सुभाष अवचट

सुभाष अवचट.. चित्रकलेच्या दुनियेत मनमुक्त विहार करणारं कलंदर व्यक्तिमत्त्व. या साप्ताहिक सदरात ते शब्दचित्रं रेखाटणार आहेत.. सहवास लाभलेल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्यासोबतच्या आनंदयात्रेची!

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

मी मनमुक्त आयुष्य जगलो. आयुष्य जसं समोर आलं, तसं ते अंगावर घेतलं. जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत भरभरून रस घेतला. जंगलं फिरलो, गावं भटकलो, नगरं समजून घेतली, देश-विदेशांत हिंडलो. हे करताना माणसं भेटत गेली. त्या माणसांच्या या गोष्टी!

एकोणीसशे नव्वदपर्यंत मी पुण्यात राहत होतो. ते पुणं वेगळंच होतं. आता पूर्ण बदललं आहे. माझं घर प्रभात रोडवर पंधराव्या गल्लीत. बाजूच्या गल्लीत व्यंकटेश माडगूळकर, दोन गल्लय़ा सोडून पु. ल. देशपांडे, समोरच्या बाजूला भीमसेन जोशी आणि मागच्या बाजूला एस. एम. जोशी.. सारे नेहमी भेटणारे. सायंकाळी पुलं फिरायला निघायचे. त्यांना फिरायचं वगैरे नसायचंच. ते चालता चालता घरी यायचे. गप्पा मारता मारता उशीर झाला की मग मला सांगायचे, ‘‘सुभाष, तुझं बरं आहे रे, तुझी बायको घरात आहे. पण सुनीताचं काय?’’ मी सुनीताबाईंना फोन करून सांगायचो, ‘‘भाई माझ्याकडे आहेत.’’ त्याही म्हणायच्या, ‘‘माहितीय मला.. तो तुझ्याकडेच येणार. थांब, तुझ्या बायकोला सर्व करायला लागेल. मीच डबा घेऊन येते.’’ असं सुंदर वातावरण होतं. कधी कधी वसंतराव देशपांडे यायचे, भीमसेन जोशी यायचे. गप्पांच्या मैफिली झडायच्या. घरी बायको व दोन लहान मुलं होती. नुकताच संसार सुरू झाला होता. व्यंकटेश माडगूळकर तर रोजच भेटायचे. त्यांना सारे ‘तात्या’ म्हणायचे. तात्यांची व माझी गट्टी होती. ते मला ‘काय मितरा?’ म्हणून हाक द्यायचे. मीही त्यांना काय, ‘तात्या मितरा’ असा हाक मारीत असे. मी विचारायचो, ‘काय चाललंय सध्या?’ त्यांचं उत्तर असायचं- ‘मितरा, करमवून घेतोय बघ.’ या सगळ्या सर्वार्थाने मोठय़ा असलेल्या मंडळींनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. का केलं, ते सांगता येत नाही.

तात्या आणि मी संध्याकाळी कॉमर्स कॉलेजपर्यंत फिरायला जायचो. आमच्या दोघांच्या आवडी सारख्या. भटकंती, शिकार आणि चित्रं! तात्या हे खरं तर चित्रकारच. त्यांनी लेखनातून चित्रं काढली. आम्ही हिंडत असायचो. तात्यांची बॅग कायम भरलेली असायची. त्यात सोबत कॅमेरा आणि बंदूक. म्हणायचे, ‘‘मितरा, चल जाऊ.’’ आम्ही निघायचो. कधी सिंहगडावर, कधी भोरला. एकदा तर पुणे स्टेशनवर गेलो आणि तिथून थेट केरळला गेलो.

