.

मित्रा, मागे वळून न पाहणारे पुढे जाऊन धडपडतात आणि फार पुढे पाहायला गेलो तर पायाखाली नक्की ठेच लागते हा अनुभव गाठीशी असल्याने मी नाइलाजाने वर्तमानात जगणारा माणूस आहे. तू विचारलेल्या भारताच्या भविष्याविषयी जरा जनमनाचा कानोसा घ्यावा म्हणून, मी एका काँग्रेसी भक्ताला उद्याच्या भारताविषयी विचारलं तर तो म्हणाला,‘‘ या सनातनी लोकांचं राज्य जर राहिलं तर भारताचं भविष्य टोटल अंधकारमय आहे.’’ तेवढय़ात आमचं संभाषण ऐकणारा बाजूला उभा असलेला भाजपाचा भक्त म्हणाला, ‘‘मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्तानचं भवितव्य उज्ज्वल आहे.’’ त्यानंतर त्याने ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल!’ हा सुविचारही काही कारण नसताना आम्हाला ऐकवला. तुला सांगतो दादू, दोन्ही बाजूंच्या भक्तांना हा अतिआत्मविश्वास कुठून येतो तेच मला समजत नाही. (अतिआत्मविश्वास कधीही धोक्याचाच रे. कालपरवा, आपल्याकडे १७५ जण आहेत म्हणणाऱ्यांचं काय झालंय बघितलंस ना तू!). दादू, रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल असेलही, नसेलही.. पण रात्रीच्या स्वयंपाकात उद्याचा नाश्ताकाल मात्र असतो इतकंच मला ठाऊक आहे.

मला असं वाटतं की, भविष्यात जर आपल्या देशाने प्रगती करावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण काळानुसार बदललं पाहिजे. जुन्या प्रथा, परंपरा, प्रतीकं यांनाच जर कवटाळून बसलो तर आपण नव्या युगाच्या नव्या अपेक्षांना कसा न्याय देणार आहोत? न्यायावरून आठवलं, न्यायदेवतेच्या हातात अजूनही ती जुनाट तागडी ठेवण्यात काय हशील आहे रे? आपण तंत्रज्ञानात इतकी प्रगती केलीय, तिच्या हाती एक चायनीज इलेक्ट्रॉनिक वेइंग-स्केल आपण देऊ शकत नाही का? यार दादू, आपल्या सरकारी खात्यांचा कारभार बदलत्या जगाच्या गरजेप्रमाणे अपडेट होत नाही ही खरी चिंतेची बाब आहे. आता आरटीओ डिपार्टमेंटचंच उदाहरण घे ना (आरटीओ म्हणजे रिश्वत टेकर्स ऑफिस हा जुना जोक झाला दाद्या, मी वाहतूक खात्याविषयी बोलतोय). तर हे आरटीओवाले अजूनही दुचाकीचं ड्रायव्हिंग लायसन्स देताना उमेदवाराला मदानात इंग्रजी आठ आकडय़ाप्रमाणे गाडी चालवायला लावतात आणि उमेदवाराला तेवढं जमलं की देऊन टाकतात लायसन्स. अरे पण त्या इसमाला, त्याचा खांदा आणि डोक्याच्या मध्ये मोबाइल पकडून गाडी चालवता चालवता मोबाइलवर बोलता येतं की नाही ही किमान अर्हता तर तपासून बघाल की नाही!

तर ते जाऊ दे. नाहीतर तुला वाटेल की हा सदू आपल्या पत्राला उत्तर द्यायचं सोडून स्वत:चेच घोडे दामटवत असतो. तर तुझा प्रश्न असा होता की, की दहा वर्षांनंतर आपल्या देशाचा चेहरा कसा असेल? हे बघ दादू, मला नाही वाटत दहा वर्षांत आपल्याकडे फारसा फरक पडेल. फार फार तर काय होईल? ऑनलाइन चिरीमिरी देता यावी म्हणून प्रत्येक सरकारी खाते आपापले अ‍ॅप बनवील. अमुक मायक्रॉनपर्यंतच्या प्लास्टिक पिशव्या चालतील आणि तमुक मायक्रॉनच्या चालणार नाहीत हा घोळ चालूच राहील.

बोफोर्स, राफेल, अच्छे दिन आणि राम मंदिर याच मुद्दय़ांवर निवडणुका लढल्या जातील. आज आमदार पळवले जातात, पुढे राज्यपाल पळवून नेले जातील. जीएसटी कायद्यामध्ये पाचेक हजारावी सुधारणा केली जाईल. आरक्षणाची टक्केवारी शंभर टक्क्यांच्या वर गेलेली असेल. ट्रॅफिकचे नियम तोडणारे ड्रोन पकडण्यासाठी ट्रॅफिक पोलीस झाडाआड उभे राहण्याऐवजी झाडावर लपून बसून राहतील, सलमान खान वयाच्या साठीतही कॉलेजकुमाराची भूमिका करत असेल. अक्षय कुमार आणि कंगना राणावतच्या सिनेमात निर्माता म्हणून बाकायदा ‘भारत सरकार’चं नाव येईल. पाकिस्तानी अतिरेकी आपल्या देशात दहशत माजवत असतील आणि आपण लाल किल्ल्यावरून इशारे देत राहू. जगभरात शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावत राहतील आणि ते शोध आम्हाला हजारो वर्षांपासून माहीत होते असे दावेही आपण करतच राहू. पुतळे बनत राहतील. पुतळ्याच्या उंचीवरून नेत्यांची उंची मोजण्याची प्रथाही सुरूच राहील. आपलं भविष्य किती बदलेल सांगता येत नाही, पण सत्तेत असलेल्या पक्षाच्या लहरीप्रमाणे आपला इतिहास बदलेल हे मात्र नक्की.

दादू, बाकी काही म्हण, आपल्याकडे केवळ भारताचे भविष्य बदलायचीच नव्हे तर जगाचे भविष्य बदलून त्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असली तरी आपण ते मनावर न घेता आजच्यासारखेच वागत राहिलो तर फारतर पाठय़पुस्तकातला इतिहास बदलू शकू. ज्यांना भविष्यातला भारत घडवायचाय त्यांचे विचार, कृती आणि दृष्टी या तिन्ही गोष्टी काळाच्या पुढे धावणाऱ्या असाव्यात. एक पाय भूतकाळात आणि एक पाय भविष्यकाळात ठेवला तर वर्तमानकाळाची विजार अवघड जागी फाटणार हे राज्यकर्त्यांइतकेच तुझ्यामाझ्यासारख्या सामान्य माणसांना जितक्या लवकर समजेल, उमजेल तितके बरे!

तुझा मित्र,

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 4:40 am

Web Title: regard for tomorrow tapalki article abn 97
Next Stories
1 प्रगाढ शांतीचे अमूर्त रूप
2 विशी..तिशी..चाळिशी.. : ती
3 नाटकवाला : धमाल बालनाटय़ं
Just Now!
X