कुमार शिराळकर

kumarshiralkar@gmail.com

सध्या नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीसारख्या अनेक मुद्दय़ांना विरोध करण्यासाठी देशभरातील विद्यार्थी व तरुण मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरत आहेत.  तरुणांच्या या राजकीय सजगतेची आणि कृतीशीलतेची बीजे कुठेतरी याआधीच्या परिवर्तनवादी चळवळी व आंदोलनांतून रुजली आहेत. १९६०-७० च्या दशकांत अशा आंदोलनांत व चळवळींमध्ये अनेकांनी स्वत:ला झोकून दिले होते. वर्तमानाशी नाते सांगणाऱ्या त्या भूतकाळाचा मागोवा..

तरुणांना आकर्षून घेणारी कोणतीही चळवळ ज्या त्या स्थल-काल-परिस्थितीच्या विशिष्ट परिप्रेक्ष्यात साकारली जात असते. १९६०-७० च्या दशकांत महाराष्ट्रातील श्रमिकांच्या चळवळीत युवक-युवती आकृष्ट होण्यामागे असा कोणता परिप्रेक्ष होता आणि त्या चळवळींचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्याकरता कोणती विचारसरणी, कार्यशैली व नैतिकता कार्यरत होत होती, त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न..

१९६०-७० च्या दशकांत एकंदरीत जगभरातच अनेक ठिकाणी राजकीय पर्यावरण तापलेले होते. फ्रान्समधील विद्यार्थी कामगारवर्गासह रस्त्यावर उतरून राज्यसत्तेशी संघर्ष करत होते. अमेरिकेतील देशी-विदेशी, काळे-गोरे तरुण व्हिएतनामला नामशेष करायला निघालेल्या सरकारचा कडवा निषेध करत होते. जपानमधील तरुणांमध्ये जरी अराजकीय प्रवृत्तींचा प्रादुर्भाव नंतरच्या काळात झाला तरी नव-डाव्या विचाराने प्रेरित झालेले तरुण युद्धविरोधी भूमिका घेऊन आंदोलन करत होते. चीनमध्ये माओने सुरू केलेल्या अभूतपूर्व सांस्कृतिक क्रांतीचा नंतरचा प्रवास जरी संधिसाधू दडपशाहीने बाधित झाला असला तरीही सुरुवातीला तिथल्या तरुणांनी परिवर्तनाचा हा सांस्कृतिक पलू उचलून धरला होता.

अशा या आंतरराष्ट्रीय राजकीय पर्यावरणात आपल्या देशातील राजकीय वातावरण जनचळवळीच्या दृष्टीने वेगवान बनत होते. स्वातंत्र्यानंतर जनसामान्यांच्या आशा-आकांक्षांना फुटलेले धुमारे कोमेजून जात होते. शहरी औद्योगिक क्षेत्रात मंदीची प्रचंड लाट १९६७ पासूनच घोंगावत होती. १९६०-६१ नंतर सुरू झालेल्या कृषिक्षेत्रातील हरितक्रांतीचा बहर ओसरू लागला होता. पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली जुलमी, शोषक जमीनदारांविरुद्ध आदिवासींचा सशस्त्र लढा उभारणारी चळवळ पसरत होती. दलित पँथर्स, स्त्री-मुक्ती संघटना, युवक क्रांती दल, एक गाव- एक पाणवठा, लोकविज्ञान संघटना, पॅवलो फ्रेरी यांच्या कॉन्शन्टायझेशन पद्धतीचा अवलंब करणारा आणि विज्ञानविषयक शिक्षण देऊ पाहणारा होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्रॅम अशा संघटनांच्या चळवळी जोर धरत होत्या. मागोवा गटासारखा मार्क्‍सवाद मानणारा जहाल मतवादी गट युवकांमध्ये, कामगारांत आणि ग्रामीण भागात कार्य करू लागला होता. समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचे पाच पक्ष एकत्र येऊन कामगार-शेतकऱ्यांच्या लढय़ांचे पुढारपण करत होते. मजूर संघर्ष वाहिनीचे व्यापक अस्तित्व जाणवत होते. जनसमुदाय हलत होते. उत्स्फूर्त तसेच संघटित लढे ठिकठिकाणी उद्भवू लागले होते. महागाई, गरिबी, दुष्काळ हे मुद्दे घेऊन अनेक ठिकाणी तीव्र संघर्ष छेडले जात होते.

महाराष्ट्रात कामगारांच्या संघटना लढाऊ कृती करत होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात आलेल्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रामुळे जनतेला चांगले जीवनमान लाभेल असे जे वाटले होते, तसे ते मिळत नव्हते. मुंबई शहरात वाढलेल्या बेरोजगारीच्या समस्येला मराठी-अमराठी असे वळण देऊन शिवसेना आक्रमक झाली होती.