एकदा तात्यांचा फोन आला, ‘मितरा, चल.’ मी- ‘कुठं?’ ‘मेळघाटला.’ मी तात्यांच्या घरी गेलो. तात्यांसमोर एक गंभीर गृहस्थ बसलेले. तात्यांनी ओळख करून दिली.. ‘हे मारुती चितमपल्ली. हे वनाधिकारी आहेत.’ ती आमची पहिली भेट. आम्ही मारुतरावांच्या जीपने मेळघाटला जायला निघालो. गप्पांत असं ठरलं- आपण तिघांनी मिळून एक पुस्तक काढायचं. मेळघाटात राहायचं.. पक्ष्यांचा, प्राण्यांचा अभ्यास करायचा.. चित्रं काढायची. हवेत विरलेल्या अनेक गोष्टींसारखी ही कल्पनाही नंतर विरून गेली.

आम्ही आधी मारुतरावांच्या घरी गेलो. मारुतराव म्हणजे विलक्षण गंभीर आणि तसे अबोल गृहस्थ. मध्यम बांध्याचे. व्यवस्थित विंचरलेले केस. जुन्या वनाधिकाऱ्यासारखे दिसणारे! जंगलातली प्रत्येक गोष्ट त्यांना ठाऊक. कानावर आवाज पडला की तो कोणत्या पक्ष्याचा किंवा प्राण्याचा आवाज ते सांगायचे. संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचं सरकारी घर खूप मोठं होतं. गोल कौलांचं छप्पर असलेलं घर होतं. घरी त्यांची लहान मुलगी होती. तिनं भिंतीवर लांब लांब वेल्वेटची पिसं असणाऱ्या शेंगा लावून ठेवलेल्या होत्या. भिंतीवरच वारली चित्रं रंगवलेली होती. आम्ही बाहेर वडाच्या झाडाखाली बसलो. व्हिस्कीचे ग्लास भरले. मारुतराव एकदम सोवळे. त्यांना मद्यपान वज्र्य. गप्पा सुरू झाल्या. तेवढय़ात झाडावरून काहीतरी खाली पडलं. मारुतराव म्हणाले, ‘हा बेडूक होता.’ झाडावर बेडूक बसतो, हे मला पहिल्यांदा कळालं. जेवण झालं. झोपायची तयारी झाली. मध्यरात्र होत आलेली. मारुतराव थोडय़ा ओशाळ्या आवाजात म्हणाले, ‘बारा वाजत आलेले आहेत. तुम्हाला थोडासा त्रास होईल.’ मी विचारलं, ‘कसला त्रास?’ ‘बरोबर बारा वाजता या भिंतीवरच्या शेंगा आहेत ना, त्या फुटतील.’ मी अविश्वासाने पाहत राहिलो. बारा वाजले आणि त्या ठोक्याला फटाक्यांची माळ लागावी तसा आवाज करत त्या शेंगा फुटल्या. निसर्गाची ती किमया मला विस्मयचकित करून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघं मेळघाटात जायला निघालो. मेळघाट फार गुंतागुंतीचा. पाच- सहा डोंगर एकत्र आलेले. मध्ये छोटंसं मैदान. त्यातही डोंगर एकमेकांत घुसलेले. त्यातून वाट असलेली. सगळा भूलभुलैय्या तयार झालेला. आमची जीप चाललेली. तात्या आणि मारुतराव पुढे बसलेले. मागे मी आणि माझ्या बाजूला डिझेलचे दोन ड्रम. त्याच्या वासाने मी त्रासलो. ‘तात्या, हे काय आहे?’ ते हसले. जसजसं जंगलाच्या आत आत जायला लागलो, तसतसं उंच उंच गवत लागलं. हत्ती गवत. अर्जुनाची भलीथोरली झाडं दिसली. ड्रायव्हरला तो भूलभुलैय्या कसा पार करायचा ते माहिती होतं. प्रवास करत करत आम्ही मेळघाटात जिथं राहणार होतो, तिथं पोहोचलो. कित्येक एकराच्या जंगलात एक टेकडी. त्या टेकडीवर एकच एक असा ब्रिटिशकालीन सरकारी बंगला. त्या बंगल्यात एक खानसामा आणि वायरलेस. दुसरं कोणीही नाही. बंगल्याच्या प्रशस्त व्हरांडय़ात आम्ही बसलो. जंगलातली संध्याकाळ वेगळी असते. काळोख पडला की प्रकाश-सावल्यांचे खेळ सुरू होतात. प्रकाशात दिसलेली झाडं काळोखात वेगळाच आकार घेतात. नवनवी इल्यूजन्स तयार होतात. व्हिस्कीचे घुटके घेत असताना तात्या म्हणाले, ‘मितरा, जंगलातला नियम लक्षात आहे ना?’ मी ‘हो’ म्हणालो. हा नियम साधा होता- मद्य कमी प्यायचं. नाही तर शिकाऱ्याच्या डोक्यात इल्यूजन्स तयार होतात. गप्पा सुरू झाल्या. खानसामा जेवण बनवत होता. जंगलातले आवाज सुरू झाले. एकदम मोठा आवाज कानावर येऊन पडला. मारुतराव म्हणाले, ‘हा माकडांचा आवाज आहे. याचा अर्थ जवळच कुठेतरी वाघ आलाय. वेगवेगळे पक्षी, प्राणी वाघाच्या आगमनाची वर्दी देतात. काय त्याचा रुबाब असतो!’ असं काही काही ते सांगत होते. एवढय़ा दूर जंगलात विजेचा लपंडावही सुरू होता.

