News Flash

रफ स्केचेस : फॅन्टसीज

ही संध्याकाळ जुन्या शिल्लक राहिलेल्या वॉटर कलर्सची पॅलट आहे.

|| सुभाष अवचट

बँडस्टँडच्या समुद्रावर सूर्य अस्तास जातो, तसे स्टुडिओतले रंग बदलत जातात. ही सायंकाळ गर्द राखाडी रंग घेऊन उराशी येते. झाडंदेखील आपापली पानं मिटवत झोपेच्या तयारीत असतात. फांद्यांत लपलेले पक्षी पोटाशी पंख घेऊन, चोचीतलं गाणं गिळून, गर्द पानांमध्ये डोळे मिटतात. ही खरी तर प्रार्थनेची वेळ असते. अशा वेळी मी स्वत:भोवती फेरफटका मारतो; जशा गत्र्या स्त्रिया संध्याकाळी घरसंसाराच्या गराड्यातून सरसं करून, पावडर-कुंकू करून गावाबाहेरच्या मंदिराकडे पाय, मन मोकळं करून येतात.

अशा संध्याकाळी कुठं जायचं? त्यात जाण्याचं ठिकाण ठरलेलं नसतं. रस्त्यावरून चालताना पेंटिंगमध्ये अकारण उतरलेले रंग-रेषांचे गुंते माझ्या जीन्सच्या फाटक्या खिशातून गळत जातात. उरलेसुरले स्टुडिओच्या पायऱ्यांवर घरंगळत जातात. मी हलका आणि आनंदी होत दरवाजा उघडून आत येतो आणि थोडा वेळापूर्वी पारोसे वाटणारे पेंटिंगमधले रंग नाहीसे झालेले असतात. ही वेळ स्ट्रेंज असते. अगदी करकरीत तिन्हीसांजा. माझी आई मला म्हणायची, ‘‘अरे, तू अमावास्येला तिन्हीसांजेला जन्मलास. सूर्य मावळला की तुझ्या अंगात कुठलं तरी भूत शिरतं.’’ मी सूर्याचा भक्त असावा. दिवसभर ताजातवाना असणारा मी यावेळी सैरभैर होतो. चैतन्य अंमळ उदास होते. ही उदासी स्टुडिओवर, पेंटिंग्जमध्ये, आसपास फिरत राहते. अशा वेळी मी खिडकीत उभा राहतो. माझ्यातलाच आवाज मला म्हणतो…

 

ऐक!

किनाऱ्यावरच्या काळोखावर इमारतींचे चोरटे प्रकाश

आकाश आणि समुद्रामध्ये, अंधाराचीच अंधाराला टेकलेली काळी रेघ

मनात अदृश्य मनाच्या उघडझाप करणाऱ्या खिडक्या, श्वासांचे प्रतिध्वनी,

समोरचा फोन वाजेल,

रिमोट दाबला तर टी. व्ही,

कॅसेट बदलली तर गाणे,

उठून किचनमध्ये गेलो तर रमचा ग्लासही भरता येईल;

काडी उजळली की सिग्रेट पेटेल,

डोअरबेल वाजल्यासारखी वाटतेय; कोण येणार माझ्याकडे अशावेळी?

खात्री करावी म्हणून दार उघडले,

तर दारात अंधार उभा!

मला ढकलूनच तो आत आला, घरभर फिरला;

दिव्याचे बटन ऑन करून, माझ्यासमोर खुर्चीत बसला

आणि म्हणाला,

अंधारात रस्ता चुकलेल्या एका छोट्या पोराची गोष्ट तुला सांगतो, ऐक!!

