‘लोकरंग’मधील (९ मे) ‘तुझी गोधडी चांगली’ हा गिरीश कुबेर यांचा प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण करणारा लेख वाचला. अतिप्रतिक्षित पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने प्रतिष्ठेच्या केलेल्या प. बंगालमध्ये, ममता बॅनर्जी यांनी भाजपने सत्तास्थापनेसाठी बांधून तयार ठेवलेले बाशिंग उतरवून टाकले. या निकालाचा दुसरा अन्वयार्थ वरील लेखात लेखकाने मांडला आहे. सर्वांचे लक्ष प. बंगालच्या निवडणुकीवर का होते याची कारणेही लेखात नमूद केली आहेत. त्यापैकी अल्पसंख्याक व विशेषत: मुसलमानांनी पाठिंबा दिल्याने ममता यांच्या पक्षाने दोन-तृतीयांश जागांवर विजय मिळवला, हा या पराभवानंतर भारतीय जनता पक्ष व त्यांच्या समर्थकांनी केलेला दावा व युक्तिवाद किती खोटा व धादांत असत्याच्या पायावर केला असल्याचे लेखात आकडेवारी देऊन स्पष्ट केले आहे.

भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या हिंदू मतांपेक्षा पाच टक्क्यांहून कमी मते यावेळी मिळाली. याचे कारण भाजपच्या कार्यकत्र्यांनी अकारण वा जाणूनबुजून दिलेले ‘जय श्रीराम’चे हाकारे. हे भाजपचे क्षुद्र उद्योग असल्याने ते त्यांच्या अंगाशी आल्याचे दिसून आले. भाजपाने मुसलमानांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे कधीच दिसून येत नाही. कारण हिंदू समाज व मतदार एकवटल्यावर त्याची गरज नाही अशी त्यांची धारणा असते. या लेखात निवडणूक निकालावर अत्यंत वस्तुस्थितीदर्शक विश्लेषण वाचकांसमोर मांडले गेले आहे. – प्रकाश शिशुपाल, दहिसर पूर्व, मुंबई.

‘७० टक्क्यांचा विजय’ हा विखारी प्रचार भोवला

‘तुझी गोधडी चांगली’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. पहिला मुद्दा म्हणजे, देशातील मोदी उदयानंतर केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर राज्याचा विकास जोमात होतो- असा युक्तिवाद (‘निवडणूक जुमला’ म्हणा हवं तर!) भाजप जनतेच्या गळी उतरविण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतो. असे असेल तर कथित विकासाचे डिंडिम वाजवत ‘विकासपुरुष’ अशी आपली प्रतिमा मिरवणारे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना यूपीएच्या दहा वर्षांच्या राजवटीत राज्याचा विकास करणे कसे शक्य झाले?

वास्तविक देशात निवडणुका कोणत्याही असेनात; मोदी-शहा दुकलीच्या प्रचाराचा आरंभ आणि सांगता धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय होतच नाही. बंगालमध्ये या ध्रुवीकरणाचा कळसाध्याय बघायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये ७० टक्के हिंदू आणि ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. यातून भाजपने ‘७० टक्क्यांचा विजय’ असा विखारी प्रचार केला. ममता बॅनर्जी यांची संभावना तर ‘बेगम ममता’ अशी करण्यापर्यंत भाजपची मजल गेली. भाजपच्या धार्मिक राष्ट्रवादाला प्रादेशिक राष्ट्रवाद व बंगाली अस्मितेने छेद द्यायचे धोरण ममतांनी अवलंबिले. मुस्लिमांची एकगठ्ठा मते तर त्यांना मिळालीच; पण ज्या हिंदू मतदारांवर भाजपची सर्व भिस्त होती, ती हिंदू मतेही बंगाली अस्मितेच्या नावाखाली ममतांच्या पारड्यात भरभरून पडली. आपण पश्चिम बंगाल जिंकला आहे, आता केवळ निवडणूक निकालाची औपचारिकता तेवढी बाकी आहे, या आविर्भावातून भाजप नेत्यांच्या मुखातून ‘दोनशे पार’चा गर्वाग्नी बाहेर पडू लागला. त्यावर पाणी ओतण्याचे काम बंगाली मतदारांनी केले.