मारुतराव म्हणाले, ‘उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. जेवून झोपू आता.’ ते जरा खाजगी आवाजात म्हणाले, ‘पण एक सांगू का तुम्हाला? या बंगल्यात एक भूत आहे.’ मी ओरडलो, ‘तात्या, हे लईच इंटरेस्टिंग व्हायला लागलंय. मला भूतं जाम आवडतात. सांगा गोष्ट.’ माझं बालपण ओतुरला गेलं. तिथं जुने वाडे, जुनं वातावरण. मला भूतं बघायची इच्छा तर होतीच. मी लहानपणी खूप प्रयत्न केले, पण कधी दिसलीच नाहीत. आज संधी आली होती.

मारुतराव सांगायला लागले, ‘या भागात कोरकू आदिवासी खूप. तर त्यांच्यात एक सुंदर मुलगी होती. तिला आई नव्हती. ती नेहमी या परिसरात यायची, फिरायची. तिच्या पायात घुंगरू होते. त्यांचा आवाज करत ती सगळीकडे भिरभिरायची. तिचा मृत्यू कसा झाला वगैरे काही कुणाला ठाऊक नाही. पण आजही रात्र झाली की ती या बंगल्याच्या परिसरात फिरते. तिच्या घुंगरांचे आवाज येतात. तुम्ही घाबरू नका. झोपा.’ तात्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांच्याकडे. जेवणं झाली. पलंगांना मच्छरदाण्या लागल्या. आमच्याकडे दोन टॉर्च देऊन मारुतराव डोक्यावरून पांघरूण घेऊन घोरू लागले. त्यांची झोप हुकमी. आम्ही दोघे जागे. तात्या मला म्हणाले, ‘अरे, रात्री मला दोनदा शूला जावं लागतं.’ तो जुना बंगला. बाथरूम बेडरूमपासून लांब होती. दोन-तीन खोल्या ओलांडून जावं लागे. मी म्हणालो, ‘मी आहे, येईन तुमच्यासोबत.’ तेवढय़ात वीज गेली. अगदी चित्रपटासारखं वातावरण निर्माण झालं. वारा होताच. तेवढय़ात तात्या म्हणाले, ‘सुभाष, तुला आवाज येतोय का?’ खरंच घुंगरांचा आवाज येत होता. खिडकीजवळून. खिडकीजवळून तो आवाज छतावर गेला. मी- ‘हो, येतोय आवाज. इल्यूजन वगैरे नाहीये,’ असं म्हणालो. तेवढय़ात आवाज बंद झाला. तात्या म्हणाले, ‘चल, शूला जाऊन येऊ.’ मी हातात टॉर्च धरून त्यांच्याबरोबर गेलो. वीज नव्हतीच. ते बाथरूममध्ये गेले. परत आवाज यायला लागला. आम्ही बेडरूममध्ये परतलो. थोडा वेळ गप्पा मारल्या. मला भूत बघायचं होतं. तात्यांना झोप नव्हती. घुंगरांचा आवाज सुरू होता. आम्ही दोघेही- ‘ती मुलगी दिसलीच तर तिच्याशी बोलू..’ अशा गप्पा मारत बसलो. उत्तररात्र सुरू झाली. तात्या पुन्हा एकदा शूला जायला निघाले. मी त्यांच्याबरोबर टॉर्च धरून होतो. ते आत गेले, तर बाथरूमच्या जवळून घुंगरांचा आवाज यायला लागला. आम्ही परतलो. तात्या म्हणाले, ‘अरे, एवढा फिरलोय, पण हा असा घुंगरांचा आवाज वगैरे पहिल्यांदाच अनुभवलाय.’ आवाज बंद झाला. ‘चल, तू झोप. मीही झोपतो.’ आम्ही झोपून गेलो. घुंगरंवाली मला काही दिसली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर मारुतराव दाढी करत बसलेले. त्यांच्याकडे जुन्या जमान्यातल्या स्त्रियांकडे बांगडय़ा-कुंकवाची पेटी असायची ना तशी पेटी होती. तिच्यात वेगवेगळ्या खणांत दाढीचं सामान, कंगवा, तेल असं सारं व्यवस्थित ठेवलेलं होतं. तिच्या झाकणाच्या आतल्या बाजूला आरसा होता. (आजची व्हॅनिटी बॅगच!) त्या आरशात पाहून ते काळजीपूर्वक दाढी करत होते. मी म्हणालो, ‘तुमच्या भूतानं मजा नाही आणली बुवा. घुंगरांचा आवाज ऐकला, पण ती सुंदर बाई काही भेटली नाही.’ ते डोळे मोठे करून बघत राहिले. त्यांचा या गोष्टींवर विश्वास.

