गिरीश कुबेर यांच्या ‘दांभिकांचा मळा’ या लेखावरील स्वप्नील कानडे यांची प्रतिक्रिया वाचली. खरं तर या लेखात अनिरुद्धबापूंचा नाममात्र उल्लेख आहे. त्यावरून कानडे किंवा अन्य कुणाच्याही भावना दुखावण्याचं काहीच कारण नाही. खरं तर ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ ही प्रतिज्ञा आपल्याला अक्षरओळख झाल्यापासून ज्ञात आहे. असं असताना त्या प्रकारे वागण्यासाठी कुमा बाबा, बापू, माताजी वगैरेंची गरजच काय? रामनामाच्या जपाच्या वह्य़ाच्या वह्य़ा भरून, स्वत:चे वेगवेगळ्या देवांच्या पोझेसमधले फोटो काढून नक्की काय साधते? भारतीय स्त्री मंगळसूत्राचं पावित्र्य सर्वोच्च मानते. मग त्याच जागी एका परपुरुषाचा लॉकेटमधला फोटो तिला कसा काय चालतो? आपली पुरुषप्रधान संस्कृती एवढी समजूतदार असती तर ‘रामायण’वधानंतर संपलं असतं. त्यानंतर सीतामाईला पुन्हा वनवास भोगावा लागला नसता. म्हणजेच दांभिकपणा आपणा सर्वाच्याच रोमारोमांत भिनलेला आहे.
– संदेश बालगुडे, घाटकोपर

सर्वव्यापी वृत्ती
गिरीश कुबेर यांचा ‘दांभिकांचा मळा’ हा लेख वाचून हे जाणवत होते की अशी वृत्ती समाजात चांगलीच मुरली आहे.  केवळ राजकारण नाही तर कुटुंब, कार्यालय, समारंभ यांमधूनही दांभिक वृत्ती पाहायला मिळते.
– नितीन तायडे

भारतीय मानसिकतेचे अचूक दर्शन
‘दांभिकांचा मळा’ या लेखात भारतीय मानसिकतेचे अचूक विश्लेषण केले आहे. हे जळजळीत वास्तव स्वीकारण्याची आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व आजी आणि माजी नेत्यांचे आणि त्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याची आपली अजून तयारी नाही, हे सत्य आहे. माणसे ही स्वार्थाने प्रेरित असतात आणि स्वार्थ साधण्याकरताच ती कार्यप्रवण होतात हे आपण एक समाज म्हणून जितक्या लवकर स्वीकारू, तितके ते सर्वाच्या भल्याचे आहे. सर्वाचे हित साधणारी समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी एक तर सर्वजण नि:स्वार्थीपणे इतरांचा विचार करून कृती करणारे असावे लागतात किंवा मग सर्वाना त्यांचा त्यांचा दीर्घकालीन स्वार्थ कशात आहे ते पूर्णपणे समजलेले असावे लागते. पाश्चात्य जगात (विशेषत: अमेरिकेमध्ये) ही परस्पर स्वार्थ समजून घेण्याची आणि तो मान्य करण्याची मनोवृत्ती जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे कोणी नेत्यांना किंवा सरकारला ‘मायबाप’ असा दर्जा देत नाही. स्वार्थ मान्य केल्यामुळे कायद्याचे स्वरूप वास्तवाला धरून होते आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा अधिक प्रामाणिकपणे होते. (उदा. लॉबिंग अधिकृत करणे.) भारतातील बरीच जनता भोळी आहे आणि कोणी नि:स्वार्थीपणे काम करू शकतो यावर ती फार आंधळेपणाने विश्वास ठेवते. नेमका याचाच गैरफायदा नेते मंडळी उचलताना दिसतात. साधा सोसायटीचा पदाधिकारी काहीच मोबदला न घेता का म्हणून प्रामाणिकपणे काम करेल? किंवा जबाबदारीच्या मानाने अतिशय तुटपुंज्या वेतनात नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि सरकारी अधिकारी का म्हणून काम करतील, असा प्रश्न आपल्याला पडत नाही. सर्वाचा स्वार्थ सर्वानी मान्य करावा आणि एकत्रितपणे समाजव्यवस्थेमध्ये तो साध्य व्हावा, हाच अर्थ ‘जो जे वांछिल, ते तो लाभो’मध्ये ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावा. जो आपण नीट समजून घेण्याची गरज आहे.      
– प्रसाद दीक्षित

यथा प्रजा, तथा राजा!
‘दांभिकांचा मळा’ हा अत्यंत परखड लेख वाचला. खरं तर दांभिकता ही भारतीय समाजाने पुरातन काळापासूनच स्वीकारलेली गोष्ट आहे. गाईसह समस्त प्राणिमात्रांमध्ये आणि सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व आहे असे जरी आपण हिंदू लोक मानत आलो असलो तरीही माणसांत (दलितांमध्ये!) देव पाहण्याचे मात्र आपण टाळतो. स्वार्थाधतेचा आपण धिक्कार करत असलो तरी आपण स्वत: आत्यंतिक स्वार्थी असतो. राजकारणालाही मग त्याची लागण झाली तर त्यात आश्चर्य ते काय? त्यामुळेच आपल्या लायकीनुसार आपल्याला सरकार मिळते. म्हणूनच खेदाने म्हणावे लागते की, आपल्या देशाला काहीही भवितव्य उरलेलं नाही.  
– मनोहर सप्रे

सार्वत्रिक रोग
‘लोकरंग’ (२३  जून)मधील ‘दांभिकांचा मळा’ हा गिरीश कुबेर यांचा लेख विचारप्रवर्तक आहे. अनेक राजकीय नेते, लेखक यांचा दांभिकपणा उजेडात आणून कुबेर यांनी हा रोग इतरत्रही पसरला आहे, हे दाखवून दिले आहे. या रोगाचा शोध घेऊन तो नष्ट करण्याचा सर्वानी प्रयत्न करायला हवा. अनेक नामवंत क्रिकेटर, कलाकार अथवा अन्य सेलिब्रेटीज् आपण देशासाठी खेळतो अथवा गातो अथवा अन्य काम करतो असे म्हणतात, पण प्रत्यक्षात ते पसा आणि कीर्तीसाठी आपले गुण विकत असतात. पसे देऊन क्रिकेट, गायन, सिनेमांची आवड असणाऱ्यांनी ही जाणीव ठेवून सेलिब्रेटीज्ना उगाच डोक्यावर बसवू नये. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्याच वेळी एका श्रेष्ठ क्रिकेटरने एक सुंदर शतक झळकावले, ‘मी हे शतक या हल्ल्यात शहीद झालेल्यांना अर्पण करतो,’ असे तो म्हणाला आणि प्रसारमाध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली. प्रत्यक्षात आपल्या विक्रमांच्या यादीतून त्याने ते शतक वगळले नाही. मग अर्पण केले म्हणजे काय केले? आणि यात देशासाठी त्याग तो कोणता? राजकारणी नेते आणि मंत्री एखाद्या इमारतीचे अथवा फ्लाय ओव्हरचे उद्घाटन करताना ‘मी हे राष्ट्राला अर्पण करीत आहे’, असे म्हणतात. परंतु प्रत्यक्षात ती वास्तू त्या मंत्र्याची नसतेच, ती राष्ट्राचीच संपत्ती असते. राष्ट्रीय संपत्ती राष्ट्राला अर्पण करण्याचे खíचक समारंभ आणि हा दांभिकपणा जनतेने बंद करायला लावले पाहिजे.
– केशव आचार्य

अप्रतिम लेख!
 –  प्रफुल्ला डहाणूकर