त्यावेळच्या धुळे जिल्ह्यतील शहादे परिसरात धडाडीचे आदिवासी तरुण अंबरसिंग सुरतवंती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी स्वत:च्या रक्तात बुडविलेल्या लेखणीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र लिहून आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संताप व्यक्त केला होता. आदिवासी स्थानिक तरुण कार्यकत्रे त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. सर्वोदयचे नेते व कार्यकत्रे होतेच. लाल निशाण पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष यांचे नेते शहाद्याला येऊ लागले. बाबा आमटे यांच्या सोमनाथच्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठातले तरुण कार्यकत्रे त्यांना येऊन मिळाले. डाव्या विचारांनी भारावलेल्या, ग्रामीण भागात चळवळ करू इच्छिणाऱ्या काही शहरी, मध्यमवर्गीय तरुणांनी शहादे परिसरात कार्य करण्याचा निश्चय केला. देशात अनेक भागांत क्रांतिकारी ध्येयनिष्ठेने आणि समर्पणाच्या असीम जिद्दीने झोकून देऊन कार्य करणाऱ्या तरुण-तरुणींचे संच तयार होत होते. तथाकथित स्वयंसेवी संस्थांचा फंडिंगचा फंडा अशा युवक-युवतींना प्रलोभने दाखवू शकत नव्हता. क्रांतिकारी ध्येयनिष्ठेपासून तरुणांना दूर खेचून डाव्या चळवळींची धार बोथट करण्यासाठी वापरायचे एक मोहमयी साधन असलेल्या या स्वयंसेवी संस्थांना लुडबूड करू द्यायची नाही असा पवित्रा दलित- आदिवासी- श्रमिक जनतेत कार्य करणाऱ्या संघटनांनी जाणीवपूर्वक घेतला होता.

नक्षलवादी असो, युवक क्रांती दल असो, दलित पँथर्स असो की मागोवा गट आणि त्याच्याशी संबंधित शहरी-ग्रामीण भागात काम करणाऱ्या श्रमिक संघटना; त्यांचा राजकीय-तात्त्विक रोख ‘निवडणुकांच्या समन्वयवादी, संधिसाधू राजकारणामुळे परिवर्तनाच्या पायाभूत कार्याला खीळ बसत आहे,’ हा होता. जरी त्या संघटनांमध्ये खूप राजकीय व वैचारिक मतभेद असले तरी या मुद्दय़ाबाबत त्यांची धारणा सारखीच होती.

कामगार, शेतकरी, शेतमजूर, कारागीर, व्यावसायिक अशा श्रमिकांचे श्रमिक म्हणून असणारे प्रश्न घेऊन चळवळ करत असतानाच दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला अशा सामाजिक समूहघटकांचे विशेष प्रश्न घेऊन मुद्दाम चळवळ करावी लागते. भारतीय ऐतिहासिक परंपरेतून उद्भवलेल्या जातिभेदांना, अस्पृश्यतेला, स्त्री-पुरुष विषमतेला, श्रेष्ठ-कनिष्ठतेला, नाना तऱ्हेच्या अवैज्ञानिक श्रद्धा-अंधश्रद्धांना, धर्माधारित द्वेषाला निखालसपणे नेस्तनाबूत करण्याच्या लढय़ांना किती खडतर स्थितीतून जावे लागते याचा अनुभव पूर्वसुरींनी दिलेला होताच. आर्थिक शोषण, सामाजिक भेदाभेद, जुलूम ज्यांना भोगावे लागतात त्यांना इतर श्रमिकांपासून वेगळे पाडून समताप्रधान मानवी समाजाकडे जाणारे लढे फोडण्याचे प्रस्थापित वर्ग-जात-सत्तेचे षड्यंत्र वारंवार यशस्वी होत आले आहे. सर्वहारा-अर्धसर्वहारांची केवळ बेरीज नव्हे, तर त्यांची एकजीव एकजूट सर्व प्रकारच्या मूलभूत जहाल परिवर्तनासाठी करावी लागते याचे भान सतत ठेवणे आवश्यक असते. दलितांना मिळणारी भेदभावाची तुच्छ वागणूक, सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू न देणे, त्यांचे केस कापण्यास नकार देणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, मारझोड करून उलट त्यांच्यावरच खोटेनाटे गुन्हे दाखल करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनादर दाखवून अवहेलना करणे, इ. गोष्टींविरुद्ध आंदोलने करून मानवी हक्क प्रस्थापित करावे लागतात.

