‘गिनीपिग्जतेच्या जाणिवेसाठी..’ हा गिरीश कुबेर यांचा अभ्यासपूर्ण लेख एका सामाजिक जाणिवेपोटी लिहिलेला वाटला. विदेशी औषध कंपन्या आपल्या देशातील गरिबांना पैशाचे आमिष दाखवून औषधांच्या चाचण्यांसाठी वापरतात. त्यात काहीजण मृत्युमुखी, तर काहीजण जायबंदी वा अपंग होतात, ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे झालेली जाणीव मन विषण्ण करणारी आहे. दर २६ जानेवारीला ‘जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’ असा गळा काढून तिरंगी झेंडय़ाला सलाम करण्याचा देखावा करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना स्वातंत्र्याला ६५ वर्षे होऊनही गरिबीची शिकार होत असलेल्या जिवांशी काहीच घेणे-देणे नसावे? अमेरिकी कंपन्या आपली औषधे खपवण्यासाठी एखाद्या ‘बर्ड फ्लू’ किंवा ‘स्वाइन फ्लू’सारख्या रोगाचा जगभर प्रचार झाल्याचा कांगावा करतात आणि कसा नफा कमावतात, हे या लेखात उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. पण दुर्दैव असे की, या देशातील नावाजलेले डॉक्टरदेखील गंभीर आजाराचे कारण दाखवून परदेशी महागडय़ा औषधांची शिफारस करताना दिसतात तेव्हा दु:ख होते. त्यामागे असलेले गुपित म्हणजे औषधविक्रेत्यांना मिळणारा भरमसाठ नफा आणि त्यातला डॉक्टरांना वळता केलेला काही भाग. कर्करोगपीडित रुग्णांना ‘केमो’ द्यायची वेळ येते तेव्हा ‘इंडियन देऊ की इम्पोर्टेड?’ असा संभ्रमात टाकणारा प्रश्न विचारला जातो. अर्थात बहुमोल जीव वाचवण्यासाठी दुप्पट किंमत मोजून परदेशी कंपनीचे औषध खरेदी केले जाते आणि रुग्ण दगावला की ‘कॅन्सरवर इलाज नाही’, असे सांत्वन करून ‘मानवी’ चेहरा धारण केलेले हे ‘अमानवी’ दलाल आपले हात झटकतात. लंडनमध्ये ‘स्वाइन फ्लू’ने आजारी झालेली महिला पत्रकार कोणतेही औषध न घेता बरी झाली, यातून लोकांनी योग्य तो धडा घ्यायला हवा. मृत्यू टाळणे आपल्या हाती नसले तरी स्वत:हून मृत्यूला आमंत्रण न देणे हे नक्कीच आपल्या हाती आहे.
– सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व), मुंबई.

ग्राहकांची आर्थिक लुटमार
‘गिनीपिग्जतेच्या जाणिवेसाठी’ (२० डिसेंबर) हा गिरीश कुबेर यांचा लेख, त्याचप्रमाणे ‘रुग्णांच्या जिवाशी खेळ’ हा डॉ. अनंत फडके यांचा आणि ‘कमकुवत कायदे आणि बेपर्वा सरकार’ हा        डॉ. अजित पाडगांवकर यांचे लेख वाचून धक्का बसला.. आणि आपण घेत असलेल्या औषधांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणारी ‘गिनीपिग्ज’ तर नाही ना या विचाराने झोप उडाली. हे सर्व संबंधितांना मॅनेज केल्याशिवाय शक्य नाही. शिवाय या बडय़ा औषध कंपन्या नागरिकांची आर्थिक लुटमार कशी करतात याची झलक पहा. ‘गुडप्रेस’ या दहा गोळ्याच्या पाकिटाची किंमत २२.५० रुपये होती, ती एकदम ३० रुपये झाली. ‘डायनोराम’ची किंमत ९७.५० रुपये होती ती १०५ झाली. ‘एमलॉग्न’ची किंमत २७.५० रुपये होती ती ४०.५० रुपये झाली. ‘फॅरेक्स’या दूध पावडरची किंमत अशीच एकदम ३० रुपयांनी वाढली. हे सर्व काय चाललंय?
– प्रभाकर पानट, मुलुंड (पूर्व), मुंबई.

सरकारनेच तोडगा काढावा
‘लोकरंग’ (२७ जाने.)मधील माधव चव्हाण आणि वसंत काळपांडे यांचे लेख शिक्षणाची सद्यस्थिती आणि सत्यकथा सांगणारे आहेत. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वानी आवर्जुन वाचावे असे हे लेख आहेत. आजची शिक्षण व्यवस्था दिशाहिन आणि बोथट झाल्यासारखी वाटते. या शिक्षण व्यवस्थेला नव्याने झळाळी मिळण्याची आवश्यकता आहे. पण हल्ली बदलत्या निर्णयामुळे, बाजारूपणामुळे आणि माधव चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षणाचा दर्जा वाढवण्याऐवजी परीक्षा सोपी करा, यावरच आपला जोर राहत असल्याने संख्येला महत्त्व येऊन गुणवत्ता मागे पडत चालली आहे. हा संख्या आणि गुणवत्ता यांचा संदर्भ केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून तो शिक्षकांच्या बाबतीतही लागू पडतो. काळपांडे यांनी दर पाच वर्षांनी शिक्षकांची वेगळी शिक्षक पात्रता चाचणी घ्यावी असे सुचवले आहे. ते बहुतांश पालकांना पटण्यासारखेच आहे. मात्र किती शिक्षक त्याला तयार होतील, हे सांगणे कठीण आहे. सरकार या गोष्टीचा नुसता विचार करायला लागले तरी शिक्षकांचे संप सुरू होतील. मात्र याबाबत सरकारच योग्य तो तोडगा काढू शकते. सरकारने हा प्रश्न उचलून धरायलाच हवा.
– नवनाथ भानवसे, करमाळा, सोलापूर.