खानसाम्यानं आम्हाला खायला काहीतरी आणून दिलं. डाक बंगल्यातलं जेवणघर बंगल्याच्या बाहेर एका टोकाला असतं. मी खानसाम्याजवळ गेलो. त्यानं जेवण, ब्रेकफास्ट कसा होता वगैरे विचारलं, तर ते छान होतं वगैरे बोलून मीच त्याला विचारलं, ‘काय रे, तू इथं एकटा राहतोस. रात्री कुठं झोपतोस? तुला रात्री घुंगरांचा वगैरे आवाज येत नाही का?’

तो म्हणाला, ‘साहेब, येणारच आवाज. ते माझं लाडकं मुंगूस आहे. त्याच्या पायाला मी लाडानं घुंगरू बांधलेत. रात्र झाली की मी त्याला सोडतो. ते मुंगूस सापाच्या शोधात रात्रभर इकडे तिकडे फिरत राहतं. छतावर जातं. सकाळी मी त्याला परत बांधतो. ते बघा, तिकडं बांधून ठेवलंय त्याला.’

आयला! हे मारुतरावांचं भूत?

मी मारुतरावांकडे गेलो व त्यांना म्हणालो, ‘अहो, ती बाई वगैरे काही नाही. ते मुंगूस आहे.’ मारुतराव बघत बसले. ‘नाही हो, ते खरं आहे.’ मी खानसाम्याला हाक मारली, ‘अरे, तुझी ती घुंगरुवाली बाई घेऊन ये.’ तो मुंगुसाला घेऊन आला. त्याला खाली सोडलं. त्याच्या पायातला घुंगरांचा आवाज ऐकून मी म्हणालो, ‘आहे की नाही तोच आवाज?’ मारुतराव म्हणाले, ‘अरे, सुभाष, तुझ्या लक्षात आलं, पण माझ्या लक्षात कसं आलं नाही हे?’

मी म्हणालो, ‘जाऊ द्या हो. आज रात्री दुसऱ्या कोणत्या भूताची गोष्ट सांगणार?’

ते दीर्घ विचार करून म्हणाले, ‘पुन्हा कधीतरी सांगेन..’

Subhash.awchat @gmail.com