‘बिकट वाट’नंतर ‘आयएनटी’साठी मी आणखी एक नाटक बसवले. नील सायमनच्या ‘द ऑड कपल’ या तुफान विनोदी कॉमेडीचा अनुवाद ‘तुझी माझी जोडी’. हेच नाटक मी दिल्लीला मराठी आणि हिंदी भाषांमधून बसवले होते, तेव्हा ते पुन्हा एकवार उभं करणं, हा फारच सोपा जिम्मा होता. ‘बिकट वाट’नंतर ‘..जोडी’ बसवणं म्हणजे बुद्धिबळाच्या सामन्यानंतर भिकारसावकारचा डाव मांडण्यागत होतं. प्रयोग नेटका झाला. अरुणने त्याच्या नेहमीच्या सराईतपणाने बबनची भूमिका केली. कटकटय़ा, भाबडय़ा भास्करला माधव वाटवेने साकार केला. या नाटकाच्या निमित्ताने या रंगभूमीच्या कट्टर पाइकाशी छान ओळख झाली. त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली.
पॅरिसहून आल्या आल्या मी ‘नांदा सौख्य भरे’हा खेळ लिहिला होता. या खेळात सांसारिक डावपेच खुलवले होते. स्टेजवरचे लुटुपुटीच्या नवराबायकोच्या भूमिकेत खऱ्याखुऱ्या जोडीदारांना-अरुणला आणि मला पाहून प्रेक्षकांना गंमत वाटत असे. या रिव्ह्य़ूला कल्पनेबाहेर दाद मिळाली. लेखणी आता पुन्हा शिवशिवू लागली होती. ‘नांदा’च्या यशाने प्रेरित होऊन मी एक नवा खेळ लिहिला.
सेन नदीच्या साक्षीने मी पाहिलेले नानाविध रिव्ह्य़ू माझ्या मनात कायमचे घर करून होते. हा एक विलक्षण, मोहक, बेबंद असा नाटय़प्रकार आहे. वारा प्यायलेल्या वासरागत तो आनंदाने स्वैर बागडतो, तुम्हाला समवेत घेऊन. त्याच्या अवखळ प्रकृतीला कसले बंधन मानवत नाही. त्याला साचेबंद कथानक नसते. एखादे सूत्र मात्र जरूर असते. त्या सूत्रात छोटे स्वयंपूर्ण प्रवेश, गाणी, नाच, चुटके, नकला गुंफल्या जातात. प्रेक्षकांना गुदगुल्या करीत, टपला मारीत हे मोहनाटय़ उलगडत जाते. अडीच तास निखळ करमणूक, धम्माल.
माझ्या नव्या खेळासाठी मी ‘शेजारधर्म’ हा मध्यवर्ती धागा पकडला. ईनमीनतीन माणसांच्या (आप्पा-आई-मी) मायक्रो कुटुंबामध्ये वाढल्यामुळे की काय- बालपणापासून मला शेजारधर्माबद्दल फार आकर्षण वाटे. एकाच इमारतीत किंवा चाळीत, वेगवेगळ्या विभाजक भिंतींच्या आड स्वतंत्र चुली मांडणाऱ्या आणि तरीही एकत्र कुटुंबाप्रमाणे नांदणाऱ्या शेजाऱ्यांबद्दल मला प्रचंड कुतूहल वाटे. संधी मिळाली की आमच्या घरी समोरच्या चितळेवाडीत किंवा शनिवार पेठेमधल्या बापटवाडीत जाऊन तिथल्या गजबजाटात हरवून जायला मला विलक्षण आवडत असे. शेजाऱ्यांचे परस्परसंबंध, देवाण-घेवाण, रुसवे-फुगवे  हे सर्व काही मी हपापून पाहत असे. लहानपणी केलेल्या या निरीक्षणांमधूनच माझा ‘कथा’ चित्रपट आणि ‘अडोस पडोस’ आणि ‘हम पंछी एक चॉलके’ या टीव्ही मालिका यांची उपज झाली असावी. गुलझार यांनी मला गमतीने ‘मिनिस्टर ऑफ चॉल्स’ हा किताब बहाल केला होता. माझ्या नव्या रिव्ह्य़ूमधली पात्रे आता चाळीतून बाहेर पडून जरा शिष्ट वस्तीमध्ये उतरली होती. पण शेजारधर्म तोच. या खेळाला खूप छान समर्पक नाव मिळाले- ‘सख्खे शेजारी’. सख्खे या शब्दातच सगळं काही आलं. केवढा आशय आहे, या छोटय़ाशा शब्दात!
