‘लोकरंग’मधील ‘भाई… निरंतर योद्धा’ हा मधु लिमये यांच्यावरील त्यांचे पुत्र अनिरुद्ध लिमये यांनी लिहिलेला लेख वाचला. भाईंच्या स्पष्टवक्तेपणाच्या आड दडलेला त्यांचा खेळकर स्वभाव व प्रामाणिकपणाच्या जोडीला अखंड व्यासंग यामुळे इतर समाजवाद्यांहून ते नेहमी वेगळे वाटत. बिगरकाँग्रेसवादावर आधारलेले मोरारजी सरकार २८ महिन्यांतच कोसळले यास मधु लिमये यांना सोयीस्करपणे जबाबदार धरले जाते; परंतु त्यांना हे जाणले होते की, लोकशाही मूल्ये व सर्वधर्मसमभाव या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड करून चालणार नाही, अन्यथा त्याचे गंभीर दुष्परिणाम भविष्यात होतील. म्हणूनच घटकपक्षांच्या दुहेरी निष्ठांना त्यांचा विरोध होता. लोकशाही मार्गाने तंबूत शिरलेला धार्मिक उन्मादाचा उंट भविष्यात घात करेल हे ते ओळखून होते.

इंदिरा गांधींच्या अनेक निर्णयांना त्यांनी कडाडून विरोध केला होता, तरीही इंदिरा गांधींनी मोक्याच्या वेळी त्यांचाच सल्ला मागितला होता. कारण सुडाचे राजकारण न करणाऱ्यांपैकी ते होते. गोवामुक्ती संग्रामात १९ महिने कारावास व तितकेच महिने आणीबाणीतही कारावास भोगणाऱ्या या आगळ्यावेगळ्या व्यासंगी व सच्च्या समाजवाद्याची आज खरी गरज होती. कारण एकाधिकारशाही व धार्मिक उन्माद आज कधी नव्हे एवढे फोफावत आहेत, ज्याचा धोका त्यांनी चाळीस वर्षांपूर्वीच ओळखला होता. – विजय दांगट, पुणे</strong>

मधु लिमये : लोप पावलेल्या तत्त्वनिष्ठ राजकारणी पिढीचे प्रतिनिधी

‘लोकरंग’मधील ‘भाई… निरंतर योद्धा’ हा मधु लिमये यांच्यावरील त्यांचे पुत्र अनिरुद्ध लिमये यांनी लिहिलेला लेख वाचला. हा लेख तत्त्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या राजकीय व्यक्ती आणि काळ याचा उत्तम धांडोळा घेतो, तो फक्त मधु लिमये नाही तर त्या वेळच्या लोहियावादी राजकारणी लोकांचे प्रतिनिधित्वही करतो. दुर्दैवाने देवीलाल, मुलायमसिंग, लालू प्रसाद यांच्याकडून त्यांची घराणेशाही आणि तत्त्व, नैतिक, आर्थिक भ्रष्टाचार याकडची वाटचाल ही एकूण समाजवादी राजकारणाची अधोगती, हे दुर्दैव. महाराष्ट्रात मधु लिमये आणि यशवंतराव मोहिते या दोघांचा भारतीय राज्यघटनेचा दांडगा अभ्यास होता. बॅ. नाथ पै, मधु लिमये यांचा धसका घेत. त्यांची भाषणे सत्ताधारी पक्ष आणि  लोकसभा सदस्य कान देऊन ऐकत. यशवंतराव मोहिते यांच्या व्यासंगाचा उपयोगही पक्षास होत असे.

एके काळी समाजवादी तसेच इतर राजकारणी नेत्याच्या आत्मचरित्रांनी मराठी साहित्यविश्व ढवळून निघाले होते आणि त्याची जणू लाटच आली होती- दलित आत्मचरित्रासारखी. त्यात ना. ग.  गोरे, एस. एम., दत्ता देशमुख, पी. बी. कडू, भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे इ. या सगळ्यांत मधु लिमये यांचे आत्मचरित्रही तितकेच वाचनीय, उद्बोधक आणि भारतीय राजकारणाच्या मोठ्या कालखंडाचे आकलन होण्यास मदत करणारे होते. – सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)