News Flash

प्रतिक्रिया..

एक आम पत्रकार (‘आम’च! आम्हाला खोकलासुद्धा येतो!) या नात्याने आम्हांस ‘आप’च्या विजयाचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण हे केलेच पाहिजे.

| February 15, 2015 01:26 am

एक आम पत्रकार (‘आम’च! आम्हाला खोकलासुद्धा येतो!) या नात्याने आम्हांस ‘आप’च्या विजयाचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण हे केलेच पाहिजे. त्यास अंमळ उशीर झाला आहे हे आम्ही जाणतो. परंतु नाइलाज आहे. आमचे परमस्नेही रा. रा. प्रकाशजी जावडेकर, रा. रा. रविशंकरजी प्रसाद, सुश्री निर्मलाजी सीतारामन lok01यांच्याप्रमाणेच आम्हीही तयारी केली होती. या च्यानेलवर जाऊन हे बोलेन, त्या पेपरात ते बोलेन, दाढीत गोग्गोड हसत अस्सा बाईट देईन.. परंतु देवाजींची आणि नमोजींची करणी अगाध आहे! त्यांनी (पक्षी : नमोजी) आमच्या मनातील अहंकाराचा वारा काढून टाकण्यासाठी म्हणूनच हा असा अपघात घडवून आणला. हा पराभव हीसुद्धा नमोजींची एक लीलाच आहे!
(माह्यताय? आमच्या मिस काय सांगत होत्या? त्या दिवशी ना नमोजींनी सहज म्हणून ना बलाकजींच्या समोल तोंड उघडले, तल त्यांच्या तोंडात बलाकजींना काय दिस्ले माह्यताय? एकसोदस कोटी जन्ता! विश्वलूपदर्शनच ना ते, पप्पा? – इति आमचे धाकटे कन्यारत्न. थोडक्यात काय? नमोजींची लीलाच ती! उगाच नाही गुजरातेतील राजकोटात नमोजींचे मंदिर उभे राहिले.)
परंतु तरीही आधीची तयारी बाजूस ठेवून, कोणत्याही दबावास बळी न पडता आपण अत्यंत परखड व सेक्युलरपणे ‘आप’च्या विजयाकडे पाहिले पाहिजे.
वाचकांतील आम स्त्री, पुरुष व अन्यहो,
आपच्या या विजयास सर्वस्वी जबाबदार कोण असेल, तर ते दिल्लीचे मतदारच, असे आमचे प्रामाणिक मत आहे. मतदार कसले? ठगच ते! राजकारणात एक प्रकारची विश्वासार्हता, पारदर्शकता (आठवा : मन की बात!), स्वच्छता (झाडू, झाडू!), झालेच तर विनम्रता (परमसेवक! एवढय़ात विसरलात?) आणण्याचे निकराचे प्रयत्न सुरू असताना दिल्लीकरांनी उभ्या भरतखंडाचा विश्वासघात केला आहे. त्यांनी च्यानेलांना फसवले. आमचा आवडता च्यानेल- जो की इंडय़ा टीव्ही (‘नागिन की शादी’ फेम!) त्याचे थोर पत्रकार व न्यायमूर्ती रजतजी शर्मा यांना फसवले. त्याचे एवढे काही नाही. फिट्टंफाट झाली! पण सव्र्हे कंपन्यांच्या अजाण, अबोध पोरापोरींनाही त्यांनी ठगवावे? अशाने या कंपन्यांवर पोपट घेऊन रस्त्यावर बसायची पाळी आली तर त्यास जबाबदार कोण? आं?  
आमच्या परम डेअरर नेत्या सुश्री किरणजी बेदी म्हणतात तेच खरे आहे. हा फतव्याचा विजय आहे. घराघरांतून ‘आप’ला मतदान करण्याचे गुप्त फतवे निघाले होते आणि त्यामागे मतदारांचा हात होता, हे आता उघड झाले आहे. तेव्हा हा विजय मतदान यंत्रातील गडबडीचा नसून मतदारांतील गडबडीचा आहे. खरे तर बेदीबाईंमुळेच ते गडबडले. त्यांना वाटले, नमोजींच्या हातात डंडा आहे तेवढा पुरे. त्यात आणखी बेदीबाईंच्या हातातल्या डंडय़ाची भर नको. त्याहून झाडू बरा! आता हा झाला आम्ही लावलेला अर्थ!
परंतु ज्येष्ठ पत्रकारांची अन्यही काही कर्तव्ये असतात. उदाहरणार्थ बातम्या देणे. (कोण रे तो नतद्रष्ट! कोटय़ातून घरे मिळवणे, पेड न्यूजा छापणे, बातम्या पेरणे, काडय़ा घालणे, मालकांची मंत्रालयातील कामे करून देणे यांना आद्यकर्तव्ये म्हणतो? पत्रकार संघाचा पुरस्कार नाही मिळाला की माणसे असेच बरळू लागतात. आपण त्याकडे लक्ष न दिलेलेच बरे!) तर त्या कर्तव्यास जागून आमचे अभ्यासू नेते ‘आप’च्या या विजयाकडे कसे पाहतात, हे लोकांसमोर आणलेच पाहिजे. तेव्हा सादर आहे- आमच्या लाडक्या नेत्यांची मन की बात..
शरश्चंद्रजी पवार : श्री. केजरीवाल यांनी लोकांना पाणी आणि वीज देण्याच्या संबंधाने जे वायदे केले त्यामुळे लोकांनी त्यांच्या संबंधाने हा निकाल दिलेला आहे. पाणी आणि वीज ही दोन महत्त्वाची खाती आहेत हे आम्ही पहिल्यापासूनच श्री. अजितदादा यांना सांगत होतो. परंतु त्यांनी ती सोडलीच नाहीत..
पृथ्वीराज चव्हाण : समजा, ४९ दिवसांत आम्हीसुद्धा राजीनामा दिला असता तर..? पण त्यासंबंधी आता बोलणे कशाला? आता काय राजीनामाच राजीनामा!
छगन भुजबळ : हा विजय मफलरीचा आहे. मफलर म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी! खरे तर आमची मफलरसुद्धा काही कमी नाही. शंभर टक्के वूलनची आहे. पण लोकांना दृष्टिदोष झाला आहे, त्याला कोण काय करणार?
राज ठाकरे : व्वा! एकही मारा, पण क्या मारा! डांग्या खोकला असतो ना तसा डांग्या पराभव केला मोदींचा. अर्थात कार्यकर्त्यांची फौज असल्यावर शेंबडं पोरपण विजयी होतं. ते नसताना विजयी झाले असते तर कौतुक होतं! कॅय? पण तुम्हाला मी बजावून सांगतो, एक वेळ मी पक्ष बंद करीन, पण अशा फौजा गोळा करण्याच्या भानगडीत कदापि पडणार नाही..
नारायण राणे : आपचा विजय झाला? कोन काय बोल्लाच नाय आपल्याला!
आणि सरतेशेवटी..
उद्धव ठाकरे : हाहाहा.. हीहीही.. होहोहो.. खीखीखी.. असो! आपचा विजय हा कडवट झाडुत्वाचा विजय आहे! तो आपला त्या ह्याचा विजय आहे! पण खरंच आप कशामुळे जिंकली? जाऊ दे.. आपचा विजय झाला.. फुर्रफिस्सखीखीखी..                       
lr10

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2015 1:26 am

Web Title: response to aap victory in delhi
टॅग : Arvind Kejriwal
Next Stories
1 चौकशी!
2 ओबामाजी, परत या, परत या..
3 जाणिजे भक्तीकर्म..
Just Now!
X