शाळेत असताना ‘दिवाळी’ या विषयावर निबंध लिहा म्हटले की, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा आणि भाऊबीज अशी काहीशी मांडणी असायची. नाही म्हणायला मध्ये एक वाक्य लक्ष्मीपूजनाचे असे. घरात पेढे, बत्ताशे, कुरमुऱ्याच्या प्रसादामुळे लक्ष्मीपूजन झाल्याचे कळत असे. पण त्याचे फार काही महत्त्व कधी वाटले lok06नाही. विद्यार्थिदशेत    दरवर्षी दसऱ्याला होणारे सरस्वतीपूजन फार महत्त्वाचे होते. लक्ष्मीपूजनाशी ओळख बरीच उशिरा, म्हणजे स्वत: कमावते झाल्यावर झाली. शेअर बाजाराशी एक गुंतवणूकदार म्हणून संबंध आल्यावर ‘मुहूर्त ट्रेडिंग’ या प्रकाराशी ओळख झाली. जुन्या पिढीला या एकंदरच समारंभाचे फार अप्रूप. शेअर बाजारात या दिवशी चांगलाच उत्साह दिसून येतो. जुनी गुंतवणूकदार मंडळी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन ठेवतात. या दिवशी सहसा ही मंडळी काही विकत नाहीत. यात भावनिक गुंतवणूक प्रचंड असते. पण का कुणास ठाऊक, माझे मन काही त्यात रमले नाही.
लक्ष्मीपूजन आहे म्हणून ‘मुहूर्त ट्रेडिंग’ करायलाच हवे आणि त्या दिवशी काहीतरी खरेदी करायलाच हवे, हे कधीच मनाला पटले नाही. परीक्षेच्या आदल्या दिवशी भरपूर अभ्यास केला म्हणून कोणी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल असे नाही. उच्च श्रेणीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे तर वर्षभर अभ्यास करायला हवा. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची आराधना केली, ‘मुहूर्त ट्रेडिंग’ केले की लक्ष्मीने तिचा चंचल स्वभाव सोडून आमच्या घरी कायमचे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा ठेवणे फारच भाबडेपणाचे ठरते. चांगल्या आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या बलोपासनेप्रमाणे लक्ष्मीपूजन दीर्घकालीन व शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. तो एक दिवसात उरकायचा कार्यक्रम नाही.
 यावर्षीच्या लक्ष्मीपूजनाची तयारी करायची झाली तर आपल्या मस्तकावर लक्ष्मीचा कितपत वरदहस्त आहे याच्या तपासणीपासून करावी लागेल. बऱ्याचजणांना स्वत:जवळ किती संपत्ती, गुंतवणुका आहेत याची माहिती नसते. श्रीमंत असो अथवा मध्यमवर्गीय; फार थोडय़ा व्यक्तींजवळ स्वत:च्या गुंतवणुकांची जंत्री उपलब्ध असते. या दिवाळीला स्वत:च्या गुंतवणुकांची एक यादी बनवता आली तर लक्ष्मी आराधनेची ती एक चांगली सुरुवात असेल. या वर्षी पूजेला लक्ष्मीची मूर्ती जरूर ठेवा, पण त्या लक्ष्मीच्या पायाशी तुमच्या गुंतवणुकांची ही यादी देखील जरूर ठेवा. एकदा यादी तयार झाली की आपण नक्की कुठे आहोत हे आपल्याला नक्की कळेल. आणि श्रीमंतीच्या दिशेने तुमची योग्य वाटचाल चालू होईल.
कोणतीही पूजा करताना काही नियम पाळावे लागतात. गणपतीला दुर्वा लागतात तर शंकराला बेलाची पाने. उलट करून चालत नाही. लक्ष्मी कितीही चंचल असते असे म्हटले तरी लक्ष्मीला शिस्तबद्ध भक्त अधिक प्रिय असावेत. वाटेल तशा आणि वाटेल तेव्हा केलेल्या (खरे तर आयकर वाचवायची शेवटची तारीख जवळ आली की घाईत केलेल्या) गुंतवणुका फारशा पसंत नसाव्यात. प्रत्येकाने स्वत:च्या आर्थिक उद्दिष्टांची एक यादी बनवावी आणि त्याला साजेशा गुंतवणुकांचा मार्ग चोखाळावा. माझा शेजारी ‘मुहूर्त ट्रेडिंग’ करतो, म्हणून मी केले पाहिजे किंवा इतर कुणी सांगितले म्हणून दरवर्षी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे नाही. काहीही कळत नसताना वायदे बाजारात डेरीवेटीव ट्रेडिंग केले पाहिजे असेही नाही. ज्याने कधीही अध्र्या दिवसाचाही उपवास केला नाही त्याने अचानक नवरात्रात नऊ दिवस कडक उपवास केला तर त्याचे काय होईल, हा विचार मनाशी आणून बघा. श्रीमंतीच्या दिशेने एकदम मोठी उडी मारण्यापेक्षा हळूहळू वाटचाल करणे केव्हाही श्रेयस्कर. कुठे व कसे पैसे गुंतवायचे हे ठरवण्यासाठी थोडी मेहनत जरूर घ्या. यासाठी तज्ज्ञांची (गुंतवणूक सल्लागारांची) मदत घ्यावी लागली तरी चालेल.  
एकदा तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या गुंतवणुकांची माहिती मिळाली की मग ठरल्याप्रमाणे पैसे गुंतवत राहणे हाच शिस्तबद्ध लक्ष्मी उपासनेचा एक भाग आहे. पूजा करताना काही स्तोत्रे-मंत्र म्हटले जातात. या वर्षी लक्ष्मीपूजन करताना सर्व स्तोत्रे जरूर म्हणा. पोथीदेखील वाचा व त्याचबरोबर एखादे गुंतवणूकसंबंधी पुस्तक विकत घ्या किंवा या संबंधीच्या एखाद्या लहानशा अभ्यासक्रमात  नाव जरूर नोंदवा. विशेषत: घरातील तरुण मंडळींना या मार्गाने जायला उद्युक्त करा. कोर्स पूर्ण केल्यास त्यांना एखादे बक्षीसदेखील देऊ  करा. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा मार्ग (काही वेळा) सरस्वतीच्या दरबारातून जातो हे विसरून चालणार नाही.
 दरवर्षी स्वत:च्या गुंतवणुकांचा आढावा जरूर घ्या. लक्ष्मीपूजन दरवर्षी असते. कारण तुम्ही दरवर्षी तुमच्या गुंतवणुकांकडे बघणे अपेक्षित असते. तुमच्या आर्थिक गरजा बदलतात, जोखीम घेण्याची कुवत बदलते, तसेच उत्पन्नाचे प्रमाणदेखील बदलते. या सर्वाचा मेळ घालून  श्रीमंतीच्या दिशेने वाटचाल करणे अपेक्षित असते. हेच खरे लक्ष्मीपूजन! पण येथेच थांबू नये. या दिवाळीला गरजू मंडळींना आर्थिक मदत देऊन दानयज्ञातदेखील थोडा सहभाग घ्यायला
हरकत नाही.