भारतातील उतरंडीवरच आधारित वंशपरंपरागत जन्मसिद्ध अधिकारभेदांची समाजरचना छिन्नविच्छिन्न केल्याखेरीज समाजवादाची उभारणी केवळ कल्पनाविलास आहे. समाजवादाकडे नेणाऱ्या जनवादी क्रांतीसाठी जातिसंस्थेविरुद्ध आणि जातिभेदांविरुद्ध जाणीवपूर्वक चळवळ करणे नितांत गरजेचे आहे याचे भान हवे. श्रमिकांची उतरंडीवर आधारित विभागणी तशीच ठेवून समाजवादी समतेकडे पोहोचणे कदापि शक्य नाही. आजपर्यंत श्रमिकांची फाटाफूट करणाऱ्या विभागणीवरच शोषण-छळकर्त्यां वर्ग-जातींनी सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा यांचा उपभोग घेतला आहे. भांडवलशाही विश्वातील सर्व वस्तूंना क्रयवस्तू बनविते. माणसाची श्रमशक्ती, कला, सृजनशीलता, प्रतिभा अशा प्रत्येक गोष्टीला क्रयवस्तू केले जाते. वस्तू आणि यंत्र म्हणूनच माणसे स्वत:कडे आणि परस्परांकडे पाहायला लागतात. यंत्रवस्तू झालेल्या माणसामाणसांतील संबंध मानवी राहतच नाहीत. ते वस्तुमय आणि यंत्रमय होतात. समाजवादाची आशा करणे म्हणजे ही ‘वस्तुमयता’ भस्म करणे होय. माणसाला माणूस बनविण्यासाठी आणि माणसा-माणसांतील परस्परसंबंध मानवी बनविण्यासाठी त्यांचे वस्तूंवरील परावलंबित्व संपविणे व त्यांचे वस्तुबंद श्रम मानवी सृजनशीलतेसाठी मुक्त करणे आवश्यक आहे. भांडवल श्रमांना बांधून ठेवते, परावलंबी बनवते. माणसाचे श्रमच परावलंबी होतात. माणूस त्याच्या श्रमातून बनलेल्या गोष्टींनाच पारखा होतो. हे पारखेपण, हा परात्मभावी दुरावा दूर करण्यासाठी त्याच्या सर्जनशील श्रमांचा खरा मालक तीच/ तोच बनायला हवा.

या सामाजिक-राजकीय जाणिवा आणि त्याकरता करावयाचा राजकीय चळवळींचा व्यवहार याबाबत डाव्या पक्ष-संघटनांची असलेली कमजोरी आणि चुकीच्या भूमिका यांना पूर्णपणे फाटा द्यायला हवा असे परखडपणे मांडले जात होते आणि ब्राह्मणी वर्चस्ववादी विकृतीच्या मगरमिठीतून मुक्त करणारी फुले-आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी संघटना सरसावत होत्या. तथापि चळवळीत आकर्षति झालेले कार्यकत्रे समजून-उमजून एका विशेष कार्यशैलीचा आग्रह धरत होते. कार्यकत्रे श्रमिकांच्या झोपडय़ांतच राहत होते. त्यांच्यात मिसळत होते. त्यांच्याशी एकरूप होत होते. कार्यकर्त्यांमधील परस्परसंबंध, त्यांचे लोकांबरोबरचे संबंध कॉम्रेडशिपचे आणि परस्परांना समजून घेणारे तसेच सहकार्य करणारे राहावेत यासाठी विशेष लक्ष दिले गेले. टीका-आत्मटीका तत्त्वाच्या जाणीवपूर्वक व समजदार अंमलबजावणीमुळे चळवळीला धार येत गेली. व्यक्तिवाद, नोकरशाही, एकांडेपणा, हडेलहप्पी वृत्ती अशा घातक अपप्रवृत्तींना काबूत ठेवणे हा चळवळीचा नेहमीचा कार्यभाग झाला. निर्णयप्रक्रियेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचा सहभाग आणि अधिकाधिक लोकांची भागीदारी यावर कटाक्षाने लक्ष देण्यात आले. नेते-कार्यकत्रे यांच्यातील कृत्रिम उच्च-नीचतेला फाटा देण्यात आला. चळवळीत कितीही खडतर प्रसंग आले, कितीही शारीरिक व मानसिक त्रास झाला तरी तो आनंदाने झेलण्याची सवय त्यांना झाली. कार्यकर्त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि त्यांचा विश्वास संपादन केला तर लोक त्याची कशी शतपटींनी परतफेड करतात याचा अनुभव चळवळीने त्यांना पुरेपूर दिला. लोकशाही म्हणजे हवेत तरंगणारे बुजगावणे नसते. लोकशाही हा माणसा-माणसांतील प्रत्यक्ष व्यवहाराचा आनंददायी आणि उत्साही आविष्कार असतो याचा प्रत्यय चळवळीने भरभरून दिला. लोक आणि कार्यकत्रे यांचे समानतेचे नाते परस्परांकडून अखंडपणे शिकण्यातच सामावलेले असते याचे मनस्वी प्रत्यंतर चळवळीने दिले.

