|| प्रमोद मुनघाटे

डॉ. गणेश देवी यांची ओळख जगाला अलीकडे एक भाषाशास्त्रज्ञ म्हणून झाली आहे. त्याआधी साहित्य, साहित्यशास्त्र, समीक्षा, संस्कृती आणि आदिम जमाती यांचे अभ्यासक म्हणून ते दीर्घकाळ परिचित होते. या विषयांवरील त्यांचे ग्रंथ जगभरच्या विद्यापीठांत अभ्यासले जातात. भाषा व संस्कृतीच्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांचा भटक्या-विमुक्त-आदिवासी समूहांशी संबंध आला. त्यांच्या प्रश्नांसाठी ते प्रसंगी रस्त्यावरही उतरले. हे त्यांचे वेगळेपण एरवीच्या चौकटीतील विद्वान लेखकाच्या प्रतिमेशी जुळणारे नाही.

‘त्रिज्या’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लेखसंग्रहात डॉ. देवी यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वामागील प्रेरणा आणि त्यांच्या एकूण कार्यामागील भूमिकेचा परिचय होतो. साहित्य, संस्कृती व भाषांच्या संदर्भात काम करताना ते सामाजिक व्यवहाराच्या परिघाकडे कसे ओढले गेले आणि आदिवासी-भटक्यांच्या प्रश्नांवर लढताना ते त्या प्रश्नांच्या सांस्कृतिक मुळांकडे कसे खेचले गेले, याचा ते या पुस्तकात स्व-शोध घेतात. केंद्र ते परीघ असा ‘त्रिज्या’मधील त्यांचा हा प्रवास केवळ बौद्धिक नाही, तर तो भावना, संवेदना आणि अंत:प्रेरणांचाही आहे. त्यांचा हा प्रवास स्तिमित करणारा आहे. डॉ. देवींच्या संशोधनाचा व्यास एका भाषेचा वा संस्कृतीचा नसून तो वैश्विक कसा आहे, याचे दर्शन या लेखनातून घडते. थोडक्यात, त्यांच्या साहित्य, भाषा व संस्कृती या विषयांवरील मूलभूत लेखन आणि आदिवासी-भटक्यांच्या संदर्भातील सामाजिक कार्याच्या तात्त्विक अधिष्ठानाचा त्यांनी स्वत:च घेतलेला शोध ‘त्रिज्या’मधील लेखांत नोंदविला आहे.

मनोगत, चिंतन, नोंदी आणि वृत्तांत अशा स्वरूपाची सरमिसळ असलेल्या या पुस्तकात डॉ. देवी काही ठिकाणी पद्याचाही वापर करतात. ते व्यक्तिगत आयुष्यातील काही तपशील त्यांच्या ज्ञानात्मक अनुभवांशी जोडून काही सांगू पाहतात, तेव्हा वाचकांसाठी तो एका विशाल बौद्धिक विलासाचा अनुभव ठरतो. ‘त्रिज्या’ या पहिल्याच लेखात तरुणपणी डॉ. देवींवर ज्या विचारांचा प्रभाव होता, त्याचा उल्लेख आहे. गौतमाचे समाधीवस्थेतून परत फिरणे, जैन तत्त्वज्ञानातील काळ-अणूची संकल्पना आणि युक्लिडच्या भूमितीतील त्रिज्येविषयीची धारणा इत्यादी. पुढे डार्विन आणि मार्क्‍स यांच्या विचारांच्या संदर्भात सत्तेचे ‘केंद्र’ व ‘परिघा’ची चर्चा डॉ. देवी करतात, तेव्हा एकाच वेळी त्यांच्या लेखनातील बौद्धिक परिमाण आणि भाषिक लालित्याची वाचकाला सुखद जाणीव होते.

दीडशे पृष्ठांच्या या पुस्तकात आठ लेख आहेत. ‘स्व-त्व’ आणि ‘स्त्री-त्व’ हे दोन लेख चिंतनपर आहेत. ‘स्व-त्व’मध्ये महात्मा गांधी, श्री अरविंद, डॉ. आंबेडकर व महाश्वेतादेवी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याचे डॉ. देवी सांगतात. जीवनमूल्ये जपण्याची असोशी म्हणून ते बडोदा विद्यापीठातील प्राध्यापकीचा त्याग करतात. ‘स्वत्वा’ची अशी परखड परीक्षा स्वत:च घेणारे डॉ. देवी जीवनमूल्यांच्या आग्रहासाठी प्राण पणाला लावणाऱ्या महात्म्यांच्या बलिदानाचे कटू सत्य पुढील शब्दांत मांडतात :