अशा कल्पनेमध्ये रमणं ही निसर्गानं मला दिलेली बर्थडे गिफ्टच म्हणावी लागेल. जशा सायंकाळच्या राखाडी छटा बदलत बदलत रात्रीकडे झुकतात, तशी ही बेभरवशी उदासी उदबत्तीच्या धुरासारखी खिडकीबाहेर जाते. मीच निर्माण केलेल्या आभासाच्या मच्छरदाणीत मी झोपून जातो. सकाळी मी उठतो. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हात मला प्रश्न पडतो, मी आहे कुठं? कोणाच्या घरात? कोणत्या शहरात? कोणाबरोबर मी झोपलो? सवयीनं मला याचा धक्का बसत नाही. वास्तविक मी तर माझ्या स्टुडिओमधल्या सोफ्यावर अवघडून झोपलो होतो. विचित्र समुदाय माझ्याभोवती आहे. तो मी पाळलेला नाही. यातले भरदुपारी बेडरूमचे पडदे ओढून, सायंकाळ झाली म्हणून रोमान्स करणारे असतात. वर्तमानपत्रात छापलेल्या आदिवासी मुलीच्या कवितेवर मॉर्निंग टीचा कप ठेवून टीव्ही पाहून हेच प्राणायाम करतात. सकाळी, संध्याकाळी रस्त्यात चालणाऱ्या शेजाऱ्यालाही ओठातल्या ओठात हे ‘हॅलो’ म्हणत नाहीत. मला वाटतं, तुम्हीच पोखरलेलं, स्वत:भोवती बांधलेलं हे दुष्ट वारुळ आहे. त्याला लागलेल्या मुंग्या, वाळवी उद्ध्वस्त करायला, खायला तुम्हीच जोपासलेलं हे अस्वल कधी कुठल्या संध्याकाळी येईल याचाही तुम्हाला भरवसा नाही.

ही संध्याकाळ जुन्या शिल्लक राहिलेल्या वॉटर कलर्सची पॅलट आहे. त्यात मीडिऑकर ईगो कधीच विरघळून गेलेले आहेत. त्याला आयुर्वेदातही उपाय नाहीत. श्वास सोडा, धरा- तरीही या जुन्या जखमेला इलाज नाही. आपल्याच स्वभावानं ती चिघळत जाते. संध्याकाळच्या या प्रार्थनेत हे समजून घ्यायला हवं. कोणाला दुष्ट वाटते ही सायंकाळ! त्याला इलाज नाही. मी तर कधीच तिच्याशी समझोता केला आहे. मला दिसतं ते हे जग नाही. मला जाणवतं तेही हे जग नाही. त्यातलं एकुलतं एक प्रेम, ते मिळाल्यानंतरच्या निष्ठुर प्रेमातली जेलसी, त्यातली पॅशन, पॅथॉस गळून जातात. पण मला भोवती माझंच विश्व तयार करायला याच करकरीत तिन्हीसांजेनं मदत केलीय. ती अशी की, माझ्यातला मी दिवसा आणि रात्री दुसरा हा ओव्हर टाइमचा बोनस आहे. या अशा अस्तास गेलेल्या वेळेत बाजार, गल्ल्या, बार्स, समुद्रकिनारे फुलतात खरे; पण ते नेमक्या त्या मुहूर्तावर ते चक्र अवलंबून असतं. हे प्रत्येक सेन्सेटिव्ह माणसांचे वैयक्तिक अनुभव असतात. सूर्योदय, सूर्यास्त हे चक्र काही काळ पावसाळ्यातले ढग लपवतात. अशा वेळी मी स्टुडिओमध्ये नसतो. पॅरोलवर सुटल्यासारखा पावसाचा पाठलाग मी करीत आलो आहे. अशा वेळी काही करायचे नाही. फक्त पाऊस अनुभवायचा. तो थांबू नये म्हणून भिजल्या कपड्यांत प्रार्थना करायची. तो जपला की तुम्ही तुम्हालाही माहीत नसलेल्या एका अलौकिक पातळीवर पोहचू शकता. त्याला गुरूच्या मदतीची गरज नसते. पावसाचा तो दैवी आवाज. दिवस आणि रात्र त्या ढगांमध्ये विरघळून गेली आहे. सारं कसं अधांतरी झालंय. हा तर त्यावेळेचा रोमान्स आहे. विजांच्या कडकडाटात दुपारीच झाकोळलेला सूर्य, त्यातून निर्माण झालेली हुरहूर माझ्या भावविश्वात, पाण्यात रंग विरघळत जावे तशी सायंकाळ, रात्रीला आपले रंग देते. यासाठी अमावास्येलाही जन्माला यायला हवे.

मी खुर्चीत बसलो आहे. दिवेलागण झाली असावी. आणि मला वाटते,

 

‘‘हा कोण पाहतो माझ्याकडे?

शेजारी उभा कोण, अंगावरून मघाशी गेला;

कॉलनीच्या नाक्यावर हा उभा होता.

बस स्टॉपवर सकाळी, दुपारी, रेस्टॉरंटच्या काऊंटरपाशी हा उभा

पब्लिक बूथमधून कोणास फोन करतोय हा?

चर्चगेटला फास्ट लोकलमध्ये घाईत शिरला

थिएटरमधून झर्रकन् बाहेर पडला; लिफ्टमध्ये अचानक आला,

दुधाच्या रांगेत, पोस्ट ऑफिसात, बँकेत, शाळेच्या गेटपाशी,

जॉगर्स पार्कमध्ये

माझ्यामागे कोण पळतोय हा?