हृदयाला भिडणारी गीते
‘लोकरंग’मधील विश्वास नेरुरकर यांचा ‘ ‘ऐ मेरे वतन के लोगो’चा सुवर्णमहोत्सव’ हा लेख आवडला. हे गीत हृदयाला भिडणारे आहे, पण त्याच्या चालीमध्ये जे बदल करण्यात आले ते करायला नको होते असे वाटते. नेरुरकरांनी म्हटले आहे की, इतर समकालीन गीतकारांनी प्रदीपजींइतका स्वातंत्र्यजागृतीसाठी प्रयत्न केलेला नाही. हे त्यांचे विधान फारसे पटत नाही. उदाहरणादाखल ‘आनंदमठ’मधील ‘वंदे मातरम’ (लता मंगेशकर व हेमंतकुमार) आणि दिलीपकुमार-कामिनी कौशल यांच्या ‘शहीद’मधील ‘वतन की राह में नौजवाँ शहीद हो’ (खान मस्ताना, मोहम्मद रफ़ी आणि कोरस) ही गाणी त्याची साक्ष म्हणून सांगता येतील. ‘शहीद’मधील ही गीतरचना आणि त्याची चालही हृदयाला भिडते. ती ऐकत असताना डोळ्यात अश्रू उभे राहतात. ‘सुवासिनी’ या मराठी चित्रपटातील आशा भोसले यांनी गायिलेले ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या गीताचाही उल्लेख करायला हवा. खरे तर अशा देशभक्तीपर गीतांचा आढावा घेत ‘ऐ मेरे वतन के लोगो’चे वेगळेपण स्पष्ट करायला हवे होते.
– आरती पै, बोरीवली, मुंबई.
स्वरस्मृतींना साद
‘ओम रेडिओ नम:।’ या आनंद मोडक यांच्या लेखाने रेडिओच्या सुमधुर स्मृतींना साद घातली! पूर्वी रेडिओ हा कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य होता. ‘सूरदासा’च्या या मोठय़ा घराच्या वर भिंतीत एक छोटासा देव्हारा बसवून घेतलेला होता. बाबा सकाळी देवपूजा करायचे. पूजेसाठी बाकी काही असो-नसो; रेडिओ सिलोनवरील ‘पुराने फिल्मों के गीत’ हा स्वरमंत्रोपचार अत्यावश्यकच! या जादुई मंत्रांच्या अभिषेकाने देवपूजेची मैफल रंगे. आणि मग सुरू होई सैगलगीतांची महाआरती! सैगलस्वरांशी अद्वैत हा बाबांसाठी दिवसातला परमोच्च समाधानाचा क्षण असे. अगदी बालपणापासून कानांवर झालेल्या या संस्कारांमुळे सैगलसाहेबांची असंख्य गीते आजही तोंडपाठ आहेत. त्यापैकी ‘दुनिया रंगरंगिली बाबा’ हे गाणं बाबांचं प्रचंड लाडकं. शिवाय, ‘एक राजे का बेटा लेकर उडनेवाला घोडा’ या गाण्याच्या अखेरीस असणारं सैगलहास्य त्यांना भारी आवडे. हुबेहूब तसाच हसण्याचा त्यांचा ‘रियाज’ गाण्याच्या जोडीला सुरू असे.
रेडिओच्या स्वरछायेतच मी मोठी झाले आणि किशोरावस्था संपता संपता रेडिओने पुरते झपाटले. सुमारे १९७० च्या आसपास ठोकळेबाज रेडिओची ‘ट्रान्झिस्टर’ नामक छोटी आवृत्ती प्रसवली आणि रेडिओशिवाय जगणं अशक्य झालं. माझ्या ट्रान्झिस्टरच्या काटय़ाला दोनच थांबे ठाऊक होते- विविध भारती आणि रेडिओ सिलोन. प्रातर्विधीवगळता सर्वच ठिकाणी या छोटय़ा दोस्ताची हजेरी अनिवार्य असे. विशेषत: अभ्यासाच्या वेळी आमचे विशेष सूर जुळायचे आणि अभ्यास एक मस्त मैफल व्हायची. एस. एस. सी. बोर्ड परीक्षेतील मेरिट, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश अशा पर्वामध्ये रेडिओच्या ध्वनिलहरी म्हणजे एकाग्रतेचे अभेद्य सुरक्षाचक्रच! रेडिओच्या सुखद स्मृतींमध्ये रमावे तेवढे थोडेच!
– डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, नांदेड.
ल्ल