डॉ. चैतन्य कुंटे – keshavchaitanya@gmail.com

डॉ. चैतन्य कुंटे.. संगीतकार, संगीत अभ्यासक. संगीताच्या मानवी संस्कृतीशी असलेल्या संबंधांचे चिंतक. संगीताने माणसाचं आयुष्य व्यापले आहे, त्याला धर्म कसे अपवाद ठरणार? भजन, कीर्तन, अभंग, गुरुबानी, सुफी संगीत अशा नानाविध प्रकारे विविध धर्मानी संगीत जोपासलं, फुलवलं.. त्याचा धांडोळा घेणारं पाक्षिक सदर.

मी : धर्म आणि संगीताच्या बाबतीत मला ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ ही म्हण आठवते.

कुणी एक : हा काय चमत्कारिक संबंध जोडतोस तू?

मी जरा हसत : ‘माय मरो आणि मावशी जगो’ अशी अजून एक म्हणही आठवते बरं!

कुणी दुसरा : फारच तऱ्हेवाईक दिसतोस तू. आमचा पवित्र धर्म आणि या म्हणी? संगीताचं वगैरे ठीक आहे.. ते तर बोलूनचालून चार घटका मनोरंजन असतं. पण धर्म? (ज्याबद्दल कुणी एक अक्षर जरी काढलं की आमच्या अस्मिता की काय म्हणतात त्या लग्गेच दुखावल्या जातात. आम्ही फार हळवे आहोत हं!) धर्माबद्दल म्हणी आठवून हसणंबिसणं हे अतीच झालं हं. मार खायची लक्षणं आहेत ही!

मी : अहो, रागावू नका असे. मी तुमच्या पवित्र धर्माला हसत नाहीये. उलट, या म्हणींत धर्म आणि संगीत यांच्या संबंधांची थोरवीच आहे असं मी सांगू पाहतोय!

वाचकहो, या संवादाचा खुलासा करतो.

धर्मसंगीताचे आविष्कार कधी अंतर्मुख करणारे, शांतवणारे असतात; तर कधी बहिर्मुख, चेतवणारेही असतात. कशा प्रकारचे संगीत कोणत्या प्रयोजनासाठी याची निश्चित बांधणी धर्मसंस्थांनी शतकानुशतके केली आहे. त्यामुळे धर्मसंगीताच्या काही प्रकारांत शेकडो वर्षे कोणतेही बदल झाले नाहीत, तर काही प्रकार नित्यनूतन रूप धारण करतात. धर्मसंस्था जसे मानवाच्या वर्तनाचे नैतिक विधिनिषेध तयार करते, तसेच संगीताबद्दलचेही काही ठाम ग्रह ती तयार करते. म्हणूनच धर्मसंस्थेने काही प्रकारचे संगीत ग्रा मानले, तर काही प्रकारचे त्याज्य ठरवले. काही संगीताला धर्म मनमोकळेपणाने कवेत घेतो, तर काही संगीतप्रकारांना अगदी झिडकारून दूर लोटतो. याचमुळे धर्म आणि संगीताचे नाते काहीसे दुटप्पी होते!

एकीकडे धर्म आपल्या सोयीसाठी संगीताला वापरून घेतो, तर दुसरीकडे संगीतकारही स्वत:ला मोठय़ा समूहापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने भक्तिसंगीताचा सूर लावतात. आणि मजा अशी की, धर्मसंस्था हवे तेव्हा संगीताचा निषेध करून मोकळी होते; आणि संगीतकारही आपला कार्यभाग साधला की भक्तिगीतांपासून अलगद बाजूला सरकतात!