अपरात्री टॅक्सीत परतताना, ड्रायव्हरच्या सीटमध्ये कोण बसलंय?

लॅच-कीने फ्लॅटचे दार उघडावे

पंखा सोडून, घामेजलेले, दमलेले शरीर

बेडवर झोकून द्यावे तर,

माझ्याच अगोदर, माझ्याच रिकाम्या बेडवर

हा झोपलेला-

कोण आहे, कोण आहे हा?’’

 

हे तर संध्याकाळचे फेरफटके आहेत. ही फॅन्टसी कालातीत आहे. ती स्वयंभू आहे. ती लहान मुलांमध्ये प्रकर्षाने दिसते. ते त्यांच्या या विश्वात स्वत:शीच खेळत राहतात. अठराशे नव्वद साली आयरीश लेखक ऑस्कर वाईल्ड अशाच फॅन्टसीमध्ये रमला आणि त्याने ‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ नावाचं जगप्रसिद्ध पुस्तक दिलं. पेंटिंगमधल्या त्या व्यक्तीजवळ त्यानं तारुण्य मागितलं. त्याला त्याच्या बदल्यात त्याने स्वत:चा आत्मा दिला आणि मग शोध सुरू झाला. त्याच्यावर गदारोळ झाला. उलटीसुलटी टीका झाली. त्यावर चित्रपट निघाला. पण त्यातून वाईल्डची ही फॅन्टसी अजून टिकून आहे. वॉल्ट डिस्नेने असाच मिकी माऊस जगाला दिला, आणि मर्ढेकरांनी पिपातले उंदीर. शेक्सपिअरने ‘टू बी ऑर नॉट टू बी’चे हॅम्लेटच्या तोंडी वाक्य दिले. तुकारामाचं पुष्पक विमान, किंवा सर्वांच्या हातात असलेलं आत्ताचं हॅरी पॉटर असेल; ही सारी माणसे कदाचित अशाच खुर्चीत बसली असावीत. त्यांच्या मनातली ही कॅरेक्टर्स, त्यांच्या अनुत्तरित विचारांची ही वटवाघळे अशाच संध्याकाळी बाहेर पडली असावीत.

या फॅन्टसीज् आपल्याला आऊट साईड ऑफ द बॉक्स नेतात. सर्जनशीलतेचं एक नवीन दालन उघडतात. प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात. हीच स्वप्नं जगाला नवीन रूपाची ओळख करून देतात. त्यातून नवीन साहित्य, चित्रं, सिनेमे, फिलॉसॉफीचे नवीन अर्थ तयार होतात. मला अजूनही ‘पीटर पॅन’ हे पुस्तक जवळचं वाटतं. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’, नाही तर आपले ‘चांदोबा’ मासिक, ‘द वंडरफुल विजार्ड ऑफ ओज’ हे एकोणीसशे साली लिहिलेलं पुस्तक भुरळ घालतं. मग समजतं की, खरं पाहिलं तर जीवन हे फेअरी टेल्ससारखं आहे. त्यात सुख, दु:ख, पश्चाात्ताप, मृत्यू, तारुण्य, साहस यांचं अद्भुत मिश्रण असतं.

या भ्रामक दु:खात वेगानं वारे फिरतात. ते पालटून टाकतात माझेच, माझ्यावरचे चेहरे. आरशात पाहिलं तेव्हा त्यात होती अनोळखी प्रतिमा. या जुन्याच चेहऱ्यावर आपली हसरी नवीन उपमा, असं वाटतं. त्या दु:खात वेगानं फिरावं, वारे ओलांडून एकदाच जाऊ देत मनातली अधांतरी दारं, या फॅन्टसीज् सर्वांना येत असाव्यात. बहुदा त्या सेक्शुअल असतात. त्या आल्या तरीही त्याचा कलेत उपयोग करून घेणारा कलाकार हा योगीच असावा लागतो. अन्यथा तुमच्या मनातल्या कल्पनांना तोंडवळा नसतो. पुरावा नसतो. सत्य आणि असत्याच्या या भ्रामक चक्रात खरं-खोट्याला पुरावे लागतात. त्या फॅन्टसीवर तुमची श्रद्धा असावी लागते, हे मला लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी शिकवलं. चित्रं, लिखाण, शिल्पं ही त्याची काही रूपं. चारशे चाळीस व्होल्टच्या विजेच्या खांबाला स्पर्श केला तर माणूस मरतो, हे सत्य होय. फॅन्टसीमधील तरंगते विचार चित्रांतून, कथा-कादंबऱ्यांतून येतात. त्याला हे नियम कसे लागू होतील? जेम्स बॉण्डचे सिनेमे हेच उत्तर आहे. प्रत्यक्ष जगात आपल्या मनात दडपलेल्या भावनांना, रागाला पडद्यावर जेव्हा बच्चन व्हिलनला मारतो तेव्हा टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकातील दडपलेल्या मनाला एक भ्रामक जस्टिस मिळतो. ही दुहेरी मनातली फॅन्टसी आहे.