‘आपल्या काळाच्या फार पुढे पाहण्याची क्षमता हा एक विचित्र शाप आहे. ती एक प्रकारची मानसिक व्याधी आहे. ज्यांना ही व्याधी ग्रासते, त्यांना जग सहजासहजी माफ करत नाही. जमाना त्यांना नाकारतो आणि ते स्वत: सतत स्वत:ला तडीपार करत राहतात; पण दृष्टी असेल तर दिसणारच. तडीपार झालेल्यांना काही वेळा ‘ओपीएट’ विष देण्यात येते. काही वेळा त्यांच्या विचारांना जातीचे सुरुंग लावण्यात येतात. त्यांची टवाळी करणाऱ्या टोळ्या त्यांच्यावर सोडण्यात येतात. काही वेळेला ते तरीही फार पुढचे पाहून ठेवतात.. आणि नंतर पुढे पुढे तसेच होत राहते.’

‘स्त्री-त्व’ या लेखात डॉ. देवी प्रेम, सत्य व सौंदर्य या संकल्पनांचा मागोवा घेतात. गेल्या शंभर वर्षांत जगात मानवाने घृणेला पोसून प्रचंड विनाश घडवून आणला आहे. बुद्ध, येशू, मीरा आणि गांधी यांनी प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडले. उच्च दर्जाच्या प्रेमाला बुद्ध ‘करुणा’ आणि गांधी ‘अहिंसा’ म्हणतात. त्यांची अहिंसेची अभिव्यक्ती स्त्रीत्वावर आधारित असल्याचे सांगून डॉ. देवी ‘स्त्रीत्व’ या संकल्पनेला गांधींच्या राजकारणाच्या संदर्भात मूल्याचा दर्जा देतात. गांधींच्या ‘मौन’, ‘असहकार’ व ‘मिठाचा सत्याग्रह’ हे आंदोलनाचे अहिंसक मार्ग ‘स्त्री’विशेष कसे आहेत, ते डॉ. देवी सांगतात. गांधींनी आपल्या सामाजिक-राजकीय कार्यात स्त्रीत्वाला महत्त्व देऊन इंग्रजांच्या घृणेच्या भाषेला प्रेमाने उत्तर दिले. अटक, जमावबंदी, अभिव्यक्तीबंदी ही ‘पुरुषत्वा’च्या परंपरेतून निर्माण झालेली भाषा आहे.

‘सत्ता’ या लेखात डॉ. देवी यांनी ‘राष्ट्र’ व ‘लोकशाही’ या संकल्पनांची चिकित्सा भारतीय समाजाच्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात केली आहे. भारत हे ‘राष्ट्र’ म्हणून आज ज्या रूपात आहे, त्यामागील ऐतिहासिक तथ्यांचा मागोवा ते घेतात. भारतातील तीन द्रष्टय़ा विचारवंतांनी स्वातंत्र्यापूर्वीच ‘राष्ट्र’ ही संकल्पना कशी त्याज्य मानली, ते सांगतात. ‘राष्ट्रामुळे आपल्यामध्ये खोटा अभिमान निर्माण होऊन आपले सारे चांगले गुण विनाश पावतील’ असे अरविंद घोष यांनी म्हटले होते. तर रवींद्रनाथांनी मृत्यूपूर्वी राष्ट्रवादाचे धोके सांगून आपण ‘विश्वमानव’ का व्हायला हवे, ते नोंदविले होते. अखेपर्यंत गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या गांधींनी दांडीयात्रेत विद्यापीठातील मुलांना बरोबर घेतले, पण साबरमती आश्रमातल्या सहकाऱ्यांना सोबत घेतले नाही. कारण देश घडवताना नवीन जग विसरणे गांधींना योग्य वाटले नाही. साबरमती आश्रम ही जग घडवणाऱ्या माणसांची प्रयोगशाळा होती. जर्मनी आणि इटलीचा केवळ भौगोलिकतेवर आधारित, आर्यलडचा केवळ संस्कृतीवर आधारित आणि रशियाचा आर्थिक मुद्दय़ावर आधारित असलेला राष्ट्रवाद या द्रष्टय़ांना मान्य नव्हता. डॉ. देवी म्हणतात, भारताकडे सर्व जगाला देण्यासाठी राष्ट्रवादाची एक नवी संकल्पना आहे; ती म्हणजे- ‘डेमोक्रसी बाय डायव्हर्सिटी’!