धर्म आणि संगीताच्या नात्यात एक प्रकारचे द्वंद्व दिसते. संस्कृतशास्त्री ग. उ. थिटे यांनी नमूद केले आहे की, संगीतातील अलौकिक सामथ्र्य लक्षात घेऊन वैदिक काळात यज्ञविधीतील संगीतास पवित्र, पूज्य मानले होते; परंतु त्याखेरीजच्या मनोरंजक संगीताचा निषेध केला होता. मार्गीसंगीत असलेले सामगायन हे जणू देवांपर्यंत पोचवणारे, म्हणून पवित्र मानले. उलट, लौकिक, मनोरंजक संगीत हे माणसाचे चित्त विचलित करते, भावना चाळवते आणि पारलौकिकापासून त्यास दूर करते, म्हणून असे ‘वैषयिक’ देशीसंगीत हे त्याज्य मानले. इस्लामनेही ‘मौसिकी हराम’ म्हणजे संगीत हे निषिद्ध आहे असा इशारा दिला. मात्र, सुफी संप्रदायाने संगीताच्या आधारे धर्मप्रचार ग्रा मानला. बौद्ध धर्मही एकीकडे उपासनेत मंत्रोच्चार, विशिष्ट वाद्यांचे नाद असे संगीत मान्य करतो आणि दुसरीकडे ‘अट्ठसील’ प्रार्थनेत ‘नच्च गीत वादित विसुक दस्सन माला गंधविलेपन धारणमंडन विभूसनट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी’ (नाच, गाणे-बजावणे, नाटक-तमाशे, मालागंधविलेपन, दागदागिने या सर्वापासून मी अलिप्त राहीन.) अशी शपथ घ्यायला लावतो!

मानवाच्या हृदयपरिवर्तनाचे काम भारी अवघड. हे काम भाषणातून करायला जेवढी ताकद लागेल, त्याच्या निम्म्याच श्रमांत व वेळेत ते काम संगीत करते! शेकडो शब्दांचे घण घालून जे पाषाणहृदय द्रवत नाही, ते चार मधाळ स्वर कानी पडले की लगेच पाघळते. संगीताचे हे अद्भुत सामथ्र्य धर्मप्रणालीने हेरले नाही तरच नवल! मग धर्मप्रणाली म्हणते, ‘आमच्या नैतिक तत्त्वांचा प्रसार मोठय़ा समुदायात करायचा आहे म्हणून आम्हाला संगीत हवे. पण तेवढय़ापुरतेच. लोकांच्या अंत:करणात शिरण्याचे काम झाले की मग संगीताला बाजूला ठेवणेच बरे. कारण जरा खांद्यावर घेतले की हे बाळ डोक्यावरच बसते!’ संगीत हे माणसाला बहकवते, अगदी खुळे करते. म्हणूनच धर्माचं संगीताशी पटत नाही. मात्र, संगीतासारखे प्रभावी संमोहनास्त्र पूर्णत: टाकण्याचीही धर्माची इच्छा नसते. म्हणून संगीतावाचून धर्माला करमतही नाही. अशी ही धर्म-संगीताच्या नात्यातील ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ची मेख आहे.

धर्मसंगीताच्या बाबतीत नैतिक तत्त्वे ही ‘माय’, तर भक्तिपदे ही ‘मावशी’! नैतिक तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या डोक्यावरून गेले तरी रसाळ भक्तिपदांतून त्याचे उद्बोधन होत राहते. म्हणूनच तर ‘ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ’ असे म्हटले आहे ना! नवविधा भक्तीत वरून दुसरे स्थान ‘कीर्तनभक्ती’ला मिळाले आहे. भजनाच्या आळवणीतून तात्त्विक बोध जरी झाला नाही, तरी देवाच्या समीप आहोत अशी भावना सतत होते. याचमुळे मला ‘माय मरो, मावशी जगो’ ही म्हण धर्मसंगीताच्या संदर्भात आठवते.

जर्मन तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्‍स याने ‘धर्म ही अफू आहे’ असे विधान केले होते. (एखाद्या मोठय़ा विधानातील लहानसा भाग उचलून तेवढय़ाचा विपर्यासजनक अर्थ लावला जाण्याचा हा उत्तम नमुना आहे. मार्क्‍सने केलेले मूळ विधान आणि त्याचा पूर्ण संदर्भाने लागणारा अर्थ खूपच वेगळा आहे.) धर्म म्हणजे अफू मानलीच, तर त्या अफूच्या नशेच्या श्रेयाचा मोठा वाटा धर्मसंगीताचा आहे! कारण धर्म आणि संगीताची सांगड हीच मुळी एका मानसशास्त्रीय पायावर घातली गेली आहे.