विचित्र प्रतिमांनी मनात चित्रफितीप्रमाणे दृश्यं फिरत राहतात. त्यात लंगडी घालतानाचं बालपण असतं. नदीच्या किनाऱ्यावर चितेवर जळणाऱ्या वडलांच्या पार्थिवाला लपेटलेल्या ज्वाला असतात. माझ्याच जन्मलेल्या पाळण्यातल्या मुलांकडे पाहताना मनातल्या न समजणाऱ्या भावनांचे कोलाज असतात. घरात अडचण नको म्हणून गावाबाहेरच्या विराण मंदिरात एकतारी हातात देऊन सोडलेल्या आंधळ्या आजोबांचा चेहरा असतो. दुपारी मैत्रिणीच्या घरात पहिला किस घेताना अंगात असलेला थरकाप असो, गावातल्या राजकारणाला, अफवांना कंटाळून गाव सोडून वेशीबाहेरच्या रस्त्यावर हातात बॅग घेऊन चालणारी कष्टाळू एकटी शिक्षिका असो, कोठलाही त्रास न देणारं, आजोबांसारखं देवळापाशी उभं असलेलं ओलं लिंबाचं झाड करवतीनं कापणारे गावकरी असोत, भरदुपारी गल्लीत रस्ता ओलांडणाऱ्या मांजरीची धुळीत सरकणारी सावली असो, महाबळेश्वारच्या ऑर्थर स्ट्रीटवर पावसाळ्यात दाटलेल्या ढगांत दरीत झोकून आत्महत्या करणारा प्रवासी असो, बर्फात गुंतलेली डॉ. झिवॅगोची लाराची धून असो, भरदुपारी समुद्रकिनाऱ्यावर बेभान नाचणारा झोर्बा असो, पंढरपूरच्या पायऱ्यांवर पायांना भेगा पडलेले झोपलेले वारकरी असोत, हवेत प्रवास करणारे गंधर्व असोत, खोल समुद्राकाठच्या गावातल्या देवळातून लाटांच्या गाजेत मिसळलेले भजन असो, नाहीतर नारळाच्या झावळ्यांतून वाऱ्याबरोबर वाहणारा लगन गंधार असो, समईच्या ज्योतीपाशी थांबलेली देव्हाऱ्यातली एकाग्र शांतता असो, मध्येच एकमेकांत हलणारे पॅलेटवरचे रंग असोत, त्यात फिरणारे साधू असोत, भीक मागणारे हसरे भिकारी असोत, वेदना लपवून अंगविक्षेप करणारा सर्कशीतला विदूषक असो, खिडकीच्या काचेला पावसाळ्यात चिकटलेली ओली पाने असोत, की पु. शि. रेग्यांच्या कवितेवर उपडी झालेली काळ्या शाईची दौत!

या फॅन्टसीचा भरवसा नाही. श्वास धरा- सोडा, तरीही ती जुनी होत नाही. त्यात ॐचा उद्गार नाही की चर्चच्या ऑर्गनचा आवाज नाही. ती तरल, जन्मापासून खोल मनभर फिरत राहते.

या स्टुडिओत तीच मला सांगते, ‘‘चल, थोडं फिरून येऊ या!’’ गर्दीतल्या खिशामध्ये तीच ठेवते परतीचं तिकीट. इथंच समजलं मला या ऋतूंनी किती चेहरे दिले मला? प्रवासात संथ श्वासांचे हिरवे गाणे पुन्हा कधी रचले? कोणत्या ऋतूत ते माझ्यासाठी कोणी गायले?

Subhash.awchat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 12:07 am

Web Title: rough sketches fantasies bandstand akp 94
Next Stories
1 अरतें ना परतें… : लेखकाचा तिसरा डोळा
2 मोकळे आकाश… : राईट-ऑफ
3 अंतर्नाद : अझान, गिनान आणि सोज-मर्सिया
Just Now!
X