‘सख्खे शेजारी’ला तत्काळ निर्माता मिळाला. ‘रंगयात्री’च्या मधुकर नाईकने हा खेळ प्रथम प्रकाशात आणला. कलाकारांची निवड आम्ही फार चोखंदळपणाने केली. पाहता पाहता गाजलेल्या कलाकारांची एक दमदार फळी उभी ठाकली. तात्याच्या मध्यवर्ती भूमिकेत अर्थातच अरुण विराजमान झाला. तो असताना दुसरा तात्या संभवतच नव्हता. इंग्रजी वाक्प्रचार वापरायचा तर तात्याचा रोल अरुणला हातमोज्यासारखा फिट्ट बसला. आता त्याला बायकोही तशीच जबरदस्त हवी. ‘मी तुम्हाला अगदी फर्स्ट क्लास कृष्णा देतो’ नाईक म्हणाले, ‘सुहास जोशी’.‘वा! फारच छान’ मी म्हटलं. ‘पण का हो? मला सुहास देणारे तुम्ही कोण? मी तिला लहानपणापासून (तिच्या) ओळखते. पुण्याला माझ्या ‘पत्तेनगरीत’ नाटकात ती बदाम राणी होती. शिवाय तिचा ‘एनएसडी’चा प्रवास मी पाहिला आहे.’ तर सुहास ठरली. तात्या-कृष्णा वयाने अंमळ प्रौढ आणि बाळबोध वळणाचे असतात. त्या दोघांचा सुरुवातीचाच एक प्रवेश फार रंगत असे..
आपल्या शेजारणींकडून कृष्णा तावातावाने घरी येते. तात्यांना बजावते, ‘हे पाहा, आजपासून मला कृष्णा म्हणायचं नाही. कसलं जुनाट बुरसट नाव आहे.. मला नाव बदलायचंय.’
‘आं? इतक्या वर्षांनंतर? कमाल आहे. चांगलं लग्नात म्हणत होतो नाव बदलू या, तर म्हणालीस, मला माझ्या माहेरच्या नावाचा अभिमान आहे.. आता एकदम बदलायचं म्हणजे- एकदम बदलायला नको अगदीच. त्याचा शॉर्ट फॉर्म करायचा.
हल्ली कशी पद्धत आहे? निर्मलाचं निर्मळ-
म्हणजे कृष्णाचं ‘कृष्ण’ करायचं?’
‘अंहं.. किसन!’ (तात्या ‘आ’ वासतो) ‘तुमचं नांवसुद्धा लांबलचक आहे.’
का? ‘तात्या’. किती छोटं नाव आहे.
‘तात्या म्हणजे अगदीच.. तात्या वाटतं.’
‘पण गोपीनाथ कुणी म्हणत नाही मला. नाव लांबलचक आहे म्हणून.’
‘तेच म्हणते मी! त्याचा शॉर्ट फॉर्म करायचा- गोपी.’
‘छान! म्हणजे तू कृष्ण आणि मी गोपी?’
अरुण, सुहास हा प्रवेश इतक्या उंचीवर नेऊन सोडत, की पुढचे नाटक गॅसच्या फुग्यासारखे वरवर चढत जाई. जगनसाठी- दुसऱ्या शेजाऱ्यासाठी, नाईकांनी मंगेश कुलकर्णीचे नाव सुचवले. ‘हुशार आहे. पण.. अं.. जरा विक्षिप्त आहे. तुम्हाला बघावं लागेल.’ ‘उत्तम!’ मी म्हटले. ‘मला विक्षिप्त माणसं आवडतात. मी बघेन त्याच्याकडे.’ मग मंगेशने ‘मकरंद’ या तिसऱ्या शेजाऱ्यासाठी सतीश पुळेकरचं नाव सुचवलं. मराठी रंगभूमीवर सतीश हा नव्याने उगवलेला तारा होता. कामाची चांगली समज होती. निर्मल या तडफदार, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या शेजारणीसाठी मीना गोखलेची निवड झाली. मीना मला टेलिव्हिजनमध्ये भेटलेली. अभिनयनिपुण, उत्साही आणि चुणचुणीत (हा शब्द तिला हातमोज्यासारखा बसतो). मुख्य म्हणजे तिची विनोदबुद्धी तल्लख होती. छुपे बारकावे (र४ु३’ी) तिला झटकन कळत. उरलेल्या शेजारणीसाठी- शर्वरीसाठी नृत्याचे अंग असलेली अभिनेत्री हवी होती. संजीवनी बिडकरला मी एकदा कुठल्याशा नाटकात पाहिले होते. ती फर्मास लावणी नाचली होती. तिच्या नाचाला एक वेगळाच खास बाज होता. नेहमीचा साचेबंद प्रकार नव्हता. तिचा मादकपणा अंगावर येणारा नव्हता, एक मिश्कील अंतर राखून होता. मला तीच हवी म्हणून मी नाईकांपाशी लकडे लावले. ती मिळाली. शेजाऱ्यांच्या तिन्ही जोडय़ा सज्ज झाल्या. या सहा जणांखेरीज एक महत्त्वाचे पात्र नाटकात होते. अगांतुक, उपरा, क्ष किंवा बहुरूपी. वेगवेगळी सोंगे घेऊन तो वेगवेगळ्या प्रवेशांमध्ये दाखल होई. कधी म्युनिसिपल सव्‍‌र्हेअर, कधी पोलीस इन्स्पेक्टर, कधी दारूडय़ा, कधी लुच्चा ट्रॅव्हल एजंट तर कधी काही. दर वेळी तो वेश आणि अभिनिवेश बदलून येत असे. हे जोखमीचे काम करायला हवा असलेला इरसाल नट आमच्या दोस्त मंडळींच्यातच होता, अरुण होर्णेकर. त्याने हे सगळेच बहुरूपी अवतार झोकात पेश केले.