विरोधकांच्या त्रुटी, कच्चे दुवे हेरून ते अतिरंजित पद्धतीने मांडणे, विरोधकांचे प्रतिमाभंजन करणे आणि जिथे आपली शक्ती कमी आहे तिथे विरोधी पक्षातील एखाद्या लोकप्रिय नेत्याला पक्षात घेऊन उमेदवारी देऊन त्यांच्यामागे पक्षाचे ‘पाठबळ’ उभे करणे, हे भाजपच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. ज्या आसाम राज्यात भाजप सत्तेवर आहे, तिथे ‘सीएए’बाबत भाजप चकार शब्द काढत नाही; मात्र पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यास ‘सीएए’ राबवण्याचे आश्वासन देऊन मोकळा होतो. काँग्रेसची पराभव मालिका आणि धोरण विसंगती कधी संपणार, की हा पक्षच संपणार, अशी परिस्थिती आहे. पाच राज्यांतील निकाल बघता पाचही राज्यांना स्थिर बहुमतातील सरकारे मिळाली आहेत. पण पराभूत विरोधी पक्ष अगदीच नगण्य नाहीत. यात खरा विजय लोकांचा आणि लोकशाहीचा झालेला आहे. लोकशाहीची उबदार गोधडी हे आपल्या व्यवस्थेचे लक्षण या निवडणूक निकालांतूनही परावर्तित होत आहे. – बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>

गोधडीची सुई बंगालवरच चालली!

गिरीश कुबेर यांचा ‘तुझी गोधडी चांगली’ हा लेख वाचला. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या भाजपविरोधी कौलामुळे लेखकाच्या गोधडी शिवण्याच्या सुईला चांगलेच टोक आले आहे. हे टोक आरपार करून कधी एकदा मोदी सरकारचा ऱ्हास होतो आणि आपणास राज्यसभा खासदारकी मिळते याकरता लेखक उत्सुक दिसतात. अन्यथा जी राज्ये वर्षानुवर्षे भाजपविरोधी आहेत, त्यापैकी आसाम, बंगाल, पुद्दूचेरी या राज्यांत भाजपला चांगले यश मिळूनही गोधडीची सुई बंगालवरच जास्त चालली आहे. भाजपने दावा करूनही भाजप हरला, हे सत्य असले तरी भाजप लोकसभेत २ जागांवरून ३०३ जागांवर झेप घेणारा पक्ष आहे, हे लक्षात ठेवा. भाजप चूक सुधारू शकतो, म्हणूनच हे घडते. आपण ज्या काँग्रेस विचारांचे वर्तमानपत्र चालवता त्यात गोधडीचा किती भाग भाजप-विचारांनी व्यापला आहे याची जाणीव ठेवावी आणि मगच आपल्या गोधडीच्या ठिगळाची ऊब घ्यावी आणि द्यावी.  बंगालमध्ये भाजपचे मतांचे प्रतिशत लक्षणीय आहे आणि त्या आधारावर बंगालमध्ये पक्षवाढ होईलच. आपले गोधडी स्वप्नरंजन चालू ठेवण्यास खूप खूप शुभेच्छा.   – सुनील मोने, भाजप बूथ प्रमुख

आकडेवारीची तुलना चुतराईने!

‘तुझी गोधडी चांगली’ हा गिरीश कुबेर यांचा     प. बंगालच्या निवडणुकविषयीचा लेख वाचला. लेखक म्हणतात की, मतदार लोकसभा आणि विधानसभा यांसाठी मतदान करताना वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो, आणि हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मतदार सुज्ञ आहे. परंतु लेखात स्वत:चे पुढचे निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आकडेवारीची तुलना करताना मात्र चतुराई करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीची तुलना आताच्या २०२१ च्या विधानसभा निवडणूक आकडेवारीशी केली आहे. बाकी धार्मिक मुद्द्यांव्यतिरिक्त जात, भाषा हे मुद्देही महत्त्वाचे आहेत, हे बरोबरच. ‘विविधतेतील एकता’ समजून घ्यायला हवी, हेही अगदी योग्यच. लेखात २०१६ च्या विधानसभेच्या मतदान आकडेवारीची तुलना केली असती तर कदाचित काही वेगळे सत्य समोर आले असते. – संदीप दातार, बदलापूर

‘आम्ही जिंकलो, पण मी हरले’

‘तुझी गोधडी चांगली’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. करोनाच्या काळात निवडणुका घेणे ही एक घोडचूकच झाली. त्याचे परिणाम देशाची जनता भोगते आहे. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्र्रेस येणार हे उघडच होते. या राज्याच्या निवडणुकांचा मागील इतिहास पाहता, तेथील जनतेचा कल एका पक्षाकडे सत्ता देऊन स्थिर सरकार देण्याकडे असतो. भाजपची मतांची टक्केवारी कमी होऊनसुद्धा त्यांनी तीनवरून ७७ जागांवर झेप घेतली, हे कौतुकास्पद आहे. त्यातून त्यातील ४८ जागा तृणमूलकडून हिसकावून घेतल्या आणि ममतादीदींची परिस्थिती ‘आम्ही जिंकलो, पण मी हरले’ अशी झाली. त्या फाजील आत्मविश्वासात मग्न होत्या असाच याचा अर्थ होतो. – सुधीर  ब. देशपांडे, विलेपार्ले, मुंबई