बालचित्र समितीला रामराम ठोकून मी पुन्हा दिल्ली दूरदर्शन केंद्रावर हजर झाले. आता ‘प्रमुख प्रोडय़ुसर’चा मुलामा उरला नव्हता. निमूट पुन्हा ग्रेड २ वाल्या रंगरूटांच्या रांगेत मी सामील झाले. मानाची नोकरी सोडून परतल्यामुळे साहजिकच मी कुतूहलाचा विषय बनले होते. पण तो हुद्दा मी काही तत्त्वांसाठी सोडला होता, त्यामुळे माझी मान ताठ होती. तर मागील पानावरून पुढे चालू झाले.. समाधानाची गोष्ट म्हणजे आमची गृहस्थी पुन्हा सुरू झाली. मुलं (विनी, गौतम) ‘दिल्ली पब्लिक स्कूल’मध्ये शिकू लागली.
मुंबईच्या अनुभवाचा मला फायदा निश्चितच झाला. माझ्या खात्यावर आता दोन ‘बाल’पट नोंदवले गेले असल्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला. मी ‘माहितीपट’ या सिनेमाच्या काहीशा उपेक्षित अंगाकडे लक्ष वळवलं. डॉक्युमेंटरीला दर्शकांपर्यंत पोचायला हक्काचा असा मंच नव्हता. त्यासाठी निदान चित्रपट माहिती विभागाचे (फिल्म्स डिव्हिजन) माहितीपट लोकांनी पाहावेत यासाठी थिएटर्समधून मूळ चित्रपटाच्या आधी माहितीपट दाखविण्याची सरकारने काही काळापुरती सक्ती केली होती.
पण ते पाहण्याची सक्ती कशी करणार? डॉक्युमेंटरी सुरू झाली की प्रेक्षक सरळ उठून बाहेर जात. त्यांना फारसा दोष देता येणार नाही, कारण अधिककरून त्या फिल्म्स शब्दबंबाळ, प्रचारकी थाटाच्या आणि रूक्ष असत. तेव्हा हा प्रयोग फोल ठरल्यावर बिचाऱ्या लघुपटाला प्रेक्षक गाठण्याचा तोही मार्ग खुंटला. मला ठामपणे वाटते की, लघुपटासाठी दूरदर्शन हा एक उत्तम मंच आहे. एखाद्या हृद्य विषयावर कुटुंबासमवेत डॉक्युमेंटरी पाहण्याची प्रथा जर रूढ झाली, तर निश्चितच या सिनेप्रकाराला बरे दिवस येतील. फिल्म्स डिव्हिजनमध्ये सुखदेव, प्रमोद पति, इ. दिग्दर्शकांनी सुंदर लघुपट निर्माण केले. पण काही मोजके सिनेमहोत्सव सोडले तर त्यांच्या या कलाकृतींना फारशी मोकळी हवा मिळाली नाही. त्या डबाबंदच राहिल्या. माहितीपट म्हणजे तो कंटाळवाणाच असणार, असा एक समज रूढ आहे. बर्ट हॅन्सट्रा या दिग्दर्शकाचे माहितीपट पाहिले तर हा समज दूर होईल. फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये त्याचे तीन सरस सिनेमे मी पाहिले. ‘डेल्टा फेझ’ (पाण्यावर), ग्लास (काचनिर्मितीची किमया) आणि तिसरा ‘झू’! ‘झू’ या लघुपटाची संकल्पनाच अफलातून आहे. प्राणिसंग्रहालयामधला एक दिवस हॅन्सट्राने टिपला आहे. पण त्याची मेख अशी, की सिनेमा हा जनावरांच्या दृष्टिकोनातून पेश केला आहे. म्हणजे माणसं ही जणू श्वापदं. त्यांचे एकेक नमुने पाहून असा संभ्रम पडतो, की गजाआड कोण असायला हवं? मी या दिग्दर्शकाची जबरदस्त चाहती होते. तेव्हा एका भारतीय चित्रपटाच्या महोत्सवासाठी ते येणार असं कळलं तेव्हा खूप आनंद झाला.
दूरदर्शनसाठी त्यांची मुलाखत घेण्याचा मान मला मिळाला. ही मुलाखत कुठल्या पाश्र्वभूमीवर घ्यायची, याची त्यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा त्यांनी कुतुबमिनार, लाल किल्ला इत्यादी प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे धुडकावून लावली. ‘चांदणी चौकच्या बाजारात किंवा जामा मस्जीदजवळच्या एखाद्या गल्लीत आपण बातचीत करू या,’ असं ते म्हणाले. ‘मला गतकाळाशी कर्तव्य नाही. आजच्या जिवंत घडामोडींत मला रस आहे. दगडधोंडे नाही, तर चालतीबोलती माणसं मला जवळची वाटतात.’
डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी वेधक विषयांची कमतरता नव्हती. दूरदर्शनच्या माझ्या कारकीर्दीत मी साधारण आठ-दहा लघुपट बनवले. त्यातले चार ठळकपणे आठवतात. वेगवेगळय़ा विषयांचा वेध घेऊन माहिती देता देता सिनेमा रंजकही होईल याची मी खबरदारी घेत असे.
कॉम्प्युटर ग्राफिक्सचा चमत्कार घडण्यापूर्वीचा तो काळ होता. गल्लोगल्ली, कोपऱ्या-कोपऱ्यावर उभारलेले सिनेपोस्टर्स रंगवणारा एक खास चित्रकारवर्ग रात्रंदिवस राबत होता. लोकप्रिय तारे-तारकांच्या हुबेहूब प्रतिमा चितारून मोठाले फलक उभारणाऱ्या या मंडळींविषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. हे पोस्टर आणि पडदे रंगवणारी मंडळी आता जरी काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी त्याआधी मी त्यांच्या कामाची दखल घेऊ शकले याचे मला समाधान वाटते. त्यांच्या कामाच्या खास अड्डय़ांमध्ये आम्ही कॅमेरा आणि इतर सरंजाम घेऊन पोचलो. त्या बकाल गोडाऊन्स किंवा तबेल्यांमध्ये रंगाची डबडी, ब्रश, मोठाले तख्ते यांच्या गराडय़ात तल्लीन होऊन काम करताना आम्ही त्यांचे चित्रण केले. त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातल्या काही मोठय़ा मार्मिक होत्या. अजून आठवतात. ‘आमची कला ही खरी लोककला आहे. ती पाह्य़ला तुम्हाला मोठं तिकीट काढून प्रदर्शनात जावं लागत नाही. ती तुमच्याकडे धाव घेते. अवघ्या शहराला शोभिवंत करते. पण आम्हाला कुणी चित्रकार म्हणून ओळखतं का? आम्ही रंगारी!’
रंगीबेरंगी डाग मिरवणारा बनियन आणि अर्धी चड्डी घालून शिडीवर चढून रंगकाम करणारा एक चित्रकार आठवतो. त्याला मुद्दाम जरा वाकडा प्रश्न केला, ‘का हो? भररस्त्यात तुमचे पोस्टर लागलेले असतात. ते कुमार आणि बालवयातली मुलं पाहतात. शस्त्रधारी छैले आणि उत्तान वेश केलेल्या छबिल्या. ही अशी भडक चित्रं पाहून त्यांच्या कोवळय़ा मनावर परिणाम होणार नाही?’
यावर पोटतिडकीने त्याने उत्तर दिले, ‘अहो, आमची ही सर्व चित्रं जागच्या जागीच गोठून उभी असतात. हा शत्रुघ्न बंदूक ताणून उभा आहे. तो कधी गोळी झाडणार नाही. गिरकी मारताना मुमताजचा घागरा जरा वर गेला असला, तरी तो आणखी वर जाणार नाही. तुम्ही तिकीट काढून हॉलमध्ये जाता. तीन तास तुम्ही हलत्या चित्रांचा धुमाकूळ चवीने पाहता. बायांचे वेडेवाकडे नाच आणि हीरोचा तुफान गोळीबार. रक्ताचे पाट पडद्यावरून थेटरात येणार की काय, अशी भीती वाटते. तर हे पाहून पोरांची नीती बिघडत नाही का? सांगा!’
पोस्टर पेंटर्सच्या या लघुपटासाठी एक फारच नामी मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एम. एफ. हुसेन यांची. ते मूळ पंढरपूरचे. गरीब घराण्यात जन्मले. लहान वयात त्यांनी पोस्टर रंगवण्याचे काम सुरू केले. सुरुवातीच्या त्या दिवसांबद्दल हुसेन भरभरून बोलले. ‘दुर्गा खोटेची छबी रंगवायला मिळाली- ‘पायाची दासी’ सिनेमासाठी- तेव्हा मी धन्य झालो.’ त्यांची दिवसाची कमाई तेव्हा आठ आणे होती. आज हुसेनच्या एका चित्राची किंमत कोटीमध्ये होते.
माझ्या लघुपटाचा शेवटचा शॉट मोठा बोलका होता. भिंतीला टेकलेले एक लांबच लांब आडवे पोस्टर. एक ललना.. किमान वस्त्रे घालून पहुडलेली. दोन वर्षांचा एक छोटा बालक हातात भिरभिरे घेऊन शेजारून इकडून तिकडे चालला आहे. त्याच्या अंगावर चिंधीसुद्धा नाही. त्या अर्धनग्न युवतीचा उत्तानपणा आणि त्या छोटय़ा पोराचा निष्पाप नागडेपणा यांचा अप्रतिम विरोधाभास या दीर्घ शॉटमधून प्रतीत झाला. याच शॉटवर श्रेयनामावली प्रकटली.
पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट बनवण्याचा मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले. त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले. पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत. त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स! नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले. ‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता. रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली. हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.
पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही.
‘द लिट्ल टी शॉप’- ‘चहाचा छोटासा ढाबा’- हा खरोखरच ‘लघु’पट होता. अवघ्या ११ मिनटांचा. तो अशासाठी महत्त्वाचा ठरला, की माझे पहिलेवहिले सिने-पारितोषिक या छोटय़ा फिल्मने मला मिळवून दिले. दिल्ली-आग्रा हायवेवर एक पिटुकला, पण ऐटबाज असा मातीचा ढाबा होता. एक विधवा बाई तो एकटी चालवीत असे. तीच मालकीण, तीच चहा बनवणारी, तो पांथस्थाला देणारी, ग्लास विसळणारी आणि गल्लाही सांभाळणारी. आडदांड ट्रकड्रायव्हर गिऱ्हाईकांना समर्थपणे तोंड देणारी पण तीच. आजच्या काळात एक अशिक्षित महिला कशी आपल्या पायावर ठाम उभी राहू शकते, हे दाखवण्याचा तो एक सुप्त प्रयत्न होता. सिनेमाला निवेदन नव्हते. एखादाच संवाद होता. ‘ओय, चालीस किलोमीटर दी चा देई. मिठ्ठी ते कडक.’ अशा ठरावीक ‘फिरस्ता’ फर्माईशीचा.
आशियाई नभोवाणी संघटनेचं (अ२्रंल्ल इ१ूिंं२३्रल्लॠ वल्ल्रल्ल) पहिलं बक्षीस या ‘ढाब्याला’ मिळालं. तेहरानला समारंभ झाला. सन्मान स्वीकारायला तेव्हाचे केंद्रप्रमुख रमेश चंद्र गेले होते. मला नंतर कळलं. असो.
इंग्लंडच्या कॉमनवेल्थ फाऊंडेशन या संस्थेने भारतीय दूरदर्शनमधल्या पाच-सहाजणांचे शिष्टमंडळ आमंत्रित केले होते. २० दिवसांच्या स्नेहयात्रेसाठी. एव्हाना पी. व्ही. कृष्णमूर्ती हे मुरब्बी नभोवाणीतज्ज्ञ आमचे केंद्रप्रमुख झाले होते. ते या शिष्टमंडळाच्या अग्रणी होते. माझी या यात्रेसाठी निवड झाली, कारण माझ्या लघुपटांचा आणि टेलिनाटिकांचा थोडा बोलबाला होऊन माझे तेव्हा जरा जरा नाव होऊ लागले होते.
आमचा मुक्काम मुख्यत्वे लंडनलाच असणार होता. ग्लॅसगोला धावती भेट ठरली होती. मी धावतपळत एडिनबरोला जाऊन येण्याची संधी साधली. माझी आजी- आईची आई स्कॉटलंडमधल्या या किल्ल्यांच्या सुंदर शहरात वयाच्या ४० व्या वर्षी निवर्तली. न्यूमोनिया होऊन. तिचे नावही ‘सई’ होते.
आमची सफर फारच सुंदर झाली. अगदी राजेशाही. आम्हाला फिरवायला स्वतंत्र रोल्स रॉइस होती. आणि आमच्या तैनातीला पीटर ब्राऊन हे अतिशय अनुभवी जनसंपर्काधिकारी होते. आम्ही अनेक स्टुडिओंना भेटी दिल्या. प्रत्यक्ष प्रसारण पाहिले. नाटकांच्या तालमींना हजर राहिलो. नवे तांत्रिक शोध पाहून दिपलो. त्यांच्या टी. व्ही. युनिटबरोबर फिरलो. तो सगळाच अनुभव प्रभावित करणारा होता. प्रत्येक क्षेत्रामधली त्यांची प्रगती, त्यांची अद्ययावत सामग्री आणि एकूणच त्यांच्या साम्राज्याचा पसारा- सारेच नेत्रदीपक होते. पण मला सगळय़ात जास्त काय भावले असेल, तर त्यांची शिस्त. प्रत्येक गोष्ट प्राणपणाने केली जाई. ‘चालसे’ वृत्तीला थारा नव्हता. वेळेच्या बाबतीत अतिशय चोख. ‘काय सांगू बाबा? ट्रॅफिक!’ अशासारखा बचाव कधीच ऐकू येणार नाही. सुप्रसिद्ध नट सर लॉरेन्स ऑलिव्हिएचा एक किस्सा सांगतात. एका कॅमेरा तालमीला ते टेलिव्हिजन स्टुडिओत दहा मिनिटे उशिरा पोचले. ते सेटवर पोचताच फ्लोअर मॅनेजर त्यांना म्हणाला, ‘‘लॅरी. यू आर लेट!’’ यावर सर ऑलिव्हिए उद्गारले, ‘‘आयम् सॉरी मायकल. इट वोंट हॅपन अगेन.’’ पुन्हा अशी चूक घडणार नाही. आपल्या देशात एक साधा कर्मचारी आणि राष्ट्रीय ख्यातीचा अभिनेता यांच्यात अशा प्रकारचा संवाद संभवेल का? कदापि नाही.