श्रमिकांची सर्वागीण चळवळ समताप्रधान जनवादी ध्येय-ध्यासाने भारावलेली हवी. तिच्यासाठी आवश्यक तो सगळा त्याग करण्याची तयारी हवी. शक्य ते सर्व समर्पण करण्याची मनस्वीता हवी. येतील ती संकटे धर्याने झेलण्याची वृत्ती हवी. पण एवढेच पुरेसे नाही. एका ठाम, कणखर, प्रगल्भ वैचारिक आणि व्यावहारिक अधिष्ठानाशिवाय चळवळ करणे चुकीचे आहे. तसेच कोणतीही नवी क्रांतिकारी चळवळ आधीच्या ऐतिहासिक क्रांतिकारी चळवळीच्या मजबूत धाग्यांपासून पूर्णपणे तोडून घेऊन करता येत नाही. चळवळीलादेखील एक सातत्य असावे लागते. आधीच्या सर्व ऐतिहासिक चळवळींचे परखड आणि पारदर्शक परीक्षण करून त्यातून काढलेल्या निष्कर्षांमधून क्रांतीला पुढे घेऊन जाणाऱ्या सकारात्मक गोष्टींचाच फक्त स्वीकार करावा लागतो. मूलभूत परिवर्तनाच्या अदम्य इच्छेने आणि पराकोटीच्या क्रांतिकारी प्रेरणेने केलेल्या प्रयासांमध्येदेखील गंभीर चुका होऊ शकतात, हे संवेदनशीलता न गमावताही जाणता यायला हवे. खऱ्याखुऱ्या क्रांतिकारी चळवळीचा विचार व व्यवहार कधीही आंधळेपणाने किंवा घोकंपट्टी करून करता कामा नये. समताप्रधान समाजाकडे जाणारी क्रांती भारतात यशस्वी करायची असेल तर चार्वाक-लोकायत-बुद्धापासून वसाहतवादाविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य चळवळींचे आणि स्वतंत्र भारतातील साम्यवादी-समाजवादी चळवळींचे, फुले-आंबेडकरी चळवळींचे आपण वारस बनायला हवे. तसेच जगातील इतर देशांत हुकूमशाही व एकाधिकारशाहीविरुद्ध आणि भांडवलशाहीविरुद्ध झालेल्या क्रांत्यांनंतर केल्या गेलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पसा-सुखोपभोग-प्रसिद्धी-मानसन्मानादी प्रलोभनांना बळी न पडणाऱ्या, सतत बदलत्या परिस्थितीचा वेध घेत स्वत:ला तपासणाऱ्या व त्यानुरूप बदलणाऱ्या आणि तरीही ध्येयदृष्टी जराशीही अधू होऊ न देणाऱ्या लोकांचे हे काम आहे. अशी प्रदीर्घ काळ चालणारी गुंतागुंतीची चळवळीची प्रक्रिया तोलून धरणाऱ्या कार्यकर्त्यांनी तितिक्षा व दीर्घोद्योग यांची कास धरायला हवी. समाजवादाचे ध्येयधनुष्य पेलण्याची ताकद भांडवली बाजारात विकत मिळत नाही. ती स्वकष्टार्जित कमाई असते. गेल्या शतकातील साठी-सत्तरीच्या जगभरच्या उठावांच्या दशकांमध्ये तारुण्याच्या ऐन उमेदीत धडाडीने श्रमिकांच्या चळवळीत उडी घेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना ऊर्जादायी समाधान मिळाले, हे नि:संशय! पण आता त्या परिप्रेक्ष्यापेक्षा खूपच बदललेल्या परिस्थितीत नव्या तरुण-तरुणींनी नव्या वाटा धुंडाळून क्रांतीची धुरा अंगावर घ्यायला हवी. आणि अनेक युवक-युवती ती घेत आहेत याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अखेर चळवळीचे शाश्वत आर्यसत्य आहे- मानवाच्या कल्याणाचे, समतेचे आणि सर्व तऱ्हेच्या सत्ता-सक्तीतून मिळणाऱ्या मुक्तीचे!