एकटी व्यक्ती आपल्या बुद्धीनुसार स्वतंत्र विचार करते, सहसा इतरांना जुमानत नाही. मात्र, मोठय़ा समूहाच्या विचाराचा दबाव तयार झाला की त्यापुढे एकटय़ादुकटय़ाचे काही चालत नाही. हे जाणूनच धर्मयंत्रणा समूहभारित विचारांची, सर्वानी एकाच रीतीने करण्याच्या आचारांची कडक अशी तटबंदी तयार करते. एकदा का सामूहिक विचार-आचारांची अशी तटबंदी तयार झाली की धर्मतत्त्वे सुरळीतपणे, बिनधोकपणे प्रवाहित करता येतात. हे काम साधण्यासाठी संगीतासारखी कला धर्म आपलीशी करतो. एका धर्माच्या ध्वजाखाली मोठय़ा समुदायाला एकत्रित करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून संगीताचा वापर जवळपास सर्वच पंथांनी, संप्रदायांनी केला आहे.

संगीतात एक खास शक्ती असते. स्वर माणसाला गुंगवतात; तर लय एक तंद्री, नशा तयार करते. स्वर-लयीचे हे ‘मादक चाटण’ चाखलेला माणूस स्वत:चे भान हरपून बसतोच! स्वत्त्व विसरायला लावणारी, एक संमोहित अवस्था निर्माण करणारी ही संगीताची शक्ती ओळखूनच तर धर्माने संगीताला आपलेसे केले. संगीताच्या संमोहक गिलाव्याचा वापर करून सुटय़ा सुटय़ा व्यक्तिमनांचे चिरे सांधून एकसंध अशी लोकमानसाची भिंत उभी करण्याचे काम धर्मसंगीत मोठय़ा चतुराईने करते! वैयक्तिक, स्वतंत्र बुद्धीला संगीताच्या संमोहनातून शह दिला जातो आणि लोकमानसाच्या घट्ट जाळ्यात तिला बंदिस्त केले जाते. आणि म्हणूनच धर्मसंगीतात समूहाने गाण्याच्या गीतप्रकारांची रेलचेल आहे.

योजक वापरातून धर्मसंगीत व्यक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव बोथट करते. हे संगीत आपण एका समुदायाचा भाग आहोत अशी जाणीव रुजवत व्यक्तीचे ‘स्व’त्त्व तिला काही वेळापुरते का होईना, विसरायला भाग पाडते. एका कळपाचा भाग असल्याची ही जाणीव माणसाला आपल्या अनामिक आदिम भयापासून मुक्त करते, आश्वस्त करते. समूहात सहभागी व्यक्तींत एकल संगीत आविष्काराची आकांक्षा नसते. उलट, समूहाच्या स्वरात स्वर मिसळल्याने आपण या समूहाचाच भाग असल्याची, सुरक्षिततेची भावना तयार होते. अर्थातच इथे लक्षात येते की समूहातील अशी सुरक्षेची उबदार भावना देणारं हे संगीत म्हणजे धर्मप्रणालीच्या विचारपूर्वक आखणीचा मूलभूत भाग आहे. म्हणूनच ‘कोणताही धर्म त्याने निर्माण केलेल्या धर्मसंगीताशिवाय वाढू वा टिकू शकत नाही’ असे एक सैद्धांतिक विधान करता येते.

शांतवणारी श्रवणसुखद प्रार्थना, भक्तिगीते आपण अनुभवतो. पण प्रार्थनास्थळांत अनेकदा जोरजोरात बडवलेले तास, टोल, घंटा, ढोल, फुंकलेले शंख आणि समूहाचा उच्चरव हेही तुम्ही अनुभवले असेलच. धर्मसंगीताच्या सामूहिक आविष्कारांत अनेकदा असा हेतुपुरस्सर गोंगाट वा कोलाहलही असतो. हा गोंगाट मनाला काही काळापुरता बधिर करतो आणि व्यक्ती ही त्या तात्पुरत्या वेळेकरता विचारहीन, उन्मादी व तरीही आश्वस्त होते. ही बधिर, विचारहीन स्थिती निर्माण होणे हादेखील धर्मास आवश्यक वाटणाऱ्या सामूहिक जाणिवेचा भाग असतो. ही जाणीव माणसाला समूहाशी सतत जोडत राहते आणि त्याचे पर्यवसान त्या समूहाने अंगीकारलेले विशिष्ट आचारविचारही सहजपणे स्वीकारण्यात होते. धर्मसंगीतात व्यक्तीला असे ‘सामूहिक प्राणी’ बनविण्याची विलक्षण मोठी ताकद असते!