लंडनभेटीचा माझ्या मते उच्चांक होता- डेव्हिड फ्रॉस्टने घेतलेल्या मुलाखतीला माझी प्रत्यक्ष हजेरी. या गाजलेल्या पत्रकाराचे मुलाखत घेण्याचे तंत्र विलक्षण होते. हसतखेळत समोरच्या व्यक्तीला गाफील करून मग डंख मारायचा. त्याने रिचर्ड निक्सनची घेतलेली मुलाखत विख्यात होती. मी पाहिलेल्या मुलाखतीत फ्रॉस्टने एका अमेरिकन उद्योग‘पत्नी’ला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले.
आमच्या ब्रिटिश यजमानांनी आमचे खूप कौतुक केले. प्रेक्षणीय स्थळांना भेट, मेजवान्या, स्वागत समारंभ या सोहळय़ांव्यतिरिक्त निवडक नाटकेही आम्हाला पाहायला मिळाली. ऑपेरामध्ये संगीतिका, रॉयल शेक्सपिरीयन कंपनीची नाटके, वेस्ट एंडला ‘एक्वस’ (ए०४५२) या जबरदस्त नाटकाचा प्रयोग पाहून तृप्त झाले. दिल्लीला अरुणबरोबर नुकतीच ‘नाटय़द्वयी’ ही संस्था स्थापन केली होती. संगीत नाटय़ विभागात (रल्लॠ- ऊ१ें ऊ्र५्र२्रल्ल) अरुण आणि दूरदर्शनमध्ये मी आपली रोजीरोटी कमावत असलो तरी आम्ही नाटकाशी एकनिष्ठ होतो. लंडनला पाहिलेल्या नाटकांमधून बरेच काही शिकायला मिळाले. आमच्यापैकी एकाने फर्माईश केली. ते महाभाग म्हणाले, ‘‘हे सगळं शेक्सपियर वगैरे उच्चभ्रू संस्कृतिदर्शन ठीक आहे, पण ‘ओ कॅलकत्ता’ पाह्यल्याशिवाय परतणे हे काही खरं नाही.’’ त्या काळात हे नाटक मंचावरच्या विवस्त्र नटांच्या लीलांसाठी गाजत होतं. ‘अश्लील’ म्हणून झालेला त्याचा बोभाटा भारतापर्यंत पोचला होता. या रसिक सहकाऱ्याची मागणी बाकीच्यांनी धुडकावून लावली.
आमच्या सफरीची मुदत संपत आली होती. मग एक सुखद घटना घडली. लंडनमध्ये एक लघुपट करण्यासाठी मला विचारणा करण्यात आली. पंधरा दिवसांनी माझा मुक्काम वाढला. इंग्लंडमधल्या तीन सरकारी समाजसेवी संस्थांवर मी चित्रपट बेतला- ‘ळँी ऌी’स्र््रल्लॠ ऌंल्ल.ि’ मदतीचा हात पुढे. मति अविकसित असलेल्या मुलांची संस्था, एक अनाथाश्रम आणि एक वृद्धाश्रम अशा ठिकाणी शूटिंग झाले. वृद्धाश्रमात आम्ही कॅमेरा घेऊन दाखल झालो तेव्हा आदल्याच दिवशी तिथे एक प्रेमविवाह झाल्याचे समजले. वर वय वर्षे ८२ आणि वधू ८० ची. त्या संस्थेतच त्यांची भेट झाली आणि प्रेम जुळले. गंमत म्हणजे या प्रकरणाला दोघांच्याही घरून- म्हणजे मुलांचा आणि नातवंडांचा विरोध होता. त्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केले. काळाचा महिमा!
‘मदतीचा हात’ मी यजमानांच्या हातात दिला. सिनेमा पाहून ते म्हणाले, ‘या स्नेहयात्रेची किती समर्पक सांगता झाली! What a befitting climax to this trip! (भाग २)
छायाचित्र : पंकज मलिक- ‘डॉक्टर’ फिल्ममध्ये.