‘सख्खे शेजारी’मध्ये दोनतीनच गाणी होती. पण ती, विशेषत: त्याचे शीर्षकगीत महत्त्वाचे होते. यशवंत देवांनी नाटकाचे संगीत करायचे कबूल केले आणि अप्रतिम चाली आणि पाश्र्वसंगीत या नाटकाला लाभले. पहिलंच गाणं तयार होताच ते ऐकवायला नाना घरी आले, ते आपल्या दमदार आवाजात गातगातच आत शिरले. एक हात कानावर, दुसरा उंच हवेत.
‘शेजारी, शेजारी आम्ही सख्खे शेजारी
आमचा खेळ मांडिला, वेशीच्या दारी-’
प्रत्येक नाटकवाल्याच्या कारकीर्दीत- मग तो नाटककार असो, दिग्दर्शक असो वा कलाकार असो- कायम स्मरणात राहतील असे क्षण येतात. नानांनी गाणे म्हणत घेतलेली ती दमदार एन्ट्री, हा मला नाटकामुळे लाभलेला एक सुवर्णक्षण होता.
याच गाण्यातल्या काही ओळी गात तिघी शेजारणी एकमेकींचे हात धरून ठुमकत पुढे येतात. चाल ओवीच्या वळणावर होती.
बायका : आम्ही शेजारणी, जशा बहिणी बहिणी-
           सायीचं दही जसं ठेवावं विरजुनी
           दृष्ट काढा कोणी मीठमोहऱ्या उतरूनी
पुरुष :   बोलाचीच कढी, त्याला बोलाची फोडणी.
इतका वेळ आपापल्या बायकांच्या मागे दडलेले नवरे, आपली ओळ बायकोच्या आडून डोकावून छान जोशात म्हणत असत. तो प्रकार फार गोड वाटे.
सहा शेजारी आणि अगांतुक या सगळ्यांचे चांगले गूळपीठ जमले. सुरुवातीला संजीवनी थोडी बुजल्यासारखी, अलिप्त असे, पण ती लवकरच रुळली.
रेशमाच्या लडी सुळसुळत जाव्यात तद्वत प्रयोग उलगडत जात असे. १०-१२ प्रयोगानंतर मी प्रत्येक प्रयोगाला हजर राहणे कमी केले. याचा फायदा घेऊन नट मंडळी विशेषत: पुरुष नट- भयानक अधिकपणा करू लागले. नको तिथे अंगविक्षेप करणे, डोळे विस्फारणे, वेडीवाकडी तोंडे करणे इ. मनाचे चाळे करू लागले. मग मी मधूनच न सांगता प्रयोगाला जाऊ लागले. गुपचूप बाल्कनीत एका टोकाला जाऊन बसत असे. पण बातमी ताबडतोब पोचायचीच. ‘रेड आली, रेड आली’ अशी धोक्याची सूचना पार स्टेजपर्यंत पोचत असे. ज्ञानेश्वर म्हणून एक हुशार बॅकस्टेज कर्मचारी होता, तो या सगळ्यांचा खबऱ्या होता. पण खरोखर मराठी रंगभूमी का या हीन प्रवृत्तीला बळी पडली आहे, हे समजत नाही. भल्या भल्या समजदार अनुभवी नटांनासुद्धा हा मोह आवरत नाही. विनोद कसा अलगद फुलला पाहिजे! बोटं खुपसून अश्राप कळ्या अकाली फुलवण्यात काय हंशील आहे? एकदा मी सगळ्यांवर फारच रागावले. आमची ‘शेजारी’ची टीम कुठल्या तरी गावाला प्रयोगानिमित्त गेली होती. परत येताना घाटात बस बंद पडली. स्टेशन जवळच होते. तेव्हा गाडी पकडून मुंबईला परतण्याची टूम निघाली. आम्ही सगळे सामान घेऊन भराभर उतरलो. मंगेश ड्रायव्हरजवळच्या सीटवर बसूनच राहिला. ‘मी बसनेच येणार आहे’ असं त्यानं निग्रहानं सांगितलं. अगदी अलीकडे मंगेश फार दिवसांनी भेटला तेव्हा त्यानं खुलासा केला, की मी त्याला रागावल्यामुळे तो रुसला होता.