‘भाषा’ या विषयाला प्रथमच सांस्कृतिक, जैविक आणि तात्त्विक परिमाण देण्याचे काम डॉ. देवी यांनी गेल्या अडीच दशकांत केले आहे. भटके-विमुक्त-आदिवासींच्या ‘ढोल’ या नियतकालिकापासून युनेस्कोपर्यंत त्यांनी केलेल्या भाषाविषयक कार्याचा आढावा या लेखात आहे. मृत्युपंथाला लागलेल्या भाषांना टिकवणे का महत्त्वाचे आहे आणि ते कसे करता येईल, याचा एक कृती-आराखडाच डॉ. देवी यांनी मांडून दाखविला आहे. गुजरातमधील ‘आदिवासी अकादमी’ आणि ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हे त्यांचे काम थक्क करणारे आहे.

विश्वउत्पत्तीपासून जागतिकीकरणापर्यंतची भाषेची उत्क्रांती मांडून भविष्यातील भाषेविषयी डॉ. देवी महत्त्वाचे प्रमेय या लेखात मांडतात. जागतिकीकरणाच्या समर्थकांना जगात मोजक्याच भाषा असाव्यात असे वाटते; पण जगभरातील मानवसमूहांचा भाषिक वारसा, संस्कृती व बौद्धिक संपदा नष्ट झाले तर काय होईल, ते डॉ. देवी सांगतात. ज्यामुळे माणूस प्राण्यांपासून वेगळा ठरला, त्या भाषेची निर्मितीप्रक्रिया गेली पाच लाख वर्षे सातत्याने सुरू होती. आज हे भांडवल गमावण्याच्या टप्प्यावर आपण आहोत. भाषेचे जतन म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांचे जतन करणे होय. या मुद्दय़ावरून डॉ. देवी यांचे भाषेबद्दलचे संशोधन आणि कार्य त्यांच्या भटक्या-विमुक्त व आदिवासींच्या न्याय-हक्कांच्या आंदोलनापर्यंत कसे पोहोचते, ते लक्षात येते.

‘लोक’ या लेखात ते ‘लोकसाहित्य’ व ‘फोकलोर’ या संज्ञांमधील फरक सांगतात. युरोपमध्ये ‘फोक’चा अर्थ ‘सांस्कृतिकदृष्टय़ा बिनचेहऱ्याचे समाजघटक’ असा प्रचलित होता, तर मौखिक गीतांना ‘लोर’ म्हणत. आधुनिकतावादाच्या प्रभावातून ‘फोकलोर’चा अर्थ केवळ मौखिक साहित्य असा संकुचित झाला; पण भारतीय परंपरेत मौखिक साहित्य हे केवळ ‘फोक’ कधीच नव्हते. वस्तुत: साहित्य हीच एक ‘ज्ञानशाखा’ असते. भारतीय परंपरेतील कला-साहित्य-शास्त्रे मौखिकतेतूनच संक्रमित झाली. ती मौखिक संपदा म्हणजे विद्यासंक्रमणाचे सोपे व समाजस्मृतीत रुजलेले ज्ञानमार्ग होते. आंग्ल शिक्षणाच्या चौकटीत या ‘समाजस्मृती’ नाकारल्या गेल्या. केवळ स्वर व ध्वनीवर आधारित भारतीय संगीत परंपरा मात्र अबाधित राहिली. डॉ. देवींच्या मते, भविष्यातील भाषेत शब्दच नसतील, प्रतिमा असतील. त्या नव्या बहुमाध्यम  संवादसंस्कृतीत प्रचंड वेगाने कृत्रिम स्मृती मानवी मेंदूवर स्वार होईल. आपल्या हजारो वर्षांचा संस्कृतीसंचय आपण गमावून बसू. यावर भाषेतील मौखिक स्मृतीच्या शक्यता जपून ठेवणे हाच एक इलाज संभवतो. आदिवासी-भटके यांच्या मौखिकतेत आजही जिवंत असणारी बहुमाध्यमता कदाचित उद्याच्या भाषांची जननी असू शकेल, असे डॉ. देवींना वाटते.

थोडक्यात, वसाहतवादी सौंदर्यमूल्यांनी बाधित झालेली साहित्य-संस्कृती असो की आदिवासी-भटक्या-विमुक्तांचे अस्तित्व असो, या सगळ्यांची सूक्ष्म चिकित्सा करताना डॉ. देवी स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्यत्रयी प्रमाण मानतात.

  • ‘त्रिज्या’- डॉ. गणेश देवी,
  • पद्मगंधा प्रकाशन, पुणे,
  • पृष्ठे- १६८ , मूल्य- २३० रुपये.

pramodmunghate304@gmail.com