बसने कुठे जाण्याची पाळी आली, की निर्माते मधुकर नाईक यांच्यामधल्या सुप्त नाटय़गुणांना पालवी फुटत असे. त्यांचे उंच, धिप्पाड आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरला साजेल असे होते. प्रवासाला निघाले की नाईक खाकी पँट, पांढरा शर्ट आणि खिशाला कसला तरी टिनपॉट बिल्ला असा पोशाख घालून आपला रोल निभावायला सज्ज होत. गळ्यात दोरीला एक शिट्टी असे. बस कुठे अडली किंवा गाडय़ांची झिम्मड झाली की नाईक बसमधून रुबाबात उतरत आणि शिट्टी वाजवीत, हातवारे करीत ‘ट्रॅफिक कंट्रोल’ करीत असत. पाहात राहावं! अर्थात आमची बस पुढे निघत असे, हे सांगायला नको. नाईकांची ही शिट्टी सगळीकडे मात्र चालली नाही. महाराष्ट्र मंडळाच्या आमंत्रणावरून एकदा नाटक कलकत्त्याला गेले होते. मी जाऊ नव्हते शकले, पण सगळ्यांकडून वर्णन ऐकून ऐकून गेल्यातच जमा झाल्यागत होते. अत्यंत उद्विग्नपणे तो दौरा आठवला जाई. सगळाच गैरकारभार होता. नाटक संपल्यावर शेजाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले. परतीची तिकिटे आरक्षित केली गेली नव्हती. उन्हाळ्याचे दिवस, त्यातून सुट्टय़ा. गाडय़ांना तुफान गर्दी होती. एकमेकांच्या डोक्यावर चढून सगळे कसेबसे कोंबून एकदाचे डब्यात बसले. नाईकांनी शिट्टी वाजवून दादागिरी करण्याचा प्रयत्न करताच त्यांना सवाई असलेले बंगबंधू उसळले. मारामारी करायला जागाच नव्हती, म्हणून ती वेळ टळली. त्या असह्य़ प्रवासातसुद्धा शेजाऱ्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. एक पालथा पंजा गालाला लावून, फिल्मी सुस्कारा सोडून मंगेश स्वप्नाळू आवाजात म्हणाला, ‘असं वाटतं, की हा प्रवास कधी संपूऽऽऽच नये.’ मध्ये स्टेशन लागले की प्लॅटफॉर्मवर उतरून तो आणि सतीश चिरका घाणेरडा आवाज काढून आरडत ओरडत फेरी मारून येत. ‘घ्यायचे का शेज्जारी?’ जुने पुराणे शेज्जारी. फाटके, विटके, घामट, घाणेरडे शेजारी. चार चार आता..’
नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. तो दर प्रयोगानिशी वाढत होता. एका दिवशी तीन प्रयोग- आणि तिन्ही ‘हाऊस फुल्ल’ अशी एक नोंद आहे. प्रयोगानंतर, नटमंडळींच्यात एक धावती पण मनस्वी अशी चर्चा होत असे. आज प्रयोग ढिला का झाला? अमुक ठिकाणी हंशा का नाही आला? नको तिथे प्रेक्षक का हसले? कुणी पाटय़ा टाकल्या? अशा मुद्दय़ांवर मनमोकळी चर्चा होत असे. मला वाटतं, त्यामुळे ४०० प्रयोग झाल्यानंतरही नाटक ताजे राहू शकले. कलाकारांच्यात काही बदल झाले होते. संजीवनीच्या जागी प्रतिभा माथुर आली होती. सुहासला तिच्या वाढत्या जबाबदारींमुळे सर्व प्रयोगांना उपस्थित राहणे अवघड जाऊ लागले, तेव्हा रजनी वेलणकरचा प्रवेश झाला. ‘कृष्णा’ला सुहासने पार उंचावर नेऊन ठेवले होते, तेव्हा रजनीवर दडपण होते. पण तिने या भूमिकेला स्वत:चा एक वेगळाच गोडवा बहाल केला. सगळे हंशे वसूल करून घेतले. कृष्णाचा एक बंपर हंशा सांगावासा वाटतो. नाटकाच्या शेवटी तात्या दुबईला जाणार म्हणून त्याचे मित्र एक सेंड ऑफ पार्टी आयोजित करतात. स्कॉचची बाटली मिळवतात. चौघे नटून थटून उत्सवमूर्तीची वाट पाहात आहेत. तात्या-कृष्णा आल्यावर मकरंद विचारतो ‘कृष्णावहिनी, तुम्ही काय घेणार? लिंबू सरबत, लिम्का का थम्स् अप?’ कृष्णा निरागसपणे सांगते, ‘मी स्कॉच घेईन एवढी एवढी’ आणि प्रेक्षागृह कोसळते. दर वेळी हा हशा कानावर आदळला की मी नव्याने कृतार्थ होत असे. सुहास आणि रजनी दोघी हा प्रवेश सुंदर करीत. गंमत म्हणजे दोघींच्यात एवढा समझोता होता की एकमेकींची सोय पाहून त्या प्रयोग करीत असत. गडकरीचा खेळ सुहास करी तर दीनानाथला रजनी हजेरी लावीत असे.
नाटकाचा गुजराथी आणि हिंदी अवतारही मंचावर अवतरला. ते टेलिव्हिजनवर झळकले. पुढे ‘मैत्री’ या संस्थेने त्याचे प्रयोग केले. पुण्याच्या ‘पीडीए’ने त्यांच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने १९ ऑक्टोबर २०१० पासून काही प्रयोग केले. शशिकांत कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली हे खेळ झाले.
रंगयात्रीच्या जमान्यामधला ‘शेजारी’चा एक चित्तथरारक अनुभव आठवतो. पुण्याला बालगंधर्वमध्ये प्रयोग चालू होता. चोखंदळ पुणेकर मिनटा-मिनटाला हसून दाद देत होते. अचानक प्रेक्षागृहामध्ये एक वेगळीच खळबळ उडाली. पाठोपाठ ‘पडदा पाडा’, ‘पडदा पाडा’ असा गलका झाला. दुसऱ्या रांगेमधल्या एका वयस्क प्रेक्षकाचे जागीच निधन झाले होते. सुदैवाने कुटुंब बरोबर असल्याने अँब्युलन्स बोलवून त्यांना तात्काळ नेण्यात आले. काही काळ सुन्न स्तब्धता पाळल्यावर नाटक पुन्हा सुरू झाले. पण नट आणि प्रेक्षक, सगळ्यांचाच जोश विरला होता. आपल्या नाटकात असे काही अघटित व्हावे, याचे वैषम्य वाटत राहिले. मग काही दिवसांनी एक पत्र आले. त्याचा गोषवारा असा- ‘गेल्या आठवडय़ात आपले नाटक पाहात असताना माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन ते निवर्तले. हा त्यांचा तिसरा अटॅक. डॉक्टरांचा सल्ला न जुमानता, उरलेले दिवस आनंदात घालवायचे, असे त्यांनी ठरवले होते. तुमच्या नाटकात ते सतत खदखदत हसून दाद देत होते. हसत हसतच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आम्ही आभारी आहोत.’
हौशी संस्था, ठिकठिकाणची महाराष्ट्रे मंडळे, नाटय़शिबिरे आदींकडून नाटकाचा प्रयोग करण्यासंबंधी नित्यनेमाने विचारणा होई. त्याचे पुस्तक कुठे मिळेल? कुठेच नाही. कारण छापलेच नव्हते, तर मिळणार कुठे? खरे तर, प्रयोगाचा धडाका चालू असताना काही प्रकाशकांनी ते पुस्तकरूपाने छापण्याबद्दल विचारले होते. पण मी फारशी उत्सुक नव्हते. ‘बहुरंगी खेळ म्हणजे शाश्वत नाटक नव्हे. ती तात्पुरती गंमत आहे. तीन दिवस मोहवणारे तेरडय़ाचे फूल,’ असा फोल युक्तिवाद करून, मी तेव्हा पुस्तक छापायचे टाळले.
पण तेरडय़ाचे फूल पुन्हा फुलायचे होते.
तीस-एक वर्षांच्या अवधीनंतर..        (क्रमश:)    

Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..